गेल्या काही दिवसात….

अमरावतीच्या डॉ. मोहना कुलकर्णी, स्वतःचं हॉस्पिटल, जम धरलेली प्रॅक्टीस. गेल्या काही वर्षांपासून पालकत्व, शिक्षण, विवाह या विषयांसंदर्भात समुपदेशनाचं काम सुरू करावं असा विचार त्यांच्या मनात येत होता. त्यांच्या आई शांताताई किर्लोस्कर यांच्या आयुष्यभराच्या ‘पालकत्वाच्या’ क्षेत्रातल्या कामाचा धागा या जाणिवेत गुंफला असणार. निर्णय झाल्यावर मोहनाताईंनी या संदर्भातलं वाचन, शिकणं, धडाक्यानं सुरू केलं. गेल्या काही महिन्यांपासून अमरावतीत प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. त्यांच्या ‘स्वानंद’ या समुपदेशन सेवेतर्फे २७ मार्च रोजी पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. ‘मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास’ असा कार्यशाळेचा विषय होता.

अमरावतीचे डॉ. सतीश आगरवाल यांनी शारीरिक वाढ व विकास या विषयावर मांडणी केली. डॉ. मोहना कुलकर्णी यांनी मुलांच्या वैचारिक व भावनिक वाढीमधे पालकांची बदलती भूमिका आणि नकळत होणारी भावनिक मारपीट याबद्दल सांगितले. डॉ. संजीवनी कुलकर्णी व शुभदा जोशी यांनी मानसिक-नैतिक-बौद्धिक विकास या संदर्भात सहभागी पद्धतीनं कार्यशाळा घेतली. भर उन्हाळ्यातही शंभरेक आई-बाबा अतिशय उत्साहानं या पूर्णवेळ कार्यशाळेत सहभागी झाले. आमिष-शिक्षा, सप्तप्रज्ञा (multiple intelligence), पालक-मूल नातं, अशा विषयांवर चर्चा विशेष रंगली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरे आणि मनमोकळ्या गप्पांनी कार्यक्रमाची सांगता झाली. आता दर महिन्याच्या २७ तारखेला सायं. दोन तास अशा संवादासाठी हा गट भेटत राहणार आहे.