बहर

एक चेहरा. अनुत्तरित प्रश्नांची चौकट असलेला. अदितीच्या मनात अलगद घर केलेला. माळ्यावरून काढून, ट्रंकेवरची धूळ पुसून तळातील जुने फोटो काढून बघत राहताना सर्व प्रसंग समोर उभा रहावा तसा.

काकूचे घर केवढे मोठे. समोर अंगण. अंगणात सोनेरी पांढरी वाळू. घराला सात आठ पायर्‍या त्याच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी नक्षीदार गोलाकार छान ओटा. वर सायलीचा वेल. इथे बसून अदिती चुलत बहीण गौरीबरोबर सागरगोटे खेळायची. मोठी पडवी. उजव्या बाजूला डॉक्टरकाकांची दवाखान्याची खोली. मग मधले घर. त्यातील काचेच्या कपाटातील डोलत्या बाहुलीकडे बघण्याचा अदितीला कधीच कंटाळा यायचा नाही. त्या बाहुल्या खास कार्यक्रमासाठीच बाहेर काढल्या जायच्या. मधल्या खोलीच्या चारी बाजूला पुन्हा खोल्या. पैकी एक स्वयंपाकघर, नंतर मागची खोली. तिथे मोठे न्हाणीघर. त्याच्या एका खिडकीशी विहीर. मागे अंगण, गोठा. अदितीला एकटीला न्हाणीघरात जाण्याची भीती वाटायची.

काका आणि काकू खूप लाड करत. त्यामुळे भीती दूर पळून जायची. गेले काही दिवस घरात गडबड होती. अदितीच्या बरोबर खेळायला गौरी, मनू, केतन, सुचा असे कितीतरी जण होते. आत्या, काका, आजी, आजोबा अशी मोठी माणसं लहानांना दंगा करू नका, असे सांगत होती.

स्वयंपाकघरातून छान छान वास येत होते. अदितीची आई तळलेल्या नक्षीदार करंज्या ताटात ठेवत होती. अदिती व कंपूला उंबर्यााच्या आत येण्यास मनाई होती. फराळासाठी त्यांना यातील लाडू, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे असे आवडणारे सर्व पदार्थ काकू देत असे. एका विशेष पदार्थाची अदितीला गंमत वाटायची. स्वयंपाकघरात चुलीवर एक मोठी माठासारखी पालथी पाटी. त्यावर काकू व आई दोघी कोपरांनी मोठी करत पोळी भाजत. तीच मांडे म्हणून खायला मिळायची. त्याचा खरपूस वास व खुसखुशीत चव….. अहाहा, काय मजा!

दुपारी जेवण आटोपल्यावर रंगी-बेरंगी कापडाचे भेंडोळे घेऊन कापडवाला मधल्या खोलीत बसला होता. काकूने सगळ्यांसाठी वेगवेगळी कापडे मोजून कापायला सांगितली. जवळ बसून सर्व कापडांच्या रंगावरून अदिती हात फिरवत होती. डिझाईनच्या जागी मजेशीर गुदगुल्या होत होत्या. अदितीला या खेळाची मजा वाटली. मोरपंखी मऊ रंग, वर चमचमणारी फुलपाखरं! ‘सांगावं का काकूला, हे कापड माझ्यासाठी घे म्हणून?’, अदितीला वाटलं. तेवढ्यात काकू म्हणाली, ‘हे टाफेटा गौरीच्या परकर-पोलक्यासाठी कापा. बाकी सगळ्यांसाठी त्या ताग्यातील द्या.’ अदितीने त्या कापडाच्या रंगावरून हात फिरविला. तिला ते मऊमऊ वाटले नाही. डिझाईनच्या गुदगुल्याही झाल्या नाहीत.
काकू लाड करायची. गौरी कशी हट्ट करून सगळे मागून घ्यायची, तसे करावेसे अदितीला वाटायचे. पण तिला काकूकडे येताना आईने समजावून सांगितलेली गोष्ट आठवायची. ‘आपण गावाला जातोय. गौरीच्या भावाची मुंज आहे. तिथे कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करायचा नाही.’

