वाचा-लिहायला शिकताना…

आज स्पर्धेनं चरमसीमा गाठलेली आहे. माणसाची सगळी बुद्धी आणि शक्ती त्यासाठीच पणाला लागते. स्वतःचा व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून विकास साधण्यासाठी प्रयत्न करणं याची काही शक्यताच शिल्लक राहत नाही. आपली शिक्षणपद्धतीही याला जबाबदार आहे. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी नसून फक्त मार्क्स मिळवण्यासाठी आहे असंच मुलांना शिकवलं जातंय. विचार करायला शिकणं, शब्दसंग्रह वाढवणं, शब्दांचा नेमका आणि अचूक वापर, कल्पनाशक्तीचा विकास यासारखे गुण दुर्लक्षित राहतात. असलेले गुणही मारले जातात. क्रमिक पुस्तकातील धड्यावरच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या शब्दात लिहिणार्यार विद्यार्थ्याला कमी गुण दिले जातात. आणि वर्गात शिक्षकांनी लिहून दिलेलं उत्तर तंतोतंत उतरवणार्या्ला जास्त! यातून विद्यार्थ्यांना कोणता संदेश जातो?

भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ पोकळ मुळाक्षरं, शब्द, व्याकरण यांचा अभ्यास नव्हे. त्या शब्द वाक्यांमधून अर्थ मनामधे शिरतो. एखादा नवीन अनुभव त्यातून मनोमन घेतला जातो. भाषा म्हणजे तो अनुभव पोचवण्याचे माध्यम. एकमेकांच्या मनातले विचार जाणून घेण्याचा एक मार्ग. त्यामधून केवढा तरी आनंद मिळू शकतो. पण शाळेत लिहिणं, वाचणं शिकवताना याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. अक्षर, लिपी अन् शुद्धलेखन यामधेच अनेकदा ते अडकून पडतं. भाषेचा चांगला वापर करण्यापासून, वाचण्यातल्या आनंदापासून मुलं पारखीच राहतात.

लखनौच्या नालंदा संस्थेमधे मात्र उपक्रम वेगळ्या दिशेने घेतलेले दिसतात. शिक्षणातून आत्मविश्वास, निरीक्षण क्षमता, कल्पनाशक्तीचा विकास, अभिव्यक्तीचं सामर्थ्य हे गुण आत्मसात करता यावेत या दृष्टीनं तेथे केलेले प्रयोग महत्त्वाचे वाटतात.

श्री. कमलेशचंद्र जोशी नालंदा संस्थेच्या ‘प्रारंभ शैक्षिक संवाद’ या त्रैमासिकाचे संपादन करतात. यांनी या उपक्रमांबद्दल लिहिलं आहे.

आमच्या शाळेत पहिली, दुसरी व तिसरीत शिकणारी बहात्तर मुलं होती. ती मागास ग्रामीण भागातली होती. त्यातली काही मुलं प्रथमच या अनौपचारिक शाळेत आली होती. काही मुलं सरकारी शाळातून पहिली/दुसरी/तिसरीत असताना मधेच शाळा सोडून घरी बसली होती.

मुलांचे लिहा-वाचायला शिकणं अर्थपूर्ण व्हावं यासाठी आम्ही आवर्जून प्रयत्न करत होतो. त्यामुळे क्रमिक पुस्तकाच्या अभ्यासाबरोबरच फक्त लिहावाचायला शिकण्यासाठीही एक तासिका आम्ही ठेवली होती. त्यासाठी मुलांना गोडी वाटेल अशी चित्रांची पुस्तकं, माहितीपूर्ण साहित्य वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा केलं होतं. हे सगळं साहित्य आम्ही कॉम्प्युटरवर टाइप करून घेतलं, चित्रं चिकटवली. मग त्याच्या दहा दहा प्रती काढून प्रत्येक प्रतीला आकर्षक कव्हर घातलं आणि मुलांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग करायला सुरूवात केली. वर्गात शिकवण्याची पद्धतही बदलली. एकेकटं बसणं, मित्राबरोबर, छोटे गट करून किंवा शिक्षकांच्या बरोबर बसणं यातल्या कोणत्याही पद्धतीनं अभ्यास करण्याची मुलांना मोकळीक दिली. पहिलीतील मुलांना शिक्षिका शिकवत असत, त्याबद्दल बोलत असत, त्यातले शब्द ओळखायला मदत करत असत. दुसरी-तिसरीतल्या मुलांना ही पुस्तकं हाताळण्याची, त्यांना हव्या त्या पद्धतीनं वाचण्याची मुभा होती. शिक्षिका त्या मुलांना लागेल ती मदत करत असत. कोणत्याही वर्गात वीसपेक्षा जास्त मुलं नव्हती. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणं त्यांना सहज शक्य होत होतं.

