टेंपर टॅन्ट्रम्स

‘‘कोण म्हणतं, ‘मुलं म्हणजे फुलं’? माझं तर स्पष्ट मत आहे, मुलं म्हणजे, क्षणाची फुलं अन् अनंतकाळचे काटे आहेत!’’
हे उद्गार आहेत एका नवपालक आईचे. तिच्या तीन वर्षाच्या मुलानं तिची पूर्ण ‘दशा’ करून टाकल्यावरचे.

मुलं जोवर पूर्ण परावलंबी असतात तेव्हाच जास्त गोजिरवाणी दिसतात. जसंजसं ती ‘स्व’तंत्र होऊ लागतात तसे त्यांच्या ‘स्व’चे चटके बसू लागतात अन् पालक हैराण होऊ लागतात.

दीड एक वर्षापर्यंत मुलानं कसं वागायचं यावरचे निर्बंध आपण मोठे लोक ठरवतो. मूल स्वतः त्यात फारसं काही ठरवत नसतं. फारसा विरोधही करत नसतं. त्यामुळं पालकांना ‘छान’ वाटत असतं.

पुढं दोन वर्षांनंतर मात्र त्याला चाचपणी करत वागावं लागतं. मी काय करू? काय नको करू? मला काय जमेल? हे मी करून पाहावं का? हे आईबाबांना का आवडलं नाही? त्यांना आवडेल असं म्हणजे मी नक्की कसं वागावं? त्यांना आवडलं नाही तर ते मला सोडून देणार नाहीत ना? मग मी एकटा कसा राहू? हे त्याचे प्रश्न. त्यावर मुलांनी यथाशक्ती यथाबुद्धी उत्तरं शोधलेली असतात अन् त्यानुसार ती वागत असतात. आजूबाजूच्या मंडळींच्या पसंतीस येईल असं – त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी, त्यांचं आवडतं होण्यासाठी मुलं स्वतःचं वागणं ठरवत जातात. स्वतः आपणहूनही बदलत राहतात. थोडक्यात शहाणी होत जातात.

अर्थातच त्यांच्या स्वभावानुसार अन् परिस्थितीनुसार त्यात रंग भरत जातात. कोणाही दोन व्यक्तींचं अनपेक्षित वागणं समोरासमोर आलं की संघर्ष येतोच. मग काहींचा हट्ट सुरू होतो. तो पुरवला नाही तर आक्रस्ताळेपणा – पुढे राग – क्रोध – भडका… अशी सर्वांनाच त्रासदायक नकोशी वागणूक समोर येते. यालाच ‘टेंपर टॅन्ट्रम्स’ असं सर्व समावेशक नाव आहे.

जरी हे असं वागणं जगातल्या सर्व जाती-धर्म-पंथांतल्या मुलांमधे दिसत असलं तरी ‘टेंपर टॅन्ट्रम्स’ याला मराठीत एक असा प्रतिशब्द नाही. सौम्य हट्ट – वेडेवेडेपणा – तिसरं-विसरं – आक्रस्ताळेपणा, बिथरणं, रागानं बेभान होणं, हाताबाहेर जाऊन वागणं, डोकं फिरल्यासारखं वागणं, इ.इ.इ. अशा चढत्या क्रमानं वाईट वागणं, या सगळ्याला मिळून एकच संज्ञा ‘टेंपर टॅन्ट्रम्स’.

दोन-तीन वर्षांच्या सर्वच मुलांचं थोडंफार वेडं वागणं, त्यांच्याशी झकाझकी होणं सर्वच पालकांनी अनुभवलेलं असतं. अगदी वेड्यासारखी बिथरून वागणारी मुलंसुद्धा मोठेपणी सौम्य झालेली दिसतात ! म्हणजे ही तात्पुरती अवस्था म्हणता येईल. पण या प्रकारची वागणूक स्वभाव होऊन राहण्याचा धोकाही आहे. तो कुणाला जास्त आहे, तो कसा ओळखायचा, कसा टाळायचा हेही पाहू या.

एखादं मूल सारखं सारखं म्हणजे दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा आणि पंधरा मिनिटांपेक्षा अधिक वेळा असा हट्ट करत असेल – बिथरत असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीनं हाताळणं आवश्यक आहे. त्याची कारणमीमांसा शोधणं आणि दुरुस्ती करण्यासाठी काही उपचारांची रूपरेषा ठरवणंही आवश्यक आहे.

