(विशीच्या वेशीतून – लेखांक -१) – स्वातंत्र्याची सुवर्णमहोत्सवी मशागत

‘शिक्षण मनांना जागं करणारं असावं, कृतीची ऊर्मी फुलवणारं असावं…’ अशी वाक्यं आपण ऐकतो. काही वेळा ती आपल्या मनाला स्पर्शून जातात तर काही वेळा मनात घर करतात. आपल्याही शाळेत, परिसरात असं शिक्षण बहरावं असं वाटत राहतं. पण कसं? हे उमगत नाही.

जगण्याच्या चाकोरीत अनेक गोष्टी आपल्याला नाउमेद करत असतात. पण त्याचबरोबर त्यावर मात करण्याची ताकद देणारे प्रकाशकणही अस्तित्वात असतात यावर विश्वास ठेवूया. कोल्हापूरचं सृजन आनंद हे असंच एक प्रकाशाकडे झेप घेणारं विद्यालय. ११ जून १९८५ पासून गेल्या वीस वर्षांत या विद्यालयानं प्राथमिक शिक्षणात चैतन्य आणण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. लीलाताई पाटील आणि त्यांच्या सहकार्यांरनी सातत्यानं नवनवीन उपक्रम आखले. प्रत्यक्षात आणले. पुढील अंकात अशा तीन उपक्रमांची मांडणी असेल.

अशा सृजन कल्पनांची बीजं आपल्याही मनात कदाचित सुप्तावस्थेत असतील. काही जणांनी त्या वाटेवर काही पावलंही टाकली असतील. २६ जानेवारी नजीक आहे, या निमित्तानं या वाटेवरच्या प्रवासाची नवी सुरुवातही करता येईल. ह्या लेखांमधून ही वाट अधिक सुकर, स्पष्ट व्हायला मदत व्हावी अशी आशा आहे.

ह्या लेखमालेच्या रचनेत आपल्या प्रतिसादांचं स्थान फार महत्त्वाचं आहे.

आज हा लेख लिहायचे योजल्यावर मी जणू पुनः एकदा १९९७ सालातील एप्रिल ते ऑगस्ट हे महिने जगत आहे असं वाटतंय. हा पाच महिन्याचा काळ व्यक्तिशः मला व आमच्या विद्यालयाची मुले, ताई-दादा तसेच पालक अशा सार्यां्नाच खूप आव्हानात्मक वाटला होता. पाहायला गेलं तर खसखशीच्या दाण्याएवढे असणारे हे विद्यालय! पण बेत मात्र मोठे मोठे!! स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव केवळ साजरा नव्हे तर साजिरा करण्याची आस बाळगणं ही त्यापैकी एक बाब. सुवर्णमहोत्सव होऊन गेल्याला आज आठ वर्षं झाल्यानंतर हा लेख लिहिण्याचा एक हेतूही आहे – आणखी दोन वर्षांनी आपण स्वातंत्र्याची साठी अनुभवणार आहोत! ती ‘साठी बुद्धी नाठी’ न ठरता ‘बहुत काही माझ्या गाठी’ ठरावी अशी आमची तर इच्छा आहेच, पण आपलीही इच्छा तशीच असेल अशी आशा. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून आता वाचू या स्वातंत्र्याची सुवर्णमहोत्सवी मशागत!

