पालकांशी भेटीगाठी – तुलतुल’च्या निमित्तानी
सुधा क्षीरे
आमच्या एका छोट्या उपक्रमाविषयी तुम्हाला सांगायचं आहे. या उपक्रमासाठी निमित्त झाली ती ‘तुलतुल’! ही ‘तुलतुल’ कोण माहीत आहे? ही आहे एका बंगाली कथेची नायिका! वय साधारणत: 7/8 असावं. पालकनीतीच्या मे 2001 च्या अंकात एक अनुवादित कथा प्रसिद्ध झाली ‘उद्याची भीती’. मूळ बंगाली कथा आशापूर्णा देवी यांची, मराठीत अनुवाद केला श्री. अतुल देशमुख यांनी. हीच ती तुलतुलची गोष्ट. ही वाचली आणि आम्हांला वाटलं की, या गोष्टीच्या निमित्तानं पालकांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं. गोष्ट तुम्हाला थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हांलाही पटेल आम्हाला असं का करावंसं वाटलं.
तुलतुल ही एक सुखवस्तू घरात लाडाकोडात वाढणारी छोटी मुलगी. आजी-आजोबा, आई-बाबा आणि दादा ही तिच्या घरातली माणसं. शिवाय घरात येणारी कामवाली बाई आणि तिची या तुलतुल एवढीच मुलगी टुनी ! एके दिवशी शाळेत बाईंनी सांगितलं – ‘हे आंतरराष्टीय बालवर्ष आहे. प्रत्येक मुलाला प्रेम आणि शिक्षण मिळालं पाहिजे. नसेल तर आपण तिला/त्याला ते मिळवून द्यायला पाहिजे.’ हे ऐकून भारावलेल्या तुलतुलला टुनी दिसली ती जुन्या, फाटक्या कपड्यातील, शिळं काही-बाही खाणारी, आईला कामात मदत करणारी आणि शाळेत न जाणारी! टुनीला आपल्यासारखंच आयुष्य मिळालं पाहिजे असं तुलतुलला वाटलं. तिनं सगळ्या मोठ्या माणसांना ते सांगितलं, त्यांना ते कळेना, पटेना. मग तुलतुलनं भांडणं केली, ती रुसली, रडली, हिरमुसली. अखेर जिन्यात जाऊन एकटीच रडत बसली – ती स्वत:च्या अपमानानं नव्हे तर या विचारानं की, ‘सगळी माणसं मोठी झाल्यावर इतकी दुष्ट होतात? मीही मोठी होऊन असाच विचार करू लागले तर ? विसरूनच गेले की, सगळी माणसं अखेर सारखीच असतात तर?’
गोष्टीचा हा शेवट आपल्यासमोर अनेक अवघड प्रश्न उभे करतो. ‘मोठं’ होणं म्हणजे नक्की काय? दुसर्याच्या, दु:खितांच्या, वंचितांच्या वेदनेविषयीच्या तरल संवेदना बोथट होत जाणं? व्यवहारी जगाचा कठोर न्याय मुकाट मान्य करत जाणं? स्वत:च्या छोट्या छोट्या प्रश्नांनी अस्वस्थ होणं आणि विषमतेतून निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांना ‘हे असंच असणार’ असं म्हणायला शिकणं?
