संवादकीय २००५

‘जेव्हा कधी माणसानेवस्ती केली आणि मानवी संस्कृती स्थापन झाली, तेव्हापासूनच काही लोकांनी इतरांवर हुकुमत गाजवायला सुरुवात केली. हेच कार्य अव्याहत पुढे चालू राहण्यासाठी मुलांचा उपयोग झाला. प्रत्येक सज्ञान पालकाजवळ, मग तो कितीही कनिष्ठ स्तरातला किंवा शक्तीहीन असला तरी हुकूम सोडायला, धाक दाखवायला आणि शिक्षा करायला, कुणीतरी होतंच. एखादा गरीब मनुष्य स्वतः जरी गुलाम असला तरीही त्याच्याजवळ त्याच्या मुलांच्या रूपाने, त्याचे स्वतःचे असे काही गुलाम होतेच. केवळ याच कारणासाठी अनेकजण लहान मुलांशिवाय राहूच शकणार नाहीत.’ असं जॉन होल्टने म्हटलं आहे. हे वाचायला अगदी कटू वाटतं, पण हे खोटं आहे असं सिद्ध करता येईल?

आपल्या सामाजिक वास्तवामधे, लहान मुलांसाठी म्हणून निर्माण केलेल्या सर्व संस्था आपण आठवून पाहूया – पहिलं घर, नंतर शाळा, त्याला पूरक अशी पाळणाघरं किंवा रहिवासी शाळा, आश्रमशाळा, इ. यातील कोणत्याही ठिकाणी मुलांना काय हवं आहे, त्यांना काय वाटतं आहे, त्यांच्या काय हिताचं आहे, या गोष्टींचा प्राथमिकतेने विचार होतो का? त्यात मुलांसाठी निवडीला वाव असतो का? तर ‘अगदी अभावानं’ असंच म्हणावं लागेल.

सतत मोठ्यांच्या आवडीनिवडी-विचारांप्रमाणेच आणि त्यांच्या सोयी-लहरीनुसार सगळा कारभार चाललेला असतो. अनेकदा त्यांच्या वैतागलेल्या हरलेल्या मनस्थितीला तोंड देण्याची वेळ मुलांवर येते. तेव्हा त्यांची परिस्थिती गुलामाप्रमाणेच होते.

याच्यावर उपाय म्हणून जर मुलांना सर्व अधिकार देऊ केले तर काय होऊ शकतं त्याचं एक चित्रण (विशेषतः टीनेज मुलांचं) एका अमेरिकन पुस्तकात वाचायला मिळालं – कितीतरी मुलं या अर्धवट वयामधे अतिशय गोंधळलेल्या मनाच्या स्थितीत, आसपास दिसणार्याध बेडर, ‘कूल’, आनंदी, ताकदवान भासणार्याण गटांसारखं वागायला बघत आहेत. त्यांच्या गँगमधे सामील होऊन जगातली सगळी सुखं-आईबापांच्या जीवावर-लैंगिकसुख, गाड्या उडवणे, दारू-ड्रग्ज इथपर्यंत मिळवायला बघत आहेत.

हे चित्रण टोकाचं आणि अमेरिकन म्हणून बाजूला ठेवता येत नाही, कारण आपल्याकडचं चित्रदेखील ह्याच दिशेनं जाताना स्पष्टपणे दिसतं आहे. एकंदरीनं बेजबाबदार वागणुकीचं प्रमाण खूप वाढतं आहे. ह्याचं कारण मोठ्यांचा धाक मुलांना उरलेला नाही, असं सोपेपणानं अनेकदा सांगितलं जातं. पण हे मुळात कारण नसून फक्त काही ठिकाणी दिसणारं लक्षण आहे.

आणखी एक चित्रही दिसतं, पालकांना अनेकदा ते बोचतही नाही. ही मुलं अत्यंत टोकाची म्हणावीत अशी हिशेबी होतात. त्यांना स्वतःचा स्वार्थ कुठे आणि कशात साधता येणार आहे ह्याचा अक्षरशः आश्चर्यकारक आणि नेमका अंदाज असतो. स्वार्थाबद्दल एरवी हरकत नसते, पण हा स्वार्थ हीन पातळीवरचा असतो. भ्रष्टाचाराची सगळी साधनं त्यांना कौशल्यानं वापरता येतात.

