गोष्ट रोहनची !

ही गोष्ट आहे रोहनची. त्याच्या आई-बाबांची आणि आमची म्हणजे त्याच्या मावशी, काकाची. रोहन वय सात वर्ष. तो जेव्हा खूप लहान होता तेव्हा अशक्त होता. आजारी असायचा. डॉक्टर सारखे चालूच. आज ताप, उद्या सर्दी, परवा कसली तरी ऍलर्जी, यामुळे आईनं तळहाताच्या फोडासारखं जपलेलं. फार खेळू दिलं नाही, थंडी वाजेल म्हणून बाहेर जायचं नाही, खोकला होईल-गार खायचं नाही, असं सगळं खूप जपून जपून.

रोहन मोठा व्हायला लागला. आईला सोडून कुठेही जायचा नाही. तिची ओढणी घट्ट धरूनच चालायचा. मोठ्यांच्या सारख्या सूचना-पडशील, लागेल, फुटेल, आजारी पडशील. अशा सगळ्या नकारार्थी सूचनांनी त्याला स्वतःबद्दल विश्वासच राहिला नाही. तो खूप भावनाप्रधान आहे.

त्यामुळे एवढंसं काही झालं की पटकन् रडू यायचं. आनंद, दुःख, राग सगळ्यावर रडायचंच. मग शाळेतल्या मित्रांनी रड्या म्हणून चिडवणं, मारून पळून जाणं, दप्तर ओढणं हे चालू झालं. रोहन रोज रडत घरी यायचा. आई खूप वैतागायची. आपण त्याला खूप भित्रं बनवलं असं तिला वाटायचं. पण आता काय करावं हेही समजायचं नाही. त्यातच त्याला चष्मा लागला. नंबर बराच होता. जाड भिंगाचा चष्मा होता. मग तर अजून जपणं सुरू झालं. चष्मा फुटेल हे एक नवीन कारण मिळालं.

रोहनची चित्रकला चांगली होती. तासन् तास तो त्यात रंगून जायचा. साहजिकच संध्याकाळी ग्राऊंडवर खेळण्यापेक्षा चित्रं काढणं सोपं आणि सोयीचं झालं.

रोहनच्या आई-बाबांचा आणि आम्हा दोघांचाही निसर्गात मुक्त भटकंती हा आवडीचा विषय. या पावसाळ्यात भटकंतीसाठी एकही आठवडा चुकवायचा नाही असं आम्ही ठरवलं होतं. प्रश्न होता तो रोहनचा. पाऊस, गार वारा, धबधबे, डोंगरातलं चढणं, उतरणं या त्याच्या दृष्टीनं अशक्य कोटीतल्या गोष्टी. आता काय? चौघांपुढे प्रश्न. त्याला इथे ठेवून जाणं शक्य नव्हतं, योग्यही वाटतं नव्हतं. एकदा तसंच त्याला घेऊन पावसाळ्यात छोट्याशा ट्रेकसाठी बाहेर पडलो. ट्रेक अगदी सोपा सरळ होता. रोहनही मजेत होता हे पाहून बरं वाटलं. धो-धो पाऊस कोसळायला लागला. कारमधून आम्ही भिजायला बाहेर पडलो. पण रोहन केविलवाणा होऊन रडायच्या बेताला आला होता. त्याला हे सगळं नवीनच होतं. आम्ही मनसोक्त भिजत होतो. आनंद घेत होतो. तो मात्र गाडीत बसून खूप रडत होता. ते पाहून सगळे खूप निराश झालो आणि परत फिरण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर रोहन शांत झाला. चित्रं रंगवत बसला. आमच्यापुढे परत प्रश्न ! मनातून रोहनचा खूप राग यायला लागला. त्याची आई तर रडायलाच लागली. आमच्यापुढे आता दोनच पर्याय होते. भटकंती हा शब्द विसरणे किंवा रोहनला मनानं तयार करणे. खूप विचार करून आम्ही दुसरा पर्याय जमतोय का ते बघण्याचं ठरवलं. आमची ही एक परीक्षाच होती.