पहिलीतील मुलं जास्त करून चित्रंच काढायची. शिवाय आपल्या परिसराबद्दल लिहिणं, अपूर्ण गोष्ट पूर्ण करणं, चित्र व शब्दांच्या आधारानं लिहिणं हेही करत असत. त्यातही शुद्धलेखनासारख्या तांत्रिक गोष्टींपेक्षा त्यांच्या अभिव्यक्तीकडे जास्त लक्ष दिलं जात असे.

शिक्षिकांबरोबर नियमितपणे बैठका घेऊन, चर्चा करून, वाचताना संदर्भ लावणे, अर्थ समजून घेणे, निष्कर्ष काढणे – अशा भाषेच्या वेगवेगळ्या अंगांबाबतची मुलांची समज वाढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला. लिहिण्या वाचण्यातील व्याकरणाच्या चुका काढण्यापेक्षा मुलं सहजपणे, स्वाभाविकपणे भाषा कशी शिकतील यावर जोर दिला पाहिजे हे शिक्षकांच्या लक्षात आणून दिलं.

असंही शिकता येतं
मुलं लिहा-वाचायला शिकतात तेव्हा ती नुसतीच शब्द किंवा अक्षरं बरोबर वाचण्याचा प्रयत्न करत नाहीत. वाचलेलं समजून घेताना ती त्यात आपले अनुभव गुंफतात. उदा.-तिसरीतला नऊ वर्षाचा सुग्रीव ‘सूरज और चांद ऊपर कैसे गये’ ही गोष्ट वाचत होता. गोष्टीचं शेवटचं वाक्य असं होतं की ते पळता पळता थेट आकाशात पोचले आणि तिथेच राहू लागले. त्याऐवजी त्यानं वाचलं की ते देवाच्या बरोबर आकाशात पोचले आणि तिथेच राहू लागले. देव आकाशात राहतो हे त्यानं आधी ऐकलेलं होतं, ते त्यानं गोष्टीतल्या प्रसंगाला जोडलं.

मुलं नवीन शब्द काही संदर्भाच्या आधारानंही ओळखतात. यासाठी ती बरेचदा चित्राचा उपयोग करतात. दुसरीतली सात वर्षाची रेखा ‘चींटा मोची’ नावाची गोष्ट वाचत होती. त्यातला ‘गिंजाई’ हा शब्द तिला वाचता येईना. पण पुस्तकात त्या किड्याचं चित्र होतं. ते पाहिल्याबरोबर तिला तो शब्द काय असेल हे समजलं आणि मग तिनं तो वाचला.

मुलांचं अर्थाकडेही लक्ष असतं. दुसरीतली सात वर्षाची सोनी पुस्तक वाचत होती. त्यात एक वाक्य होतं.- ‘बिट्टीला बघून वडील हसले’. त्यातला ‘हसले’ हा शब्द तिला नीटसा वाचता आला नाही म्हणून अंदाजानं तिनं ‘बिट्टीला बघून वडील खूष झाले’ असं वाचलं.

