फुलांनी फुलायला हवं म्हणून..

लहानपणी शास्त्राच्या पुस्तकातून आपण फुलपाखराच्या चार अवस्था, त्यांच्या आकृत्यांसह घोकून पाठ केलेल्या असतात. कथा, कादंबरीतल्या नायिकेनं तारुण्यात पदार्पण केलं यासाठी ‘सुरवंटाचं सुरेख रंगीबेरंगी फुलपाखरू झालं’ अशा तर्‍हेचं वर्णन आपण वाचलेलं असतं. पण ‘फुलांनी फुलायला हवं म्हणून…’ या नवीन पुस्तकात सुरवंटाचं फुलपाखरू बनण्याच्या प्रक्रियेचा इतका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला आहे की हे पुस्तक लहानांचं असलं तरी मोठ्यांसाठी लिहिलंय असं वाटावं.

लहान मुलं वाचतील तेव्हा ती फुलपाखराची गोष्ट असेल. पण हीच गोष्ट जेव्हा मी वाचते तेव्हा त्यात मला आपल्या मानवी जीवनावरचं भाष्य दिसायला लागतं. विशेषतः अळी जेव्हा म्हणते-‘‘अरे आपण एवढे दिवस खातोय, आणि जाड होतोय. आपण एवढंच करणार का? इतक्या सुंदर ठिकाणी जगण्याचा अर्थ फक्त एवढाच असेल? नसणार. आणखी काहीतरी असलं पाहिजे. ते शोधायला हवं.’’ तेव्हा मला हे आपल्या आयुष्याशी जोडावंसं वाटतं. पुढे गोष्ट वाचल्यावर जाणवतं की निसर्गात घडणारी कोणतीच गोष्ट निर्हेतुक नसते. जन्माला येणार्या प्रत्येक सजीवाचं एक विहित कार्य असतं. ‘मी तर अगदी सामान्य, माझं कसलं आलंय कार्य !’ असं म्हणून कोणीच स्वतःला नगण्य, निरुपयोगी समजू नये.

शिखरावर काय आहे, तिथे कशासाठी जायचं-काहीही माहीत नसताना, सगळे जातायत म्हणून इतरांना तुडवत, धक्काबुक्की करत चढत राहणं ह्यात अडकल्यामुळे काहीतरी वेगळं, सुंदर बनण्याची आपल्याला लाभलेली क्षमता आपण ओळखतच नाही. दुसर्‍या कुणाचं तरी आयुष्य सुंदर करण्याचं स्वप्न पाहता आलं, ते स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली, आपल्याला लाभलेली क्षमता ओळखता आली तर मग जमिनीवर सरपटणार्याच साध्या बिळबिळीत अळीचं सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू होऊन जातं.

फुलपाखरू होणं म्हणजे काय? ते काय करतं? याबद्दल गोष्टीतली राखी अळी म्हणते ‘फुलपाखरं फार सुंदर असतात. आपल्या रंगीबेरंगी पंखांनी ती आकाश आणि पृथ्वीला जोडतात. प्रेमाचा संदेश सगळीकडे पोचवतात. तेसुद्धा सर्जनशील प्रेम ! ती फुलांना न दुखावता फक्त त्यांचा रस पितात. आणि प्रेमाचं बीज एका फुलातून दुसर्याे फुलात उडतउडत पोचवतात. त्यांच्यामुळेच तर फुलं फुलतात. फुलपाखरं नसती तर जगात फार कमी फुलं फुलली असती.’

प्रत्येक फुलपाखरानं आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिलं तर सगळीकडे सुंदर फुलं फुलतील, आनंद भरून राहील आणि जग सुंदर बनून जाईल !

फुलांनी फुलायला हवं म्हणून, किंमत रु. २५/-
मूळ लेखिका : ट्रिना पौलस,
हिंदी रूपांतर : फुलोंकी उम्मीद – अरविंद गुप्ता,
मराठी रूपांतर : नीलिमा किराणे, कुतुहल प्रकाशन,
२६५, नवीपेठ, गांजवे चौक, पुणे ३०, फोन ड्ढ २५२३५३६९