एक गाव घाटातलं

शहरांमधे नव्या इयत्तेसाठी नवी वह्यापुस्तके, सॅक, वॉटरबॅगा (आणि नवे व्यवसाय/गाईडे) यांनी बाजार भरलेत तिथे गावांमधे मात्र वेगळंच चित्र. मेळघाटातल्या टिटंबा गावातील एका शिक्षणसेविकेनं तिथलं चित्र आपल्यापुढे उभं केलं आहे. त्यांच्या डोळ्यांना जे दिसतं, जसं दिसतं तसं ! त्यांच्या भाषेचीही एक छान चव आहे म्हणून काही बदल न करता इथे देत आहोत.

अमरावती जिल्हा. धारणी तालुका, धारणी तालुक्यात जाताना निसर्गाचं तोंडात बोट घालायला लावणारं दर्शन घडतं. तो परमेश्वतराच्या अथक परिश्रमाने निर्माण झालेला घाट मेळघाट. वळणावळणाचा रस्ता, कुठकुठे आंधळे वळण. धोक्याचे. थोडीशी चूक झाली तर गाडी ‘आ’ वासून बसलेल्या खाईत कोसळणारच. खाईत मोठमोठी सागाची झाडे – सूर्यकिरण झेलण्यासाठी ताडासारखी वाढलेली. सुंदर सुंदर रानफुले, सपाट चेहर्यारचे मोठमोठे पाषाण. मध्येच रस्त्यावर आलेली माकडं, क्वचित जंगलात दिसणारी हरणं, रानगवे आणि भरपूर पक्षी – रंगीबेरंगी. ही सर्व निसर्गाची करामत बघता बघता कुठे कुठे दाट जंगलात दिसणारं माणसाचं अस्तित्व. प्रथम छाप…. अंतिम असते. मेळघाट अशीच छाप पाडतो. नंतर धारणी येते. बसस्टॉपवर उतरा. बस क्वचितच लागलेली दिसेल. ट्रॅक्सवाले ओरडत असतात टिटंबा-चाकर्दा-सावलीखेडा.

ट्रॅक्समध्ये बसा. जिथे १०-१२ सवार्यार पुर्याव होतात, तिथे क्षणातच ३०-४० चा आकडा पार होतो. कुणी लोंबकळत, कुणी टपावर. त्यात टिटंब्याला जायचे म्हटले की एक नदी, एक तलाव लागतोच. वळणाचा खाच खडग्याचा पण डांबरी रस्ता. कुसूमकोट, शिरपूर, राणीतंबोली, मांडू, घुटी असे स्टॉप घेत घेत गाडी टिटंब्याला येते. ट्रॅक्समधून सौंदर्य बघावं इथलं. सातपुडा पर्वतरांगा परतवाड्यापासून पसरलेल्या त्या मेळघाटातील एकूण एक गावापर्यंत. प्रत्येक गाव या रांगांच्या कुशीत वसलेले.

टिटंबा गाव


सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेलं. साधारण २००० लोकसंख्या. मेळघाट कोरकूंचा. त्यामुळे प्रत्येक गावात कोरकू लोक. आदिवासी जमात. कुडाची छोटी छोटी घरे. उंचावर, अति उंचावर, उतारावर. गावात जिल्हा परिषदेची शाळा, एक हायस्कूल PSCचा दवाखाना, आश्रमशाळा, पोस्ट, राशनचं दुकान, गावात गल्लोगल्ली असणारी सिडूची (दारूची) दुकानं. कोरकूंच्या बुटक्या घराचा बुटका दरवाजा. आत गेल्यावर अंधार भेटतो. अज्ञानाचा, अंधविश्वासाचा.
इथला एक गाव जाणला की मेळघाटातील सर्व गावांची, तिथल्या लोकांची व आमच्यासारख्या दूर शहरातून येऊन शाळेत शिकविणार्याळ शिक्षकांची माहिती होते. मला इथे नोकरीला लागून अडीच वर्षे झाली. या वर्षात शाळेतील, गावातील अनुभव खूप आले. काही चांगले, काही वाईट. सर्व अनुभव इथे व्यक्त करते. त्यातून काय शिकावे, काय फुकावे, काय जपावे, काय करावे हाच प्रश्न उरतो.