नियोजकांचा दृष्टिकोन
सर्वप्रथम या कार्यक्रमातून आम्हाला काय अपेक्षित होतं हे जाणून घेऊ. सुचिता पडळकर या ताईंनी नियोजनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्या आपल्या टिपणात लिहितात –
‘‘ह्या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी मी स्वतः होऊन अंगावर घेतली. सामाजिक किंवा राष्ट्रीय दृष्टिकोन अर्थपूर्ण करणार्याह उपक्रमात सामील होणं मला नेहमीच आवडतं. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवासारखे कार्यक्रम केवळ मुलं/केवळ शिक्षक/केवळ पालक यांच्यासाठी नसतात. सर्वांनी एकदिलानं ते साजिरे करायचे असतात. दरवर्षी येणार्यात स्वातंत्र्यदिनापेक्षा एकदाच येणारा स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सव, त्या उपक्रमात सहभागी होणार्याय सार्यांदच्याच स्मरणात चिरकाल राहायला हवा असा झाला पाहिजे. राष्ट्र ही एक भावनिक संकल्पना आहे. देशाच्या कानाकोपर्यां त उमटणार्या उत्साहवर्धक अथवा वेदनामय घटना यामुळं आपण राष्ट्र या संकल्पनेत हळूहळू गुंतले जातो. त्या दृष्टीनं नियोजनात विचार, भावना व कल्पना यांचं जसं मिश्रण असायला हवं तसंच विद्यालयाचं सारं वातावरण स्वातंत्र्यासंबंधीच्या उन्मेषांनी झगमगलेलं असायला हवं. स्वातंत्र्यपूर्व भूतकाळ, आजचा वर्तमानकाळ आणि उद्याचा भविष्यकाळ यांना साधणारा हा स्वातंत्र्यमहोत्सव नुसता देखणा होऊन चालणार नाही तर ‘राष्ट्र’ ह्या संकल्पनेच्या उभ्या आडव्या धाग्यांनी आम्हा सर्वांची एकात्मता वाढवणारा तो ठरायला हवा.’’

सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिन कसा कसा?
१९९७ च्या १५ ऑगस्टचं झेंडावंदन रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी करायचं, हे ठरलेलं होतं. झेंडावंदन झाल्यावर सारे ताईदादा व मुलं यांनी शाळेतच मुक्काम केला तर मजा येईल अशीही एक सूचना आली होती. परंतु स्वच्छतागृहाची अडचण, डासांचे संभाव्य हल्ले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम रात्री १२.३० पर्यंत आटोपल्यानंतर एका वास्तूत सार्यांनी झोपून कोणतं महत्त्वाचं शैक्षणिक उद्दिष्ट आपण गाठणार? त्यापेक्षा एखाद्या निवासी सहलीत सार्यांकनी एकत्र झोपायचं ठरलं तर निदान काही वृत्तीविषयक बाबी हाती तरी लागतील असा विचार होऊन सायंकाळी ८ ते रात्री १२.३० या वेळात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम व्हावा असं सर्वानुमते ठरलं. जो तपशीलवार कार्यक्रम ठरला तो आपण वाचूया का?

१४ ऑगस्ट १९९७
(१) रात्री ८.०० वाजता सर्व ताईदादा व मुले गणवेशात इयत्ता तिसरीच्या वर्गखोलीत एकत्र जमतील.
(२) ८.०० ते ८.३० : प्रा. श्री. चंद्रकांत पाटगावकर (स्वातंत्र्यसैनिक) मुलांशी १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल संवाद साधतील. त्यातील काही रोमहर्षक प्रसंग सांगतील.
(३) ८.३० ते ८.४५ : १५ ऑगस्ट १९४७ च्या ‘सकाळ’ वृत्तपत्राचा अंक प्रदर्शित केला जाईल.
(४) ८.४५ ते ९.१५ : भाषा भगिनींची भेटगाठ- उर्दू, कानडी, गुजराती, मल्याळी, बंगाली या भाषा जाणणार्या स्थानिक व्यक्ती आपल्या भाषेचे काही नमुने मुलांपुढे मांडतील व समजावून सांगतील.
(५) ९.१५ ते ९.३० : ‘पावसाच्या कविता’ या विषयावर पूर्वघोषित झालेल्या पालकस्पर्धेचा व ताईदादांच्या सुशोभन स्पर्धेचा बक्षीस समारंभ.
(६) ९.३० ते १०.०० : प्रा. पोवार यांचा स्लाईड शो. (फक्त इयत्ता तिसरी व चौथीसाठी)
(७) ९.३० ते १०.०० : इयत्ता पहिली/दुसरीची मुलं कुंड्या रंगविणे व जुन्या साड्यांच्या धांदोट्यांच्या वेण्या घालून त्यांच्या पायपुसण्या बनविणे ही कामे समूहगीते गातगात करतील.
(८) १०.०० ते १०.३० : वर्गवार स्पर्धा
इ. पहिली – तानाजी मालुसरे – दोराला धरून वर चढणे.
इ. दुसरी – भारत जोडो – दिलेल्या तुकड्यातुकड्यांतून भारताचा एकसंध नकाशा तयार करणे.
इ. तिसरी – शेर्पा तेनसिंग – बांधलेल्या दोराला धरून वरच्या टोकापर्यंत कमीत कमी वेळात जलद गतीनं चढणं.
इ. चौथी – पी. टी. उषा – जिन्याच्या सर्व पायर्यां जलद गतीनं पळत चढणं व उतरणं.
१०.३० ते ११.०० – राष्ट्रीय गीतांचा व घोषणांचा जलसा – आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
११.०० ते ११.३५ – मशाल मिरवणूक – आजी व माजी मुलं, आजीमाजी पालक, निरीक्षणासाठी आलेल्या व्यक्ती व ताईदादा यांचा सहभाग.
१२.१० – ध्वजवंदन
१२.१५ ते १२.२५ – आतषबाजीचं सौंदर्य अनुभवणं.

