काय सांगू? कसं सांगू?

लैंगिकता शिक्षणाच्या दृष्टीनं डॉ. साठे यांनी ‘हे मला माहीत हवं! किशोरावस्था ओलांडताना’ हे पुस्तक मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाच्या निमित्तानं पालकनीतीच्या माहितीघरात चर्चा आयोजित केली होती. वय दोन ते अठराच्या मुलांशी या विषयावर कसा संवाद साधायचा हा चर्चेचा मुख्य विषय होता. दोन तास मोकळेपणानं बोलणं झालं. शेवटी संजीवनी आणि विनय कुलकर्णींनी त्यांना या विषयावर तुम्ही एक पुस्तकच लिहा – असं आग्रहानं सुचवलं. ते हे पुस्तक, गेल्या जानेवारीत प्रकाशित झालं.

पालकत्वाचा विचार विविध संदर्भांतून करत असताना लैंगिकता हा सर्वस्पर्शी संदर्भ आपण विसरू शकत नाही, ह्यामुळेच मुलांना लैंगिकता शिक्षण देणं हे पालकांसाठी अपरिहार्य असतं. मुद्दामहून दिलं नाही तरी आपल्या जगण्यावागण्यातून आपण अनेक गोष्टी मुलांपर्यंत पोचवतच असतो. त्यातून काही शिक्षण आपोआपच होतं. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण देण्याची जबाबदारी जरी तज्ज्ञांवर टाकली तरी आपल्या दृष्टिकोनातून, बोलण्यातून आपण योग्य गोष्टीच पोचवाव्यात यासाठी विचार व्हायला हवा. योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टी माहीत असायलाच हव्यात. त्यासाठी ‘काय सांगू, कसं सांगू’ हे डॉ. शांता साठे व डॉ. अनंत साठे यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय उपयुक्त तर आहेच पण निरतिशय आवश्यक आहे.

टीव्ही आणि इतरही माध्यमांमधून लैंगिकतेचा मारा सुरू असतो. जे दाखवलं जातं ते अतिशय बटबटीत, अवास्तव, अतिरंजित व हिंसक स्वरूपाचं असतं. तरुण तरुणीच नाही तर लहान लहान मुलांच्याही हे विकृत स्वरूपात सामोरं येतंय. त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल अतिशय चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोचत्येय. हा मारा थांबवणं तर पालकांच्या हातात नाहीच. म्हणूनच लैंगिकतेबद्दल योग्य ती माहिती मुलांना देण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची आज पूर्वी कधी नव्हती एवढी गरज निर्माण झाली आहे. पालकांनाही हे सर्व जाणवतंच आहे. पण सांगायचं कसं, केव्हा, किती असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले आहेत.

साठे दांपत्य गेली पंचवीसहून अधिक वर्ष लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहेत. शाळांतून हा विषय शिकवायला शिक्षकांची तयारी नव्हती. म्हणून त्यांनी प्रशिक्षण देऊन कार्यकर्ते तयार केले. भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या पुणे शाखेतर्फे १९७७ सालापासून ठिकठिकाणी कार्यशाळा घेऊन ते प्रबोधनाचं काम करत आहेत. त्यावेळी पालक-मुलांशी बोलताना त्यांना असा अनुभव आला की मुळात पालकांच्याच मनात लैंगिकतेबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यांनी या संकल्पनेचा खोलवर जाऊन विचार केलेला नाही. याविषयीची पुरेशी मूलभूत शास्त्रीय माहितीही बर्यािचजणांना नाहीये. दुसरं म्हणजे संकोच आडवा येतो. ही कोंडी फोडायची तर निकड आहे. डॉ. साठे पतीपत्नींनी खास आईबाबांसाठी पुस्तक लिहून हे अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे.

