ओळख – ‘सेतू’ची

‘सेतू’ हा नागपूरचा काही सुजाण पालकांचा गट. त्यापैकी अमर दामले नुकतेच पुण्याला पालकनीतीचं काम समजावून घ्यायला आले होते. वैयक्तिक पालकत्वाच्या निमित्तानं समोर येणार्या आव्हानांना आनंदानं खांद्यावर घेऊन नवनवीन कल्पना साकार करण्यासाठी स्नेहा आणि अमर हे दांपत्य उत्साहानं कामाला लागलं आहे. त्यांच्या आणखी काही मित्रांच्या गटासमवेतच्या या ‘सेतू’ बद्दल स्नेहाताई सांगत आहेत.
काम आणि वैयक्तिक आयुष्यातलं पालकपण यांचा सुरेख मेळ घालायचा ही मंडळी प्रयत्न करताहेत. दुसर्याव भागात स्नेहाताईंच्या अनुभवांबद्दल वाचूया.

कितीतरी प्रश्न वेगवेगळ्या वयाच्या मुलांच्या पालकांना रोजच सोडवावे लागतात.
– रोज मुलांना डब्यात काय द्यायचं?
– मुलांच्या प्रश्नांना काय आणि कसं उत्तर द्यायचं?
– सतत टिव्ही पाहण्यामुळे मुलांवर अनिष्ट परिणाम होतात हे मान्य पण मुलांनी टिव्ही पाहायचा नाही तर काय करायचं?
– एकच मूल असावं की दोन?
– डोळ्यांचा व्यायाम करून चष्म्याचा नंबर कमी होतो का?
– अलीकडे आमच्या घरी बापलेक एकमेकांशी बोलतच नाहीत आणि बोलले की हमरीतुमरीवरच येतात.
– मुलगा खूप हुषार आहे. त्याला सगळं येतं पण नेमकं पेपरच्या वेळी काय होतं कोणास ठाऊक. पेपर नीट सोडवतच नाही.
– आजकाल मुलं पुस्तकं वाचत नाहीत.
– बाहेर गेलं की मुलं काहीतरी विकत घेऊन मागतात. काय करावं?
– मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे पण तिला दिशा कशी द्यायची?
– मुलांना Quality time द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं?

बरं अशा प्रश्नांसाठी आपण उठून काही डॉक्टरांकडे जात नाही. खूपदा मैत्रिणींमध्ये ह्या विषयांवर बोलल्यानंतर काही गोष्टी निश्चित स्पष्ट व्हायच्या – एक हे की फक्त आपलीच मुलं हे सगळं करीत नाहीत, इतरही मुलं थोड्याफार फरकाने अशीच वागतात. आणि दुसरं म्हणजे आज मुलांच्या रूपाने समोर येणारे हे प्रश्न फार काही टोकाचे नसले तरी त्यावर उपाय शोधावा लागणारच आहे. कदाचित पुढे यातून काही वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतील. अर्थात हे खरंच आहे की एखादा पर्याय सर्वांनाच लागू पडणार नाही कारण प्रत्येक मूल आणि प्रत्येक घराचं स्वत:चं असं काहीतरी वेगळेपण असतं. मात्र मैत्रिणींसोबत ह्या विषयावर केलेल्या चर्चेतून काय करायला नको, ह्याचं भान निश्चित येत होतं आणि वेगवेगळे प्रयोग करून, डोळस प्रयत्न करावे लागतील ह्याची जाणीव होत होती. आणि म्हणूनच ‘‘सेतू – A conscious Parent Forum’’ असं नाव घेऊन आम्ही काही मैत्रिणींनी तीन वर्षांपूर्वी महिन्यातून एकदा गप्पा मारायला भेटायचं ठरवलं. त्यात मी, स्वप्ना डबीर – विठाळकर, मैत्रेयी काळे, यशश्री तापस, मोनिका अलोणी अशा काहीजणी होतो. आपल्या ह्या गप्पांचा विषय पालकत्वाशी संबंधित ठेवायचा हे निश्चित केलं. मग त्या दिवशी जो विषय ठरला असेल त्या विषयातील एका तज्ज्ञ व्यक्तीला आमंत्रित करायला लागलो.