इथे शाळेतील मुलांसाठी मोफत पुस्तके, कपडे, पिशव्या येतात. शाळेतून खडू-पेन, पेन्सिल पुरविली जाते. थोड्या लोकांचा अपवाद वगळता बाकी लोकांना शिक्षणात स्वारस्य नाही. बस, दुपारी एका वेळेला खिचडी मिळते म्हणून की काय ते मुलांना शाळेत पाठवितात. इथे प्रायमरीच्या वर्गात, प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत एक बहीण-भाऊ, फ्री येते. कारण असते – घरी कुणीच नाही. आई-वडील कामावर. दुपारी गावात फिराल तर स्मशानभूमीची शांतता असते.
येथील सकाळ पाच वाजता सुरू होते. गावात दोन-तीन हॅन्डपंप, एक विहीर. तो हॅन्डपंप व विहीर दिसली नाही, तरी आठपर्यंत फक्त आवाज येतो खट्खट् खट् खट्. नंतर नऊच्या सुमारास गावातील बकर्या्, गायी-म्हशी गोळा करण्यासाठी काही गुराख्यांची धावपळ सुरू होते मग मॅमॅ, हंबा हंबा…..

भाषाही वेगवेगळी. कोरकू – कोरकू भाषा, गोंड-गोंडी, बलई-नेमाडी, गवळी-गवळ्यांची भाषा व कर्मचारी वर्ग मराठी भाषा बोलतात. प्रत्येक गावात कोरकूंचं प्रमाण जास्तच असते. हे कोरकू आम्हा मराठी भाषिकांना ‘जांगडी’ म्हणतात. कलाल लोक प्रत्येक गावात किराणा दुकान + दारू विकतात. मारवाडी नंतर श्रीमंत असणारी ही मेळघाटातील दुसरी जात.

प्रत्येक कोरकूजवळ कमी अधिक प्रमाणात शेती आहे. काही धांडकी म्हणजे मजुरी करतात. आम्हा मराठी भाषिकांचा ते खूप राग करतात. हे लोक आपल्याला फसवितात असेच यांना वाटते.

प्रत्येक कोरकूला शंभरातून पंचाण्णव सोडले तर डझनवार मुले असतात. ‘खुदा देता छप्पर फाडके, ले लो कंबर बांधके’ इकडे आईला मुले होणे सुरू. इकडे सून बाळंतीण. तिकडे मुलगी बाळंतीण. मुलींचे प्रमाण इकडे जास्त आहे. मुले मरण्याचं, जगण्याचं सोयर नाही सुतक नाही.

एका खुराड्यासारख्या घरात आई-वडील. एखादा बुडा बाबा, बुडी माय, सात आठ मुलं मुली राहतात. ‘सेक्स’ बद्दलची सर्व कल्पना चवथी पाचवीतील मुलांना असते. बोटावर मोजता येईल एवढ्या पैशासाठी येथील मुली-बाया सर्वस्व लुटतात. अशा ठिकाणी कोण किती पाण्यात आहे हे सांगताच येत नाही. मग अधिकारी वर्ग असो वा कर्मचारी वर्ग. आम्हाला हे सर्व माहीत असून आम्ही काहीच करू शकत नाही. इकडे या लोकांत म्हणे हे सर्व कॉमन आहे.

