परशुराम कांबळे

(BSC Nursing, पहिले वर्ष) यावर्षी मी बारावी सायन्सची परीक्षा दिली. मला ६४% मार्क्स मिळाले.

मला आठवते, लहानपणी मी खेळघराच्या दारात बसून आत काय चालू आहे हे बघायचो. तेव्हा खेळघराच्या ताईंनी मला आत घेऊन तुला शिकायचं आहे का ? असे विचारले आणि मी होकार दिला. तेव्हा मी दुसरीला होतो. तेव्हापासून मला खेळघरात जायला खूप आवडतं.

खेळघरातील वातावरण खूप आनंददायी आहे. इथं शांतता असते. प्रत्येक मुलाला स्वतःचं मत मांडायची संधी असते. जर एखादा मुलगा काही विचार करत नसेल तर तो खेळघरात विचार करायला लागतो. स्वतःचं मत मांडायला लागतो, सर्वांना पटवून देऊ शकतो. इथं अभ्यासाला जसं हवं तसं वातावरण आहे. काही अडलं तर मदत करायला भरपूर जण उपलब्ध आहेत.

येथे अनेक संधी उपलब्ध करून देतात. मुलांना गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून गणित आणि विज्ञान आठवडे साजरे होतात. यात दोन्हीची नव्यानं ओळख करून देतात. हे सगळे प्रात्यक्षिकातून शिकवलं जातं. वार्षिक स्नेहसंमेलनसुद्धा साजरं केलं जातं. अनेकांच्या कलेला वाव दिला जातो.

आज मी युवक गटाला जातो. या युवकगटातील अनेक मुलांना खेळघरानं मदत केली आहे. ‘खेळघर’ ही आमची सपोर्ट सिस्टिम आहे. ती आम्हाला आर्थिक असो, सामाजिक असो किंवा मानसिक प्रश्न असोत, प्रत्येकात मदत करतच असते.

माझा एक छोटासा अनुभव सांगतो, मी बारावीची परीक्षा नुकतीच दिली होती, तेव्हा मला टेन्शन आलं होतं, की नक्की पास होईल का ? मार्क चांगले पडतील ना? मला माझ्या मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतं होतं. त्यावेळी मला खेळघराची आठवण झाली. मी शैलजा आत्याशी बोललो, तेव्हा माझ्या मनाला शांतता वाटली आणि मी स्थिर झालो.

माझं आणि खेळघराचं नातं एवढं जवळचं झालं आहे ना की, काहीही झाले किंवा कोणताही प्रश्न पडल्यावर पहिली खेळघराची आठवण येते. त्यामुळे मी खेळघराचा खूप खूप आभारी आहे. अरे पण आपल्या माणसाचे कुणी आभार मानतात का? खेळघर तर माझंच आहे आणि ते कायम माझंच राहील.