म्हणून सगळं आलबेल?

आपण भेटतो… बोलतो….
गप्पा, एकत्र जेवणं, फोन,
मुलांचं राहायला जाणं चालू राहतं….
हास्याची कारंजी उडत राहतात
कर्तृत्वाचा सुगंध दरवळत राहतो.
पक्वान्नांचे स्वाद घेत राहू मनसोक्त.
नशेचे घोट मनांना तरल करतील.
जीवनाच्या आस्वादासाठी उभारी देतील….

पण…. पण….
….म्हणून सगळं आलबेल आहे असं नाही!

बोलतो ना आपण भरपूर….
हे, ते…. असं, तसं….
पण खरं सांगायचं तर,
टाळतोच मुद्याचं जे असतं खदखदत मनात.
पुन्हा पुन्हा परतवून लावतो त्या आतल्या आवाजाला,
गप्प बसवतो…. वेळ पडलीच तर गळाही दाबतो त्याचा.
बोललोच तर कुठून सुरू होईल… नि कुठे पोचेल?
काय काय निघेल पॅन्डोराज बॉक्स मधून….
नकोच ते ! नकोच ते !

त्यापेक्षा जमवतो आपण तत्त्वज्ञान
सुखेनैव जगता यावं म्हणून….
बनवतो आपलं इथिक्स-लवचीक
वेळोवेळी वाकवता येईल असंच !
तेच मित्र आपले, ज्यांचीही व्यथा तीच, दिशा तीच.
शोधतो मार्ग नवे नवे.
धाडसं नवी नवी…

वेदनेला आतल्या आत विरघळून टाकण्यासाठी.
दिसांमागून दिस जातात….
संपत्ती जमते, मान वाढतो….
किर्ती दिगंतात पसरते
आत्मविश्वासानं ओतप्रोत हास्य चेहर्याथवर ……….
पण तरीही…. तरीही…. मनातून एक आवाज वर येतच राहतो…

….म्हणून सगळं आलबेल आहे असं नाही.
म्हणूनच आज….
विचारावं वाटतंय स्वतःलाच….
माझ्या मनाच्या आत खोलवर आहे का….
एक धग… एक निखारा शिल्लक अजून….
पाहावं का तपासून पुन्हा एकदा?
घ्यावा का वेध या वाटण्याचा….?