वाचक कळवतात

नमस्कार,

जानेवारी 2020 च्या अंकातील पहिल्याच पानावरील ढग्रास सूर्यग्रहणाबाबत वाचलं. ग्रहणाच्या दिवशी आम्ही गोव्यात सायकल ट्रेकवर होतो. मी पुण्याहूनच ग्रहण पाहण्यासाठीचे तीन चष्मे बरोबर नेले होते, ते सकाळी निघतानाच ग्रुपमध्ये वितरित केले. ग्रहण ‘चढू’ लागल्यानंतर सूर्यप्रकाश कमी होऊ लागला तसा मुद्दामच बसस्थानक, चर्चचे प्रवेशद्वार, चहाची टपरी अशांसारख्या ठिकाणांजवळ थांबून चष्म्यातून ग्रहण पाहू लागलो. साहजिकच आसपासचे दोनचार लोक, विशेषतः शाळकरी मुलं, नक्कीच गोळा व्हायची. त्यांना ग्रहण दाखवलं तसंच सायकलवर असल्यानं कमी प्रदूषण, इंधनबचत, शारीरिक व्यायाम ह्याबद्दलही थोडंफार उद्बोधन केलं.

हे सगळं वर्णन आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपवरून मित्रांना कळवलं, तेव्हा समजलं की मुंबई, ठाणे इ. परिसरात ढगांमुळे ग्रहण दिसलेलं नाही किंवा अगदीच थोडावेळ दिसलं, पुण्यात तर पाऊसच होता!

अशा रीतीनं वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण पाहण्याचा योग जुळून आला.

श्रीनिवास निमकर