कार्यक्रम कोसळणार! एक भाकीत
नेहमीपेक्षा काही वेगळं मांडलं गेलं की बरेचदा ‘मूले कुठारः’ अशा स्वरूपाची टीका होते. वय वर्षे सहा ते अकरापर्यंतची मुलं रात्री १२.३० पर्यंत उत्साहानं जागी राहतील व कार्यक्रमात आनंदानं सहभागी होतील या गृहीतकावर आधारलेला हा कार्यक्रम कोसळणार असं अनेकांचं भाकीत होतं. ‘‘एवढ्या लहान मुलांना रात्री बोलवणार? येतील का मुलं? आणि ती रात्री घरी कशी परतणार? असे कितीतरी प्रश्न उपस्थित केले गेले होते. परंतु शिक्षकसभेत काही ताईदादांनी, ‘‘मुलं तुमची भीती निराधार ठरवतील. बघालच तुम्ही !’’ असं म्हणून जणू मुलांची तळी उचलून धरली आणि कार्यक्रमाच्या नियोजनाला हिरवा कंदील दाखवला गेला.

स्वातंत्र्यमहोत्सवाला साजेसं वातावरण
सृजन आनंद विद्यालयातलं त्या सायंकाळाचं वातावरण स्वातंत्र्यमहोत्सवाला साजेसं होतं. अतिशय उत्साही. एक प्रकारच्या गांभीर्यानं भारलेलं आणि तरीही आनंदमय.
‘‘त्या दिवशी विद्यालयात वावरताना १९४२ च्या लढ्याच्यावेळी वातावरणात कसं अभूतपूर्व मंतरलेपण असेल याचा अंदाज करता येत होता आणि सुवर्णमहोत्सवाच्या ह्या कार्यक्रमात बिंदूरूपानं तरी आपण आहोत याचा अभिमानही वाटत होता.’’ ही निमाताईंच्या अहवालातील वाक्यं अतिशय समर्पक आहेत. विद्यालयाच्या लांबलचक व्हरांड्यात इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी स्वातंत्र्यासंबंधीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूबद्दल काढलेली चित्रं किंवा लेखन त्यातील रसरशीतपणामुळं मनं वेधून घेत होती. स्पर्धेत उतरलेल्या पालकांच्या ‘पावसाबद्दलच्या कविता’ आणि त्यासंबंधीची रेखाटनं मोठ्या दिमाखानं सार्यां्चं लक्ष खेचत होती. ताईदादांनी केलेली सुशोभनं म्हणजे तर सर्वांचा आकर्षण बिंदू होता. उदयदादांचं ‘इंडिया गेट’, ‘लाल किल्ला’ आणि ‘राजमुद्रा’, नूपुरताईंची ‘स्त्री शक्ती’, रोहिणीताई संत यांचं ‘ससा आणि कासवाच्या’ गोष्टीचं आधुनिक रूप, रोहिणीताई कुलकर्णी यांनी सादर केलेलं ‘वटवृक्ष की बोन्साय’ अशी एकापेक्षा एक प्रभावी सुशोभनं ती करणार्यांटच्या विषयाच्या जाणकारीची तसंच सादरीकरणाच्या कौशल्याची जणू प्रतिबिंबं होती. सारे ताईदादा पांढर्याा शुभ्र पोशाखात लगबगीनं इकडूनतिकडं जात-येत होते. हा अनोखा कार्यक्रम बघायला पालकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंजुश्री कुलकर्णी (श्रमिक विद्यापीठ कोल्हापूर), शोभा जाधव (माजी शिक्षिका सृजन आनंद विद्यालय), श्रीमती शिखरे (प्रा. शाहू कॉलेज) ही निरीक्षक मंडळी मोठ्या चिकित्सेनं मुलांचं लेखन, पालकांचं व ताईदादांची सुशोभनं व लेखन न्याहाळत होती.

