उत्सवाचा उद्योग
श्री. साठे व्यवसायानं वास्तुरचनाकार आहेत. साहित्य, नाट्य, चित्रपट या माध्यमांमधून त्यांनी माणसाच्या मनोव्यापारांचा सातत्याने वेध घेतला आहे. परिवर्तनासाठी प्रयत्न केला आहे. आपले उत्सव उद्योगांकडून कसे नियंत्रित केले जातात. भांडवलशाही व्यवस्था आपल्या जगण्यावर कसा परिणाम घडवते नि त्याला आपण कसं तोंड द्यायचं, याबद्दल ते लिहीताहेत –
माणूस, स्वतंत्र, स्वतःपुरता उत्स्फूर्तपणे जे जगतो ते एकट्यापुरतं असतं. तसं पशूही जगतात. पण माणसाला तेवढं पुरत नाही. उत्स्फूर्त प्रेरणा थोड्या बाजूला ठेवून, नियंत्रित करूनही एकत्र येऊन सर्वांच्यासाठी आनंद निर्माण करणं त्याला आवश्यक वाटतं. धनधान्य निर्माण झालं की सुगीचा आनंद व्यक्त होतो. भरपूर मासळी मिळाली की नारळीपौर्णिमा साजरी होते.
तसंच दुःखही वाटून घ्यावंसं वाटतं. एकत्र येण्यातून संस्कृती निर्माण होते, नीतीनियम येतात. त्यात आनंद निर्मिती आहे तसंच पशुत्वाचं दमन आहे. अशा एकत्र येण्यामधूनच एक संदर्भ असलेलं नातं निर्माण होतं. त्यांचं म्हणणं एकमेकांना कळायला लागतं.
पूर्वी माणसांच्या वैयक्तिक आयुष्यात, उत्सव, सण त्यांच्या नियंत्रणात असायचे. त्याच्याशी आर्थिक व्यवहार जोडलेला नसायचा. त्यांच्या फुरसतीच्या काळात माणसं गावांतल्या सार्वजनिक मोकळ्या जागांत एकत्र यायची, मिळून तयार्या् करायची, उत्सव साजरे व्हायचे. खेळ-गाणी-नृत्य-वाद्यवादन या सगळ्यात त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. ह्या सहभागात आनंद होता, कष्ट होते, पण ते सर्वांच्या साथीमुळे वाटले जात होते. सुखद होत होते. पूर्वीची लग्नं-कार्य आठवा. डाळी-धान्य निवडण्यापासून, मंडप बांधण्या-सजवण्यापर्यंत सारी कामं घरीच होत असत. शेजारी-पाजारी, मित्र-नातेवाईक सार्यां चीच त्यात मदत असायची.
आता तसं राहिलं नाही. तो एक आर्थिक व्यवहार झाला आहे. सगळ्या गोष्टी विकत किंवा भाड्यानं मिळतात. कामाला पैसे देऊन माणसं मिळतात, एवढंच नव्हे तर कामं करवून घेऊन संपूर्ण समारंभ घडवून आणण्याचंच कॉन्ट्रॅक्ट देता येतं. ह्या समारंभांमधे पाहुण्यांचा तर सोडा घरच्यांचाही सहभाग नसतो. ती एक फक्त बघण्याची, सजावटीची, प्रेक्षणीय गोष्ट होते. आपण स्वतःही त्या सजावटीचा एक भाग बनतो. मग अधिक अधिक सुंदर, नजरबंदी करणारे सजावटी समारंभ आकाराला येतात. मग त्यातून संस्कृतीत भर पडत नाही. ते एक ‘उत्पादन’ होतं. विकत घेण्याची आणि विकण्याची गोष्ट होते. आपण ते विकत घ्यायचं आणि एकीकडे वेफर्स खाता-खाता ‘enjoy’ करायचं.