चार दिवसांनी शिंपीकाकांनी सगळ्यांचे कपडे शिवून आणलेही. गौरीचा परकर-पोलका किती छान दिसत होता. सकाळीच अदितीचे व गौरीचे भांडण झाले होते. ‘बरं झालं! कुठेय तुला माझ्यासारखं परकर-पोलकं?’ गौरीला चेव चढला होता. अदितीने आजूबाजूला पाहिले. ती काही म्हणणार इतक्यात आईचा चेहरा तिला दिसला.

अदिती अशावेळी गोठ्याजवळील कडब्याच्या खोलीत जाऊन शामण्णांशी बोलत बसे. ते कडबा कापत तिला चांगली धाटं शोधून द्यायचे. त्याची बैलगाडी बनवायला ती त्यांच्याकडून शिकली होती.
‘चला सगळ्याजणी. बांगडीवाली आली आहे’, काकू सर्वांना हाक मारत होती.

‘काकूचे सगळे ऐकायचे. त्या आपल्याला…..’ असे पुढे आई अदितीला न समजणारे काही नेहमीच सांगत असे. हातातील धाटं खाली ठेवून अदिती मधल्या खोलीत गेली. ‘उमावाहिनी चला. थोडा वेळ तरी स्वयंपाकघरातली कामं बाजूला ठेवा. या बांगड्या भरायला’, काकू अदितीच्या आईला बोलावत होती.

काय बहार, काय रंग, काय तो किणकिणणारा आवाज! अदिती हरखून गेली. बांगडीवाल्या काकू पाटावर बसवून एकेकीला बांगड्या घालत होत्या. नजरेनेच अदिती सर्व बांगड्या हातात घेऊन पाहात होती. डाळींबी रंगाच्या सोनेरी चांदण्या असलेल्या बांगड्यांच्या आवाजांचे तुषार तिच्यावर उडत होते. अदिती तल्लीन झाली होती. जणू तिच्या हातात त्या बांगड्या हळूच आल्या आहेत. ‘या खास आणलेल्या बांगड्या गौरीला भरा. त्यातलाच मोठा वीड मला भरा’, काकू सांगत होती.

अदितीला धाटांचे चाक आठवले. ‘लक्ष कुठे आहे. नीट पाटावर बस.’ काकू सांगत होती. अदितीच्या हातात दुसर्याहच बांगड्या भरल्या होत्या. त्यांच्या आवाजाचे तुषार उडत नव्हते. शिवाय, गौरीला पुन्हा चेव चढला होता. ‘गौरी काय चालले आहे. पुरे.’ असे काकू तिला फटकारत होती.

‘चारा कापून ठेवलाय. लहान बाईसाठी चांगली धाटं काढून ठेवलीत. मी मळ्यावर जाऊन येतो’, शामण्णा काकूला सांगत होते. ‘आपल्या अदितीबाई धाटाची गाडी फारच छान करतात, नाही!’, असे म्हणत काकूने अदितीला जवळ घेतले. ‘भांडणं पुरे. चला मिळून खेळा पाहू आता’, गौरीला काकू सांगत होती. त्या दोघींना तेच हवे होते. आपला धाटाचा खजिना दाखवायला गौरीला घेऊन अदिती गेली.

आजोबा आज सकाळपासून अंगणातील मांडवात सर्वांना कामं सांगत होते. फुलांचे गेंद कोठे लावायचे, आंब्याची तोरणं कशी बांधायची, या सर्वात ते लक्ष देत होते. ‘आता भटजी येण्याची वेळ झाली आहे. तुम्ही छोटे लोक मधे मधे करू नका….’ असे काही काही सांगत होते. सनईवाले सनई वाजवत होते. त्या आवाजात कोणालाच ते काय सांगत आहेत हे नीट ऐकू येत नव्हते.

इतर मोठी माणसं उगीचच इकडून तिकडे करत आहेत, असे अदितीला वाटत होते. आज नेहमीपेक्षा वेगळी गडबड होती. मांडवात अदितीला माहीत नसलेली खूप मोठी माणसं दिसत होती. अबब, किती अनोळखी माणसं! अदितीची घाबरगुंडी उडाली.