चौघं बसून काही चर्चा केली, ठरवलं असं नाही. पण रोहनला समजून घेण्यातही आम्ही कमी पडतो आहोत, हे लक्षात यायला लागलं. थोडक्यात लिहिणं अवघड आहे पण सगळं सविस्तर आलं नाही तरी एकूण आमचा प्रवास लक्षात येईल असं पाहाते.

पहिल्यांदा रोहनच्या वागण्यातल्या नकारार्थी गोष्टी पाहायचं ठरवलं. नकारार्थी पहिल्यांदा, कारण त्या सारख्या सारख्या समोर येत होत्या.
 रोहन फक्त आईशीच बोलायचा. वाक्यांची नीट मांडणी त्याला करता यायची नाही. आपल्याला लोक हसतील ही भीती त्याच्या मनात असावी.
 एकूणच भीती या शब्दानं त्याचं सगळं विश्वच व्यापलं होतं. डोंगरावर चढायचं तर पडू ही भीती, पाण्यात पाय घसरेल ही भीती, चिखलानं पाय भरतील ही भीती, गवतात किडे चावतील ही भीती, पावसानं भिजून सर्दी होईल ही भीती आणि अशा अनेक.
 चिखल, माती, किडे, शेण याविषयी खूप किळस होती. डोंगर चढताना चिखलानं हात भरले तर रडायला लागायचा.
 डोंगरात, रानावनात असं भटकण्यापेक्षा टी.व्ही.वर कार्टून पहाणं, कॉम्प्यूटर गेम्स खेळणं, हॉटेलमधे जाणं, बरं वाटायचं. (पहिल्यांदा आम्ही कारमधून जात असताना तो तासन् तास मोबाईलमधल्या गेम्स खेळत असायचा)
 मी अशक्त आहे, बारीक आहे, त्यामुळे डोंगर चढणे वगैरे आपलं कामच नाही हे त्यानं मनाशीच ठरवून टाकलं होतं. त्यामुळे बाहेर पडलो की चेहरा कायम रडवेला.
 मी येत नाही, मला जमणार नाही, मी करणार नाही, मी पडेन, लागेल, अशीच वाक्यं सतत असायची.
 मला सोडून हे लोक पुढे जातील ही भीती त्यामुळे आईचा हात घट्ट धरल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकायचा नाही. त्याला एखादी गोष्ट आवडली नाही, भूक लागली, दमला तर सांगायचा नाही, नुसता रडायचा. मग आम्ही ओळखायचं की त्याला काय झालंय. अशा आणखी काही गोष्टीही वेळोवेळी लक्षात आल्या होत्या. मग आम्ही त्याच्यातल्या चांगल्या गोष्टींकडे पाहायला लागलो.
 तो बारीक असला तरी अशक्त नाही. जेवण व्यवस्थित करतो, भरपूर जेवतो, स्टॅमिना भरपूर आहे. वजन कमी असल्यामुळे तर तो आमच्यापेक्षा वेगानं डोंगर चढू शकतो.
 त्याची चित्रकला फारच छान आहे. कागद आणि रंग बरोबर घेतले तर तो खूष असतो.
 ट्रेकला जाण्याबद्दल नाराज असूनही, या रविवारी कुठं जायचं हे तो आईकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतो.
 स्वप्नात मला फुलं, फुलपाखरं, धबधबे, डोंगर, झाडं दिसली होती, ती मला बोलावत होती, हे तो आईला सांगतो.
 ट्रेकला कितीही दमणूक झाली असली तरी दुसर्याु दिवशी तो फ्रेश असतो, न कंटाळता शाळेत जातो.
 शाळेतल्या शिक्षकांना, मित्रांना, कुठेकुठे गेलो होतो हे सांगतो. जेव्हा सांगतो तेव्हा चेहरा आनंदी असतो. आणि अशा बर्यााच मुद्यांनंतर आम्ही आमच्या वागण्यात बदल करायला सुरुवात केली. आज
दोन वर्षानंतर रोहनमध्ये खूप फरक पडला आहेच, पण आमच्या दृष्टीतही बदल झालाय.