मुलाला कोणताही शारीरिक आजार नाही ना? नुकताच आजारातून उठला आहे काय? त्याला ऍनीमिया (लोहाची कमतरता) नाही ना हे प्रथम पाहायला हवे आणि तसे असेल तर त्याची दुरुस्तीही करायला हवी. अनेकदा हे दोन्ही जोडीने सापडते आणि स्वभावदोष उफाळून आलेले असतात. त्यामुळे वर्तणुकीत आणि वातावरणात बदल घडवावेच लागतात.
मुलं अशी का वागतात बरं? कारणं मुलांत, पालकांत आणि वातावरणात दिसतात.

मुलांमधील कारणं
मुलांना जसं जसं स्वतंत्रपणे क्रिया (शारीरिक) करता येऊ लागतात तसं तसं त्यांचा वापर करून पहाण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग ते प्रयोगाला लागतात-मग चुका होतातच-बोलणी, मार खातात आणि मग पालकांच्या मर्यादांच्या कक्षेत बसायची कसरतही चालू होते. मूल जेवढं स्वतंत्र बाण्याचं, उद्योगी, धडपडं तेवढे पालकांशी लढाईचे प्रसंग अधिक. जितकं मवाळ, सौम्य, शांत, ऐकणारं, तितके प्रश्न कमी. इथं बुद्धिमत्तेचा मुद्दा गौण ठरतो.

मुलांमधली साधी सोपी कारणं म्हणजे, भूक लागणं, दमणं, झोप येणं (अन् ती न लागणं) इथं चाणाक्ष पालकांनी हे जाणलं अन् दुरुस्त केलं तर प्रश्नच मिटतो.
– पुढची परिस्थिती जरा वरच्या पायरीवरची.
मुलाला काहीतरी करून पालकांचं लक्ष वेधायचं असतं. एक तर आपण केलेलं काहीतरी दाखवायचं असतं, किंवा करूनच दाखवायचं असतं, तर कधीकधी चक्क लहान होऊन पूर्वीसारखे लाड करून घ्यायचे असतात. अशामुळं मुलांचे काहीतरी मिळवण्यासाठी हट्ट सुरू होतात.
– काहीतरी टाळण्यासाठी सुद्धा नकार देऊन हट्ट होऊ शकतात. असं काही तरी ‘करू नको’ म्हणून तर काही तरी ‘कर’ म्हणून पालकांना विरुद्ध वागावं लागतं. थोडक्यात पालकांची अपेक्षा ‘असं’ वाग म्हणून तर मुलाला नेमकं ‘तसं’ वागायचं नसतं. अशी अपेक्षा, अन् वास्तव यातली तफावत.
– हा एक नकारात्मक प्रतिक्रियेचा काळ वाढीच्या टप्प्यांत अपरिहार्यपणे येतो. सर्वच मुलांमध्ये-कमी जास्त प्रमाणात दिसतो. साधारणपणे दुसर्याा वर्षानंतर दिसतो-वाढीला लागतो-अन् वर्षभरात संपतो. कधीकधी एखाद्या मुलात पहिल्या वर्षी इतकंच नव्हे तर पहिल्या महिन्यांतही हट्टीपणाचे-आक्रस्ताळेपणाचे पैलू अनुभवायला मिळतात.
चारेक वर्षांपर्यंत हा प्रकार जर थांबला नाही, दुरुस्त करण्यासाठी पालकांकडून स्वतःमधे किंवा वातावरणात बदल घडवले नाहीत तर हा स्वभाव बनून राहतो आणि पुढे स्वतःला अन् घराला-सर्वांनाच त्रासदायक होतो.
– मोठमोठ्यांनी ओरडणार्‍या मुलांत सौम्य कर्णबधिरतेचं कारण लक्षात ठेवावं आणि तसे तपास अन् उपचार करावेत.

