टूटे खिलौने

‘‘मम्मा चल ना, मला नकोय रोबो !’’ माझा दहा वर्षाचा मुलगा म्हणाला. आम्ही एका डिपार्टमेंटल स्टोअरमधे गेलो होतो. मॅनेजरनं दर्शनी हॉल रंगीबेरंगी सुंदर खेळण्यांनी खूपच छान सजवला होता. सामान्य परिस्थितीतल्या आयांना दुकानात गेल्यावर खेळण्यांच्या विभागातून जवळजवळ ओढतच मुलांना बाजूला न्यायची सवय असते. मीही त्यातलीच एक आई होते. पण आज मीही नकळत त्या आकर्षक जाळ्यात अडकले. लवकर पुढे गेलं पाहिजे हे कळत असूनही माझे पाय स्टोअरच्या दारातच खिळले. दारातली ‘लोकर मिळेल’ ही पाटी मी आधीच पाहिली होती. मला स्वतःला टोपी आणि स्कार्फसाठी लोकर घेणं अतिशय गरजेचं होतं.

मुलाला खेळण्याच्या आकर्षणापासून वाचवण्यासाठी मी घाईघाईनं त्याचा हात ओढला. मला खरं तर त्याचे डोळेच झाकावेसे वाटत होते. अशावेळी अत्यंत अनपेक्षितपणे ‘मला रोबो नकोय’ हे शब्द त्याच्या तोंडून आल्यामुळे मी अवाक झाले. (खरं तर पटकन त्याचा पापा घ्यायची अनिवार इच्छा झाली होती. पण आम्ही दुकानात असल्यामुळे मी तसं केलं नाही.) तोंडानं काहीही बोलला तरी खेळण्यांवर खिळलेली त्याची नजर आणि जड झालेले पाय बघून माझ्या पोटात कालवलं. वाटलं, टोपी आणि स्कार्फ खरंच इतकं महत्त्वाचं आहे का?

माझं लग्न उशिरा झालं. त्यानंतर बर्याहच वर्षांनी मूल झालं. त्यामुळे मी चाळिशीची होते आणि माझा मुलगा फक्त दहा वर्षाचा होता. आयुष्यात अनेक भल्या बुर्याि प्रसंगांना तोंड द्यायची मला सवय होती. त्याला अजून ते शिकायचं होतं. मुलाच्या जन्मापासून मला बर्फासारख्या गार वार्याचचा त्रास होई. डोके असह्य दुखू लागे. तरी मी टोपीशिवाय चालवून घेत होते. शिवाय माझा जुना स्कार्फ होताच. तो डोक्याला बांधल्यावर मी विचित्र दिसत असे. पण त्यामुळे माझ्या मुलाला त्याला हवा असलेला रोबो मिळणार असेल तर काय हरकत आहे? यावर माझ्या नवर्यारची काय प्रतिक्रिया असेल हे मला माहीत होतं. त्यांनी तर फार पूर्वीच मला, ‘फाजील लाडानं तू त्याला बिघडवत्येस’, असा इशारा दिला होता. (आपण सामान्य माणसं आहोत. आपण धनिक लोकांची बरोबरी करणं योग्य नाही असंही ते म्हणायचे.) मी विचार केला की सर्वात लहान रोबो घेण्याएवढे पैसे आहेत माझ्याजवळ. टोपी आणि स्कार्फबद्दल काहीतरी सांगून वेळ मारून नेईन. अशा रीतीने मनाच्या द्विधा अवस्थेवर मात करून मी रोबो खरेदी करण्याचा निश्चय केला. तेवढ्यात दुकानाच्या दरवाजाच्या दिशेने जात माझा मुलगा इतक्या ठामपणे बोलला, ‘‘चल मम्मा, घरी जाऊ या. वर्तमानपत्रात आलं होतं की हे रोबो परदेशातल्या मुलांनी वापरलेले असतात. चीनमधला पैसा मिळवण्यासाठी ते ही खेळणी इकडे पाठवतात.’’ असं म्हणून तो घाईने दरवाज्याच्या दिशेनं चालू लागला.

