आशाएँ… खिले दिल की

‘जन्माला आलेलं मूल चालायला लागणार’, हे जितकं नैसर्गिक, तितक्याच सहजपणे ‘पाच वर्षांचं मूल शाळेत जाणारच’ असं मनात येतं ना! पण नाही, ते सर्वांसाठी खरं नाही. अगदी प्रत्येकासाठी विनामूल्य शाळा उपलब्ध असली तरी त्या शाळेत जाणं नि शिकणं तितकं सोपं नाही. मुलींना तर नाहीच.
आजही गरीब वस्त्यांमधल्या मुलींना शिकायचं तर असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, झगडावं लागतं. थोडीशी मदत, संधी मिळाल्या तर मात्र इथेही उमेद जागी होते.
पुण्यातल्या लक्ष्मीनगर या झोपडवस्तीत काम करणार्याअ खेळघरातल्या अनुभवांबद्दल –

‘माये ग माये… नगं तोडू माजी शाळा…
लई लई शिकून मोठं व्हायचंय मला…’

सहावीतली मनीषा गॅदरिंगमधे अतिशय आर्ततेनं ही कविता सादर करत होती. जमलेल्या पालकांचे, मुला-मुलींचे डोळे भरून आले होते. जणू तिच्या छोट्या हृदयातली तडफड त्या शब्दांतून व्यक्त होत होती. अनेकांच्या अंत:करणाला हात घालणार्याे मनीषाच्या मनातली भीती खरी ठरली. तिला शाळा सोडावी लागली. वडिलांचं आजारपण, आईला मदत, घरातली-बाहेरची कामं या सगळ्यात शाळा बुडायची, मग पुन्हा शाळेत गेली की अभ्यास बराच पुढे गेलेला असायचा. मैत्रिणी तुटलेल्या असायच्या. मग तिचंही मन रमायचं नाही. तरीही हट्टानं सहावी पूर्ण केली तिनं. पण सातवीत सपाटून स्वत:च आजारी पडली. खूप हल्लकपणा आला. शाळेत जायची उमेदच संपली तिची.

आईच्या साडीला धरून, तिच्या आड लपून मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहाणारी शबनम! ७-८ वर्षांची शबनम अजून घरी कशी? म्हणून आईला भेटले. तर म्हणाल्या, ‘ती अजून २ वर्षांनी मदरशात जाईल. तिचा शाळेचा खर्च परवडायचा नाही आम्हाला.’ शबनमचे दोघे मोठे भाऊ अतिशय उत्साहानं खेळघराच्या सगळ्या वर्गांना येतात. त्यांना उत्तम खाजगी शाळेत घातलंय. त्यांच्या वागण्याकडे, अभ्यासाकडे आईचं छान लक्ष असतं. पण शबनम? तिला काय करायचंय शिकून मुलीच्या जातीला?

अंगावरच्या युनिफॉर्मच्या चिंध्या झालेल्या, केसांच्या जटा, ७-८ दिवसात आंघोळ नाही, अशी ७-८ वर्षांची सपना, नेहमी आनंदसंकुलच्या दारात रेंगाळायची. बोलायला गेलं तर पळून जायची. काळ्या सावळ्या सपनाच्या डोळ्यात अतिशय विलक्षण अशी चमक होती. तिचा चेहरा विसरताच यायचा नाही. चौकशी करायला गेले तेव्हा पाहिलं, घरात अठरा विश्वे दारिद्रय. त्यात सपनापेक्षा लहान चार-पाच भावंडं. एकतर वर्षाच्या आतलं. वय वर्ष चार भांडी घासत होती. वय वर्षे तीन आणि पाच तिथेच खेळत होते. आईनं सपनाबद्दलच्या तक्रारींचा पाढा सुरू केला. ऐकत नाही, शाळेत नाव घातलं तरी शाळेत जात नाही, घरात काही मदत करत नाही, सार्यान वस्तीभर भटकते, कुणाच्याही घरी जाते, उलटून बोलते. इ. ‘काल रात्री ११ वाजले तरी बाई घरी आली नाही. मी ह्या पोरांना घेऊन तिला शोधत बसले.’ आता मात्र सपना एकदम चवताळून उठली, ‘काय करू ग घरी येऊन, तो मामा पिऊन नाय-नाय ते बोलतो. मार खायला यायचं का घरी?’ सपनाचे वडील त्यांना सोडून निघून गेले होते. आईनं दुसरा घरोबा केला होता. सपना शाळेत, खेळघरात रमू शकली नाही. रस्त्यानं कडेकडेनं हिंडायचं… भंगार उचलायचं, विकायचं, खायचं… मन मानेल तसं भटकायचं… काही सांगायला गेलं की रागा रागानं बघायची. हं हं करायची नि निघून जायची. असे काही दिवस गेले. मोठी व्हायला लागली तशी वाट्याला येणार्या अनुभवांनी जाणतं बनवलं तिला. आपसूक घरात राहायला लागली, आईचा उजवा हात बनली.

