नवजाणिवांच्या प्रसूतिकळा

अलीकडेच ‘crossroads – labour pains of a new worldview’ नावाचा एक अभ्यासपूर्ण माहितीपट पाहण्यात आला. सध्या जगात आपण अनुभवत असलेला पर्यावरण आणि मानवी मूल्यांचा र्‍हास माणसाच्या टोकाच्या अहंचा परिपाक आहे. ह्यापासून धडा घेत माणूस जितक्या लवकर आपला अहं कमी करून परस्परावलंबन, सहजीवन, परस्परांचा आदर ही मूल्यं स्वीकारेल, तितक्या लवकर तो निसर्गाशी एकरूप होऊन नव्या दृष्टीनं जगू लागेल. ज्या वेदनांमधून सध्या सजीव सृष्टी जातेय, त्या वेदना नवीन जाणिवांची दारं उघडण्यासाठी आहेत, असा काहीसा सावध करणारा; पण तरी आशावादी दृष्टिकोन यात आहे. हा आशावाद समजून घेऊन तो मुरवत असतानाच मुलांवरील व स्त्रियांवरील अत्याचारांच्या बातम्या सतत चहू बाजूंनी ऐकू येत आहेत. अशा घटनांवर येणारी पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ‘किती क्रूर आहेत ह्या घटना…’ भावनेच्या पहिल्या भरात मुलांची काळजी वाटणं, असुरक्षित वाटणं हे स्वाभाविकच.

मध्यंतरी अरुण कोलटकरांच्या विपाशा या कवितेवर आधारित नाटक पाहिलं. साधारण चौथ्या शतकात घडलेली ही कथा. त्यातली हायपेशिया ही ग्रीक गणितज्ज्ञ, खगोलवेत्ता, संशोधक, तत्त्वज्ञ स्त्री. ती तत्त्वज्ञान आणि खगोलविद्या शिकवत असे. तिची ज्ञानसत्रं गाजत होती. अर्थात, तिचं पुरुषांच्या सभेला जाणं, पुरुषांच्या बरोबरीनं वागणं, पुरुषांनीही तिच्या विद्वत्तेसमोर मान तुकवणं काहींना मान्य नसणारच. तिथला बिशप सिरिल म्हणतो, शिकवायची परवानगी नाही स्त्रीला, मग ती कितीका हुशार असेना. इथे तर ही बया चक्क प्रवचनं देते, तत्त्वज्ञान शिकवते जगाला. आणि सगळे शहाणे, तिचा प्रत्येक शब्द मोलाचा असल्याप्रमाणे ऐकतात. तिच्या रोजच्या जायच्या-यायच्या वाटेवर पाळत ठेवून ते तिला गाठतात. कवीनं म्हटलंय, ‘भर रस्त्यात तुला नागवं केलं त्यांनी; षंढ नीतीच्या, सनातन नियमांना अनुसरून. फरफटत नेलं तुला त्यांनी, आणि बोरूसारखं सोलून काढलं, अक्षरश:, कालवांच्या धारदार शिंपल्यांनी.’ पुरुषसत्ताक विचारसरणीची बळी होती ती.

त्यावर इतका काळ गेला, तरीही खोलवर कुठेतरी तीच मानसिकता रुजलेली बघायला मिळते. ती मुळासकट उखडून काढण्याची मोठ्ठी जबाबदारी आपल्यावर आहे. इतक्या काळानंतर, का होईना; पण या जाणिवा जागृत होत आहेत हे कमी आहे का? अर्थात, भावनेत अडकून रस्ता सापडणार नाही, हे निश्चित.