त्याच्या आवाजात प्रौढपणा होता. त्याचा तर्क माझ्या बुद्धीच्या बाहेरचा होता. शाळेत आदर्श विद्यार्थी असलेल्या माझ्या मुलापुढे आम्ही पतिपत्नी शुद्ध स्वार्थी आहोत असं मला स्पष्टपणे वाटलं. मी झटकन काउंटरजवळ गेले आणि माझ्याजवळच्या पैशात जो रोबो येऊ शकेल तो घेऊन टाकला. त्यामुळे विदेशी लोकांचा फायदा होणार आहे का चीनचा याचा मी जराही विचार केला नाही.

रात्रीचं जेवण झाल्यावर तो रोबोशी खेळत होता. त्यानं रोबोच्या हातात खेळण्यातलं पिस्तुल दिलं तेव्हा रोबो एखाद्या कसलेल्या नटाप्रमाणे हावभाव करायला लागला. गोड आवाजात गायला लागला. माझ्या पतिदेवांनी खूप चिडचिड केली. रोबो महाग होता खराच. पण त्याच्याशी खेळताना मुलाला जो आनंद मिळत होता, त्याची किंमत कशातही करता येणार नव्हती. तो मोठेपणी नेता बनू दे नाहीतर आमच्यासारखा सामान्य माणूस. पण स्वतःच्या बालपणाबद्दल त्याच्या मनात कटू आठवणी राहू नयेत अशी माझी इच्छा होती. ‘‘होमवर्क करायला विसरू नकोस.’’ एवढं मात्र मी त्याला बजावलं. त्यानं ते मान्य केलं आणि तो त्याप्रमाणे वागतही होता.

परत थंडीचा कडाका सुरू झाला. ‘तुझ्यासाठी किमान चांगले बूट तरी घ्यायला हवे होते’, असं माझे पती नाराजीनं बोलले पण मी त्यांची समजूत घातली.

एक दिवस माझा मुलगा दुसर्यााच एका रोबोशी खेळताना दिसला. हा रोबो पिवळा, आकारानं मोठा आणि भीतिदायक दिसत होता. ‘‘हे काय आहे?’’ मी कडक सुरात विचारलं, ‘‘राक्षस रोबो!’’ एखाद्या जवळच्या नातलगाबद्दल बोलावं इतक्या आस्थेनं त्यानं सांगितलं. टी.व्ही.वरच्या कार्यक्रमांमुळे रोबोचा पूर्ण परिवार मला माहीत होता. त्याच्या नावाशी मला काही कर्तव्य नव्हतं. तो कोणाचा आहे हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. स्वरात जराही बदल न करता मी त्याला विचारलं, ‘‘कोणाचा आहे?’’ ‘‘माझ्या मित्राचा’’ त्याचं उत्तर स्पष्ट होतं. माझ्या मनातल्या शंकेची त्याला पुसटशीसुद्धा जाणीव नव्हती. ‘‘आमच्या वर्गात प्रत्येकाकडे वेगवेगळा रोबो आहे. म्हणून आम्ही अदलाबदली करतो.’’ त्याचं ते भाबडं उत्तर ऐकून आपण त्याच्याशी उगीचच इतक्या कठोर आवाजात बोललो हे मला जाणवलं. पण माझा नाइलाज होता. मुलामध्ये खोटेपणा, बेइमानी तर नाही ना याबाबत मी फार जागरूक असते. खरं तर मुलांच्या या वागण्यात गैर काहीच नव्हतं. पण याचं समर्थन करावं की विरोध हे माझं मलाच कळेना. ‘‘राक्षस असू दे नाहीतर आणखी कोणी.’’ नव्या खेळण्यात दंग झालेल्या त्याला मी म्हटलं, ‘‘अभ्यासात कसूर होता कामा नये. आणि हो, दुसर्‍याच्या खेळण्याशी जपून खेळ.’’ त्यानं मान हलवली. तो सांगितलेलं ऐकतो याची मला खात्री होती.