आपल्या पालकांना याविषयी काय म्हणावंसं वाटतं, हे जाणून घेण्यासाठी म्हणून पालकनीतीतर्फे पालकांबरोबर चर्चांचे कार्यक्रम घ्यायचे असं आम्ही ठरवलं. सप्टेंबर-ऑयटोबर 2001 या दोन महिन्यांमध्ये पुण्यात असे चार कार्यक्रम घेतले. त्यामध्ये ‘बालभवन’, ‘नॅशनल इन्शुरन्स अॅकॅडमी’, ‘अभिनव विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक शाळा’, आणि ‘अक्षरनंदन (प्राथमिक)’ इथले पालक सहभागी झाले होते. या चर्चांची पद्धत आम्ही साधारणत: अशी आखली होती – सुरुवातीला ही गोष्ट असलेले पालकनीतीचे अंक सर्व पालकांना वाचायला देत होतो. गोष्ट वाचण्यासाठी सुमारे 10 मिनिटं वेळ ठेवला होता. त्यानंतर त्यांच्यासमोर फळ्यावर एक छोटी आकृती काढत होतो, ज्यात मध्यभागी होती तुलतुल आणि भोवती होते – आजी-आजोबा, आई-बाबा, दादा, टुनी आणि टुनीची आई ! तुलतुल या सगळ्यांना काय सांगू पाहात होती आणि ते तिला काय प्रतिसाद देत होते, हे आठवा आणि विचार करा. पालकांना म्हटलं, ‘या गोष्टीतल्या माणसांच्या आणि या प्रसंगाच्या निमित्तानं आपण आपला शोध घेऊ या.’ हा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर काही प्रश्न ठेवत होतो –
तुलतुलच्या आईबाबांमध्ये आपल्याला आपण दिसतो का? आपल्यामध्येही कधीतरी तुलतुल होती का? तिचं पुढे काय झालं? आपल्या मुलांना असेच प्रश्न पडतात का? ते आपल्याला विचारतात का? आपण त्यावर काय काय म्हणतो? काय करतो? हे सगळं तुम्ही आम्हांला सांगा, असं बोलून चर्चा सुरू करत होतो. मात्र, त्यांनी जे बोलायचं त्यासाठी दोन पथ्यं कटाक्षानं पाळायची विनंती केली – (1) स्वत:विषयी बोला, इतर असे वागतात, करतात हे नको; तसंच, असं असावं, असं नसावं – नको. आणि (2) तुमचे खरे अनुभव, खरी मतं सांगा. आदर्शवादी, ‘अपेक्षित’ उत्तरं नकोत.
आणि मग पालक छानच बोलले. मनापासून बोलले. खरंखुरं बोलले. मुलांनी कसं कोड्यात टाकलं, कसं विचार करायला लावलं असेही प्रसंग त्यांनी सांगितले. ‘तुलतुल’सारखी मुलांची संवेदनशीलता आपल्यासमोर येते, तेव्हा नेमकं काय करायचं याविषयी साधारणत: तीन मतप्रवाह आम्हाला दिसले, ते असे होते –
1) जास्त चर्चा करायची गरज नाही. हळूहळू मोठं होत जाताना मुलं आपोआप जगाचा व्यवहार शिकत जातात.
2) त्यांची संवेदनशीलता भाबडी असते, आपण जगाचा व्यवहार त्यांना समजावून द्यायला हवा.
3) मुलांची संवेदनशीलता जपावी. विधायक कृतीकडे वळवावी. तसं करता येतं.
काही पालकांनी असा रोखठोक विचार मांडला की गरीबांविषयी सहानुभूती, त्यांना मदत यात काही अर्थ नसतो. एकतर श्रीमंत – गरीब अशी दोन जगं राहाणारच. आपण त्यांना मदत केली तरी त्यांना त्याची जाणीव नसते, कृतज्ञता नसते. शिवाय आपल्या थोड्याशा मदतीनं त्यांचं काही आयुष्य बदलणार नसतं. आणि खरं तर आपलं स्वत:चं आधी व्यवस्थित व्हायला हवं आणि मग इतरांना मदत वगैरे करावी. कारण अशा नादात मुलांचं स्वत:चंच नुकसान होतं किंवा आपल्यासमोर वेगळेच प्रश्न उभे राहातात.
या बाबतीत काही अनुभव पालकांनी सांगितले – एकजण म्हणाली की माझ्या मुलानं वॉचमनच्या मुलाला अभ्यासात मदत करायची ठरवली. असं करता करता याच्याच वह्या-पुस्तकांची रया गेली आणि अक्षरदेखील बिघडलं.