मला आठवतेय टीव्हीवरची अल्पविराम नावाची मालिका. मी तेव्हा साधारण दहावी-अकरावीत असेन. एका रुग्णालयात कोमामध्ये असलेल्या एका एकवीस वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो. शुद्धीवर आल्यावर तिला कळतं, की ती गरोदर आहे. पुढे तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करतो आणि तिच्या बाळाचा स्वीकार करतो, असं काहीसं ते कथानक होतं. मालिकेचा शेवट म्हणजे मला तेव्हा एक परीकथाच वाटली होती. असं शक्य होईल का, कोणी एका बलात्कारित स्त्रीचा स्वीकार करेल का, असं त्यावेळी मला वाटलं होतं. म्हणजे बलात्कार झालेल्या स्त्रीला त्या घटनेचं ओझं संपूर्ण आयुष्यभर वाहावं लागतं, अशी काहीशी माझीही विचारसरणी तेव्हा होती. मला असंही वाटलेलं आठवतंय, की बरं झालं, ती कोमामध्ये होती, निदान वेदना कळल्या तरी नाहीत. शुद्धीवर असती, तर तिनं स्वतःची सुटका करून घेतली असती, असं काही माझ्या मनात आलं नाही. म्हणजे स्त्री ही अबला, असाहाय्य असते, असंही मनात कुठेतरी होतंच. पुढे काही वर्षांनी अरुणा शानभागची केस इच्छामरणाच्या संदर्भात चर्चेत आली. तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती कायमची कोमात गेली आणि जवळजवळ 42 वर्षं त्याच अवस्थेत होती. या बातमीनं माझ्या मनात खूप दहशत निर्माण केली होती. कित्येक दिवस मला अंधाराची भीती वाटल्याचं आठवतंय. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अलीकडच्या हैद्राबाद प्रकरणावरून पालकनीती गटामध्ये झालेली चर्चा. भावनांमध्ये अडकून माझी मतं अगदी निराशावादी, टोकाची झालेली होती; पण आता दृष्टिकोन बदललाय. त्रास करून न घेता अशा घटनांकडे बघता येतंय. हाच दृष्टिकोन तुमच्यापर्यंत पोचवावा, म्हणून हा लेखनप्रपंच.

थोडासा भूतकाळ तपासला, तर लक्षात येतं, की निर्भयासारख्या घटना आपल्याला नवीन नाहीत. एका अभ्यासानुसार, बलात्काराच्या घटनांमध्ये मागील सतरा वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातच लैंगिक अत्याचार हा चिंतेचा विषय झालेला आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार ही पालकांसाठी अतिशय काळजीची, भीतीची बाब आहे. हा अभ्यास असंही सांगतो, की अशा घटनांबद्दल बोलण्याचं, तक्रार करण्याचं प्रमाण पूर्वी कमी होतं. तक्रारी नोंदवून घेण्यातही टाळाटाळ केली जात असे. अत्याचारित व्यक्तीलाच दोष देऊन प्रकरण शक्यतो दडपलं जात असे. आता कायद्यात सुधारणा झाली आहे, प्रसारमाध्यमांतूनही अशा घटनांबद्दल उघडपणे बोललं जाऊ लागलंय. मुलग्यांवरही लैंगिक अत्याचार होतात ही बाब मान्य केली जाते आहे. पूर्वी सर्रास बालविवाह होत. वधू असे आठ-नऊ वर्षांची आणि वराचे वय काही वेळा बरेच जास्त असे. तिची पाळी सुरू होईपर्यंतही काही नवरे थांबत नसत. आजच्या कायद्याच्या दृष्टीनं असा विवाह हे बाललैंगिक अत्याचाराचंच उदाहरण आहे; पण त्या काळात तसं मानलं जात नसे. त्यामुळे पूर्वीचे लोक असे वागतच नसत, आता नीतीमत्ता ढासळलीय असं म्हणण्यात फारसं तथ्य नाही. कदाचित आता जाणीव थोडी वाढलीय. मानवी हक्कांबद्दल, अन्यायाबद्दल समाज थोडा जास्त जागरूक झालाय, त्यामुळे अशा घटना प्रकाशात येण्याचं प्रमाण वाढलंय इतकंच. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणात अशा घटनांचं प्रमाण वाढलेलं असेलही. काहीही असो, अशा बातम्या आता जास्त कानावर येतात हे नक्की. एकंदरच हिंसेच्या घटनांतही वाढ झाल्याचं जाणवतंय.