इथे एक माणूस कितीही बायका, एक बाई कितीही नवरे करू शकते. स्त्री-पुरुष समानता व्यंगात्मक म्हणावी लागेल. सेक्स व लग्न दारू पिण्यासाठी सारखी आहे. लहान मुले सर्रास विड्या ओढतात. तंबाखू खातात. दारू पितात. घरचं वातावरण अज्ञानी, आपल्या मुलांची नावं, कोणत्या वर्गात तो आहे हे सुद्धा कोणाला माहीत नसतं. अशा परिस्थितीतून मुले शाळेत येतात. शाळेचा मिळालेला गणवेष काही विद्यार्थीच शाळेत घालून येतात. बाकीचे विद्यार्थी होळी, जत्रेसाठी राखून ठेवतात.

सुरुवातीला वाटायचं कसं होईल आपलं! पण आता सवय झाली. शहरात राहणार्याा, जीन्स्-टीशर्ट घालणार्याी, गॉगल लावून गाडीवर फिरणार्याा आम्ही मुली चोवीस तास साड्या घालून वावरतो. मी आले तेव्हा माझ्याकडे पहिला वर्ग होता. आता मी तिसरीला शिकविते. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग. अख्ख्या धारणी तालुक्यात विद्यार्थी संख्येबाबत टिटंबा प्रथम क्रमांकावर आणि शिक्षक संख्या तोकडी. मोठी भयंकर त्रेधा तिरपीट व्हायची. प्रत्येक वर्गात साठच्या वर विद्यार्थी, काही वर्गात शंभरच्यावर. आजुबाजूच्या गावातील खूप सारे विद्यार्थी आमच्याच गावात ऍडमिशन करायचे.

एका शिक्षकाला दोन वर्ग सांभाळावे लागतात. वजन कसं वाढणार! तब्बेत खालवायची. वरून अधिकार्‍याचे दौरे. रेकॉर्ड कम्प्लीट करा. आम्ही शाळेत तीन लेडीज. आता पूर्ण टिचर स्टाफ नऊचा आहे. हवेत पंधरा. केंद्रशाळा असल्यामुळे शाळेत कामे जास्तच. कुठलाही सर्वे करायला येतो. पहिलीतील पात्र विद्यार्थी शोधण्याचा, नाहीतर इतर कुठलाही फालतू. नाहीतर मध्येच ट्रेनिंग, नाहीतर पेपरचे गठ्ठे चेक करा. महिन्याच्या अखेरीस डाक बनविण्याची धावपळ. रात्री काटा एकच्या पुढे सरकतो. मरा पण काम करा. अशात महिन्याअखेरीस कुणी शिक्षक सुटीवर गेले की डोक्याला झंडू बाम लावा. सर्व कामं करता करता विद्यार्थी सांभाळा. विद्यार्थी तर अशा कामाच्या वेळी ओसामा बिन लादेन बनतात.

मेळघाटात नैदानिक (चाचणी) सुरू आहे. पहिलीतील मुलांना नाव, आईचे, बाबाचे, शाळेचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे व वर्गशिक्षकांचे लिहिता आले पाहिजे, तेसुद्धा दिवाळीपर्यंत. अंगणवाडीतून फक्त खिचडी खाऊन आलेली पहिलीतील मुले ज्यांना रेषा, गोल काढून शिकवीत शिकवीत गेले की ते दिवाळीत १ ते १० पर्यंत कसेतरी लिहितात. इथली परिस्थिती, विद्यार्थी संख्या (एका वर्गात ऐंशीच्यावर) बघून वर्गशिक्षक कोणत्या अवस्थेत असणार? तरी प्रयत्न सुरूच असतात. इथल्या प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना मराठी येत नाही, अधिकारी वर्ग म्हणतो त्यांना हिंदीत शिकवू नका, त्यांच्याशी कोरकूत बोलू नका, मराठीतच सर्व व्यवहार करा पण जेव्हा वर्गात मराठीत शिकवायला सुरुवात होते तेव्हा

गुरुजी / मॅडमच्या डोक्यावर राक्षसासारखे शिंग फुटले की काय या भावात विद्यार्थी बघतात. समजा क्या, तर उत्तर हाऊ. नही समजा क्या, तरी उत्तर हाऊ.