दुसरीनं सांगितलं की, शेजारी बांधकामावरची मुलं एकत्र खेळली. टी.व्ही. पाहू लागली. इथपर्यंत ठीक होतं. नंतर त्यांचे आईबाबा यायला लागले. त्यांचं अस्वच्छ वागणं, बोलणं, सवयी खूपच त्रास झाला. मग सगळंच बंद केलं.
आणखी एकाचा अनुभव होता की, मुलांना सांभाळणार्या मुलीला आम्ही अगदी घरातली समजून वागणूक दिली. पण तिची भाषा मुलांच्या तोंडी आल्यावर मात्र दचकलो. असे अनुभव आले की सगळे ‘आदर्श’ बाजूला ठेवावे लागतात.
आणि म्हणूनच असे अनुभव सांगणार्या सगळ्यांच्या वतीने एका पालकांनी ठामपणे मांडलं की, मानव जात सगळी सारखीच उच्च नीच कोणी नसतं असं जे ‘तुलतुल’च्या बाईंनी सांगितलं तसं प्रत्यक्षात काही नसतं. तेव्हा मुलं असं काही बोलू लागली की, हा विषय सोडून दे. तुझा तू अभ्यास नीट कर म्हणायचं. संपवून टाकायचं. मुलं आपोआप जगाचा व्यवहार शिकत जातात.
दुसरा विचारप्रवाह आला होता, तोही अर्थात काही पालकांच्या अनुभवातून ! त्यांचं म्हणणं होतं आजूबाजूच्या गरीब, दु:खी माणसांकडे पाहून बालमन व्याकुळ होतं. त्यांना वाटतं, आपण त्यांना मदत करावी. आपल्याजवळ आहे ते त्यांना द्यावं. पण हे नेहमीच शक्य नसतं. हे आपण त्यांना समजावून द्यायला हवं. त्यावेळी करू द्यावं, पण कठोर वास्तव आणि व्यवहार त्यांना सांगावा. त्यांचे अनुभव असे होते –
एका घरातला मुलगा शेजारच्या वस्तीतल्या मुलांचा दोस्त बनला होता. त्यांचं बघून बघून तो खारी चहात बुडवून पूर्ण गिचका करून खायला लागला. हात तोंड बरबटणं, कपातून चहा सांडणं, कप लिडबिडलेला, टेबल अस्वच्छ हे काही दृश्य आईला आवडेना. पण ती म्हणाली, ‘मी त्याला रागावले नाही की, त्या मुलांची निंदा केली नाही. त्यांना दोघांनाही समजावून सांगितलं की, कोणती पद्धत स्वच्छ आणि म्हणून चांगली आहे. त्यांना ते पटलं. सवय बदलली. दोस्ती टिकूनच राहिली.
दुसर्या आईचा अनुभव तर फारच मजेदार होता. त्यांना वाटलं की, आपण नेहमी आपल्या जुन्या, वापरलेल्या साड्या बाईला देतो. तर यावेळी नवी देऊ. नवी साडी दिली. मुलीनं हे पाहिलं, तिनं आपले ढीगभर नवे कपडे कपाटातून काढले आणि म्हणायला लागली की, तिच्या छोट्या मुलीला दे. आई सांगत होती, ‘मी एक फ्रॉक दिला तिच्या हट्टाखातर आणि मग समजावून सांगितलं की असं का नाही करता येणार. आपण थोडंच देऊ शकतो.’
‘अक्षरनंदन’च्या ताईंनी एक अनुभव सांगितला. त्यांच्या शाळेजवळच बांधकाम चालू होतं. तिथं झाडाला टांगलेल्या झोळीतलं लहान मूल रडत असायचं. मुलांना वाईट वाटलं ताईंनी सांगितलं, छोट्या सुट्टीत, शाळेच्या आधी असे जाऊन तुम्ही बाळाला झोके द्या. बांधकामावरची 5-6 वर्षांची एक मुलगी. तिला वर्गात मुलांमध्ये येऊन बसू दिलं. मुलांची संवेदनशीलता सांभाळायची आणि जगाच्या व्यवहाराविषयी पण समज वाढवायची, असं करणं शक्य आहे, योग्य आहे असं या पालकांचं म्हणणं होतं.