वाचतात… समजून घेतात..
मुलं जे वाचतात त्याचा स्वत: अर्थ लावायचा प्रयत्न करतात. अर्थ लागेपर्यंत परत परत वाचतात. फक्त त्यांना त्यासाठी योग्य तेवढा वेळ आम्ही दिला पाहिजे. दुसरीतला आठ वर्षाचा वीरेंद्र ‘पापा जल्दी आ जाना’ हे पत्र वाचत होता. वाचून झाल्यावर त्याला तू काय वाचलंस असं विचारलं. सर्वप्रथम त्याला पत्रातली खेळणी आठवली. मग तो म्हणाला की ही गोष्ट आहे. पण अचानक त्याला जाणवलं की छे! काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यानं ते पुन्हा वाचलं तेव्हा त्याला नीट कळलं. आणि मग त्यानं सांगितलं की हे कमलानं पापांना लिहिलेलं पत्र आहे.

वाचताना अपरिचित शब्द आला तरी मुलांना फारशी अडचण येत नाही. मात्र त्यांना जे काही वाचायला देऊ त्यात असे शब्द जास्त प्रमाणात येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. नऊ वर्षाच्या प्रदीपकुमारला गोष्टीतला ‘आलूबुखारा’ हा शब्द माहीत नव्हता. पण गोष्ट वाचता वाचता त्याच्या एवढं नक्कीच लक्षात आलं की ‘आलूबुखारा’ हे एक खाण्याचं फळ आहे.

दुसरा पैलू
काही मुलांना आपल्या अंदाजाबद्दल जरा जास्तच खात्री असते, त्यामुळे गडबडीनं ती चुकीचं वाचतात. तिसरीतला नऊ वर्षाचा नरपतसिंह एक दिवस ‘घोंघा’ नावाची गोष्ट वाचत होता. पण ‘घोंघा’ ऐवजी तो ‘घोडा’ वाचत होता. त्यामुळे त्याला काही ती गोष्ट कळेना. शिक्षकांनी त्याची चूक लक्षात आणून दिल्यावर मग त्याप्रमाणे सुधारणा करून त्यानं ती गोष्ट पुन्हा वाचली.

दुसरीतला सात वर्षाचा बाली चित्रकथा वाचत होता. गोष्टीत तीन ठिकाणी पिंजर्या चं चित्रं काढलेलं होतं तरी त्याला काही तो शब्द वाचता येईना. त्यावरून असं दिसतं की काही मुलांचं चित्रांकडे अजिबात लक्ष नसतं. ती निव्वळ शब्दांशीच झटापट करत राहतात.

मुलांना मधेमधे न अडवता स्वतंत्रपणे वाचायची संधी दिली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो असं दिसून आलं. ती न घाबरता, न संकोचता आपल्या मित्रांना, शिक्षकांना कठीण शब्दांचा अर्थ विचारतात.

या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते की इथे मुलांसाठी वाचायला शिकणं हा अर्थपूर्ण अनुभव होता. मुलं स्वत: वाचून, अर्थ लावायचा प्रयत्न करून, वाचनातला आनंद मिळवायला शिकत होती.

आमच्याकडे नीरस, निरर्थक, कंटाळवाणे धडे असलेल्या क्रमिक पुस्तकांची अजिबात कमतरता नाहीय. ‘जय चल, फळ खा, कमल नमन कर, पाणी भर’ यासारखे कितीतरी धडे तुम्ही पाहिले-वाचले असतील. अशा तर्हेाच्या धड्यांमुळे वाचायला शिकण्याच्या प्रक्रियेत काही जिवंतपणाच राहत नाही. नुसते शब्द वाचता येणं पुरेसं नाही. वाचनातून मुलांची समजही वाढायला पाहिजे याचा सगळ्यांनाच विसर पडतो.