खेळघराच्या सुरुवातीच्या काळातले असे काही अनुभव. त्यातनं येणार्याग अस्वस्थपणानंच आम्हाला आणखी सक्रिय बनवलं. गट जमला – मदत मिळाली – कामाला गती आली.

सुरुवातीच्या काळातलं सुप्रियाचं उदाहरण आठवतं. सपनाचाच थोडा बरा अवतार! पण रमायची खेळघरात. आपली आपलीच असायची. कुणी मधे आलं की एकदम खवळायची. पायात कधी चपला नाही, फ्रॉकला गुंड्या नाही, डोक्याचं टोपलं. मोठी मनस्वी मुलगी. तिला मनसोक्त खेळायला मिळालं तसा तिचा राग हळूहळू कमी झाला. वाचायला, बोलायला लागली, परीक्षेत पास व्हायला लागली. जरा आत्मविश्वास आल्यावर राहणीही एकदम सुधारली. मला आठवतं ‘गर गर गिरकी’च्या शिबिरात सुप्रिया एकदम खुलली. तिला स्वत:तल्या कलागुणांचा शोध लागला. गायला लागली, भांडी घासता घासता कविता करायची, नाच छान करायची – एवढंच नव्हे तर इतरांनाही शिकवून घ्यायची. सुप्रिया काळी-सावळी, थोडीशी स्थूल आणि डोळ्यात फूल म्हणून नेहमी सगळ्यांकडून हेटाई पदरी पडायची. पण आता तिच्या चेहर्यामवर वेगळंच तेज आलं. सतत गाणं गुणगुणायची. जे जे वाटतं त्याबद्दल लिहायची, पत्रानं संवाद साधायची. आई-वडिलांनाही तिचा अभिमान वाटायला लागला. सातवी नंतर आठवीत खाजगी शाळेत प्रवेश घेतला. ‘शिकायचं! दहावी करायची!’ अशी जिद्द तिच्या मनात जागी झाली. आठवी पास झाली तसा आम्हा सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

मात्र… येवढे असूनही पुढं शिकणं सोपं नव्हतं. सुप्रियाला तिच्या आतेभावाकडून मागणं आलं. नववी पास, निर्व्यसनी, माळ घातलेला सज्जन, शांत मुलगा. सुप्रियाच्या वडिलांची दारू, घरची परिस्थिती… आज ना उद्या करायचेच लग्न! सर्वांना योग्यच वाटत होतं. आम्हाला लोणकढी थाप, पुढे शिकवणार आम्ही तिला. दोन वर्ष हवं तर माहेरी ठेवू पण दहावी पुरी करू. मुख्य म्हणजे सुप्रियाला मुलगा पसंत होता. झालं! लग्न लागलं. बाई गावी गेल्या. नवरा-सासू-नणंदेच्या घरात कष्टू लागल्या. उसाच्या शेतात कामाला जाऊ लागल्या… परत भेटायला आलेली सुप्रिया काय काय सांगत होती, ‘‘काकू, किती शिकले मी गेल्या वर्षभरात! घरातलं, शेतातलं किती काम यायला लागलं. दुसर्यालचं ऐकायला लागले, गप बसायला लागले.’’ परिस्थितीच्या शाळेत आमची सुप्पी सहन करायला शिकली, राग गिळायला शिकली, अपमान सोसायला शिकली, उरापोटी कष्टायला लागली.