सेतू अर्थात पूल. हा सेतू पालक आणि मुलांना, पालक आणि तज्ज्ञांना, पालक आणि शिक्षक, शिक्षक आणि मुलं अशा सगळ्यांना जोडण्याचं, त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचं काम करतोय. ह्या अशा गप्पांना खूप प्रतिसाद मिळणार नाही हे अपेक्षित होतं. कधी कधी तर सगळ्यांनाच महत्त्वाची कामं असायची. त्या वेळी आपण हे कोणासाठी करतोय – असे विचार येऊनही कालक्रमण सुरू होतं. मात्र हे लक्षात आलं होतं की बाकी अगदी कोणाला नाही तरी स्वत:ला तर फायदा होतोय ना! मुलांकडून अपेक्षा, प्रश्न ह्या सगळ्या बाबतीतला आपला दृष्टिकोन बदलला आहे किंबहुना समृद्ध झाला आहे हे जाणवत होतंच. मात्र हळूहळू ही कल्पना आणि संवादाची गरज बर्या्च जणांना पटली. पुढे मंजुषा लागू, वैशाली, मनीषा, संगीता ह्या मैत्रिणीदेखील नियमितपणे येऊ लागल्या. पुढे तर फक्त काही मैत्रिणींमधला हा संवाद न राहता अमर, श्री. माटे, श्री. कलंत्री, श्री.खोंडे इ. अनेक बाबा मंडळी आम्हालाही काहीतरी नवीन शिकायचं आहे असं म्हणत उत्स्फूर्तपणे सेतूमध्ये सहभागी झाले. आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून महिन्याच्या दुसर्याक शनिवारी हजर राहायला लागले.

आमच्या ह्या समृद्ध होत जाण्यामध्ये नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी, जेष्ठ आणि श्रेष्ठांनी अगदी प्रत्येक वेळी कुठलीही सबब न सांगता, निरपेक्षपणे मदत केली. त्यामध्ये डॉ. श्रीकांत चोरघडे, डॉ.सुधीर भावे, अनुपमा गडकरी, किशोर महाबळ, डॉ.सी.जी.पांडे, डॉ. कोतवाल, जयश्री काकडे, सुरेंद्र गोळे असे कितीतरी आहेत.

मागील काही महिन्यांपासून नागपूर प्रमाणेच वर्ध्याला आणि औरंगबादला मानसी फडके ‘सेतू’ च्या माध्यमातून पालकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हळूहळू अनेकांच्या सहभागातून केवळ पालकांसाठी संवाद मर्यादित न राहता वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये शिकणार्याी विद्यार्थ्यांचा गट, समुपदेशन करण्याची आवड असणार्यांणचा गट, अध्ययन अक्षमता असणार्यार मुलांचा गट, high IQ असणार्याा (विशेष मुलं) मुलांचा गट, १ वर्ष ते ४ वर्ष वय असलेल्या मुलांच्या आई वडिलांचा गट, पौगंडावस्थेतील मुले आणि पालक अशा वेगवेगळ्या गटांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमांना सुरवात झाली आहे.

आजकालच्या मुलांची टी.व्ही. ची क्रेझ आणि मुलं वाचत कशी नाहीत हा समस्त पालकांच्या गप्पांमधला आवडता विषय! पण नुसतं असं म्हणत राहून चालणार नाही. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग-प्रयत्न करावेच लागतील हे समजून येत्या पाच फेब्रुवारीला सेतू तर्फे मुलांसाठी ‘पुस्तक मंदिर’ ह्या नावाने उपक्रम सुरू करीत आहोत. काहींची मुलं मोठी झाल्याने हौसेने त्यांच्यासाठी आणलेली पुस्तकं आता कुठेतरी आलमार्यां मध्ये पडून आहेत – अशी पुस्तकं जमवणं, निधी जमवणं, काही आजोबा-आजींना गोष्टी सांगायला बोलावणं, विज्ञान प्रयोग, गणित ह्याबद्दल गंमतीदारपणे माहिती मुलांपर्यंत पोहचवणार्यां शी संपर्क साधणं, वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, खेळ अशा उपक्रमासाठी प्रयत्न सुरू आहेत. ह्यानिमित्ताने पुस्तकांबद्दल, वाचनाबद्दल जनजागृती व्हावी म्हणून एक ग्रंथदिंडीही त्याच दिवशी काढणार आहोत.