लिहिण्यासंबंधी थोडेसे
मुलांना स्वतंत्रपणे लिहायला देण्यापूर्वी आम्ही त्यांना त्यांच्या परिसराशी संबंधित विषयांची, वस्तूंची चित्रं काढायला सांगत होतो. सुरुवातीला मुलं जास्त लिहू शकत नसत. त्यांची वाक्यरचना विस्कळीत होती तसंच शब्दसंग्रह सीमित होता. त्यांना एका चित्रावरून गोष्ट लिहायला सांगितली होती. त्यांनी पहिल्यांदा लिहिलेली गोष्ट अशी होती- ‘‘आंब्याचं झाड आहे. झाडावर मुलं आहेत. आंबे तोडतायत. काही मुलं झाडावर चढतायत आणि आंबे तोडण्याचा प्रयत्न करतायत. मग एक माणूस काठी घेऊन आला आणि त्यांना मारलं.’’

नियमितपणे स्वतंत्रपणे लिहायची संधी दिल्यानं त्यांचा आत्मविश्वास वाढला. ती पहिल्यापेक्षा सविस्तर, सुसंगत लिहायला लागली.
उदा.- ‘‘मी सकाळी उठले. केर काढला व राख भरली. राख भरल्यावर पुसून घेतलं. हातपाय धुऊन जेवले. जेवल्यावर वेणी घातली, कपडे बदलले आणि बॅग घेतली. शाळेत गेले आणि शाळेत अभ्यास केला आणि घरी आले व हातपाय धुऊन जेवले. मग शेतात गेले व शेतातून घरी आले तेव्हा गवत कापून म्हशीला चारा घातला व मी हातपाय धुऊन जेवले तेव्हा रात्र झाली म्हणून मी माझ्या अंथरूणावर जाऊन झोपले’’.
सहा महिन्यांनी परत त्यांना आंबे तोडणार्याग मुलांच्या चित्रावरून गोष्ट लिहायला सांगितली तेव्हा त्यांच्या लिखाणात आणखीन फरक दिसून आला.

‘‘खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एका शेतात दोन आंब्याची झाडं आहेत. मुलं आंबे तोडत होती. तेव्हा एक माणूस दंडुका घेऊन त्यांना हाकलत होता. मग त्या माणसानं खाली पडलेला आंबा उचलला आणि आपल्या घरी निघून
गेला. तेव्हा मुलं त्याच झाडावर चुपचाप बसून राहिली होती. आणि तो माणूस गेल्यावर तिन्ही मुलं खाली उतरली आणि घरी गेली. तो माणूस त्याच झाडावर एक दिवस लपून बसला तेव्हा पाचही मुलांनी पुन्हा आंबे तोडले तेव्हा
त्या माणसानं एका मुलाला पकडलं. चार मुलं पळून गेली. मुलानं विचार केला की स्वत:ची सुटका करून घेऊन पळून जावं. मुलानं जोर लावून सुटका करून घेतली आणि पळून आला. मग पाचही मुलं घरी गेली.’’ – सत्र संपत येईपर्यंत काही मुलांच्या लिखाणातून त्यांची समज वाढल्याचं जाणवलं.

समीक्षा आणि टीकासुद्धा –
मुलं मनानी त्यांना हवं ते लिहायला लागली तेव्हा त्यांच्या लिहिण्यात सहजता आली. ती त्यांचं म्हणणं व्यक्त करायला लागली. त्यांना लिहिण्याची गोडी लागली. त्याचबरोबर वाचनाकडेही त्यांचा कल वाढला. सतत नवीन वाचायला मिळावं अशी इच्छा निर्माण झाली. त्यांनी एकत्र बसून वाचायला सुरूवात केली. जे वाचलं असेल त्याबद्दल आपसात बोलायला लागली. त्या बोलण्यातून त्यांची समीक्षक दृष्टी दिसून येत होती.

याचंही एक उदाहरण दिलं पाहिजे. दहा वर्षाची शशी ‘पालीका घोडा’ ही गोष्ट वाचत होती.- एका गावात पाली नावाची मुलगी राहत असते. ती आपल्याजवळच्या पेटीत पैसे जमवते. जेव्हा शहरात जायला मिळेल तेव्हा त्या पैशातून तिला खेळणं घ्यायचं असतं. एक दिवस ती वडिलांबरोबर शहरात जाते. तेव्हा एका दुकानातला लाकडी घोडा तिला आवडतो.