एकात्मतेसाठी भाषाभगिनींची गाठभेट
आज स्वातंत्र्याच्या ५१ व्या उंबरठ्यावर असताना एकात्मतेपेक्षा विघटनाचीच बरीच दृश्यं प्रसार माध्यमांतून भडकपणानं मुलांपुढं पेश होतात. अशावेळी ‘अनेक प्रकारच्या भाषा बोलणारे लोक आपल्याच देशात असणं ही एक श्रीमंती आहे’, असा भाव मुलांपर्यंत पोचावा म्हणूनच ‘भाषाभगिनींची गाठभेट’ हा कार्यक्रम ठेवला होता. जे योजलं ते साधलं की नाही? सिंधूताई त्याबद्दल आपल्या अहवालात लिहितात ‘‘विविध भाषा बोलणारे लोक सोपी अशी काही वाक्यं बोलून मराठीत त्याचा अर्थ सांगत होते. सुचिताताई त्यावेळी भारताच्या नकाशात गुजरात, बंगाल, कर्नाटक असे भाग दाखवत होत्या. ‘देश एकच पण भाषा अनेक’ याचा निश्चित ठसा मुलांच्या मनावर त्यामुळं उमटत होता. वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळी लिपी लक्षात यावी म्हणून बोललेली वाक्यं फळ्यावर लिहिली जात होती. देवनागरी लिपीपेक्षा बंगाली, गुजराती, कानडी इत्यादी भाषांची लिपी किती भिन्न आहे हे अनेकांना पहिल्यांदाच समजत होतं. पालकांनाही हा अनोखा कार्यक्रम आवडला होता. फलकावरील वेगळ्या लिपीतली वाक्यं ते लिहून घेत होते. स्वतःचं लेखन पूर्ण होण्याआधीच फलक लेखन पुसायला कुणीतरी सरसावतंय असं दिसताच ‘‘पुसू नका, पुसू नका’’ असं पालकांकडून अधीरतेनं सांगितलं जात होतं. मल्याळी भाषेत ‘वेळम्’ म्हणजे ‘पाणी’ आणि भाताला ‘चोर’ म्हणतात हे ऐकून मुलांना खूप हसू येत होतं. पाणी हा शब्द त्या भाषेत १२/३३० असा लिहितात हे पाहून एक मुलगी म्हणाली की ‘‘एक दोन नंतर इंग्लिश एक आणि नंतर तीन तीन शून्य असं लिहिलं की झालं पाणी.’’ सलाम आलेकूम म्हटल्यावर वआलेकूम सलाम म्हणायचं हे काही मुलांना माहीत होतं त्यामुळं उर्दू बोलणारी व्यक्ती सलाम आलेकूम असं म्हणताच मुलांनी योग्य शब्दांत प्रतिसाद दिला. स्वतःच्या भाषेव्यतिरिक्त इतर एक तरी भाषा शिकायला हवी असं अनेकांना कुठंतरी जाणवून गेलं.