आपल्या हातून अपघात झाल्यावर कुणाला काही लागलंय का, हे न् पहाता सरळ हसून पळून जातात किंवा पकडलं जाण्याची वेळ आलीच तर लाच देऊन सुटून जाण्याचा पर्याय त्यांना विचारही करावा न लागता सुचतो. ह्यासारखी ह्या हिशेबी वागण्याची लक्षणं, रोजच्या व्यवहारात अनेकांनी अनुभवली असतील. परीक्षेसाठी अभ्यास न करता, प्रश्नपत्रिका कुठे मिळू शकते किंवा परीक्षकांना किती लाच दिली असता प्रश्न सुटेल हे त्यांना अचूक माहीत तर असतंच, पण हे करावं की करू नये असा प्रश्नही मनात न आणता ते त्यासाठी बिनदिक्कतपणे पालकांचं सहकार्य मागतात. इथे खरा प्रश्न येतो, भीतीनंच मन शहारतं. आपलं कोकरू चुकलंच तर चुचकारून, प्रेमानं पुन्हा वाटेवर आणता येतं. पण बनचुकेपणानं हिशेबी वागणार्यां्ना काही म्हणजे काहीही करता येणार नाही. एव्हाना वेळ हातून गेलेली असते.

मुलांना जेव्हा अठराव्या वर्षी सर्व अधिकार असलेलं प्रौढ माणूस बनायचं आहे, सर्व जबाबदार्यााही द्यायच्या आहेत, तेव्हा त्याची पूर्वतयारी नीटपणाने, आधीपासूनच करायला हवी. प्रेम, सुरक्षितता, जोडलेपणा दाखवणारे नातेसंबंध, आदर, समानता आणि विश्वासही दाखवणारे असावे लागतात. लहानपणी तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असणारं मूल जेव्हा वेगळे विचारही करायला लागतं, आसपास पाहून प्रश्नात पडायला लागतं, काही म्हणू लागतं तेव्हा त्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा असायला लागते-मनात आणि आयुष्यातही.

मूल हिशेबी वागतं ते काही आपोआप नाही. तेच बघत ते वाढलेलं असतं. काही पालक स्वतः असं वागत नसतात पण जेव्हा आसपासचे वागतात तेव्हा त्याबद्दल बधीर मौन पाळतात. ‘आपण काय करणार? आपल्याला परिस्थिती बदलता येणारच नाही’ अशी भेकड वृत्ती दाखवतात. मुलं साहजिकच पुढं जातात. आणि मग आपल्याला जाग येते, किंवा कधीकधी तीही येत नाही. ‘न ऐकणार्याा’ मुलांबद्दल पालक खूप तक्रार करतात, पण हिशेबी मुलांबाबत फार क्वचित. उलट ‘जगात जगायला लायक’ अशा शब्दात कौतुक केलं जातं. म्हणजे पुढे काही म्हणण्याचा प्रश्नच नाही.

‘तुम्हाला तुमच्या लायकीप्रमाणे राज्यव्यवस्था मिळते’ अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. मला वाटतं ही गोष्ट मुलांच्या संदर्भात अतिशय खरी आहे. आपण मुलं लहान असल्यापासून त्यांच्यासमोर, आणि त्यांच्याशी कसे वागत आलो आहोत, त्यामधून नेमके कोणते निरोप मुलांपर्यंत पोचवले आहेत, हे इथं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यातूनच आपण परिसराकडे, आसपासच्या माणसांकडे, आयुष्याकडे कसं पाहतो? कसं पाहावं? आपल्याला एकमेकांच्या विश्वात किती स्थान आहे, कुठे आहे याबद्दल मुलं जाणून घेत असतात. त्यातूनच त्यांचे भावबंध जुळत असतात.

या सगळ्यात कुठेही मुलांना, त्यांच्या भावनांना, त्यांच्या गरजा, हित यांना प्राथमिकता नसेल, अति आवश्यक तेव्हाही नसेल तर गोंधळ होणार. जेव्हा केव्हा मुलांच्या हातात निवड करण्याची संधी येईल तेव्हा ती करताना इतके दिवस पालकांनी ही निवड कशाच्या आधारावर केली याचाच पाया त्यांच्याकडे उपलब्ध असेल.

थोडक्यात जेव्हा अधिकार शून्य पासून शंभर टक्के हा प्रवास करायचा तेव्हा तो जाणीवपूर्वक, विचारपूर्वकच करायला हवा. अधिकार आणि जबाबदार्याज हातात हात घालूनच यायला हव्यात. परिस्थिती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल. परिस्थितीशी सामना करताना तो मिळून करायचा, एकमेकांशीच लढत राहायचं नाही.

पालकनीती नेहमी मुलांची बाजू घेते असं पालकनीतीवर रुसणार्यात पालकांचं मत आहे. पण पालक आणि मुलं एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्यासाठी धडपणार्या. बाजू होऊ नयेत, यासाठी मोठ्यांनीच आपल्या अधिकारांचा वापर जबाबदारीनं करायला हवा. दोघांची मिळून टीम असावी आणि त्यांच्या आयुष्यात मानवी नीतीला, भलेपणाला गाभ्याचं स्थान असावं असा मात्र पालकनीतीचा आग्रह आहे.