पहिल्या दोन प्रकरणातून लैंगिकता या संकल्पनेची ओळख, त्याची व्याप्ती, अर्थ आणि आपल्या त्याविषयीच्या कल्पना याची सविस्तर चर्चा केलेली आहे. माणूस हा निव्वळ अंतःप्रेरणेवर विसंबून जगणारा प्राणी नाही. त्यामुळे मानवी कामजीवनाचा विचार करताना प्रत्यक्ष शारीरिक संबंधापलीकडे जाऊन इतर बर्यावच गोष्टींचा विचार करावा लागतो. मानवी कामजीवनाचे सात पैलू आहेत. त्यामुळे ‘सेक्स’ या शब्दाचा अर्थ त्या त्या संदर्भाच्या अनुषंगाने बदलतो आणि तसा समजून घ्यायला लागतो. ते पैलू असे – (१) स्त्री-पुरुष परस्पर आकर्षण (शारीरिक), ओढ (२) कामप्रेरणा – कामपूर्तीची अपेक्षा, त्यापासून मिळणारा आनंद (३) लैंगिक वर्तन – व्यवहार – त्यात गुंतलेल्या भावना, त्याबद्दलचे निकष, या व्यवहारामधल्या योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक, नैसर्गिक-अनैसर्गिक इ. (४) कामप्रेरणेकडे बघण्याचा दृष्टिकोन (५) कामप्रवृत्ती – समलिंगी, भिन्नलिंगी, उभयलिंगी (६) स्त्रीच्या/पुरुषाच्या कामप्रेरणा आणि (७) मानवी प्रजोत्पादन – बाळाचा जन्म.

विविध अंगांनी होणारा शास्त्रीय अभ्यास हा लैंगिकता संकल्पनेचा पहिला टप्पा आहे. शारीरिक मिलन आणि बाळाचा जन्म हा लैंगिकतेमधला महत्त्वाचा भाग असला तरी तेवढ्यापुरतीच माहिती म्हणजे लैंगिकता शिक्षण नव्हे, त्याच्या जोडीला लिंगभावाची (स्त्रीत्वाची/पुरुषत्वाची) ओळख आणि कुटुंबात, समाजात त्यांनी निभावायच्या भूमिका, सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन, देहप्रतिमा, कामप्रेरणेची अभिव्यक्ती, माया, प्रेम, जवळीक, नाती तसंच शृंगार आणि त्यातला आनंद-सुख या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो.

इतक्या गुंतागुंतीच्या आणि अतिव्याप्त विषयाबद्दल मुलांशी कसं बोलायचं, सुरुवात केव्हा करायची याचा विचार पुढच्या चार प्रकरणातून मांडला आहे. मुलांचं शारीरिक वर्तन, त्यांना स्वतःच्या शरीराबद्दल झालेली जाणीव, त्यांना पडलेले प्रश्न, त्यांच्या मनात निर्माण झालेला लिंगभाव या अनुरोधानं साधारण तीन ते चार वर्षाचा एक टप्पा याप्रमाणे ० ते १८ या वयोगटातील मुलांचा विचार केला आहे. त्यातल्या काही मुद्यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो –
बाललैंगिक अत्याचार – त्याबद्दलचा भ्रम काय आहे आणि सत्य काय आहे ते विस्तारानं सांगितलं आहे. मुलाला असा काही अनुभव आला आणि त्याबद्दल आईला कळलं तरी बाबांपासून सहसा ते लपवलं जातं. हे योग्य नाही. अशावेळी आई-बाबा दोघांनीही एकत्रितपणे मुलाला आधार, संरक्षण देणं, ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं. मुलींप्रमाणेच मुलग्यांशीही पुरुषांनी (तसेच त्यांच्यापेक्षा वयानं मोठ्या मुली, स्त्रियांनी) गैरवर्तणूक केल्याची (थोडी असतील, पण) उदाहरणं आहेत.

टी.व्ही. मालिकांमुळे गर्भपात आणि बलात्कार याबद्दलही मुलांना कुतूहल निर्माण होतं. पण मुलांनीच त्याबद्दल विचारलं तर सांगावं नाहीतर मुद्दाम उकरून काढून याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही.

इंटरनेटवर पोर्नोसाइट माहीत झाली किंवा मित्रांकडून माहिती झाल्यामुळे अशी साईट मुलांनी पाहिली तर त्याबद्दल नुसतं रागावण्याऐवजी त्यात काय चुकीचं आहे हे समजावून सांगावं. आपण घरात इंटरनेटवरच्या साइटस् लॉक केल्या तरी सायबर कॅफेमधे जाऊनही मुलं त्या पाहू शकतात याची जाणीव पालकांनी मनात ठेवावी असा सावधगिरीचा इशारा दिला आहे.

मुलग्यांनाही मासिक पाळीविषयी माहिती असणं अधिक चांगलं, त्यामुळे त्यांची मुलींकडे बघण्याची दृष्टी बदलते. आईशी, बहिणीशी, पुढे जाऊन पत्नीशी त्या काळात ते समजूतदारपणे वागतात.