कोणीतरी दार वाजवत होतं. आलेल्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी माझ्या मुलानं धावत जाऊन दरवाजा सताड उघडला. पण आलेल्या व्यक्तीनं बाहेरून ओढून तो बंद केला. जसं काही त्याला बाहेरच राहायचं होतं. मग दाराच्या फटीतून हळूच कोणीतरी डोकावलं. तो त्याच्या वर्गातला मोटू होता. गृहपाठ करण्यासाठी तो माझ्या मुलाची मदत घेत असे. पण आज तो त्यासाठी आला नव्हता. तो धड जातही नव्हता आणि आतही येत नव्हता. उंबर्याोतूनच घाबरलेल्या चेहर्याीनं माझ्याकडे बघत होता. शेवटी धीर करून कसाबसा बोलला, ‘‘तुझं खेळणं माझ्या हातून मोडलं… मला खूप वाईट वाटतंय…’’ हे ऐकल्याबरोबर माझ्या मुलाचा चेहरा पांढराफटक पडला. त्यापूर्वी मी कधी त्याला इतकं दुःखी झालेलं पाहिलं नव्हतं. त्यानं मोटूच्या हातातून ते मोडकं खेळणं घेतलं. आणि जखमी कबुतराला हळुवार फुंकर घालावी तशी त्या खेळण्याला फुंकर घातली. सुरुवातीच्या धक्क्यातून जरा सावरल्यावर त्यानं मदतीसाठी माझ्याकडे पाहिलं. मला टोपी आणि स्कार्फची नितांत गरज असताना त्या पैशातून घेतलेलं खेळणं मोडलं हे ऐकून क्षणभर माझं मन संतापानं भरून गेलं. पण वस्तुस्थिती स्वीकारण्याशिवाय आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. मी मुलाची नजर चुकवत म्हटलं, ‘‘तुझं खेळणं होतं त्यामुळे आता काय करायचं हे तूच ठरव.’’ खरंतर मोटूला ‘जाऊ दे मोटू, झालं ते झालं. तू जा आता’, असं म्हणून भीतीच्या कचाट्यातून त्याची सुटका करायची माझी तयारी होती. पण हा न्यायनिवाडा माझ्या मुलानंच करायला हवा होता.

त्याच्यावर दडपण येऊ नये म्हणून मी हळूच आत निघून गेले आणि तो काय बोलतो ते ऐकायचा प्रयत्न करू लागले. ‘‘पण तू ते मोडलंस कसं?’’ तो रागारागानं विचारत होता, ‘‘मी ते घेतलं… माझ्या हातून पडलं…’’ मोटू बहुतेक हातवारे करून ते कसं मोडलं हे दाखवत होता. रागानं माझ्या मुलाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. अशावेळी मी मधे पडावं की नाही मला कळेना. कारण मोठ्या माणसांच्या दृष्टीनं टी.व्ही. किंवा कॅमेर्या ची जी किंमत असते तितकाच रोबो त्याच्यासाठी किमती होता. पण तरीसुद्धा मनाचा मोठेपणा हा अनमोलच गुण आहे.

ती दुःखद निःशब्द शांतता त्या दोघांइतकीच मलाही असह्य व्हायला लागली होती. बर्या च वेळानंतर संताप गिळून, मनावर ताबा मिळवत तो बोलला, ‘‘बरं, जाऊ दे’’ त्याचा आवाज पडलेला पण स्पष्ट होता. ते ऐकताक्षणी मोटूनं तिथून धूम ठोकली. न जाणो माझ्या मुलाचा विचार बदलला तर… अशी त्याला भीती वाटली असावी. मी सुटकेचा निश्वास टाकला. आणि चटकन बाहेर येऊन त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. ‘‘हा तर मरून गेलाय!’’ बोलताबोलता त्याचे डोळे भरून आले. ‘‘मी तुला तो चिकटवून देईन हं !’’ मी त्याची समजूत घातली खरी. पण ते कितपत जमणार आहे याबद्दल मी साशंक होते. मी ताबडतोब तो दुरूस्त करायला लागले. बरीच खटपट केल्यावर तो जराजरा पहिल्यासारखा दिसायला लागला. पण अगदी नाजूक झाला होता आणि पहिल्यासारखा चालणारही नव्हता.