आता आपल्या आईला शोधले पाहिजे. आई कोठेच दिसत नव्हती. तशी काकू कोठे सापडते काय असे म्हणून पाहिले तर काकू भराभरा चालत होती. अदिती तिच्या पाठोपाठ पळतच होती. थेट स्वयंपाकघरात जात काकू अदितीच्या आईला बोलावत होती. ‘उमावहिनी, चला. पुरे आता कामाचं. तयार व्हा पाहू. चला माझ्या खोलीत’, असे म्हणत काकूने आईला बाहेरच काढले. ‘हे पाहा, तुमच्यासाठी एक गळ्यातला सर व बांगड्या ठेवल्या आहेत. शिवाय, ही साडी देखील. मला मांडवात गेले पाहिजे. मला काही लागले तर हाताशी तुम्ही असलेल्या बर्या . आता पट्कन तयार व्हा.’ काकू घाईत सांगत होती. ‘अग, तू गौरीला सोडून इथे काय करते आहेस?’ असे म्हणत अदितीच्या गालाला हात लावत काकू घाईने गेली. ती जाताना तिच्या साडीचा सू…सू असा छान आवाज येत होता. त्याबरोबर एक सुंदर सुगंधही पसरला होता. काकू आज छान वाटत होती. एकच गोष्ट मजेशीर होती. काकू वेगळीच दिसत होती. तिने नाकात काहीतरी वेगळाच डूल घातला होता. तिला गुदगुल्या कशा होत नाहीत असे वाटून अदितीला हसू आवरत नव्हते. आईला सांगावे का, तिला कशाचे हसू येते आहे ते? आईला खूप दिवसात हसताना पाहिल्याचे आठवत नव्हते. इथे आल्यापासून आई सारखे कामच करत होती.

बाहेर एवढी गर्दी. आईबरोबरच आपण बाहेर जावे असे वाटून अदिती तेथेच घुटमळली. साडीवरून तिने हात फिरवला. जवळच ठेवलेल्या बांगड्या व सर हातात घेऊन पाहिला. आई घाईत केसांचा आंबाडा घालत होती. तिचे अदितीकडे लक्ष नव्हते. अदिती आईकडे पाहत होती. ती वेगळीच दिसत होती. तिने काकूसारखा नाकात डूल घातला नव्हता. साडीवर गुदगुल्या करणारी नक्षी नव्हती. हातात व गळ्यात काकूने दिलेले घातले होते. वा, छान दिसत होती आई. पण आई काकूसारखी खूष दिसत नव्हती. आईला सारखं काम करून दमायला झालं होतं कां? अदितीनं आईचा हात पकडला. काकूसारखा तो मऊ नव्हता. तिच्या दप्तरासारखा खरखरीत होता.

अदितीने पुन्हा एकदा आईकडे पाहिलं. चेहरा दमलेला होता. आईला काय आवडले नाही बरं? विचारावं का तिला? आवडलं नसताना ती एवढ्या पट्कन काकूनं सांगितल्याप्रमाणे तयार कशी झाली? काकूने दिलेली साडी तिला छान दिसत असूनसुद्धा ती हसत का नव्हती? ती एवढ्या कोणत्या विचारात पडली होती?
-०-

किणकिणणार्‍या बांगड्यांचे तुषार, मऊमऊ परकरावरील चमचमणार्‍या डिझाईनच्या गुदगुल्या, खरपूस विरघळणारी मांड्यांची गोडी हे सर्व सरत्या काळाबरोबर मागं रेंगाळत राहिलं. मात्र पुन्हा पुन्हा भेटत राहिला तो आईचा दमलेला, विचारात पडलेला चेहरा. अनेक समारंभात, लग्नाकार्यात. अनुत्तरित प्रश्नांची चौकट ल्यालेला.

‘सारखी अशी मोठ्यांच्या मधे का करतेस? बाजूला बस पाहू.’ मावशी सांगत होती. समोर काय चाललंय हे पाहून तर अदितीला मोठ्या माणसांचे मनापासून हसू येत होते. नंदूताईचे लग्न होते. मोठी माणसे त्या दादाचे पाय परातीत ठेवून धुवत होती. त्यांना एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही कि पाय बाथरूममधे धुतात ते! सांगावे का त्यांना? हसत हसत हे करत असताना कोणीच कसे त्यांना रागावत नव्हते?

