सांगोवांगीच्या सत्यकथा – सर्व चांगल्या गोष्टी

मूळ कथा: हेलन म्रोसला

अनुवाद : शशि जोशी

मिनेसोटातल्या मॉरिसमधल्या सेंट मेरीज स्कूलमध्ये मी शिकवत होते, तेव्हा तो तिसरीत होता. वर्गातली सर्वच मुले माझी लाडकी होती. पण मार्क एडमंड होता ‘लाखों मे एक’. दिसायला चांगला, अत्यंत व्यवस्थित, नेहमी आनंदी वृत्ती, त्यामुळे त्याचा खोडसाळपणाही कधीकधी मजा आणत असे.

मार्क सतत बोलत असे. परवानगीशिवाय बोललेलेे चालणार नाही याची मी त्याला सतत आठवण करून देत असे. मला सगळ्यांत कौतुक कशाचे वाटले असेल तर त्याच्या खोडसाळ वागण्याबद्दल मी त्याला सुधारायचा प्रयत्न केला की तो मनापासून म्हणत असे, ‘‘मला सुधारण्याबद्दल थँक्यू बाई.’’ प्रथम मला या वाक्याचा उलगडा होत नसे. पण लवकरच मला ते ऐकण्याची सवय झाली.

मार्कच्या सतत बोलण्यामुळे एक दिवस माझ्या सहनशीलतेची परिसीमा झाली. नवशिक्या शिक्षकांची चूक मी केली. मी मार्ककडे पाहिले व सांगितले, ‘‘आता तू एक शब्द बोललास तर मी तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लावेन.’’

अजुनी 10 सेकंद सुद्धा झाले नसतील की एकजण उद्गारला ‘‘मार्क बोलतोय बाई.’’ मी कुणाही मुलाला मार्कवर लक्ष ठेवायला सांगितले नव्हते पण सर्व वर्गाच्यासमोर शिक्षा सांगितली होती. तेव्हा आता अंमलबजावणी करणे आले.

आज सकाळी घडल्यासारखे ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आहे. मी माझ्या टेबलाकडे गेले, हळू कप्पा उघडला चिकटपट्टी काढली आणि मार्ककडे गेले. एक शब्दही न बोलता मी चिकटपट्टीचे 2 तुकडे काढले. मार्कच्या तोंडावर फुली करून लावले व वर्गासमोर आले.

मार्क काय करतोय हे पाहण्यासाठी मी त्याच्याकडे एक नजर टाकली तर त्याने मला डोळा मारला. झालं! मला हसायला आले. मी मार्कच्या बाकाकडे गेले, चिकटपट्टी काढली अन् खांदे उडवले. सर्व मुले आनंदाने ओरडत होती. मार्कचे पहिले शब्द होते. ‘‘मला सुधारण्याबद्दल थँक्यू बाई.’’

वर्षाच्या शेवटाला मला वरच्या वर्गाचे गणित देण्यात आले. वर्षे गेली आणि माझ्या लक्षात यायच्या आधी मार्क पुन्हा माझ्या वर्गात आला. तो आता आणखीनच छान दिसत होता व तसाच नम्र होता. आता त्याला नवीन गणित नीटपणे शिकायचे असल्याने नववीच्या वर्गात तो पूर्वीइतका बोलत नसे. मोठाही झाला होता ना!

एका शुक्रवारी काहीतरी बिनसले होते. एका नव्या प्रकारच्या गणिताचा आम्ही आठवडाभर अभ्यास केला होता. पण माझ्या लक्षात आले की मुले निराश होताहेत, स्वत:वरच रागावताहेत अन् दुसर्‍यावर पण. या सगळ्याला गंभीर वळण लागायच्या आधीच मला ते थांबवायला हवे होते. म्हणून मी त्यांना वर्गातल्या सर्व मुलांच्या नावाची यादी करायला सांगितली. मग मी त्यांना सांगितले की त्यांनी आपल्या वर्गमित्राच्यां बाबतीतल्या सर्वात चांगल्या गोष्टी आठवाव्यात व त्या त्या नावापुढे लिहून काढाव्यात.

तासाचा उरलेला वेळ हे काम पूर्ण करण्यांत गेला. वर्गातून जातांना प्रत्येकाने मला त्याचा कागद दिला. चक् हंसला. मार्क म्हणाला, ‘‘मला शिकवण्याबद्दल थँक्यू बाई.’’

त्या शनिवारी मी प्रत्येक मुलाचे नाव एका वेगळ्या कागदावर लिहून काढले आणि त्याच्याबद्दल प्रत्येकाने काय लिहिले होते ते लिहून काढले. सोमवारी मी प्रत्येकाला तिची वा त्याची यादी दिली. काहीची यादी तर दोन पाने झाली होती. थोड्याच काळात सार्‍या वर्गाच्या चेहर्‍यावर खुषी होती. मला कुजबुज ऐकू येत होती. ‘‘खरंच?’’ ‘‘मला वाटले नव्हते की ते कुणाला एवढे महत्वाचे वाटेल,’’ ‘‘बाकीच्यांना मी एवढा आवडतो हे मला माहीत नव्हते.’’