पुस्तक, पाटी, दप्तर भेटल्यावर ते काही दिवसच शाळेत दिसते मग फक्त विद्यार्थी येतात. इथल्या प्रत्येक कोरकूला हिंदी-मराठीला काना मात्रा लावून लिहायची व बोलायची सवय आहे. जसं कमला असेल तर कामला, अजय असेल तर आजय.

इथला पावसाळा, हिवाळा, उन्हाळा


पावसाळ्यात शाळा सुरू होते. आणि सतत पडणारा पाऊस सुरू होतो. एक ते दीड महिना मुसळधार पाऊस पडतो. नदी-नाले एक. तीस/चाळीस वर्षे पुराण्या शाळेतील वर्गातही पाऊस सुरू होतो. मग मुले कानाकोपर्या्त बसून पावसाची मजा लुटतात. जोपर्यंत पर्वतांच्या, टेकड्यांच्या, घराघरावरील छपरांचा, लोकांच्या अंगावरचा मळ निघत नाही तोपर्यंत पाऊस धिंगाणा घालतो. पूर्ण मेळघाट स्विमिंग टँक बनतो. पाऊस जातो तेव्हा मागे ठेवतो रोगराई, आणि येथील लोकांच्या संघर्षाला सुरुवात होते. पाण्याचे प्रदूषण. डायरिया सुरू. PSCच्या डॉक्टरांची धावपळ सुरू. मुलं ओली होऊन वर्गात येतात. कुडकुडतात. घरी पाठविता येत नाही कारण दुसरे कपडे नसतात. तेव्हा आठवतं आपण शाळेतून भिजून आलो की मिळणारा गरम चहा आणि आईचं प्रेमाने अंग पुसणे. इथली आई दोन भाकरी थापल्या की कामाला जाते.

पावसाळ्यात इथे चेरापुंजीला असल्यासारखे वाटते. मग हळूच चोरपावलांनी येणारी थंडी किती कठोर बनते व मेळघाट काश्मीर बनतो. पण निसर्गाची मनसोक्त मजा इथेच घ्यावी. ते दाट धुके. त्यातून हळुवार येणारे सूर्यकिरण. अजूनही निद्राधीन झालेला पर्वत. टेकड्या. इथल्या लोकांच्या नजरा मेल्या आहेत म्हणून त्यांना कौतुक नको. आम्ही मात्र कवी बनतो.

अबब ! गारठवणारी थंडी. अशा थंडीत जिथे बेडवरून पाय खाली ठेवायला जीव होत नाही तिथे ही माणसे सकाळी उठून अनवाणी पाणी भरतात. सकाळच्या शाळेत मुले कुडकुडत येतात. बिनास्वेटर, चपलाने. आमची मुले अशी कुडकुडतात
आणि आपण गरमदार कपड्यात ! कुठेतरी मनाला बोचले आणि आम्हीपण थंडी कुडकुडत झेलली.

गावात हिवाळ्यात जत्रा भरते. त्या चार-पाच दिवसात शाळेत विद्यार्थी शोधूनसुद्धा सापडत नाही. फक्त सर, मॅडम व्हरांड्यात टेबल खुर्च्या टाकून पेंडिंग कामे करत समोर भरलेल्या जत्रेचा आस्वाद घेतात. हिवाळा जातो, जाताना खरुजाची देणगी देतो आणि प्रत्येक मुलाला खरुज झाला म्हणून समजा. गावात साथच येते डोळ्याची, खरुजाची, डायरियाची.

थंडीच्या दिवसातच गावात ‘मोतीमाता’च्या नावाने जत्रा भरते याच दिवसात आमच्या केंद्र शाळेत दोन बिट्सचा क्रीडामहोत्सव सुरू होता याच दिवसात २६ जानेवारी येते. धम्माल उडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि बघण्यासाठी गावातील लोकांची गर्दी.