पालकांमधली कारणं पाहू या –
– अननुभवी पालकांना आपल्या अपेक्षाच नीटशा समजलेल्या नसतात अन् मुलांकडून अवाजवी अपेक्षा करत राहतात. म्हणून दुसर्याा मुलाच्या वेळी परिस्थिती थोडी वेगळी होते अन् त्याचा फायदा दुसर्यार नंबरला मिळत जातो.
– आजी आजोबांजवळ (अनुभवी पालकांजवळ) मुलं कमी आक्रस्ताळेपणा करतात. जिथं मऊ सापडतं, तिथं मुलं जास्त हट्ट करतात. म्हणून बाबांपाशी कमी हट्ट चालतो.
– जेव्हा मुलाच्या दृष्टीनं जी व्यक्ती महत्त्वाची असते तिच्यापुढेच ही थेरं चालतात, म्हणून ‘आई’ ही बहुतेक वेळा ‘बळीचा बकरा’ ठरते.
– व्यक्ती दमलेली असली तर मुलांना पुरे पडायला असमर्थ होते, अन् हे प्रसंग चटकन् उभे राहतात-चिघळतात. म्हणून कामावरून आलेल्या आईच्या वाट्याला नेमकं हे येतं.
– काळजी घेणार्‍या व्यक्तीचं वागणं खरोखर काळजी घेणारं राहिलं नाही, धुसफुस होत राहिली तर मुलांना ते जाणवतं. ती अस्वस्थ होतात अन् आपल्याकडून जास्त मागण्या करत राहतात.
उदा. आईबाबांचं भांडण झालं असलं अन् आईला बाबांनी टाकून बोललेलं असलं तर राग नकळत वस्तूंवर, मुलांवर निघतो. स्पर्शातून तो पोचतो अन् नको तो प्रसंग आपोआप उभा राहतो.
– ज्या पालकांचं स्वतःचंच वागणं भडक, आवेगाचं, आवेशाचं असतं त्यांच्या मुलांना नकळत चुकीचे संदेश मिळत राहतात. उदा. ‘काही हवं’ सांगायला ओरडायचं, नापसंती सांगायला थयथयाट करायचा, राग आला तर फेकाफेकी, आदळआपट, मोडतोड, मारझोड करायची असं गरजेपेक्षा जास्त तीव्रतेचं वागणं. हे सर्व मवाळ किंवा सौम्य करायची गरज असते. साधे सोपे आवेशविरहित भाष्य असू शकते हेच घरात कानावर पडत नसल्यामुळे मुलांचं वागणं बोलणं तसंच होत जाणं.
– पालकांमधले नैराश्य, मनोविकार हे तर समजण्याजोगंच आहे. अशा पालकांना मुलांचं करणं खरं तर झेपतच नसतं. त्यांनी त्यासाठी स्वतंत्र उपचार घेणं गरजेचं आहे.

वातावरणातली कारणं
मुलांना भयरहित-ताणरहित मोकळं वातावरण हवं असतं (अर्थात सर्वांनाच). कोणताही ‘ताण’ वातावरणात भरून राहिला असला तर मुलांना तो लगेच जाणवतो. त्यांचं वागणं बदलतं, ती अस्वस्थ होतात. त्यांना वाटतं, ‘आत्ता आधी माझ्याकडे पहा, मला जास्त जपा, मला सांभाळा.’

नेमकं अशा वेळी मुलाकडं लक्ष द्यायला कोणालाच तसा वेळ नसतो. अशानं मुलं बिथरतात-विरोध करत राहतात. अन् परिस्थिती चिघळते.

घरात एकवाक्यता नसणं
एकाचं धोरण धरण्याचं अन् कडक तर दुसर्‍याचं तेव्हाच सोडून देण्याचं, मवाळ. असं झालं की मूल गोंधळतं. निवड मात्र आपलं खरं जिथं होतंय त्याचीच करत राहातं. अन् त्याचा हट्ट वाढत राहतो.
– जिथं घाई आहे-वेळ नाही तिथं मुलांचा हट्टीपणा भरीला असणारच.

अशा प्रसंगांत नक्की काय होतं?
पालकांचा विरोध असतानाही मुलं त्यांना पाहिजे तसंच वागायचं ठरवतात तेव्हा खरा प्रसंग सुरू होतो.

माघार कुणी घ्यायची? आता आपल्या मनासारखं होत नाहीये म्हटलं की मूल अन् पालक दोघंही रागावतात, आणि कुणीच माघार घेत नसल्यानं ‘पॉवर गेम’ चालू होतो.

आत्ता खरी वेळ असते, राग कसा ताब्यात ठेवावा? आपल्या मनाजोगं झालं नाही तरी कसं नीट वागावं? याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची पण पालक नेमके ‘नको तसे’ वागतात आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. आणि मुलाला मात्र ‘कसं वागू नये’ याचेच धडे मिळत राहतात.
– पालकांचा आवाज चढतो, अंगावर हात पडतो, तोंडातून नको ते शब्द, वाक्प्रचार, शेरे ताशेरे यांचा भडिमार होत राहतो. -मुलाच्या शब्दकोशात भर पडत राहते. मूलही ‘वाक्यात उपयोग’ करून दाखवतं-उलट बोलतं. मग तर स्फोटक परिस्थितीच निर्माण होते.