अदिती मोठी होता होता समारंभ व लग्नाकार्याशी जोडलेल्या अनुत्तरित प्रश्नांची चौकट मोठी मोठी होत गेली. अन्नाची नासधूस करू नये असे शिकवणारी मोठी माणसं तांदूळ का फेकतात? तूप, दूध असे जाळात का टाकतात? ‘नवरदेव रुसून बसलाय’ असे मोठी माणसं बोलत होती. म्हणजे नेमके काय? त्याची खेळणी कोणी लपवून ठेवली का? ‘आता ही जबाबदारी तुमची’ असे म्हणत सूप या डोक्यावरून त्या डोक्यावर का ठेवतात? आपली सुचाताई कोणाच्या डोक्यावरचे ओझे कशी होईल बरे?

अनुत्तरित प्रश्नांची चौकटीची रुंदी एवढी वाढली, की चेहरा नेमका कोणाचा हे ओळखणे अशक्य झाले. आईचा तो चेहरा धूसर होत गेला. त्याची जागा कोणाचाही चेहरा घेत गेला. आधीच्या पिढीचाच नव्हे. तिच्या समवयस्क बहिणींचा, मैत्रिणींचा. जणू ते चेहरे अदितीला म्हणत होते, ‘लग्न समारंभ म्हटले म्हणजे हे सर्व आलेच. तुझे काहीतरी वेगळेच विचार आहेत. तुझ्यावर वेळ आली की काय होते ते समजेलच. असे प्रश्न उपस्थितच करायचे नसतात.’

स्वतःवर वेळ? अं…हं. अदितीने प्रश्नांच्या रुंदावणार्या चौकटीवर हात ठेवला. आईचे सततचे कष्ट पाहता पाहता वेगळाच निश्चय मनात आकारत गेला.
-०-

तो दिवस अदितीला चांगला आठवतो. ती थोडीशी घाबरली होती. ‘आज आपल्या सर्वांचा मिळून असलेला खास आनंदाचा दिवस. याची आठवण म्हणून तू एक छानसे चित्र काढ. जेवायला तुला आवडणारं श्रीखंड करू’, अदितीची आई आनंदाने तिला सांगत होती. आज खास कारण होते. अदिती मोठी झाली होती. तिची पाळी सुरू झाली होती. अदितीने आरशात पाहिले. आजी तिच्याकडे पाहत होती. कौतुक तिच्या डोळ्यांतून ओसंडत होते. आईने शिवलेल्या परकर-पोलक्यात आपण परीच आहोत व उंच उंच गिरकी घेत आहोत की काय असे तिला वाटले. आजुबाजूला बासरीचे सूर वाहत होते. जाईचा सुगंध सोबत करत होता. चित्राला आगळेच रंग चढत होते.

पदवीच्या शेवटच्या वर्षी अदितीला नोकरीच्या प्रशिक्षणासाठी प्रथमच परगावी जावे लागले. ते संपवून नोकरी करत तिने अभ्यास करून परीक्षा द्यायचे पक्के केले होते. ‘‘अदिती तुझे पत्र आहे. जायच्या आधी पाहून घे’’, बाबांनी सांगितले. उत्सुकतेने अदितीने ते उघडले. तर काय प्रशिक्षणातील सहकार्याीने लिहिलेले ते प्रेमपत्र होते! ‘‘काय विनोद आहे, बघा बाबा,’’ असे म्हणत ते पत्र त्यांना वाचायला देत ती ऑफिसला उशीर होतो म्हणून निघूनही गेली होती.