कोणत्याही अत्याचाराचे पीडित व्यक्तीवर काय परिणाम होतात, समाज या घटनांकडे कसं बघतो, मुळात असे अत्याचार का होतात, अत्याचार करणाऱ्याची मानसिकता काय असते याचा विचार करूया, म्हणजे आपल्याला नेमकी कशाची काळजी वाटतेय आणि कशावर काम करायचंय ते लक्षात येईल.

लैंगिक अत्याचाराचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही परिणाम होतात. शरीरावर होणार्‍या जखमा औषधांनी बर्‍या होऊ शकतात; पण मनावर होणारे परिणाम वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात, जसे – अत्याचार कोणत्या वयात झाला, किती वेळा झाला, अत्याचार करणार्‍यांचं पीडितेबरोबरचं नातं, अत्याचार कोणत्या समाजातल्या व्यक्तीवर झालाय इत्यादी.

एका डॉक्टरांनी एक घटना सांगितली – एका दोन वर्षांच्या मुलीवर साधारण महिनाभर सोसायटीच्या पहारेकऱ्याकडून लैंगिक अत्याचार झाले. अर्थात, त्या मुलीला ते सांगता आलं नाही. पुढे योनीमार्गातील संसर्गामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं असता डॉक्टरांना संशय आला आणि पुढे तपास केला असता हा प्रकार लक्षात आला. ऐकून तिच्या पालकांना अर्थातच धक्का बसला. असं काही या जगात घडतं, याची त्यांना कल्पनाच नव्हती. ही घटना अगदी लहान वयात घडल्यानं ती मुलगी ते विसरून गेली. त्याचे दृश्य परिणाम सध्यातरी काही दिसत नाहीत. पालकांना अशा प्रकारांची कल्पना असती, तर ते जागरूक राहिले असते. परक्या व्यक्तीसोबत आपल्या मुलीला एकटं ठेवणं टाळलं असतं. मुलीमध्ये जाणवू शकणारे छोटेछोटे बदल लक्षात येऊन हा प्रकार लवकर उघडकीस आला असता. म्हणजे पालकांना अशा प्रकारांची माहिती असणं महत्त्वाचं आहे.

वरील घटनेत त्या मुलीवर काही दृश्य परिणाम दिसत नसले, तरी तिचे पालक हे कसं स्वीकारतील? ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना समुपदेशनाची गरज लागेल. आपल्या समाजात बलात्काराकडे आयुष्यभराचा डाग म्हणून पाहिले जाते, तेव्हा समाज त्यांना हे विसरू देईल? शिक्षणाची खरी गरज इथे आहे. नाहीतर अल्पविराम मालिकेतला शेवट आपल्याला अवास्तवच वाटत राहील. याचबरोबर पालकांची मानसिकता बदलणेही गरजेचे आहे. बहुतेक घटनांमध्ये पालकच ‘मुलीच्या/ घराण्याच्या अब्रूचा प्रश्न’ म्हणून, लोकांमध्ये याबद्दल चर्चा होऊ नये म्हणून अशा घटना दडपून टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याविरुद्ध तक्रार करत नाहीत, बोलणं टाळतात.

एका घटनेमध्ये वडीलच मुलीवर अत्याचार करत होते. आईला कळलं तेव्हा तिनंही त्यावर आवाज उठवण्याऐवजी सहन करण्याचा मुलीला सल्ला दिला. अत्याचाराविरुद्ध आवाज न उठवण्याची मानसिकताही गुन्हेगारांना पाठीशी घालते. ही ‘सहन करण्याची’ मानसिकता येते कुठून? वर्षानुवर्षं चालत आलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीतून, स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू आहे ह्या रुजलेल्या समजुतीतून, स्त्रीची ‘इज्जत’ तिच्या शरीरात बंदिस्त असते असं मानण्यातून! यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. स्त्री-पुरुष समानता, प्रेम, आदर समाजात रुजवण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणक्षेत्रात भरपूर काम होण्याची गरज आहे.