माझी ही धडपड चालू असताना मुलगा राक्षस रोबोशी खेळत होता. आणि अचानक काहीतरी पडून फुटल्याचा आवाज झाला. आम्ही घाबरून एकमेकांकडे पाहिलं. समोरच तो मोडलेला राक्षस रोबो पडला होता तरीही आमचा आमच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. माझा मुलगा गडबडीनं तो दुरूस्त करायचा प्रयत्न करायला लागला. पण त्या खटपटीत त्याचे आणखीनच तुकडे झाले. परिस्थिती हाताबाहेर गेलेली बघून त्यानं सगळे तुकडे एका कागदावर ठेवले. त्याची नीट पुडी केली आणि बाहेर जायच्या तयारीला लागला. ‘‘आता कुठे चाललास?’’ मी धास्तावून विचारलं. ‘‘हे परत देऊन माफी मागायला !’’ त्यानं शांतपणे सांगितलं. ‘‘तो मोटूचा आहे का?’’ मी आशेनं विचारलं, ‘‘नाही, मिनीचा.’’ हे ऐकून माझा जीव गोळा झाला. कारण तिची आई खूप आखडू होती. ‘‘तू… असाच जाणार?’’ मी चाचरत विचारलं. ‘‘मग? बरोबर काही न्यायला पाहिजे का?’’ त्यानं बावरून विचारलं. त्याचे ते निष्पाप डोळे बघून मी बोलताबोलता स्वतःला सावरलं. ‘‘ठीक आहे मम्मा, मी जातो.’’ ‘‘लवकर परत ये रे !’’

तो उगीच वेळ घालवणार नाही याची खात्री होती. त्यामुळे त्याला उशीर व्हायला लागला तसा माझा जीव खालीवर व्हायला लागला. मनात उलटसुलट विचार यायला लागले. सगळे लोक सारखे नसतात. ‘आपण मोटूला क्षमा केली असली तरी तुलाही क्षमा केली जाईलच असं नाही,’ ही शक्यता त्याला न सांगण्यात मी चूक केली असं मला वाटायला लागलं. पण लगेच असंही वाटलं की माझी भीती अनाठायीसुद्धा असेल. त्याच्या मैत्रिणीनं त्याला थांबवून घेतलं असेल. तिच्या आईनं त्याला संत्र खाण्याचा आग्रह केला असेल-अर्थात त्यानं ते घेतलं नसेलच-फार गोड मुलगा आहे माझा ! त्याचा निरागसपणा बघून त्या लोकांनी माफ केलं असेल. सगळ्या बाजूंनी विचार केल्यावर असंच घडेल याची मला खात्री वाटायला लागली. आणि त्याला नकारात्मक बाजू लक्षात न आणून दिल्याबद्दल मी स्वतःला शाबासकी दिली.

मी विचारात इतकी बुडले होते की समोर येऊन उभा राहीपर्यंत मला तो आल्याचं कळलंही नाही. त्याच्या चेहर्यााकडे पाहताक्षणीच मला कळलं की तो किती भयंकर प्रसंगातून गेलाय. तो नक्कीच रडलाही होता. पण मला समजू नये म्हणून त्यानं चेहरा पुसून साफसूफ केला होता. मुलांचा एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न फार बोलका असतो.

जे काही घडलं ते असह्य असणार याची खात्री असल्यामुळे त्याला काही विचारायचं मला धाडसच झालं नाही. ‘‘ते म्हणतायत की आपण त्यांना रोबो भरून दिला पाहिजे.’’ मोठ्या मुश्किलीनं तो म्हणाला. बोलता बोलता त्याच्या गालावरून अश्रू ओघळायला लागले.

आता हा प्रश्न फक्त मोडलेल्या खेळण्याचा नव्हता, भावनांच्या मोडतोडीचाही होता. ‘‘त्यांनी भरपाई मागणं साहजिकच आहे.’’ मी त्याचे डोळे पुसत म्हटलं. ‘‘ठीक आहे. मग मीही आता मोटूला गाठून माझ्या खेळण्याची भरपाई द्यायला सांगतो. तो तर फक्त ‘सॉरी’च म्हणाला होता ना? उद्या मी पैसे न घेताच बाजारात गेलो आणि म्हटलं की, मला अमुक वस्तू द्या हो, पण सॉरी हं, माझ्याकडे पैसे नाहीयेत ! तर चालेल का?’’ असं म्हणून तो जायला लागला.

‘‘काही कुठे जायचं नाही !’’ मी त्याला अडवलं. ‘‘पण का?’’ त्यानं सुटण्याची धडपड करत म्हटलं. त्याची कशी समजूत घालावी ते मला कळेना. जगाच्या व्यवहारी वास्तवाशी त्याची ओळख करून देणं मला भागच होतं. ते कितीही कटू असलं तरी !