‘सेतू’ची तीन वर्षांची वाटचाल ही अशी. अगदी सर्वसामान्य पालकांना नवीन पिढीचं पालकत्व सोपं नाही, आता तरी आपण काही नवीन शिकायला हवं आहे – ह्या विचारातून सुरू झालेली. सतत नवीन प्रयोग, नवीन दिशा आणि त्यातून येत गेलेलं, सुजाण पालक, ह्या नव्या भूमिकेचं भान. कारण आम्हा सगळ्यांना अगदी मनापासून वाटतं, प्रशिक्षण न घेता आपण करत असलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ‘पालकत्व’.

मूल्यमापन


एकदिवस केतन-तन्वीचं काहीतरी छोट्या कारणावरून भांडण झालं. तन्वी वय वर्षे चार आणि केतन वय वर्षे सात. रागारागात मी दोघांनाही जोरदार धपाटे घातले. दोघांची धुसफुस झाली. अर्थात थोड्या वेळाने ते शांतही झाले. पण आपण येवढ्या छोट्या कारणासाठी अगदी मारण्यापर्यंत जायला नको होतं, असं सारखं वाटत होतं. रात्री झोपतानाही तोच विचार डोक्यात होता. आणि मग अचानक सुचलं. मुलांना म्हटलं, आजपासून झोपायच्या आधी आपण एक खेळ खेळूया. (कुठल्याही गोष्टी करायच्या आणि करवून घ्यायच्या असतील त्याला खेळ म्हणून सांगितलं तर ते पटकन केलं जातं हा माझा अनुभव होता.) आपला खेळ असा आहे की आपण प्रत्येकानं आज दिवसभरात काय चांगलं काम केलं आणि कोणतं वाईट काम केलं ते सांगायचं. पहिलं मी सांगते हं, ‘‘आज मी सकाळी उठून फिरायला गेले हे छान काम केलं. (चां.का.) आणि संध्याकाळी तुम्हा दोघांनाही जरा जास्त जोरात मारलं हे वाईट काम (वा.का.) केलं.

सॉरी….!’’ ‘‘म्हणजे पुढच्या वेळी आम्ही भांडलो तर जरा हळू मारशील असं ना?’’ मुलगा लगेच म्हणाला आणि आम्ही तिघंही छान हसलो. मलाही जरा मोकळं वाटत होतं. अशी आमची नवीन खेळाला सुरुवात झाली. सुरुवातीला सात-आठ दिवस मुलांना आपण दिवसभरात काय वाईट केलं ते सांगता येत नव्हतं. किंवा कसं सांगावं ते समजत नव्हतं. त्यामानानं चांगलं काम पटपट सांगायची. मग म्हणायची, आई तूच सांग ना मी काय वाईट केलं आज. पण हळूहळू ती छान बोलायला लागली आणि कित्तीतरी मजेदार गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. ‘‘आज मी शाळेत टिफिन पूर्ण संपवला हे छान काम केलं (चां.का.) आणि आज शुभंकरोती म्हटली नाही हे वाईट काम (वा.का.) केलं. आज मी बाबाशी चेस खेळलो नाही (वा.का.), मी आजीचा चष्मा शोधून दिला (चां.का.), माझ्या शाळेच्या बुटांना मी स्वत:च पॉलीश केलं (चां.का.), आज माझा हिंदीचा अभ्यास पूर्ण झाला नाही (वा.का.), दुपारी मी गौरीशी न भांडता न रडवता खेळले (चां.का.), आज दुपारी तू घरी नसताना मी आपल्याच हातानं आलमारीतून चुपचाप चॉकलेट घेतलं (वा.का.).