स्वातंत्र्यपूर्व घटनांचं दर्शन
प्राध्यापक पोवार यांनी दाखवलेला स्लाईडशो खरोखरच अप्रतिम होता. थोडा अधिक वेळ देऊन अधिक सावकाशीनं तो पाहायला हवा होता असं तो कार्यक्रम संपल्यानंतर अनेकांना वाटलं. अंदमानमधील तुरुंग, त्या तुरुंगातील विविध विभाग, सावरकरांची १२३ नंबरची खोली, खोड्यात अडकवून कैद्यांना शिक्षा देण्याची पद्धत हे सारं स्लाईडस्मधून पाहताना, वाचलेल्या माहितीला ऐंद्रिय परिमाण मिळालं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावरकरांसारख्यांनी काय काय सोसलं आणि कोणती साहसं केली हे प्रत्यक्ष पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि अंगावर रोमांच उभे राहिले. स्लाईडच्या माध्यमातून अंदमान बेटाचं दर्शन होताना जणू आपण प्रत्यक्षच तिथं आहोत असं वाटत होतं आणि सावरकरांची तुरुंगातील खोली पाहताना,
‘दगडांची पार्थिव भिंत
अकल्पित पुढे सरली
मी कागद झाले आहे,
चल लिही, असे ती वदली’
ह्या कवितेच्या ओळी आठवल्या. प्रा. पोवार स्लाईड दाखवताना जे निवेदन करत होते ते अतिशय नेटकं व प्रभावी असल्यामुळं कार्यक्रम अधिक परिणामकारक झाला. कार्यक्रम संपवता संपवता प्रा. पोवार मुलांना म्हणाले, ‘‘आणखी पन्नास वर्षांनी भारतीय स्वातंत्र्याची शताब्दी होईल. त्यावेळी तुम्ही मुलं माझ्याएवढी असाल आणि कदाचित एखाद्या शाळेत स्लाईडशोही दाखवत असाल’’ आपलं भावी रूप डोळ्यांसमोर आणताच मुलांच्या चेहर्याववर गांभीर्याची छटा उमटली.

Trifles make perfection
Perfection is not a trifel, but trifles make perfection असं एक सुभाषित पूर्वी वाचलेलं होतं. स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात ज्यासाठी फक्त पाच किंवा सात मिनिटंच दिली गेली होती त्या कार्यक्रमाच्या संदर्भात ते पुन्हा एकदा आठवलं – १५ ऑगस्ट १९४७ चा सकाळ दैनिकाचा अंक फलकावर प्रदर्शित करणं आणि त्याबद्दल थोडंसं बोलणं हाच तो कार्यक्रम. ‘भारत स्वतंत्र झाला’ हे शब्द ज्या बातमीत लोकांनी प्रथमतः वाचले ती बातमी पुन्हा फलकावर झळकवणं आणि स्वातंत्र्य मिळण्याचा पहिला क्षण कसा असेल याचा पर्यायानं अनुभव घेणं हा १५ ऑगस्ट १९४७ चा ‘सकाळ’चा अंक प्रदर्शित करण्यामागचा हेतू होता. त्या अंकाची किंमत फक्त एक आणा (म्हणजे आताचे फार तर सहा पैसे) हे ऐकल्यावर मुलांनी सकाळ अंकाच्या आजच्या किंमतीशी त्याची तुलना केली. एका निरीक्षकांच्या अहवालात त्यांच्या कानावर आलेलं या कार्यक्रमासंबंधीचं वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे ‘‘अबब! पन्नास वर्षांपूर्वीचं वर्तमानपत्र अजूनही किती छान जपून ठेवलंय ना!’’
‘मुंगी उडाली आकाशी| तिने गिळिले सूर्याशी|’ ही काव्यपंक्ती सकाळचा अंक प्रदर्शित होताना मनात घोळत होती. ‘खर्च होणारा वेळ अथवा पैसे यांच्या प्रमाणात उपक्रमाचं साफल्य न मोजता ते नियोजित हेतूंच्या पूर्तीकडं पाहूनच मोजणं इष्ट’, हा धडा मी तरी पुन्हा एकदा गिरवला.