‘‘मोटूनं तुझा रोबो मोडला तेव्हा तू त्याला जी क्षमा केलीस ना, त्याचं मोल रुपया-पैशात करता नाही येत ! क्षमा करता येणं हा एक अनमोल गुण आहे. आणि तो तुझ्यात आहे.’’

‘‘पण मम्मा, त्याच चुकीबद्दल मला मात्र क्षमा केली गेली नाही !’’ त्याच्या जिव्हारी लागलेला त्याचा अपमान माझ्या तत्त्वज्ञानापेक्षा खूपच मोठा होता.

‘‘हे बघ बेटा. कोणतीही समस्या सोडवण्याचे वेगवेगळे उपाय असतात. समस्या रोबोसारख्या असतात, आकार बदलणार्या …. समजतंय ना मी काय म्हणत्येय ते?’’ त्यानं निव्वळ माझ्या समाधानासाठी मान हलवली. पण त्याला काहीही पटलेलं नाहीय हे मला कळलं. शेवटी मी हताशपणे त्याला समजावण्याचा प्रयत्न सोडून दिला.

रोबो मोडल्यामुळे झालेलं पैशाचं नुकसान आमच्या दृष्टीनं मोठंच होतं. पण ते भरून काढण्यासाठी घरातली एखादी वस्तू गहाण ठेवून पैसे उभे करावे लागतील इतकी काही वाईट परिस्थिती नव्हती आमची. माझे पती घरी आल्यावर त्यांना कसं सांगावं, सांगावं की नाही यावर मी विचार करत होते. त्यांच्या रागापासून मुलाला वाचवण्यासाठी ही हकिगत लपवून ठेवण्यापेक्षा ताबडतोब त्यांना सांगणंच योग्य ठरेल हे मला कळत होतं.

सगळं काही सविस्तर ऐकून घेईपर्यंत ते शांत होते. थोड्या वेळानं म्हणाले, ‘‘मला एक सांग, ती वस्तू तू मोडलीस कशी?’’

‘‘मी काही नाही केलं बाबा ! नुसतं ते फिरवलं आणि फटाक्कन ते मोडलं…’’ माझा मुलगा चाचरत बोलला. हळूहळू माझ्या पतीचा चेहरा कृद्ध झाला. तेव्हा मुलगा घाबरून माझ्यामागे लपला.

‘‘मूर्ख, नालायक, सैतान लेकाचा… ! याची भरपाई करायला माझा महिन्याचा सगळा पगारसुद्धा पुरणार नाही. थांब तुला असा धडा शिकवतो की तू जन्मभर विसरणार नाहीस.’’ आणि ते हात उगारून त्याला मारायला धावले. त्यांच्यासारख्या कष्टाची कामं करणार्यात माणसाच्या मजबूत हाताचा मार एवढ्याशा मुलाला सहन झाला नसता. कसंही करून त्याला वाचवायलाच हवं होतं. मी घाईघाईनं मधे पडले. वेदनेनं क्षणभर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली.

‘‘थंडीसाठी स्वतःला लोकरी टोपी करायची सोडून तुझ्या आईनं ते पैसे हे फालतू खेळणं घेण्यात वाया घालवले. आणि वर आता ही भरपाई ! तेवढ्या पैशात आपल्याला थंडीपुरते कोळसे आणि कोबी घेता आला असता.’’ त्यांनी पुन्हा मारपीट सुरू करण्यापेक्षा बोलणी खाल्लेली बरी म्हणून मी सगळं चुपचाप ऐकून घेतलं.