अभ्यासातही शाळेची प्रगती झाली हे मूल्यमापन गावातील लोकांनी केलं. आज विद्यार्थी शाळेतून घरी गेल्यावर अभ्यास करताना दिसतो. वर्गात येताना MAY I come in म्हणतो. रस्त्यात गुरुजी / मॅडम दिसले की Good morning/good afternoon करतो. आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या प्रयत्नांना फळ मिळतय. कुठेतरी परिश्रम सफल होतात. भाषेची तेवढी तफावत नसती तर आमच्या प्रयत्नांना प्रत्येक वेळी यश मिळालं असतं. इंग्रजी व कोरकू भाषेतील उच्चार बहुतांशी सारखेच असतात. म्हणून मुले मराठीपेक्षा इंग्रजी लवकर समजतात.

उन्हाळा सुरू झाला की त्याची पूर्वसूचना वारंवार येणारा वारा देतो. नुसता लाल मातीचा गागरा उडवितो. शाळेतील मोठमोठी झाडे पानझडी करून उन्हाळ्याची सूचना करतात. खूपच भारी असतो इथला उन्हाळा. या जीवघेण्या उन्हाळ्यात दूरच्या गावी गटसंमेलन असलं की नकोसं वाटतं. एकतर आमच्या केंद्रातील गावे इंटेरियर (अतिच) आहेत. तिथे नकोत बस, नको गाडी, नको सायकल, दोन पाय तुडवीत जावं लागतं. पाच कोस, सात कोस.

अशा प्रतिकूल परिस्थितीत जिथे लाईन (वीज) जवळजवळ नसतेच. मनोरंजनाची साधने नकोत, आठ नाही वाजलेत तर गाव स्मशान बनतं. जिथे कोणता रोग होणार कळतच नाही. ताप, डोकं दुखणं यासाठी जिथे गरम गरम सळईने हातापायाला डाग देणारे लोक आहेत, तिथे म्हातारं होऊनच घरी जावं लागेल असा ठाम विश्वास मनात ठेवून आम्ही राहतो. वाटतं सोडावी ही दिडदमडीची नोकरी. आमचे तरुण H.M. म्हणतात, ‘बॉर्डरवर उभ्या राहणार्याि शिपायांनी असा विचार केला तर कसे होईल. ते तिथे शत्रूंशी लढून देशाचं रक्षण करतात. आपल्यालाही अज्ञान, अंधविश्वास जो येथील लोकांत आहे त्याशी लढायचं आपलं कर्तव्य पार पाडायचं. स्वतः साठी तर खूप जगतो आपण, आता दुसर्यां साठी जगा. आणि नोकरी काय रस्त्यावर पडली असते?’ त्यांचं बोलणं ऐकलं आणि नोकरीचं महत्त्व, आपलं कर्तव्य कळलं. आता मी अभिमान बाळगते, चला देशाच्या यशात थोडातरी हातभार खारीसारखा मीसुद्धा लावते.

थंडीच्या गारव्यानंतर उन्हाळ्याच्या आगमनात कुणाचं लग्न जुळतं. अमरावती जिल्ह्यात हुंडा फारच. इथले अमरावतीकर शिक्षक सर्रास हुंडा घेतात. लाखाच्या वर बोली सुरूच असते. आम्हा नागपूरकर मुलींना हे कळलं की कोणत्या सरांनी किती लाख घेतले, मग त्यांना त्यावरून चिडवणं सुरू. त्यांचं आडनाव चेन्ज होतं. मग त्यांना ते पहा – एक लाख पाच हजार आले, ते पहा एक लाख वीस हजार आले म्हणणं सुरू.

हुंडा आणि शिक्षक किती विसंगती. आपण शिक्षक आहोत. आपल्याला हुंडाविरहित, जातिभेद, धर्मविरहीत समाज निर्माण करायचा. मग आपण विद्यार्थ्यांसमोर आदर्श कोणता ठेवणार?