मुलींचं शिकणं काही तेवढं सोपं नाही, शिकण्याची आवड, इच्छा, त्यातला आनंद घेता येणं त्यासाठी कष्टाची तयारी होणं येवढं पुरेसं नाही. तर शिकायचं असेल तर त्यांना झगडायला लागतं – घरी, दारी, शाळेत, खेळघरात देखील – हे आमच्या लक्षात येऊ लागलं. शाळेत जायचं तर घरची कामं पूर्ण करून. खेळघरात यायचं तर आईची मनधरणी करून, भाऊ-वडिलांच्या शंका – संशयांना उत्तरं देऊन. गृहपाठ करायचा तो रात्री जागून, खेळघरातही बरोबरीच्या मित्रांच्या चेष्टा टिंगलींना तोंड द्यायचं, हेटाईला प्रत्युत्तर करायचं, सहज सहज होणारी दादागिरी थांबवण्यासाठी न रडता वाद घालायचे. येता जाता वाटेवरच्या टग्यांना पुरून उरायचं… मनात उमलणार्याा आकर्षणाच्या नाजूक कोंबांना दडपून पूर्ण लक्ष शिकण्याकडे केंद्रित करायचं!
१२-१३ वर्षांच्या मुलींसाठी हे सारं अजिबात सोपं नाही! कुठून येणार ही ताकद? परिस्थिती विकोपाला न जाऊ देता आपल्या बाजूनं वळवून घ्यायचं सामर्थ्य त्यांच्यात कसं येणार?

या प्रश्नांना उत्तरं शोधताना खेळघरात मुलींसाठी वेगळे संवादवर्ग सुरू केले. मनातलं बोलायला, प्रश्न मांडायला त्यांची उत्तरं शोधायला एक हक्काची जागा झाली. वाद-संवाद, चर्चा, रोलप्लेज, विचारप्रवर्तक खेळ, संस्थाभेटी, नाट्यछटा, वक्तृत्व स्पर्धा, लैंगिकता शिक्षणाची शिबिरं, कर्तृत्ववान स्त्रियांबद्दलचं वाचन असे अनेक उपक्रम या वर्गाच्या रूपानं त्यांना लाभले.

खेळघराला स्वतंत्र जागा मिळाली. साधन-सुविधा मिळाल्या, शिकण्यासाठी प्रत्येक मुलीला आर्थिक मदत देणं शक्य झालं. अवघड वाटणार्याठ विषयांसाठी मदत करणारे अभ्यासवर्ग मिळाले.

ज्यांना खेळघरात नियमित येणं शक्य होतं अशा मुलींमधे खरोखर खूप बदल जाणवू लागले आहेत. त्यांना अभ्यासात रस वाटायला लागला आहे. जिथे जिथे त्या मागे आहेत, ती दरी प्रयत्नपूर्वक भरून काढायच्या प्रयत्नाला त्या लागल्या आहेत. कुणी आईबरोबर संवाद साधू लागल्या. आईला खेळघराच्या पालकगटात येण्यासाठी तयार करू लागल्या. वडिलांना-भावाला एकदा तरी खेळघर बघायचा आग्रह करू लागल्या. रस्त्यावरच्या टग्यांकडे दुर्लक्ष, ताठ मानेनं प्रत्युत्तर आणि नाहीच ऐकलं तर त्यांच्याविरूद्ध तक्रार करायला शिकल्या. खेळघरातल्या मुलांसमोर आपलं म्हणणं मांडायला शिकल्या. काही मुली परीक्षेत ५०% वरून ७०% पर्यंत जाऊन पोचल्या. आत्मविश्वासामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळंच तेज दिसायला लागलं. त्यांच्यातल्या ह्या बदलांमुळे पालकही सुखावले, त्यांच्या दृष्टिकोनात बदल होऊ लागले.