मूल या सर्वाला प्रतिसाद म्हणून भेदरून बिथरून विचित्र वागत राहते. त्याला स्वतःला क्रोधाविष्कार आटोक्यात आणता येतच नसतो. त्यावेळी त्याला कोणाची तरी नेमकी-भक्कम-तटस्थ-आश्वासक मध्यस्थी हवी असते. आणि पालकांकडून ती मिळाली तर हवीच हवी असते.

मुलांना अशा वेळी नक्की काय वाटतं?
खरं म्हणजे ‘राग’ ही भावना मुळीच हवी-हवीशी वाटणारी नाहीये. राग येणं, अंगाचा थरकाप होणं, मनाचा भडका उडणं, यामुळे शरीरात जे काय होतं ते कधी एकदा संपतंय असंच राग आलेल्या व्यक्तीला मनापासून वाटत असतं. राग आलेल्या व्यक्तीला समोरची व्यक्तीही चिडलेली भडकलेली दिसली तर आणखीच अस्वस्थ वाटतं. तसंच मुलांचंही आहे.

दुसर्‍या कोणी म्हणजे पालकांनीच या परिस्थितीवर तोडगा काढावा आणि हा रागाचा झटका – लवकर संपावा असं मुलाला वाटत असतं. आपल्या वेड्यासारख्या वागण्यानं पालकांना आणखीच राग येणार आहे हे समजत नसतं अन् राग आटोक्यात आणण्याइतकी समज-ताकद त्याच्यात नसते. म्हणूनच पालक रागावलेले असले तरी मूल पुन्हा पुन्हा त्यांच्याजवळ जायला पाहत राहते. ते काहीतरी करतील अशा आशेने ! दुसर्यात कोणी जवळ घेण्यापेक्षा रागावलेल्या पालकानंच ते करावं अशी त्यांची आतून इच्छा असते. ते तसं सूचित करत असतंही.

मूल बिथरलं तर कसं वागायचं?
काही मर्यादेपर्यंत मुलाचं वागणं-हट्ट चालू द्यायला हरकत नाही. पण आधी सांगितलेल्या व्याख्येत मुलाचं वागणं बसू लागलं तर –
तात्काळ काही तरी निर्णय करायला हवा.

मुलाचं हे वागणं अगदी दुर्लक्षिण्याजोगं असेल तर त्याला त्याच्या वयाच्या एवढ्या मिनिटांचा ‘Time out’ द्यावा म्हणजे सुट्टी द्यावी. पूर्ण दुर्लक्ष करावं. रडत असेल तर खुशाल रडू द्यावं. ‘तुझं रडू गेलं की माझ्याजवळ ये’ असं शांतपणे-प्रेमाने सांगावं आणि रडणं थांबल्याबरोबर जवळही घ्यावं. नंतर समजावून सांगावं. ओरडत असेल तर आवाज खाली आल्याशिवाय त्याच्याशी बोलू नये. मात्र झोंबाझोंबी-मारामारी-फेकाफेकी, लोळणं, अंग टाकून देणं, चावणं, अशा थराला गोष्टी जात असतील तर व्यक्तिशः मुलाला धरून ठेवावं. त्याला ती कृती करता येणारच नाही इतकं आणि शांत होऊ द्यावं. हे करत असताना आपला आवेश विरुद्ध पार्टीतून त्याच्यावर विजय मिळवण्याचा असू नये. तोंडानं अपशब्द, उद्वेगाची वाक्यं यातून तिरस्कार सूचित होऊ नये. तर, आपल्या आश्वासक मिठीत मुलाचा राग-आवेश विरघळवून देण्याचा असावा. अशा मिठीत राग शांत होण्याचा-चांगला अनुभव मुलाला मिळणं गरजेचं आहे. अशामुळे आला प्रसंग लवकर आणि चांगल्या प्रकारानं संपतो. दोन्ही पक्षी मनःस्वास्थ्यही मिळतं.