पहिल्या उदाहरणात मूल बोलूच शकत नसल्यानं त्याच्यावर होणार्‍या अत्याचाराबद्दल सांगू शकत नव्हतं, तेव्हा पालकांनीच सतर्क राहणं गरजेचं असतं. लैंगिक अत्याचार होत असलेल्या मुलांमध्ये खालीलपैकी काही लक्षणं दिसतात – शरीरावर अकारण दिसणाऱ्या जखमा, सतत कसलीतरी भीती वाटणं, स्पर्शाची भीती, कपडे बदलण्यास नकार देणं वगैरे. याकडे लक्ष असेल तर असे प्रकार वेळीच टाळता येतात.

अर्थात, बोलू शकणारी मुलं होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगू शकतीलच असं नाही. एकतर त्यासाठी लागणारी भाषा त्यांच्याकडे असेलच असं नाही. शिवाय लाज वाटणं, अपराधीपणाची भावना, आपण सांगितलं तर विश्वास ठेवतील का अशी शंका, यामुळे बरेचदा मुलं त्याबद्दल बोलत नाहीत. यातून मुलांना गंभीर न्यूनगंड येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांशी मोकळा संवाद असणं, त्यांचं म्हणणं ऐकत राहणं, त्यांना विश्वास वाटेल असं वातावरण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पीडित व्यक्तीचा ह्यात काहीएक दोष नसतो हा संदेश मुलांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. हा अत्याचार कितीही धक्कादायक असला, तरी ‘आयुष्यभरासाठी डाग’ नाही हे समजावून सांगायला हवं आणि हा संवाद मुलग्यांशी होणंही आवश्यकच, कारण लैंगिक अत्याचार मुलग्यांवरही होतात हे आपण ऐकतोच.

काही घटनांमध्ये असं आढळून आलंय, की मुलांना लैंगिक शोषण हा अत्याचार वाटतच नाही. एक मैत्रीण म्हणते, ‘‘मी साताठ वर्षांची असताना घरातल्या चुलत भावानंच माझ्यावर लैंगिक अत्याचार सुरू केले. मला त्याचा काही शारीरिक त्रास तर व्हायचाच नाही, उलट काहीतरी अनामिक सुख त्यात मला वाटायचं. त्यामुळे मी घरी कोणाला त्याबद्दल सांगितलं नाही. पुढे तो दुसरीकडे राहायला गेला आणि ते बंद झालं; पण मला या शारीरिक सुखाची आठवण यायची आणि मी हस्तमैथुन करू लागले. मैत्रिणींमध्ये मला एकदम वेगळं वाटायचं. त्यांना शारीरिक संबंधांबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी सांगायचे तेव्हा एकदम भाव वाढल्यासारखं वाटायचं. लग्नाबाबत मात्र मला खूप भीती वाटायची. जे घडलंय ते ऐकून कोणी माझ्याशी लग्न करेल का असं वाटायचं. त्यामुळे मी नात्यात गुंतणं, लग्नाबद्दल बोलणं टाळायचे. कोणावरही विश्वास टाकायला जमत नसे. मला आवडणाऱ्या मित्रानं लग्नाबद्दल विचारलं, तेव्हा मी त्याला माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलं आणि मगच आम्ही लग्न केलं. पुढे मूल होत नव्हतं म्हणून सगळ्या चाचण्या केल्या. त्यात काही निघाले नाही. ताण कमी करण्यासाठी डॉक्टरांनी समुपदेशकाकडे जाण्यास सांगितलं. तिथे मला माझेच वेगवेगळे पैलू कळले. अत्याचार करणाऱ्या माणसाबद्दल माझ्या मनात प्रचंड राग होता. माझ्याबाबतीत झालं, ते माझ्या बाळाच्याही वाट्याला येईल का, असा ताण होता. आता मला खूप हलकं वाटतंय. भूतकाळामध्ये अलिप्तपणे डोकावून बघता येतंय.’’