किशोरवयीन मुलामुलींच्या प्रश्नांच्या चर्चेसाठी आधारगट बनवणं खूप फायद्याचं ठरतं. वैयक्तिक पातळीवरील संवादापेक्षा गटामधे अधिक मोकळेपणानं बोललं जातं. ‘असं करा’, ‘असं करू नका’ असं सांगण्यापेक्षा ते जास्त फायद्याचं ठरतं.
‘एकतर्फी प्रेम’ हे प्रेम नव्हेच. कारण प्रेमातली भावनिक ओढ, कोमलता त्यात नाही. उलट हिंसा आहे. अशा तर्हेसची हिंसा, स्त्रियांची छेडछाड, पैशाच्या जोरावर स्त्रियांची लैंगिक छळणूक ह्याविषयी येणार्याह बातम्यांबद्दल मुलांशी चर्चा करायला हवी. आणि अशी कृत्यं म्हणजे पुरुषजातीला कलंक आहे हा संस्कार ही त्यांच्यावर व्हायला हवा. आणि तोही आईइतकाच किंबहुना त्याहून जास्त बाबांकडून व्हायला हवा.

लैंगिकता हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग, पण ती भावना जीवनाला ग्रासून टाकणारी न होता ते संपन्न बनवणारी व्हायला हवी. त्यासाठी किशोरवयीनांशी बोलताना त्यातले धोके आणि जबाबदार्यांतबरोबरच त्यातलं सौंदर्य, माधुर्य, हळुवारपणा आणि पारस्परिक आनंद (mutual) हेही उलगडून दाखवायला हवं. आणि त्यासाठी निव्वळ नरमादीपणापलीकडे जाऊन स्वतःची स्त्री-पुरुष म्हणून ओळख व्हायला हवी. स्वतः इतकाच दुसर्याडचा आदर करणं, आत्मसन्मानाइतकाच दुसर्याणचा सन्मान जपण्याची तयारी हवी.

आजची समाजाची स्थिती बदललेली आहे. स्त्रीपुरुष एकमेकांच्या संपर्कात, सहवासात येण्याचं प्रमाण वाढलं आहे. लग्नं उशिरा होतायत, संततिनियमनाची साधनं सहज उपलब्ध आहेत. त्यात आणखी आपणच मुलांना माहिती दिली तर ती प्रयोग करून पाहतील अशी पालकांना भीती वाटते. पण केवळ अज्ञानापोटी घडणार्याप चुकीच्या, धोकादायक वर्तनाचं प्रमाण काळजी करण्याइतकं मोठं आहे. अशा परिस्थितीत आपण मुलांशी लैंगिकतेबद्दल बोलायचं टाळतो याचाच अर्थ त्यांना त्यासंबंधात मार्गदर्शन करायचं राहून जातं : ज्याची आज सर्वाधिक गरज आहे!

लैंगिकतेविषयी मुलं आणि पालक दोघांच्या मानसिकतेचा, शंका, गैरसमजुती, अज्ञान, त्यांच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा या सगळ्याचा अतिशय बारकाव्यानं, सहज सोप्या भाषेत समतोलपणे आणि साकल्यानं विचार केला आहे हे पुस्तक वाचताना ठळकपणे जाणवतं. शिवाय सांगण्याची पद्धत ‘आम्ही सांगतो-तुम्ही ऐका’ अशी नाही तर ‘आपण बोलू या’ अशी सहज संवाद साधणारी आहे. असं हे पुस्तक ‘आजच्या’ पालकांना त्यांच्या वाटचालीत नक्कीच मार्गदर्शक ठरेल. फक्त आईनंच नव्हे तर बाबानंही आवर्जून हे वाचावं.

अगदी जाता जाता, इतक्या सुंदर पुस्तकात राहून गेलेल्या एका कमतरतेकडे नम्रपणे लक्ष वेधते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फक्त ‘आई आणि मुलगी’ दिसतेय. वडील आणि मुलगाही असते तर वडिलांचा सहभाग आणि मुलग्यांसाठीही लैंगिकता शिक्षणाची गरज असते ह्या मुद्याला हातभार लागला असता. पुस्तकात ते स्पष्टपणं मांडलेलंच आहे, तेव्हा मुखपृष्ठावर नसण्यानं फारसं बिघडत नाही पण असतं तर… दुधात साखर…
पुस्तक इतकं उत्तम आणि महत्त्वाचं आहे की त्याच्या अनेक आवृत्त्या निघतील. ह्या आवृत्तीत असलेली कमतरता पुढे भरून काढता येईल. एवढीच त्यामागची इच्छा.