असा दिवसभरातल्या कितीतरी गोष्टींचा जमाखर्च मांडला जाऊ लागला. आपल्या स्वत:च्याच वर्तनाकडे ह्या वेगळ्या दृष्टीने बघून स्वत:चंच मूल्यांकन केलं जात होतं. मात्र हा खेळ खेळताना एक खबरदारी मला घ्यावी लागली. ती म्हणजे खेळात आई म्हणून न खेळता तिसरा गडी म्हणूनच खेळायचं. म्हणजे खेळताना त्यांनी जे चांगलं काम, वाईट काम म्हणून सांगितलंय त्यावर त्याक्षणी काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, त्यावेळी नुसतं ऐकून घ्यायचं. समजा आई म्हणून जर मी खेळत असेल, तर तू घरी नसताना मी आपल्या हातानं चॉकलेट घेऊन खाल्लं – असं ऐकल्यावर मी लगेच म्हणाले असते, ‘‘काय रे, मी बाहेर गेले असताना असं करतोस तू?’’ किंवा म्हणाले असते…. ‘‘तुमच्याचसाठी, आणते न मी सगळं मग स्वत:च्या हातानं का घेऊन खाल्लं?’’ किंवा कदाचित म्हणाले असते, ‘‘तरीच… घरात आणून ठेवलेल्या वस्तू संपतात कशा ते कळतच नव्हतं.’’ किंवा अगदी असंही म्हणाले असते…. ‘‘येवढं खायला मिळतं, तरी चोरून खाता?’’ आई म्हणून माझी ही प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आणि उत्स्फूर्ततेने आली असती तरी त्यामुळे आमच्यामधला संवादाचा धागा ताणला गेला असता आणि पुढे हे सगळं सांगणं त्यांनी बंद केलं असतं.

आमच्या ह्या खेळातून पुढे काही वेगळे आयामही कळले. मुलांचं निरीक्षण आपल्याला अचंब्यात टाकणारं असतं. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून काही म्हणजे काही सुटत नाही. एक दिवस मी म्हणाले, पूर्ण दिवस गेला पण मी काहीही वाचलं नाही. अगदी आजचा पेपरसुद्धा वाचायचा राहिला. हे मी वाईट काम केलं. तेवढ्यात माझी लेक म्हणते, ‘‘काल तू म्हणाली होतीस उद्या कपड्यांची आलमारी आवरीन, ती तू आवरलेली नाही – हे पण तू आज वाईट काम केलं आहे.’’
क्षणभर या गुगलीनं मी गडबडलेच. मग झालेली चूक लगेच कबूल केली. पुन्हा असं होऊ द्यायचं नाही असा मनोमन निश्चयही केला. लक्षात आलं की मुलं आता स्वत:सोबत माझ्याही वागण्याचं मूल्यमापन करायला लागली आहेत. म्हणजे आता यानंतर आपल्या बोलण्या आणि वागण्यातील तफावत कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. जाणवलं की आपण नेहमी मुलांच्याच चुका दाखवत असतो पण कधीकधी आपलीही चूक असते जी आपल्याला लक्षातच येत नाही. मधून मधून मुलांच्या नजरेतून स्वत:कडे बघणंही जमलं पाहिजे. ही नवीन जाणीव अंतर्मुख करणारी होती. अर्थातच आमच्या ह्या नवनवीन प्रयोगांच्या मदतीनं मुलं आणि माझ्यामध्ये संवादाचा धागा कुशलतेने विणला जातो आहे .

लुडबुड नको, संवाद हवा


एका संध्याकाळी वीज गेली होती. रोजच्या ह्या भारनियमनानं वैताग आलाय आता असं सारखं माझ्या मनात येत होत. मुलंही कंटाळली होती. पावसामुळे बाहेर खेळता येत नव्हतं. मग त्यांचं उगाच एकमेकांच्या खोड्या काढणं, चिडवणं, मारणं आणि रडणं असं क्रमाक्रमानं चाललं होतं. पर्यायानं घरातल्या मोठ्यांच्या आवाजाची पट्टी हळूहळू वर वरची लागत होती. बाहेर थंड असलं तरी घरात मात्र वातावरण गरम झालेलं होतं. चला आपण तिघं काहीतरी खेळूया असं मी म्हणताच एक हलकीशी गार झुळूक घरात शिरली आणि मुलं सुखावली.

