‘ती’चं समाजकार्य

सकाळी चहाच्या कपाबरोबर ती पेपर उघडते,
पुराच्या बातम्या पुढ्यात ठाकतात.
भीषण वर्णने पाहता-वाचताना
आपण या सगळ्यापासून सुरक्षित आहोत,
नकळत ती निश्वास सोडते.

मुलांना ती म्हणते आज श्रावणी शुक्रवार,
तुम्हांला ओवाळते.
आग्रहाने, नको नको म्हणणार्यान
मुलांना, सवाष्णीला जेवू घालते.

लगबगीने ऑफीसला जाताना
सिग्नलला नागडी पोरं
ओघळलेल्या स्तनांना लुचणारी पोरं काखेत घेतलेल्या
कळकट बायका
तिच्यापुढे हात पसरतात,
तेव्हा शहारून त्यांना चुकवत ती पुढे जाते.

ऑफिसात कुणीतरी
पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत असतं,
जुन्यापान्या कपड्यांचं एक गाठोडं
त्यांच्या हवाली करून,
समाजकार्य केल्याचा ती निश्वास(?) टाकते.

आता दिवाळीची खरेदी
उत्साहाने घरातल्या
सगळ्यांना ती नवे कपडे घेते,
पुरात मायबाप गमावलेल्या
पोरांच्या फोटोचा पेपर
आवरताना ती रद्दीला घालते.

थोडासा विचार केलाय का तुम्ही?
‘ती’ म्हणजे तुम्हीच तर नाही?