– अशा युद्धप्रसंगी, एखादा तडाखा दिल्यानंही परिस्थिती तात्काळ आटोक्यात येऊ शकते; पण त्याच वेळी त्या पालकाची दहशत बसते. त्यामुळं हा या प्रश्नावरचा तोडगा नाहीच नाही.

उलट मिठीत राग शांत होणं-धुमसणं/घुसमट निवळणं-हुंदके संपणं, त्यानंतर मूल-पालक यांची दिलजमाई होणं महत्त्वाचं.
तुला राग आला होता, आता तो गेला ना? तू मला खूप आवडतोस, आता तुला पुन्हा राग येऊ नये म्हणून आपण…… करू या… वगैरे गोष्टी केल्यामुळे पालकांविषयी आदर, प्रेम, आपुलकी प्रस्थापित होते आणि तेच खरं म्हणजे हवं असतं.

ज्या पालकांना अशा प्रसंगांना सहजपणे घेता येतं, विनोदबुद्धी असते, संयम असतो, हाता-तोंडावर ताबा असतो अशांच्या मुलांचा हा प्रश्न उभा राहता राहता निवळतो. हे नक्कीच लक्षात घेण्याजोगं आहे.

आता शेवटी थोडं पालकांच्या बाजूनंही…
कितीही प्रेमाचं म्हटलं तरी मूल वावगं वागायला लागलं की पालकांना नकोसं वाटू लागतं-कधी कधी तर लाजिरवाणंच वाटतं-प्रेमाची जागा तिरस्कार घेऊ लागतो आणि मग हे प्रसंग वारंवार येऊ लागतात.
– जितकं मूल एकाच व्यक्तीबरोबर जास्त वेळ काढेल उदा. आई. तितकं त्या व्यक्तीला कंटाळतं. त्या दोघांनाही अशा वेळी ‘बदल’ हवा असतो. ‘माझ्या मुलाचा मला अगदी कंटाळा आलाय’ हे वाक्य मनात दडवून ठेवायची कसरत आईला करावी लागते. कारण, हे वाक्य ‘आईपणाला कमीपणा’ आणणारं वाटतं. आपण समाजानंच आईला असं मत व्यक्त करायला थोडीफार बंदी केलीय पण त्यात खरंच तथ्य आहे. आजूबाजूच्या लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि आई – मुलांच्या जोडीला थोडा ‘ब्रेक’ दिला पाहिजे. आईला मुलाला दुसरीकडे ठेवून सुट्टी दिली पाहिजे, म्हणजे परत भेटतील तेव्हा एकमेकांना एकमेकांची ओढ लागलेली असेल आणि मग पूर्वीपेक्षा चांगले संबंध लगेच प्रस्थापित होतील.

शिवाय, कंटाळलेल्या आईकडून चांगलं ‘आईपण’ निभावलं जात नाही. ती नुसतीच जवळ असते पण मनानं रिकामी! असं एकत्र असण्यानं ना बाळाला सुख ना आईला. याशिवाय अनवधानानं अपघातांची शक्यता वाढते ते वेगळंच. हे टाळायलाच हवं. आईला असा ब्रेक देणं घरानं मान्य केलं पाहिजे.

आता नव्या पालकांचं असं अयोग्य वागणं सुद्धा चुकूनच होत असतं, मुद्दाम नक्कीच नसतं. त्यांनाही अपराधी न ठरवता कुणीतरी शिकवण्याची गरज असते, कारण त्यांचं हे शिक्षण झालेलंच नसतं. घरातल्या जुन्या-जाणत्या पालकांची (आजी-आजोबांची) ती जबाबदारी आहे, पालकांवर चिडून-शेरेताशेरे झोडून, त्यांना कमी लेखून, मुलं बिघडवल्याचा आरोप करून चालणार नसतं. त्यापेक्षा समंजसपणानं अशा प्रसंगी कसं वागायचं हे शिकवलं पाहिजे. जितकं लवकर शिकतील तेवढे लवकर हे प्रसंग संपतील. ज्यांच्या घरात अशा व्यक्ती नसतील त्यांनी आजूबाजूला शांत-संयमी-यशस्वी पालक शोधावेत अन् त्यांचा ‘गंडा बांधावा’. त्यांनाही जमेल हळूहळू तसं वागणं-नव्हे जमवावंच लागेल. मुलं चांगली वागायला हवी असतील तर शिकून बदलावंच लागेल आपलं वागणं. ‘मुलंच पालकांना वळण लावतात’ असं म्हणतात ते काही खोटं नाही !