अभूतपूर्व मशाल दौड
स्लाईड शो संपता संपता विद्यालयात तयार केलेल्या गोड शिर्या्चा खमंग वास जसा सुटला होता तसंच वालावलकर हायस्कूलच्या मुलांच्या बँडचे स्वरही कानी पडू लागले होते. शिरा खाता खाता मुलांना पेटवलेल्या मशाली दिसत होत्या आणि कधी एकदा मशाल मिरवणुकीत सामील होतो असं त्यांना झालं होतं. रात्री ११.३० वाजता आजूबाजूला सारं शांत असताना विद्यालयात चाललेली कार्यक्रमाची धावपळ मशालमिरवणुकीच्या निमित्तानं बाहेरही निनादली. पेटलेल्या मशाली हाती धरून चाललेले माजी विद्यार्थी, ताईदादा, पालक आणि त्यांच्या बरोबरीनं आपली छोटी छोटी पावलं टाकत पळत जाणारी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुलं, दिल्या जाणार्याप दणदणीत घोषणा… सारं कसं विलक्षण वाटत होतं! घराघरांची दारं खिडक्या उघडून मंडळी बाहेर येऊन कौतुकानं ही आगळीवेगळी मशालदौड पाहात होती. अनेकप्रकारच्या दौडी काही लोकांनी यापूर्वी पाहिलेल्या असतील, परंतु रात्रीच्या नीरव शांततेत सहा वर्षांपासून साठ-सत्तर वर्षांपर्यंतची मंडळी उत्साहात, आवेशात, घोषणा देत, मशाल पेलीत भारताच्या स्वातंत्र्यरक्षणाचं स्वतःचं कर्तव्य मनात बाळगून ते इतरांच्यात जागवण्यासाठी करीत असलेली ती दौड बघणार्यांुना निश्चितच अभूतपूर्व वाटली. दौडीत सामील असलेल्यांची धुंदी ती पाहणार्यांननाही एक प्रकारची नशा चढवीत होती.

तमसो मा ज्योतिर्गमय
एवढं सारं होईपर्यंत पावणेबारा झाले होते. विद्यालयाच्या गच्चीवर ध्वजवंदनाची तयारी केलेली होती. स्वातंत्र्यसैनिक श्री. बापूसाहेब सुतार प्रथमपासूनच हा आगळावेगळा कार्यक्रम कुतुहलानं पाहात होते आणि तेच ध्वजवंदनाचे प्रमुख पाहुणे होते. ध्वजवंदनापूर्वी थोडा वेळ पाऊसही या कार्यक्रमात आपली हजेरी लावून गेला होता. स्वाभाविकच गच्चीवर थोडं पाणी साचलं होतं. १५ ऑगस्टला सकाळच्यावेळी मोठ्या पटांगणावर मारलेल्या पांढर्याह रेषांवर ओळीनं इयत्तावार उभं राहणारी मुलं गच्चीच्या मर्यादित जागेत थोडी विस्कळितपणानं उभी राहिली. पालकांची संख्याही खूप असल्यामुळं गच्चीत सार्यांतनाच थोडं दाटीवाटीनं उभं राहावं लागलं. पण मशाल मिरवणुकीचा व घोषणांचा प्रभाव अजूनही बालमनांवर तरंगत होता. रात्री बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी ‘एक साथ – सावधान’ हे शब्द वातावरणात घुमले आणि सारेजण सावधान झाले. बापूसाहेब सुतारांनी ध्वजस्तंभाला बांधलेली गाठ सोडली आणि ध्वज वार्यापवर लहरू लागला. सार्यांंचे डोळे त्या ध्वजावर खिळले. सायंकाळपासून पार पडलेल्या विविधांगी अनुभवांनी सार्यांाचीच हृदयं चिंब भिजली होती आणि तशा त्या अवस्थेत ‘जन गणांचं मन अधिनायक आहे’ असं सांगणारं राष्ट्रगीत आम्ही सारे म्हणू लागलो. राष्ट्रगीतानंतर कोणाचंही भाषण होणार नव्हतं.