पुन्हा वर्गात कधी त्या कागदांची चर्चा झाली नाही. मला कधीच कळले नाही की त्यांनी वर्गाबाहेर त्याच्यावर चर्चा केली किंवा आपल्या पालकांना दाखवले, पण ते महत्त्वाचे नव्हते. या सगळ्याचा जो उद्देश होता तो सफल झाला होता. विद्यार्थी पुन्हा स्वत:वर व इतरांवर खूष होते. ते विद्यार्थी आयुष्यात खूप पुढे गेले.

बर्‍याच वर्षांनी एक सुट्टीनंतर मी परत आले होते. माझे आईवडील मला विमानतळावर न्यायला आले. आम्ही घरी चाललो होतो तेव्हा आई मला ट्रिपबद्दलचे नेहमीचे प्रश्‍न विचारत होती, हवा कशी होती, प्रवास कसा झाला, तिथले अनुभव इ. इ. संभाषण थोडेसे अडखळल्यासारखे वाटले. आईने हळूच वडिलांकडे पाहिले आणि म्हणाली, ‘‘अहो,’’ बाबांनी घसा साफ केला आणि  म्हणाले, ‘‘एडमंड्सचा काल फोन आला होता.’’

‘‘हो?’’ मी म्हणाले, ‘‘बर्‍याच वर्षात त्याच्याबद्दल काहीच कळले नाही. मार्क कसा आहे कोण जाणे?’’

बाबांनी हळूवारपणे सांगितले, ‘‘मार्क विएतनाम युद्धांत मारला गेला. उद्या त्याची प्रेतयात्रा आहे. तू गेलीस तर त्याच्या आईवडिलांना बरे वाटेल.’’ आजसुद्धा मी रस्त्यावरची ती जागा नक्की दाखवू शकेन जिथे बाबांनी मला मार्कबद्दल सांगितले.

मी या आधी कधीच योद्ध्याची शवपेटिका पाहिली नव्हती. मार्क इतका छान दिसत होता अन् मोठा पण. त्या क्षणाला माझ्या मनात एकच विचार होता, मार्क, तुझ्या एका शब्दासाठी मी जगातल्या सार्‍या चिकटपट्ट्या ओवाळून टाकीन.

मार्कच्या मित्रांनी चर्च भरून गेले होते. चकच्या बहिणीने गाणे म्हटले – The Battle Hymn of the Republic. नेहमीप्रमाणे धर्मगुरुंनी प्रार्थना म्हटली. ब्युगल वाजला, एकेक करत मार्कवर प्रेम करणारे सर्वजण शवपेटिकेपाशी चालत गेेले, व पवित्र पाणी उडवले. शवपेटिकेला आशिर्वाद देणारी मी शेवटची होते. सैनिकांतला एकजण माझ्याकडे आला. ‘‘तुम्ही मार्कच्या गणिताच्या बाई होतात का?’’ त्याने विचारले. मी मान हलवली व शवपेटिकेकडे बघत राहिले, ‘‘तुमच्याबद्दल मार्क खूप बोलत असे.’’ तो म्हणाला.

प्रेतयात्रेनंतर मार्कचे बरेचसे मित्र चकच्या शेतावरच्या घरी गेले. मार्कचे आई-वडिल तिथे माझी वाट पहात होते. ‘‘आम्हाला काही दाखवायचे आहे तुम्हाला’’ त्याचे वडील म्हणाले. त्यांनी खिशातून पैशाचे पाकीट काढले. ‘‘मार्क जेव्हा मारला गेला तेव्हा त्याच्याजवळ हे सापडले. तुमच्या ओळखीचे आहे असे आम्हाला वाटते.’’

पाकीट उघडून त्यांनी काळजीपूर्वक त्यातून जीर्ण झालेली वहीची दोन पाने काढली. त्यांना चिकटपट्टी लावली होती अन् अनेकघड्या घातल्या होत्या. कागद न वाचताच मला कळले की मार्कच्या वर्गमित्रांनी त्याच्याबद्दल लिहिलेल्या चांगल्या गोष्टींची ती यादी होती. ‘‘असे करण्याबद्दल आमचे धन्यवाद’’ मार्कची आई म्हणाली, ‘‘पहा, मार्कच्या दृष्टीने तो एक अनमोल ठेवा होता.’’

मार्कचे वर्गमित्र हळूहळू आमच्या भोवती गोळा होऊ लागले. चक् जरा लाजवट हंसला अन म्हणाला, ‘‘माझी यादी अजून माझ्याकडे आहे. घरी माझ्या कपाटाच्या वरच्या कप्प्यात आहे.’’ जॉनची बायको म्हणाली, ‘‘जॉनने मला त्याची यादी आमच्या लग्नाच्या अल्बममधे ठेवायला सांगितली.’’ ‘‘माझीपण माझ्याकडे आहे,’’ मेदिलिन म्हणाली, ‘‘ती माझ्या डायरीत आहे.’’ नंतर विकीने आपले पैशाचे पाकीट काढले आणि जीर्णशीर्ण झालेली यादी सर्वांना दाखवली. ‘‘ही मी नेहमीच माझ्याजवळ ठेवते.’’ जरासुद्धा न संकोचता विकी म्हणाली. ‘‘मला वाटते आम्ही सगळ्यांनीच आपापल्या याद्या जपून ठेवल्यात.’’

त्यावेळी मी खाली बसले आणि रडले.

मला मार्कसाठी रडू आले अन् त्याच्या सगळ्या मित्रांसाठी. कारण तो आता त्यांना कधीच

भेटणार नव्हता.