सांगायची गोष्ट
पूर्वापार मी गोष्टी सांगत आलेलो आहे. गोष्ट सांगणं, माझ्या रक्तातच आहे.
माझ्या आजोबांकडून मिळालेला तो वारसा आहे, मी घेतलेला वसा आहे.
आजोबांनी मला गोष्टींचा खजिना दिला, त्यात अनेकांनी भर घातली.
क्वचित भेटणाऱ्या एखाद्या फकिरानं, तर कधी रोजच्या शेजाऱ्यानं, मला एखादी नवी गोष्ट सांगितलीय.
मी त्या गोष्टींमध्ये गुरफटून गेलो, ऐकणारा भेटला की गोष्टी सांगू लागलो.
गोष्ट सांगणं माझ्या रक्तात होतंच, ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत मी रमून जाऊ लागलो.
गोष्ट सांगणं माझ्यासाठी काय असतं?
माझे प्राण त्यात उमलतात, त्या सुगंधानं माखून जातात.
काळाच्या आणि स्थळाच्या विस्ताराचे परीघ प्रकाशवेगानं दाही दिशांना धावत सुटतात.
सांगायची गोष्ट…
गोष्ट सांगताना माझ्या कुडीत जणू प्राण फुंकले जातात.
मला आठवण येते त्या कथेच्या कर्त्याची, त्या परिसराची, माणसांची.
युद्धांचे इतिहास सांगताना माझं मन विदीर्ण होतं, नाही असं नाही,
कधी निराधार जखमी अश्वत्थाम्यासारखं जखमेवर तेल मागत मला फिरावं लागतं.
तरीही मी गोष्ट सांगायचं सोडत नाही कारण नाहीतर गोष्ट हरवून जाईल.
आपले पूर्वज पशू होते हे मला माहीत आहे.
त्यांना आपण आपल्याहून कमी का समजतो ह्याचं मला नवल वाटतं.
पशू आणि माणसामध्ये फरक काय?
भाषा! आजोबा म्हणाले होते, एकच फरक, भाषा.
कारण भाषा लिहिता येते, शब्दांना निर्विकार करून लिपीत गोठवून ठेवता येते.
लिहिलेल्या शब्दांना वाणीतल्या, चर्येवरच्या भावविभ्रमांची साथ नसते.
गोष्ट सांगणं, गोष्ट ऐकणं संपून गेलं तर, बालपणाच्या झाडावरची इतिहासाची पानं गळून पडतील,
परंपरेच्या परिसरात री ओढण्याशिवाय शिकण्याजोगतंही बरंच काही असतं, याची जाणीव हरवेल.
गोष्ट वाचली तर काय होतं?
वाचलेल्या गोष्टींचे ठसे, जसेच्या तसे, आपल्या आयुष्यावर उमटत राहतात.
ऐकलेल्या गोष्टींसारखे ते मनात झिरपत नाहीत.
म्हणून गोष्ट ऐकावी, सांगावी, नुसती वाचू नये कधी
आणि समजा वाचलीच, तर मनाच्या रानात रुजू द्यावी आधी.
मराठी रुपांतर: संजीवनी कुलकर्णी
‘लखारा’ च्या भाषा रिसर्च अँड पब्लिकेशन सेंटरने प्रकाशित केलेल्या ऑक्टोबर 2015 च्या अंकातील तेमस्युला आओ या कवयित्रीच्या ‘बुढा कहानीकार’ या कवितेतील काही भागावरून…