‘‘तो मुलगा नीट बघ. एखाद्यावेळी मी त्याला बोलावीन. मला तो आवडतो’’, अदिती आईला सांगत होती. ‘‘चांगला आहे. मोकळी मैत्री कर. ओळख नीट होणे महत्त्वाचे. जरूर घरी बोलाव’’, आई सांगत होती. अदितीचे पाय जमिनीवर होतेच कुठे?, अभ्यास, नोकरी, परीक्षा या गडबडीत वर्षं कशी गेली हे कळलेही नाही. उत्तम यश मिळूनही अदिती नेहमीच्या उत्साहात दिसत नाही, हे आईने टिपले होते. ‘‘बघ ना, तो काहीच धड सांगत नाही. मला तर त्याचे हे असे वागणे खूपच खटकते आहे. त्याच्या घरच्यांना माझे विचार जड जातील असे त्याला वाटते. मी काय करू?’’ अदितीने आपणहूनच बोलायला सुरवात केली. ‘‘त्याला तू जोडीदार म्हणून अनुरूप वाटत नसशील. तूही दूरी घेणे तुझ्यासाठी योग्य होईल. कोणीतरी योग्य व्यक्ती भेटेलच यावर विश्वास ठेव’’, आई-बाबा अदितीला समजावून सांगत होते.

दूर टेकडीवर बसून अदिती विचार करत होती. आज तो नव्हता. टेकडीवरून पायथ्याशी जाणार्‍या अनेक पाउलवाटा दिसत होत्या. डोईवरील सरपणाचे भारे झपाझप पडणार्यात पावलांबरोबर छोटे होत होते. सूर्यास्तानंतरचा संधिप्रकाश वातावरण उजळवून टाकत होता.

अदितीने प्रश्नांची ओझी दूर केली. हळू हळू काढून टाकली. कसं हलकं हलकं वाटत गेलं! ते करताना सोबत कधी आई, बाबा, बहिणी-भाऊ, शिक्षिका-शिक्षक, सामाजिक बदलांविषयी चर्चा करणार्या मित्र-मैत्रिणी होत्या. आपण मनापासून ठरविले तर काहीही अशक्य नाही असे वाटणारे ते दिवस होते.
-०-

‘‘या वळणावर आल्यावर आपोआपच सायकल पुढे जाते तेव्हा काय औरच मजा येते नाही?’’, तो विचारत होता.
‘‘वळण वगैरे ठीक आहे. मी तुझ्या घरी प्रथमच येत आहे. त्यांना तू नीट कल्पना दिली आहेस ना?’’ तिने विचारले.
‘‘तुझी, तुझ्या विचारांची, तुझ्या आवडी-निवडींची सर्व कल्पना दिली आहे. खात्री वाटत नसेल तर पुन्हा एकदा सांगतो….
पत्रिका पाहायची नाही. धार्मिक विधी नसल्याने मुहूर्त, भटजी ही प्रकरणं नाहीत. आमच्या दोघांकडे असलेल्या पैशातच सर्व लग्नखर्च. म्हणजेच साधेपणाने, नोंदणी पद्धतीने, पण उत्साहाने विवाह साजरा….’’

अदितीने त्याच्या उत्साहाने ओसंडणार्या् डोळ्यात पाहिले. आता तिचा चेहरा तिला स्पष्ट दिसत होता!

वेगवेगळ्या वळणावर खळाळणार्‍या उत्साहाने ओसंडणार्‍या डोळ्यांत तिचा चेहरा तिला स्पष्ट दिसत राहिला. कधी ते डोळे जोडीदाराचे, मैत्रिणीचे, बहिणीचे, अपार दुःख सोसूनसुद्धा आपले हसू न गमावलेल्या बायांचे, मुलींचे, सहकार्यां चे, इतर नातेवाईकांचे व वस्तीतील छोट्यांचेही!

‘‘बाईसाहेब लक्ष कुठे आहे? बंद्याकडून काही गलती झाली का?’’ तो तिची तंद्री मोडत म्हणाला. तशातही तिला तिचा भाऊ तिच्याबद्दल करत असणार्‍या विनोदाची आठवण झाली, ‘‘काही दिले नाहीस तरी लग्नात तुझा हात तरी तुला द्यावा लागेलच!’’ यातील विनोद स्त्री-पुरुष नात्यांमधील असंख्य पदर उलगडत गेला. त्यासह अदिती नाते फुलवत होती. त्यात मोकळेपणाने खेळणारा अवकाश जपत होती. त्या अवकाशात प्रत्येकाला स्वतंत्रपणे बहरण्याची खूणगाठ होती.