माझ्या मैत्रिणीला आधीपासून माहीत असतं, की मला कितीही आवडत असलं, तरी हे माझ्यासाठी चुकीचं आहे, तर हे टाळण्याचा तिनं नक्की प्रयत्न केला असता. निदान कोणाला सांगण्याचा प्रयत्न तरी केला असता. स्पर्शाची ओळख, आपलं खाजगीपण जपणं, इतरांना त्या ठिकाणी स्पर्श न करू देणं हे मुलांना संवेदनशीलतेनं सांगितलं जायला हवं, तरच मुलं त्याबद्दल बोलतील.

वरील प्रसंगात माझ्या मैत्रिणीवर वरकरणी काही परिणाम झालेला दिसत नसला, तरी खोलवर कुठेतरी याचा ताण होताच. नाती टाळणं, कोणावर विश्वास टाकता न येणं, हे त्याचेच निदर्शक. यातून बाहेर पडायला मदत करणाऱ्या, तिला समजून घेणार्‍या साथीदाराची भूमिकाही या ठिकाणी महत्त्वाची. असं निकोप वातावरण समाजात, आपल्या अवतीभोवती निर्माण करायचं असेल, तर बलात्कार, लैंगिक अत्याचार यांकडे अधिक परिपक्व दृष्टीनं बघण्याची गरज आहे.

आपण लैंगिक अत्याचारांबद्दल बोलतो, तेव्हा बलात्कार या एकाच गोष्टीचा विचार करणं पुरेसं होणार नाही. मुलांसमोर लैंगिक/ अश्लील कृती करणं, अश्लील व्हिडिओ दाखवणं, अश्लील भाषा वापरणं हेही लैंगिक अत्याचारातच मोडतं. आजकाल मोबाईलमध्ये, प्रसारमाध्यमांवर अश्लील चित्रं अगदी सहज बघायला मिळतात. त्यामुळे या गोष्टींपासून आपल्या आजूबाजूच्या मुलांना सुरक्षित ठेवणं याकडे लक्ष ठेवायला हवंय.

लोक ‘असं’ कसं वागू शकतात, असा आपल्याला नेहमी प्रश्न पडतो. समाजात घडणार्‍या अशा घटनांमागचं कारण काय असेल?

एका अभ्यासानुसार, बालवयात लैंगिक शोषण झालेल्या मुलांमध्ये मानसिक विकृती निर्माण होण्याची, मोठी झाल्यावर ती लैंगिक अत्याचार करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे लैंगिक शोषण झालेल्या मुलांसोबत असणं, बोलणं, त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं आवश्यक असतं. तसेच लैंगिक कृती अभद्र मानणार्‍या, त्या विषयावर बोलणं निषिद्ध समजणार्‍या समाजातील मुलांमध्येही न्यूनगंड, मानसिक विकृतीचं प्रमाण जास्त दिसतं. म्हणूनही लैंगिकता शिक्षण महत्त्वाचं ठरतं.