मग हे ‘events’ प्रेक्षकांच्या दृष्टीला सुख देणारे असे तयार व्हायला लागतात. साधी क्रिकेटची मॅच पाहायची तर खेळणार्यां चे छान रंगीत कपडे, भव्य उद्घाटन समारंभ, दोन दोन कॉमेंटेटर्स येतात, बरोबर कमी कपड्यांतली बाई येते. (तिला क्रिकेट मधलं काही कळत नसलं तरी चालतं.) असा दिखाऊपणा वाढत जातो. सहभागापासून माणूस अधिकाधिक तोडला जातो.
लग्नाचे, वाढदिवसाचे उत्सव पहा. सजावट, झगमगाट, लायटिंग, फ्लॉवर डेकोरेशन, भेटी, त्यांचं packing, संगीत, भरजरी वस्त्रालंकार सारं event manager च्या मर्जीनुसार. आपली नजरबंदी हे त्याचं उद्दिष्ट. मग ते पोकळ व्हायला लागतं, माणूस उपभोगाच्या कड्यात जायला लागतो. संस्कृती ही एक ‘प्रेक्षणीय वस्तू’ बनून जाते, जी विकत घेता येते.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं हे अपरिहार्य रूप म्हणावं लागेल. गेल्या १०० वर्षातले पुण्यातले महत्त्वाचे उत्सव म्हणजे गणपती-दिवाळी-रंगपंचमी….आता त्यात किती भर पडली आहे. राखीपौर्णिमा, नवरात्र उत्सव, होळी, असे पारंपरिक उत्सवही वाढलेत आणि व्हॅलेंटाईन डे, बर्थडे, ३१ डिसेंबर असे पाश्चायत्य प्रभावातून आलेले उत्सवही आहेतच. जेवढे उत्सव जास्त तेवढ्या वस्तू अधिक खपणार. तेवढा फायदा अधिक. पूर्वी त्या त्या गावचे, विशिष्ट असे उत्सव असायचे. त्या त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं लग्न समारंभ साजरे व्हायचे. ब्राह्मणांची, मराठ्यांची लग्नं त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार साजरी व्हायची. आता तसं नाही. सगळी कार्य साधारण एकाच पद्धतीनं साजरी होतात. जोडे लपवणं वगैरे प्रथा सार्वत्रिक व्हायला लागल्यात. आपल्या अशा संस्कृतीची वैशिष्ट्य लोप पावून आपण एकच एक अशा सार्वत्रिक संस्कृतीचा भाग व्हायला लागलोय. इथे महत्त्व असतं ‘वस्तूंच्या विक्रीला.’ जेवढ्या जास्त लोकांना एकाच प्रकारच्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत तेवढं ‘मास प्रॉडक्शन’च्या दृष्टीने फायद्याचे. पुढे छोट्या प्रमाणावर बेरोजगारांना मिळणारी कामे मोठ्या संघटित उद्योगाकडून गिळंकृत होतात. संस्कृतीची एक इंडस्ट्री बनायला लागते. मग छोटा कामगार उरतच नाही. अशा रितीने भांडवलशाही आपल्याला फक्त उत्पादनच नव्हे तर जीवनशैलीच विकायला लागते. सगळीकडे सारख्या वस्तू, सारखेच देव्हारे दिसायला लागतात.
आपले उत्सव दुसरंच कुणीतरी नियंत्रित करतं. गणपती उत्सवात सर्वत्र हिरोहोंडाच्या जाहिराती लागतात. गणपती पाहता पाहता हिरोहोंडाची लालूच मनात जागवली जाते. हळूहळू आपलं आयुष्यही कोणीतरी (चेहरा नसलेल्या मोठ्या उद्योगांनी) ठरवल्याप्रमाणे आपण जगायला लागतो. आपण काय करायचं, कसं जगायचं, हे तो ठरवणार. उत्सव कसे असावेत हे ते स्पॉन्सर करणारा ठरवणार. आपला त्यातला सहभाग अशा रितीनं संपवला जातो नि सगळं त्यांच्या हातात जायला लागतं.