ती दुकानदाराला त्याची किंमत विचारते. तो सांगतो, ‘‘तीनशे रुपये’’. पालीजवळ तर फक्त पंचावन्न रुपये असतात. त्यामुळे तिला घोडा घेता येत नाही. ती उदास होते. घरी आल्यावर तिला आजोबा विचारतात, ‘‘पाली तू उदास का आहेस?’’ तेव्हा ती त्यांना सगळं सांगते. त्यावर आजोबा म्हणतात, ‘‘हात्तिचा! एवढंच ना? चल, मी होतो तुझा घोडा!’’ मग पाली त्यांच्या पाठीवर बसते आणि आजोबा म्हणतात, ‘‘चल रे घोड्या टकॉक् टकॉऽक्!’’ – गोष्ट वाचल्यावर शशीला विचारलं की तुला गोष्ट कशी वाटली? तेव्हा ती म्हणाली, ‘‘थोडी चांगली आणि थोडी वाईट. शेवटी पालीला तो दुकानातला घोडा मिळाला असता तर बरं झालं असतं.’’ शशीनं जे वाचलं होतं ते समजून घेऊन त्यावर आपलं मत दिलं होतं. म्हणून तिचं ते मत महत्त्वाचं होतं. जेव्हा वाचलेल्या गोष्टीबद्दल आपण मत व्यक्त करतो, त्याच्याशी आपले विचार, अनुभव जोडू शकतो तेव्हाच ते वाचन परिपूर्ण झालं असं समजलं जातं.

मुलांना वाचनात रस असतो, ती वाचलेलं परत सांगू शकतात, ते आपल्या अनुभवाशी जोडून घेतात आणि वाचलेलं त्यांना समजतंय हे वर्गातल्या इतरही अनेक मुलांच्या अनुभवावरून आमच्या लक्षात आलं. काही मुलं आवडीनं स्वतंत्रपणेही वाचताना दिसतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हे दाखवणारं एक उदाहरण देतो-

दुसरीतला सात वर्षाचा सोनू ‘भालू का बच्चा’ नावाची चित्रकथा वाचत होता. आम्ही त्याला विचारलं की त्या पुस्तकात त्यानं काय वाचलं तेव्हा त्यानं अतिशय आत्मविश्वासानं सांगितलं, ‘‘एक अस्वलाचं पिल्लू सारखं बोराच्या झाडावर चढत होतं आणि परत परत पडत होतं, लुडकत होतं. चिमणीनं त्याच्यासाठी फूल आणलं पण त्याचं रडं काही थांबलं नाही. माकडानं केळं आणलं, खारीनं अक्रोड आणला पण त्याचं रडं काही थांबे ना! मधमाशीनं पोपटाला एक पान तोडून आणायला सांगितलं. मुंगीनं त्या पानाचा द्रोण बनवला, मग मधमाशीनं त्यातून मध आणला आणि पिलाला दिला. पिलानं मध चाटला आणि ते हसायला लागलं’’- सोनूनं गोष्टीचा सारांश अगदी बरोबर सांगितला.

आपण स्वतंत्रपणे वाचू शकतो असा आत्मविश्वास आल्यामुळे वाचनातून होणारा आनंद त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. प्राथमिक यत्तेत वाचायला शिकवताना ही गोष्ट आपण विचारात घेतो का?

आजपर्यंतच्या अनुभवातून आम्हाला असं वाटतं की लिहा-वाचायला शिकवताना जास्त व्यापक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे. तसंच कोणतही शिक्षण पुढे बराच काळ उपयोगी ठरणारं असायला हवं. वाचायला शिकण्याबरोबर ते समजून घेणं, त्याच्याशी नातं जोडणं, त्याबद्दल बोलणं, ते आपल्या आयुष्याशी जोडून घेणं या गोष्टीही यायला हव्यात. हे सगळं फक्त क्रमिक पुस्तकातून मिळणार नाही. त्यासाठी वेगळे मार्ग शोधायला लागतील.