वायपर

नोकरी लागल्याच्या आनंदासोबत
मनात मातीच्या गोळ्यांना घडवण्याचं स्वप्नं
डाव्या हातात पाठ्यपुस्तकांनी रेखलेलं ज्ञान… आणि
कोर्याज मनांच्या फळ्यावर संस्काराच्या आकृत्या काढायला
उजव्या हातात खडू…
…एवढी शस्त्र घेऊन…
जगातल्या सगळ्या वाईटाशी लढायला निघालेते मी…
…प्रत्येक वर्गावर रोज पस्तीस मिनिटं…!
संस्कारासाठी असलेले खडू बाजूला ठेवून,
शिस्तीचा चाबूक नाही हाती घ्यावा लागला कधीच.
वर्गभर पसरायची उत्सुक शांतता… आत पाऊल टाकलं की…
… त्यांच्या त्या जिज्ञासू अन कौतुकभरल्या नजरा-
नवं समजल्याच्या आनंदानं उजळणारे निरागस चेहेरे…
…वाटायचं व्वा ! जिंकलोच आता आपण !

पण-पण वर्गाबाहेर पाऊल टाकतानाच पाठीला जाणवणारी त्यांची बेशिस्त
त्या पस्तीस मिनिटांच्या बाहेरचं त्यांचं बेजबाबदार वागणं,
असण्यापेक्षा दिसण्याला दिलेलं अवास्तव महत्त्व,
त्या साफल्यचित्रातले सारेच चेहरे… मला सर्वार्थानं पराभूत करणारे,
पस्तीस मिनिटांच्या जिंकण्याला पराभवाची जीवघेणी भोवळ आणणारे.

…ठाऊक आहे मला –
नसतो कारणीभूत याला आपण एकटेच
त्यांच्या मनाच्या काचेवर अविरत कोसळत असतात
बाहेरच्या सडलेल्या व्यवस्थेचे संदर्भ थेंबाथेंबानं!
आज वायपरच्या एका फेरीत पुसून टाकले तरी –
दुसर्यायच दिवशी पुन्हा डागाळलेलीच त्यांच्या मनाची काच
त्यांच्या आयुष्याची वाट अंधुक करून त्यांची दिशाभूल करणारी…!
कुठवर असे नुसतेच पुसत राहायचे हे थेंब?
विचारांच्या पार तळाशी जाऊन आरपार घुसळलं
आणि उत्तर मिळालं – ‘‘त्यांचा स्वतःचा वायपर चार्ज होईस्तोवर’’

एकदा का नकोसे संदर्भ ओळखून-पुसून-
स्वतःच्या मनाची काच लख्ख ठेवायची सवय जडली त्यांना
की यशाच्याच रस्त्यावर धावतील त्यांची आयुष्यं!
अशा एखाद्या शिखरावरच्या आयुष्याकडे,
मान उंच करून पाहताना,
पुन्हा नव्याने चार्ज होतो आपलाही वायपर
पुढच्यांच्या मनाच्या काचेवरच्या नकोशा थेंबांशी लढायला!