मधुमिता पांड्ये ह्या तरुणीनं तिच्या अभ्यासाचा भाग म्हणून बलात्काराच्या घटनेत शिक्षा भोगत असलेल्या शंभर आरोपींची तुरुंगात जाऊन मुलाखत घेतली. त्या दरम्यान तिला मिळालेली उत्तरं आपल्याच समाजाच्या ओंगळपणाचं दर्शन घडवतात. शंभरपैकी केवळ पाच जणांना आपल्या कृतीचा पश्चात्ताप वाटत होता. त्यातील पन्नास वर्षांच्या एका व्यक्तीनं एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्याबद्दल त्याला खूप वाईट वाटत होतं; पण त्यामागचं त्याचं कारण चीड आणणारं होतं. तो म्हणाला, ‘‘मी खरंच खूप वाईट काम केलंय. त्या मुलीचं कौमार्य मी उद्ध्वस्त केलंय. आता तिच्याशी कोण लग्न करणार? म्हणून तुरुंगातून सुटल्यावर परत जाऊन मीच तिच्याशी लग्न करेन!’’ ही आपल्या समाजाची मानसिकता! (ह्यावरून महाराष्ट्रातल्या एका प्रथितयश लेखकाच्या कथेची आठवण झाली. स्त्रीचं पावित्र्य तिच्या शरीराशी निगडित असतं, अशी कथालेखकाची मनोधारणा असावी. नायिकेवर बलात्कार होतो. त्याबद्दल गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी नायिका अक्षरश: हव्वे ते प्रयत्न करते आणि नंतर मात्र त्याच्याशी लग्न करण्यासाठी तो तुरुंगातून येईपर्यंत त्याची वाट बघते.) त्या शंभर आरोपींपैकी कितीतरी जणांना आपण काय चूक केलीये हेच समजलं नव्हतं. शरीरसंबंधात समोरच्याची संमती घ्यायची असते हे त्यांच्या गावीही नव्हतं. ‘आमचं काय चुकलं? आम्ही पुरुष ना?’ अशी उद्दाम उत्तरंही काहींनी दिली.

समाजात पौरुषत्वाबद्दल चुकीच्या समजुती जशा आहेत, तशा स्त्रीत्व, पावित्र्य यांबद्दलही चुकीच्या धारणा रूढ आहेत. ह्या समजांनीच हे आरोपी जन्माला घातले आहेत. बलात्काराच्या घटनांनंतर बरेच प्रतिवाद ऐकायला मिळतात. ‘मुलींना हल्ली खूप स्वातंत्र्य दिलं जातंय. तोकडे कपडे घालून रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात, मग असंच होणार. मुलींनी वेळेवर घरी नको यायला?’ म्हणजे मुलग्यांनी वाट्टेल तसं बेजबाबदारपणे वागावं, मुलींनी मात्र स्वतःला सांभाळायला हवं, ही समाजाची मानसिकता ह्या टिप्पणीतून प्रतीत होते. लहान मुलांवर होणार्‍या अत्याचारांवर अर्थातच त्यांच्याकडे काहीही उत्तर नसतं.

अर्थात, हे सगळं कळूनसुद्धा पालक म्हणून काळजी वाटतेच, त्याचबरोबर समाजात बदल दिसायलाही वेळ लागणार. मात्र, बदल आपोआप होत नसतात, ते घडवावे लागतात, हेही तितकंच खरं.

काही दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याजवळच्या एका छोट्या गावात गेले होते. तिथून संध्याकाळी परत येताना एका दुचाकीवाल्याला लिफ्ट मागितली. गाडीवर बसलेली असताना डोक्यात विचार चालू झाले, ‘हा माणूस सोडेल ना बरोबर जागी? याच्या मनात काही भलंबुरं आलं तर? अशावेळी मला काय काय करता येईल? वस्ती असलेल्या ठिकाणी आरडाओरडा करेन.’ वगैरे. अशा विचारात गुरफटलेली असताना त्यानं मला इच्छित स्थळी सुखरूप पोचवलं आणि वर म्हणाला, ‘‘ताई, इथे संध्याकाळच्या वेळी दारुडे फिरत असतात. उगाच अडचण नको म्हणून तुम्हाला बसस्टॉपलाच सोडतो.’’ मनात आलं, जगात दोन्ही प्रकारची माणसं असतात यावर विश्वास ठेवला आणि वाईट घटनांमुळे निराश न होता जास्त सतर्क झालो, तर आपोआप मार्ग सापडत जातील.

anandi

आनंदी हेर्लेकर

h.anandi@gmail.com

लेखिका पालकनीती संपादकगटाच्या सदस्य असून त्या समुपदेशन करतात.