खेळघरातले कलेचे प्रयोग

रेश्मा लिंगायत

मे-जून २०१२ मध्ये पालकनीती आणि सु-दर्शन कला मंचानं आयोजित केलेल्या ‘चित्रबोध’ या दृश्यकला-रसग्रहणवर्गामध्ये आम्ही खेळघरातल्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर खेळघरातल्या मुलांबरोबर करून बघण्यासाठी अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचू लागल्या. तेव्हा प्राथमिक, माध्यमिक आणि शालाबाह्य अशा सर्व वयोगटातल्या मुलांबरोबर कलेचे उपक्रम घ्यावेत असं ठरलं. माझ्यासाठी हे आव्हानच होतं. पण मी ते स्वीकारलं आणि कामाला लागले.
SPM_A0272.jpg

‘कला’ म्हणजे फक्त चित्रकला, पेन्सिल-खोडरबर आणि तेलीखडू, रंग अशा साचेबद्ध विचारांच्या पलीकडे जायची माझी इच्छा होती. मुलांनी खूप काही बघावं, ऐकावं, करून बघावं, त्यांना बोलायची संधी मिळावी असं मला वाटत होतं. रोजच्या, त्याच त्याच वाटणार्याे गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या कितीतरी वेगळ्या, सुंदर दिसू शकतात, या अनुभूतींपर्यंत त्यांना बोट धरून न्यावं असं मला वाटत होतं.
ह्यासाठी घेतलेले काही उपक्रम असे होते –

पाण्यानं चित्रं काढणं

खेळघरातल्या भिंतींवर जिथं जिथं शक्य आहे, तिथं तिथं फळे रंगवलेले आहेत. फळ्यावर खडूनं लिहिलेलं आपण जेव्हा पुसतो तेव्हा खडूच्या धुळीचा एक थर फळ्यावर जमलेला असतो. बोटांनी त्यावर चित्रं काढली तर… एके दिवशी मला सुचलं, नि त्याच्यापुढं जाऊन त्यावर पाण्यानं चित्रं काढण्याची कल्पनाही सुचली.

शालाबाह्य आणि प्राथमिक गटाच्या मुलांना हातात खडू, पेन्सिल धरून लिहायची सवय झालेली नसते. मात्र बोटांनी धुळीत – वाळूत रेघोट्या मारणारी लहान मुलं मी अनेकदा बघितली होती.
त्यांना मी जेव्हा सांगितलं, ‘आज आपण फळ्यावर किंवा पाटीवर पाण्यानं चित्रं काढायची आहेत’, तेव्हा मुलांच्या चेहर्यायवर मोठं प्रश्नचिन्ह उमटलं. मग मी पाण्यात बोट बुडवून चित्र काढून दाखवलं. मुलांना समजलं, रंगाऐवजी पाणी वापरून आधी एका बोटानं, मग दोन बोटांनी अशा पद्धतीनं त्यांच्या आवडीची चित्रं काढण्यात मुलं गुंग होऊन गेली. शालाबाह्य गटातली मुलं आधी पाण्याबरोबर खेळली. त्यांनी पाणी पाटीवर शिंपडलं, पसरवलं आणि नंतर वेगवेगळी चित्रं काढण्यात ती दंग झाली. आपण काढलेलं चित्र लगेच नाहीसं होतंय याची त्यांना खूपच मजा वाटली. परत परत चित्रं काढून ती हा नवा अनुभव घेत होती.

SPM_A0218.jpg

प्राथमिक गटातही मुलांना ही कल्पना खूप आवडली आणि त्यांनी ही त्याची मजा अनुभवली. चित्र काढता काढता त्याविषयी बोलून ती माझं लक्ष वेधून घेत होती. माध्यमिक गटातल्या मुलांनीही लगेच प्रयत्न केला. त्यांना सुरुवातीला बोटं फार सहजपणे फिरवता येत नव्हती. पण हे नाविन्य त्यांना आवडल्यामुळं त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना जमलं. त्यांनी मला सांगितलं की ‘आम्ही पूर्वी कधीच असं चित्र काढलं नव्हतं.’

बोटानं रंगीत चित्र काढणं

वर्गात मी मुलांना सांगितलं की ‘आज आपण ब्रशऐवजी बोटं वापरून चित्र काढायची आहेत.’ त्यांच्या मनात बरेच प्रश्न आले आणि त्यांनी ते विचारले देखील. ‘कसं काढणार? मग बोटाला रंग लागेल ना!’ असे अनेक सूर ! सुरुवातीला मी रंगात बोट बुडवून बोट बाहेर काढताना निथळून कसं काढायचं, कसं बोट धरलं की जाड रेष येते, कसं धरल्यावर बारीक रेष येते हे दाखवलं. मग मुलं अशी काही रंगून गेली की बस ! हाताच्या हालचालीवर नियंत्रण कसं ठेवायचं, चुका झाल्या तर कशा सुधारायच्या, रंगाचा स्पर्श कसा असतो, याबद्दल कोणत्याही सूचना देणं मी कटाक्षानं टाळलं आणि त्यांचे त्यांना सर्व अनुभव घेऊ दिले. मला असं वाटतं की इतरांनी दिलेला उसना आनंद फार काळ टिकत नाही, थोड्या वेळानं विरून जातो. पण स्वतः एखादी गोष्टी अनुभवली की मिळवलेला आनंद खूप काळ टिकतो.

