प्रतिसाद

संपादक,
सस्नेह स्मरण,
तुम्हाला पत्र लिहायचंय असं आज मनात घोकत होते तर घरी पोचल्याबरोबर ‘पालकनीती’ हातात पडलं. ‘दिशा’चा लेख फारच छान आहे. तो वाचताना ‘Tuesdays with Morrie’ पुस्तकामधील एका प्रसंगाची आठवण झाली. फुटबॉलची मॅच चालू असते. दोन्ही संघांचे पाठीराखे अगदी जीव खाऊन एकमेकांवर शब्दांनी तुटून पडत असतात. शेवटी एक संघ जिकतो. त्याबरोबर प्रचंड जल्लोष ! दुसर्याा संघाच्या पाठीराख्यांचे चेहेरे पडलेले ! त्या ओरड्यातून एकदम एक आवाज येतो, ‘‘बास आता ! पुरे ! and what is wrong in coming second? ’’ क्षणार्धात सगळीकडे शांतता- माना खाली.
स्पर्धेचं बाळकडू आपणच मुलांना पाजतो. ते कडू असूनही. पण निकोप स्पर्धेचा दृष्टिकोन देत नाही. पहिलं/दुसरं येणं महत्त्वाचं नाही. ‘आपलं आपण जाणणं’ महत्त्वाचं आहे, हे सांगायला विसरतो. जगात वावरायला त्यांनी fit व्हावं म्हणून स्पर्धा शिकवतो. पण स्वतःला ओळखायचं भान तिथेच तोडून टाकतो.