साधारणपणे आम्ही आमच्या वागण्यात असे बदल केले –
 रोहन बारीक आहे असं चुकूनसुद्धा म्हणालो नाही.
 चिखल, मातीची किळस घालवण्यासाठी आम्हीही आमचे हात आणि कधीकधी कपडेही चिखलात बरबटवून घेतले.
 निरनिराळे पक्षी, फुलं, पानं, किडे जवळ जाऊन दाखवायला लागलो.
 पुढच्या वेळी जिथे जायचं असेल त्याची माहिती आधीच सांगून, तिथे कसे धबधबे आहेत, खूप फुलं आहेत असं सांगून त्याच्या मनाची तयारी करायला लागलो.
 त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला लागलो. त्याचं मत घ्यायला लागलो.
 त्याच्या कलाकलानं घेत डोंगर चढायला लागलो. तू किती छान चढू शकतोस, आम्ही तर दमलो बाबा-असं म्हणून त्याला सगळ्यात पुढे ठेवायचो.
 मुद्दाम चिखलात, पाण्यात पडल्याचं नाटक करायचो आणि सगळे पडतात, तू एकटाच नाही काही-असं सांगायचो.
 डोंगरावर चढण्याची आणि उतरण्याची एक पद्धत असते, ती त्याला शिकवली. पुढे तर आमच्यापैकी कोणी घसरलं तर तो सांगायला लागला की तुम्ही कसे चुकीचे उतरत होतात म्हणून पडलात.
 आम्ही कचरा, प्लॅस्टीक इकडे तिकडे फेकत नाही, पानं, फुलं, तोडत नाही. फुलपाखरं पकडत नाही हे तो बघायचा. त्यामुळे तो तसंच वागायचा प्रयत्न करायला लागला.

तर एकूण असा हा सगळा किस्सा. यातून तो किती शिकला त्यापेक्षा आम्ही जास्त शिकलो. त्याला समजावून घ्यायला शिकलो. असं सांगू शकलो की कार्टून पाहाणं, कॉम्प्यूटर गेम्स खेळणं, हॉटेलमधे जाणं यापेक्षा ही भटकंती
खूप सुंदर आहे. त्याची चित्रंही आता झाडं, पक्षी, डोंगर, फुलपाखरं यांनी भरलेली असतात. मुलांना बदलताना स्वतःला किती बदलावं लागतं याचा अनुभव आम्ही घेतला. कठीणही गेलं खूप वेळा. रागही यायचा त्याचा. पण तो आवरायला शिकलो आणि आमच्याकडून झालेली चूक त्यानं दाखवून दिली तर मान्यही करायला शिकलो.

रोहनमधे अजूनही थोडीशी भीती, बिचकलेपणा, संकोच आहे पण तोही जाईल हळूहळू. अजून एक गोष्ट मिळाली आम्हाला या सगळ्या प्रवासामधून. आम्ही पाचही जण एकमेकांच्या खूप जवळ आलो. छान मित्र झालो आहोत एकमेकांचे.

आणि मागच्याच महिन्यातली गोष्ट. भटकंतीला भीमाशंकरच्या जंगलात गेलो होतो. नुकतीच श्रावणसर येऊन गेली होती. छान इंद्रधनुष्य दिसत होतं. गच्च हिरवळीनं भरलेल्या पठारावर गाडी उभी केली. सामान काढेपर्यंत रोहन गायब. जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला म्हणून समोर पाहिलं. रोहननं बूट काढून फेकले होते, अंगातला शर्टही फेकला होता. तो गवतावर चक्क लोळत होता आणि मोठमोठ्यानी गाणीही म्हणत होता.

रोहन पावसानं कच्च भिजलेला आणि आमचे डोळे आनंदाश्रूंनी….