रेषांची मजा

त्या दिवशी मी माध्यमिक गटासाठी ‘रेषा’ हा विषय मनात घेऊनच वर्गात गेले होते.

DSC_0928.JPG

मी फळ्यावर एक रेषा (|) आणि एक टिंब (.) काढलं. आणि मुलांना म्हटलं, ‘‘आज आपल्याला हे दोन आकार वापरून चित्रं काढायची आहेत.’’ मुलांना कळेचना ‘म्हणजे नक्की काय करायचं?’ त्यांच्यासाठी ही एकदम नवीन कल्पना होती. ती गोंधळून गेली. मग मी स्वतः फळ्यावर काही चित्रं काढली. पुसून टाकली. ‘lines and dots’ नावाचं पुस्तक त्यांना बघायला दिलं. मग मुलं कामाला लागली, तरी तासात रंग भरत नव्हता. मुलं नेहमीसारखी खुलत नव्हती. मग थोडं बोलायचं ठरवलं –
‘‘तुम्ही पहिलं चित्र कधी काढलंत?’’ मी विचारलं.
‘‘आठवत नाही ताई !’’
‘‘तुम्हाला चित्र काढायला आवडतं का?’’
‘‘नाही, आमची चित्रं छान येत नाहीत.’’
‘‘छान चित्रं कोणती बरं?’’
‘‘ताई, पुस्तकातली चित्रंच छान असतात.’’
‘‘असं काही नाही, आपण काढतो तीही चित्रं छान येतील की… आपण आधी काढायला तर लागू. मी जे चित्र काढते, ते ‘माझं’ चित्र असतं. आणि माझं चित्र माझ्यासाठी छानच असतं. मग लोक त्याला काहीही म्हणोत.’’
मुलांना समजायला थोडा वेळ लागला. ती गोंधळलेलीच होती. मग मी ‘रेषा काय बोलतात, काय सांगतात, त्यांची वैशिष्ट्यं काय’ अशा गोष्टी बोलून त्यांना चित्रांची काही पुस्तकं दाखवली आणि त्यातूनही माझं म्हणणं थोडं स्पष्ट केलं.

मग मी त्यांना त्यांनी काढलेल्या चित्रांमधले आकार… त्याचा त्यांना लागलेला अर्थ असं बोलतं केलं. तेव्हा त्यांचे डोळे आनंदानं चमकू लागले.

मग चर्चेची गाडी रेषांकडे वळवली. चित्र सरळ, तिरक्या, नागमोडी, जाड, बारीक, पुसट अशा अनेक प्रकारच्या रेषांनी तयार होतं. या रेषा आपल्याशी बोलतात. उदाहरणार्थ सरळ रेषा, ठाशीव रेषा कशी ताठ मानेनं उभी असते. नागमोडी रेषा रमत गमत जाते, तिच्यात एक लय असते, ती लवचीक असते. मग मुलंही बोलायला लागली.

दोरा, तारा, काड्या इत्यादी वापरूनही या रेषा करता येतील, असं मी सुचवलं. प्रत्येकाला एकेक दोर दिला. त्याचा वापर करून चित्र बनवूया असं सांगितलं. ते कागदावर चिकटवायलाही सांगितलं. काहींनी त्याचा चेहरा बनवला तर काहींनी चेंडू, पण ती फार पुढे गेली नाहीत. काहींनी खडू वापरून ते चित्र रंगवलं.

यानंतर त्यांना मी थोडी लवचीक तार दिली. प्रत्येकाला हव्या त्या लांबीची तार घेण्याची मुभा होती. त्या सलग तारेपासून वस्तू बनवायच्या होत्या. हे मुलांना आवडलं आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या वस्तू बनवल्या. चष्मा, चेहरा, बाटली, सायकल, बाहुली, कानातलं अशा अनेक ! एकानं तर दहीहंडी बनवली.
20-8-12 076.jpg

आता पुढच्या कृतींसाठी मी वेगवेगळं साहित्य वापरायचं ठरवलं. मुलांना काडेपेटीच्या काड्या दिल्या. हेसुद्धा मुलांना आवडलं. ती पटापट काड्यांची चित्रं बनवायला लागली. घर, मांडव, झोका, रांगोळीसारखं डिझाइन अशी चित्रं तयार होऊ लागली.

मुलांबरोबर काम करताना काय करायचं याची त्या त्या दिवशीची थोडीशी आखणी माझ्या मनात झालेली असते. पण काम करता करता समोरच्या मुलांचा प्रतिसाद बघून अनेक नवनवीन कल्पना सुचतात. आणि लगेच त्या वापरूनही बघितल्या जातात. मी ठरवलेल्या कलेच्या उपक्रमाचा कधी खेळ होतो, कधी संवाद होतो तर कधी भाषा, विज्ञान किंवा गणिताशी जोडणी होते. हे इतक्या सहजपणे घडतं की माझं मलाही कळत नाही.
मात्र उत्स्फूर्तपणे नवनवीन कल्पना सुचणं हाच माझ्यासाठी खरा आनंदाचा स्रोत असतो.

शब्दांकन-सुषमा यार्दी
reshmabutterfly@gmail.com