गेल्या ३-४ वर्षात पुढे आलेल्या पल्लवी, रोहिणी, दीपा, सविता, लक्ष्मी, शारदा, शिल्पा… यांच्याकडे पाहून आपली दिशा योग्य आहे असा दिलासा वाटतो. अर्थात खेळघरातल्या येणार्यान प्रत्येक मुलीच्या बाबतीत हे शक्य होत नाही. काही वेळा घरातल्या अडचणी, तब्येतीचे प्रश्न, गावी जाणं, मुळातच अभ्यासात खूप मागे असणं, घरातल्या एखाद्या व्यक्तीचा विरोध अशा अनेक कारणांमुळे मागे राहात असलेल्या मुलींना कधीच विसरता येणार नाही. पण आमच्याकडून होणार्र्ल प्रयत्नांनाही मर्यादा आहेत, ह्याची जाणीव आहे.

लक्ष्मीची गोष्ट सांगून लेख संपवते.
लक्ष्मी पाच बहिणीत थोरली. ७-८ वर्षाची होईपर्यंत तिला शाळेत जायला मिळालं नाही. आईची नर्सिंग ब्युरोची नोकरी. घरातलं बहिणींचं करता करता दिवस संपून जायचा. नवव्या वर्षी मात्र शाळेत जायला मिळालं. पुढं चौथीत दोन यत्ता पूर्ण करून एकदम सहावीत आली. मुलींच्या वर्गात लक्ष्मी अत्यंत परखडपणे तिची मतं मांडायची. सुरवातीला आईबद्दल खूप राग होता. पण धडपडून घरातली कामं पूर्ण करून शिकायची जिद्द तिच्या मनात जागी झाली होती. सातवीत ३-४ महिने लक्ष्मी खेळघरात फिरकलीच नाही. नंतर समजलं की तिनं दुपारी एक काम धरलं आहे. मुलींचा वर्ग घेणार्यास ज्योतीताईनं तिला पत्र लिहिलं तेव्हा तिनं उत्तर दिलं, ‘‘ताई, बहिणीच्या आजारपणात आईची तारांबळ पाहिली. म्हटलं माझ्या जागी मुलगा असता तर त्यानं घराला हातभार लावला असता की नाही? मग मी नको का करायला?’’ माझं मन भरून आले. चिंता येवढीच वाटते, लक्ष्मीच्या आईला कामामुळे कधीच पालकसभेला येता आलं नाही. त्यामुळे इतर आयांसारखं त्यांच्यात बदलाची सुरुवात झाली नाही. लक्ष्मीच्या लग्नासाठी त्या थांबतील ना? आधी तिला शिकू देतील ना?

आमच्या डोळ्यांसमोर या मुली जाग्या होऊ लागतात, विचार करायला लागतात, स्वत:ची परिस्थिती बदलण्यासाठी धडपड करायला लागतात. सक्षम होण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात आणि त्याही पलीकडे जाऊन इतरांना मदत करायचा प्रयत्न करतात. हे बदल, हे मोठं होणं या सार्याेचे आम्ही साक्षीदार आहोत या भावनेची ऊब पुढील कामाला बळ देते.

अर्थात ही फक्त सुरुवात आहे. या पुढे किमान अठराव्या वर्षापर्यंत लग्न पुढे ढकलणं, दहावी नंतरही १-२ वर्ष काही व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यायला मिळणं, घराबाहेर पडून लांब जाऊन नोकरी करायला परवानगी मिळणं, ही एकेक गोष्ट साध्य करणं, त्यांच्यासाठी महाकर्मकठीण आहे. हे सगळं साधायचा प्रयत्न करायला त्यांची ताकद खूप अपुरी आहे. त्यांना मदतीची, संधींची, आधाराची गरज आहे. आणि हे होऊ शकलं तरच सासरघरातही त्या मानानं-माणसासारख्या जगू शकणार आहेत, येवढं मात्र नक्की. आता वाटेवरचा काळोख थोडासा दूर होऊन प्रकाशाची चाहूल लागायला लागलीय. हेही नसे थोडके!