असाच कडाक्याच्या थंडीचा दिवस होता. मी घरी येऊन बरीच खटपट करून स्टोव्ह पेटवला. माझा मुलगा माझी वाटच पाहात होता. त्याचा चेहरा लाल झाला होता आणि डोळे चांदण्यांसारखे चमकत होते. ते बघून मला वाटलं त्याला तापबीप आलाय की काय ! पण ‘‘मम्मा, तू डोळे मीट ना!’’ तो नेहमीच्या गोड आवाजात बोलला आणि माझी शंका मिटली. मी डोळे मिटले. मला वाटलं चांगले मार्क्स मिळालेला पेपर, स्वतः बनवलेलं खेळणं असं काहीतरी तो मला देणार. ‘‘हांऽऽ! आता उघड बरं डोळे !’’ मी डोळे उघडून बघितलं तर काय, जणूकाही हिरवंगार कुरणच माझ्या हातावर अवतरलं होतं. ते हिरव्या रंगाच्या लोकरीचे गुंडे होते. ‘‘रंग आवडला ना तुला मम्मा?’’ त्यानं मोठ्या उत्सुकतेनं विचारलं. ‘‘खूपच आवडला. पण तुला कसं कळलं रे, मला हा रंग आवडेल म्हणून?’’ ‘‘मम्मा, अग मी छोटा असल्यापासून तू माझ्यासाठी नेहमी हिरव्याच रंगाची लोकर वापरत आल्येस! विसरलीस की काय?’’ मी हा प्रश्न विचारावा याचं त्याला खूपच आश्चर्य वाटलं. ‘‘डॅडींबरोबर गेला होतास कां?’’ ‘‘नाही नाही, मी एकटा गेलो होतो!’’ त्यानं अभिमानानं सांगितलं. ‘‘अरे मग पैसे कुठून आणलेस?’’ मी आश्चर्यानं विचारलं. तो गप्प राहून नुसताच माझ्या तोंडाकडे बघत होता.

चोरी तर तो करणंच शक्य नाही याची मला खात्री होती. त्यानं रद्दी पेपरची काहीतरी वस्तू बनवून विकली असणार किंवा टूथपेस्टच्या ट्यूब्ज जमवून पैसे मिळवले असणार. पण मला तर तो कधी काळ्या झालेल्या हातांनी उशिरा घरी आलेला दिसला नाही. मी त्याला जवळ घेऊन पुन्हा विचारलं, ‘‘सांग बेटा, कुठून मिळाले पैसे?’’ ‘‘मी मोटूकडे मागितले!’’ त्यानं स्पष्ट स्वरात सांगितलं. ‘‘कोणाकडे मागितलेस?’’ माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ‘‘मोटू!’’ त्यानं माझ्या नजरेला नजर भिडवत सांगितलं. त्याच्या चेहर्यांवरचा तो बेडर भाव माझ्या ओळखीचा नव्हता. एका क्षणात माझा मुलगा मला परका होऊन गेला. ‘‘अरे पण कसे मागितलेस?’’ मी असाहाय्यपणे विचारलं. ‘‘त्या लोकांनी जसे माझ्याकडे मागितले होते तसेच!’’ इतक्या छोट्या गोष्टीचा मी उगीचच बाऊ करत्येय अशा सुरात तो बोलला. माझा उगारलेला हात बघून त्याला वाटलं की मी त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवणार आहे. म्हणून तो जवळ आला. पण मी त्याला जोरात थप्पड मारली. तो जराही न हलता अविश्वासानं माझ्याकडे बघत राहिला. यापूर्वी कधीच मी त्याला मारलं नव्हतं. पण आता माझी खात्री झाली की हे मारणं शेवटचं नाहीय.

त्या दिवसानंतर जेव्हाजेव्हा थंडगार वार्यााचा झोत दाराला धक्का देऊन आत येतो तेव्हातेव्हा मला आशा वाटते की आता एक चिमुकला चेहरा आत डोकावेल. पण मोटू परत कधीही आला नाही. आमच्या रोबोचे पैसे देऊन त्यानं आमची किंमत केली होती.

मी मोठा रोबोही नंतर चिकटवला. आता आमच्याकडे दोन रोबो आहेत. पण ते चालत नाहीत. आणि माझ्या मुलानं त्यांना एकदाही हात लावलेला नाही.

शैक्षिक संदर्भ अंक ५२ मधून साभार.

‘टूटे खिलौने’ ही बी शूमीनची कथा १९९२ मधे प्रथम प्रकाशित झाली. निवृत्त प्राध्यापक इंद्रमणि उपाध्याय यांनी हिंदी अनुवाद केला आहे. ही कथा संवाद प्रकाशनच्या ‘उसका एकांत’ मधून घेतली आहे. जगभरातील स्त्री लेखिकांच्या निवडक कथांचा हा संग्रह आहे. लेखिका बी शूमीन यांची ‘ए रेड कार्पेट फॉर यू’ आणि ‘फ्लाइंग नॉर्थवर्ड’ ही पुस्तके गाजलेली आहेत.