ह्याचे परिणाम भयानक आहेत. आपलं आयुष्य आपल्या हातात राहत नाही. कुणीतरी नियंत्रित केलेलं आयुष्य आपण जगायला लागलो की तुटलेपणा येतो. माझं जगण्याचं स्वातंत्र्यच माझ्या हातून निसटतं. इतरांनी ठरवून दिलेल्या गोष्टींत माझं मन रमू शकत नाही. परकेपणा येतो. मग कशातच अर्थ वाटेनासा होतो. आपण चिडचिड करायला लागतो. थकलेपण येतं पण वखवखही थांबत नाही. कशानंही शांत, समाधानी, आनंदी न वाटणं हा त्याचा परिणाम आहे.
केवळ उत्सवच नव्हे तर एकूणच संस्कृतीचा उद्योग होणं हे त्याचं कारण आहे. आपली करमणूक-सिनेमे-टीव्ही सिरियल्स, खेळ, वाचन हे सारंच उद्योग ठरवतात. अर्थातच ज्यात त्यांचा फायदा आहे त्यातच आपला आनंद आहे असं आपल्या गळी उतरवलं जातं.
अनेक संस्कृती एकत्र आल्या, आपण बहुसांस्कृतिक झालो हे आपल्या त्रासाचं कारण नाही. पण सगळे साजरे तर करायलाच हवे आणि तेही गोष्टी विकत घेत राहून, खर्च करण्यापुरता सहभाग ठेवून, याचे हे सारे तोटे आहेत. आपले खोलवरचे त्रास टाळायचे असतील तर आपल्याला त्याचा विचार करायला लागेल. आपल्या आयुष्याचं हे काय होतं आहे? कशातच सहभाग न घेता सगळंच विकत आणण्यामुळे आपण स्वतःच हळूहळू विकले जातोय, नियंत्रित होतोय, हे सूत्र लक्षात घेतलं तर उपाय शोधता येतील.
प्रत्येक बाबतीत आपल्याला स्वतःचा विचार करायला लागेल. ‘मी लग्न समारंभ असा का साजरा करायचा? भेटी देणं आणि घेणं यातून काय साधतं? आपण एकत्र कशासाठी येतो? ते खरं एकत्र येणं होतंय का? संवाद होतोय का? राखी विकत का आणायची? ती शंभर रुपयांचीच का असायला हवी?’ असे प्रश्न दडपून न टाकता निर्णय घ्यायला लागतील.
दुसर्याह बाजूला उत्सवांमुळे येणार्या छोट्या तात्कालिक प्रश्नांनाही भिडणं आवश्यक आहे. त्या वेळी उत्पन्न होणारे ध्वनिप्रदूषण, ट्रॅफिक जॅम यावर उपाय करायलाच हवेत. नाहीतर दीर्घकालीन फायदे घ्यायला आपण जिवंतच राहणार नाही!
ध्वनिप्रदूषण, ट्रॅफिक जॅम या गोष्टी काही फक्त उत्सवाच्याच वेळी होतात असं नाही. आपल्या रोजच्या आयुष्यातही आपल्या वागण्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. रोज मोठ्या आवाजात रेडिओ लावणे, मोठमोठे रिव्हर्स हॉर्न लावणे हेही कमी व्हायला हवंच. शिवाय अशा प्रश्नात येणार्या वर्गसंघर्षाचा, जातीय संघर्षाचाही विचार करायला हवा. गणपतीत आवाज नको तर ३१ डिसेंबर किंवा सवाई गंधर्वला कसा चालेल? डिस्को-नवरात्रीला कसा चालेल? असे तात्कालिक प्रश्न खोल जाऊन समाजात दर्या् पडायला लागतात. या दोन्ही अंगांनी विचार करून पर्याय शोधता येतील.