आज कुठला नवीन खेळ खेळू या? विचार करता करता सुचलं – आपण तिघांनीही पाळीपाळीनं आपापल्या शाळेतील एक गंमत सांगायची. मी सुरुवात करते हं, ‘‘आज माझ्या शाळेतल्या सानियानी डबाच आणला नव्हता. मग डबा खायची जेव्हा वेळ झाली न, तेव्हा ती रडायलाच लागली. मग काय युक्ती केली आम्ही, सगळ्या मुलांना म्हटलं आज आपण आपल्या डब्यातलं थोडं थोडं सानियाला देऊ या का? सगळे हो म्हणाले. आणि थोडं थोडं सगळ्यांनी तिला दिलं. कोणी बिस्किट, कोणी पराठा, कोणी शंकरपाळे, कोणी इडली असं थोडं थोडं सगळ्यांनी आपल्यातलं तिला दिलं. मग काय सानिया एकदम खूष! आता तुम्ही सांगा तुमच्या वर्गात आज काय गंमत झाली?’’ आमच्या ह्या खेळातून मग मुलांच्या शाळेतल्या खूप गंमती कळायला लागल्या. जसं, ‘‘आई आजही अनुष्कानी डब्यात कुरकुरे आणले होते. तिनी जस्सा डबा उघडला, आम्ही सगळ्यांनी तिच्या डब्यातला एक एक कुरकुरा टेस्ट म्हणून घेतला. आणि पूर्ण डबाच संपून गेला. मी तर नाही नेणार रे बाबा डब्यात कुरकुरे!’’ ‘‘आज किनई वर्गात प्रतीक आणि रजतची फाईटिंग झाली. प्रतीकचा शर्ट फाटला. मग त्या दोघांनाही डायरेक्ट जॉर्डन मॅमकडे नेले.’’ ‘‘आज वेदला न वर्गातच सु सु झाली. मग तो खूप रडत होता.’’ ‘‘आज टिचरनी शिकविलेली नवीन कविता मला खूप आवडली.’’ ‘‘आज आमच्या हिंदी आणि इंग्लिशच्या टिचर रजेवर होत्या त्यामुळे दोन्ही तासांना आम्ही खूप मस्ती केली.’’ ‘‘आज तबल्याच्या सरांनी न आम्हाला नुसतं चूप बसवून ठेवलं होतं आणि ते दुसर्या्च कोणाशीतरी बोलत बसले होते.’’ ‘‘आज गणिताच्या तासाला माझं काम सगळ्यात पहिलं पूर्ण झालं.’’

असं काय काय अद्भुत कळत होतं.

आमच्या ह्या तिघांच्या खेळामध्ये मग बाबा हजर असेल किंवा आजी घरी असेल तर त्यांनाही आपल्या ऑफिस किंवा कॉलेज मधल्या गमतींसह सहभाग घ्यावा लागायचा. शाळेच्या गमतीची आयडिया एकदम क्लिक झाली होती. मुलांना हा खेळ आवडला होता. आणि मला तर ह्या खेळामुळे अगदी नकळत त्यांच्या विश्वात घटकाभर फिरायला मिळत होतं. त्यांचं समवयस्कांमधलं स्थान, त्यांची निरीक्षणं, त्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया आणि ह्या सगळ्यातून त्यांचे तयार होणारे दृष्टिकोन ह्या सगळ्याचा मला उलगडा होत होता. आणि हे सगळं खेळता खेळता नकळत होत होतं. त्यांच्या विश्वात कुठेही प्रत्यक्ष लुडबुड न करता होत होतं आणि ते करताहेत ते चांगलं आहे की वाईट आहे, हे न ठरवता होत होतं.