तिसरा गट होता मुलांमधली ही संवेदनशीलता जपली पाहिजे, वाढवली पाहिजे आणि आपल्या वागण्यातून ती दृढ केली पाहिजे असं मानणार्यांचा! त्यांनी जाणीवपूर्वक तसे प्रयत्न केले होते.
एका आईनं सांगितलं, घरात काम करणार्या मुलीला माझ्या मुलांच्या वाढदिवसाप्रमाणेच नवे कपडे, खाऊ वगैरे सगळं करते. खूप छान वाटतं ते सगळ्यांनाच!
एका बाबांनी सांगितलं – आमच्या सोसायटीतल्या आणि आमच्या मुलांना म्हटलं की बांधकामावरच्या मुलांना तुमच्याबरोबर खेळायला घ्या. प्रथम इतर मुलांना ते पटलं नाही. पण हळू हळू त्यांची छानच गट्टी जमली.
एका कुटुंबात तर असा प्रसंग घडला की कामवाल्या बाईनं ईदच्या सणासाठी पैसे मागितले. आईने काही दिले नाहीत. बाबांना हे कळल्यावर त्यांनी म्हटलं की, त्यांना द्यायला हवे होते. नुसतंच म्हणून थांबले नाहीत, आईबाबा जाऊन पैसे देऊन आले आणि मगच त्या घरची चूल पेटली. या निमित्तानं बाबांनी मुलांना समजावलं की, एवढं तर आपण केलंच पाहिजे.
एका पालकआईचं उदाहरण तर खूपच आगळं वेगळं होतं. ती म्हणाली, ‘माझ्यामधली लहानपणीची ‘तुलतुल’ मी जागी ठेवलीय. मी दोन मुलं दत्तक घेतलीत. आणि त्यांच्यामधली ‘तुलतुल’ नेहमीच जागी राहील, असंच मी त्यांना वाढवीन.
एका पालकांनी स्पष्टपणे सांगितलं, मुलांमधली तुलतुल मोठेपणीही टिकायला हवी. ती मोठी होईल, तिचा भाबडेपणा कमी होईल त्यामुळं व्यवहारात येणार्या प्रश्नांसाठी तिचे मार्ग ती शोधेल. कदाचित त्यासाठी स्वत:च्या गरजा कमी करेल. मात्र यासाठी लहानपणच्या दिवसांत आपण त्यांच्या बरोबर रहायला हवं. त्यांच्या प्रयत्नांच्या प्रामाणिक इच्छेला होता होईल ती साथ द्यायला हवी.
एकूण असं दिसलं की, इतरांच्या दु:खानं व्याकुळ होणं आणि त्यासाठी काहीतरी करावंसं वाटणं ही जपण्याची गोष्ट आहे. इतकंच काय, ती प्रत्यक्ष जगण्याची प्रेरणा असावी असं मानणार्यांपासून ‘असं प्रत्यक्षात काही घडत नसतं’ असं सांगून तो विषयच मुलांसाठी संपवायचा – असं म्हणणार्यांपर्यंत पालकांचा वैचारिक, भावनिक आलेख या चर्चांमधून स्पष्ट झाला.
आमचा उपक्रम हे काही पालक प्रबोधन नव्हतं. त्यामुळे या पालकांच्या अनुभवांवर आणि मतांवर उलटसुलट चर्चा करण्याची अपेक्षा नव्हतीच. तरीही सर्व चर्चांनंतर एक दिलासा नक्कीच मिळाला की आपापल्या परीनं, यथाशक्ती मुलांमधली संवेदनशीलता जपायला हवी असा सूर नक्कीच ऐकू येत होता. यानं बरं वाटलं.