त्यानंतर होता आतषबाजीचा कार्यक्रम. माझ्या मनात मात्र स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज पहिल्यांदा फडकवणार्याझ भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा आवाज जणू घुमत होता. ‘‘आपल्या भवितव्याने ठरवलेला १५ ऑगस्टचा दिवस उजाडला आहे. गाढ अंधारातून लढा देऊन भारतवर्ष आज तुमच्यापुढं स्वतंत्र देश म्हणून उभा आहे. आपल्याला, आशियाला, एवढंच नव्हे तर जगालाही ही घटना सुदैवाची आहे. आमची आशा आज प्रत्यक्षात अवतरली आहे.’’ पन्नास वर्षांपूर्वीच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनीची जवाहरलालजींची ती वाक्यं आशा जागवणारी होती. आज ५१ व्या स्वातंत्र्यदिनी मंदावत चाललेल्या आशा पुनः प्रज्वलित करणारे ध्येयधुंद शब्द कुठून बरं ऐकायला मिळतील असा विचार मला घेरून टाकत होता. जमलेली बाकीची सारी मंडळी मंत्रमुग्ध होऊन बिनआवाजी दारूकामाची आतषबाजी पाहात होती. कित्येक मुलांनीच नव्हे तर अनेक प्रौढांनीही तशी आतषबाजी त्यापूर्वी पाहिली नसेल. सायंकाळी ८ वाजल्यापासून रात्री जवळजवळ १२.३० पर्यंत स्वातंत्र्याच्या ज्योती मनामनांत तेवविण्यासाठी परिश्रमपूर्वक केलेली वैचारिक व भावनिक आतषबाजी आणि कार्यक्रमाच्या शेवटी अंधाराला भेदून टाकणारी आम्ही पाहात असलेली प्रकाशाची आतषबाजी!

विद्यालयालगत दुसरी एक इमारत आहे. तिच्या पायर्यां वर महावीर महाविद्यालयाचे काही विद्यार्थी कार्यक्रम चालू झाल्यापासून संपेपर्यंत बसून होते. राजनदादांनी जेव्हा, ‘‘इथं तुम्ही काय करताय?’’ असं त्यांना विचारलं त्यावेळी ‘‘तुमचा हा सारा कार्यक्रम नुसता अनोखाच नाही तर अनमोल आहे. अशी शाळा आम्हाला मिळाली असती तर….!’’ भावनावेगानं त्या तरुणांना वाक्य पूर्ण करता आलं नव्हतं! ध्येयहीन तरुणाईबद्दल टीका करणार्याश शिक्षण-संस्थाचालकांनी त्या तरुणांची ही तहान भागवण्याची आपली जबाबदारी आहे हे ओळखायला हवं.

‘‘१५ ऑगस्टच्या सकाळी सात वाजता काही शाळांतील ध्वजवंदनं पाहण्याची संधी मला मिळाली. पण आपण सृजनमध्ये सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त जो कार्यक्रम आखला आहे तो मनात येऊन वृंदावन गार्डन पाहिल्यानंतर इतर कोणतीही बाग जशी पाहावीशी वाटत नाही तसंच माझं झालं.’’ इयत्ता दुसरीच्या वर्गप्रमुख संपदाताईंच्या कार्यक्रमोत्तर अहवालातील ही वाक्यं वाचल्यावरही मला आपणा सर्वांची जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं. राज्याराज्यांत वृंदावनगार्डन्स असायला हव्यात आणि साध्यासुध्या बागांतही कोणत्या ना कोणत्या तरी सौंदर्याचा आविष्कार दिसायला हवा.

स्वातंत्र्यदिन आणि स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरे करणं एकवेळ सोपं पण शिक्षणसंस्थातील प्रत्येक अध्यापन तासिका व उपक्रम विद्यार्थ्यांत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यांची प्रतिष्ठापना करणारा ठरावा यासाठी त्यांच्या मनांची दैनंदिन मशागत करणं तसं आव्हानात्मकच. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना आपण सार्यांंनीच ती मशागत करणार्याय शिक्षणाचा वसा घ्यायला हवा.

अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं काय करायचं?
इयत्ता पहिली : (१) ‘माझा देश’ ही बालभारतीतील कविता शिकणे. (२) भारताचा नकाशा पाहणं. (३) नकाशाच्या आऊटलाईनची सर्वसाधारण समज येण्यासाठी वेगवेगळ्या कृतींचे आयोजन. (४) माझं कुटुंब, माझं घर, माझं गाव, माझं राज्य, माझा देश – याबद्दलची सर्वसाधारण समज पोचवण्याचे प्रयत्न. (५) विद्यालयाचा ध्वज- देशाचा ध्वज, विद्यालयाची प्रार्थना – देशाचं राष्ट्रगीत, विद्यालयाचं प्रतीक – देशाची प्रतीकं पाहणं व समजून घेणं.
इयत्ता दुसरी : (१) मादाम कामा यांनी तयार केलेल्या पहिल्या राष्ट्रध्वजाबाबत माहिती. (२) तो राष्ट्रध्वज व आजचा राष्ट्रध्वज यांतील साम्यभेद (३) जन गण मन या गीताचा सर्वसाधारण अर्थ समजणं व ते म्हणता येणं. (४) राष्ट्रध्वज कागदावर काढणं व रंगवणं.
(५) बालभारतीत ‘धाडसी शिवशंकर’ हा वेचा आहे. त्याला समांतर असा ‘धाडसी बिंदूनारायण कुलकर्णी’ असा वाचनपाठ लिहून तो मुलांपर्यंत पोचवला जाईल. (६) बालभारतीमध्ये ‘आमची मंजू’ ही चित्रकथा आहे. त्याला समांतर अशी आमचे नेताजी, आमचे लालबहादुर शास्त्री अशी चित्रकथा तयार करणं. (७) ‘पत्राचा प्रवास’ हाही एक वेचा इयत्ता दुसरीला आहे. विनोबा/महात्माजी/इंदिराजी इत्यांदीपैकी एखाद्या व्यक्तीचं पत्र संपादित स्वरूपात मुलांपर्यंत पोचवणं. (८) चित्रकलेच्या संदर्भात महात्मा गांधींचं सर्वांनी मिळून केलेले कोलाज व परकीय मालाच्या होळीची गोष्ट ऐकून त्याबद्दल काढलेली चित्रं.
इयत्ता तिसरी : इतिहासाची साधनं हा विषयांश समजून घेण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष काम केलेल्या व्यक्ती, त्यावेळची काही छायाचित्रं, त्या कालावधीतील वर्तमानपत्रं, मासिकं, ध्वनिफिती-अशा विविध माध्यमांमार्फत इ.सन १९४२ ते १९४७ हा काळ समजून घेण्याचा प्रयत्न करणं.
इयत्ता चौथी : (१) ध्वजसंहिता समजून घेणं. (२) ‘जन गण मन’ व ‘वंदेमातरम्’ ही गीतं समजून घेणं, वहीत उतरून घेणं व त्यांच्यासंबंधी चित्रकला व हस्तकला यासारख्या माध्यमांमार्फत काही प्रात्यक्षिक कामं करणं. (३) या इयत्तेचा प्रकल्पविषय संदेश हा असल्याने स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे काही संदेश काही व्यक्ती मुलांना पोस्टानं पाठवतील. (उदाहरणार्थ, विद्यालयाच्या परिवारातील विजय तेंडुलकर, यदुनाथ थत्ते, राजा मंगळवेढेकर, सरिता पदकी, डॉ. मोहन आगाशे, शांता शेळके, शिरिनबेन चोकसी, विद्या पटवर्धन, मॅक्झीन बर्नसन, श्री. वि. वि. चिपळूणकर, श्री. दत्ता सावळे, मेधा पाटकर इत्यादी. (४) राष्ट्रीय प्रतीकं मुलांना संदेश देत आहेत असं समजून केलेलं लेखन. (५) विद्यालयाची काही माजी मुलं चौथीच्या विद्यार्थ्यांना संदेश लिहून ते पेजर, पत्रं, तार, फॅक्स इत्यादी साधनांमार्फत पाठवतील.