कारण मला नेहमीच वाटतं की, रस्त्यावर अपघात झाला आणि गर्दीतून कोणीही मदतीला आलं नाही, अशी बातमी वर्तमानपत्रात येते, यावेळी नक्की काय घडतं? आपण जर घरी बसून पेपर वाचत असू तर ती बातमी वाचतो, क्षणभर मनाला दु:ख नक्कीच होतं पण पुढे जातो. आपण जर अपघातस्थळी भोवतालच्या गर्दीत असू, तर हळहळतो, अस्वस्थ होतो अपघातग्रस्त माणूस असू तर भोवतालच्या प्रत्येक माणसाकडून आपण मदतीचीच अपेक्षा करतो.
पण जर आपण आपल्या मुलांना ‘तू तुझा अभ्यास कर, तू मार्क मिळव, तू यशस्वी हो, आधी आपलं ‘व्यवस्थित’ करावं’ एवढंच फक्त सांगत राहिलो आणि संतमहात्म्यांची चरित्रं वाचायची असतात, आचरायची नसतात असं (तुलतुलच्या आजोबांसारखं) सांगत राहिलो तर त्या रस्त्यावरच्या गर्दीत आपल्याला ‘माणूस’ भेटणार कुठून?
चौकट –
चर्चेमधला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न-
सभोवतालच्या जगातल्या दु:ख, दैन्याबद्दल मुलांशी बोलावं की नाही? कोणत्या वयापासून बोलावं? कसं बोलावं यासंदर्भात अनेक प्रश्न पडतात. विशेषत: मृत्यूबद्दल, अनाथपणाबद्दल… मुलं त्या गोष्टींनी नको एवढी अस्वस्थ होतात, खंत करत रहातात. लहान वयात त्यांना या त्रासाला कशाला सामोरं जायला लावायचं?
चर्चेतून अनेक मुद्दे पुढे आले, ‘‘आपण मुलांना कितीही दु:खापासून वाचवू म्हटलं तरी त्यांना त्याला सामोरं हे जायला लागणारच आहे. ते काही टळू शकत नाही. मूल मोठं होत असताना आपण दाखवू तेच बघतं असं नाही. ते त्याच्या नजरेनं पहात, अनुभवत असतंच. उलटच त्याच्या अनुभवांबद्दल त्याला आपल्याशी मोकळेपणानं बोलायला मिळालं तर त्याच्या मनातल्या गाठी सुटायलाही मदत होईल.’’
‘‘स्वत:च्या सुखी-समृद्ध आयुष्याची स्वप्नं सभोवतालच्या वातावरणातून मुलांपर्यंत सहज पोचत असतात. माध्यमं आणि एकूण व्यवस्थेची खेचही चंगळवादाकडे ओढणारीच असते. मुलांना शक्यतोवर सुख-सुविधा मिळाव्यात असाच पालकांचाही प्रयत्न असतो. पण दु:खाला सामोरं जाणं, दुसर्याचं दु:ख समजणं, त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं हेही मुलांच्या वाढीमध्ये आवश्यक नाही का? मग मुलांना दु:खापासून ‘वाचवणं, दूर ठेवणं कितपत योग्य आहे. भोवतालच्या जगातलं दु:ख, दैन्य, विषमता, अन्याय यांच्याशी माझाही काही संबंध आहे हेही समजू दे ना त्याला.’’
अगदी लहान वयात आपण होऊन जरी मुलांना या जगाचं दर्शन घडवलं नाही तरी त्यांच्या अनुभवातून आलेलं त्यांच्या प्रश्नांचं टोक धरून जरूर त्याविषयी बोलावं… थोडं मोठं झाल्यावर मात्र आवर्जून या जगाची ओळख करून द्यावी, त्यासंदर्भात काही मदत, प्रयत्न करायचे झाल्यास त्यात मुलांना सहभागी करून घ्यावं. एक मात्र पाळायचं, त्यांच्या हळव्या, निराश मनस्थितीत आपण त्यांच्या बरोबर रहायचं, तिथं आधार देणं, सावरणं हेही आपलंच काम.
(पालकनीतीच्या 1999च्या दिवाळी अंकातला ‘दु:ख पर्वता येवढे’ हा विनय कुलकर्णींचा लेख या संदर्भात जरूर वाचावा.)