संवादकीय – जुलै २००६
हिरव्यागार वृक्षराजीमधे दडलेली एक खेड्यातली छोटीशी कौलारू शाळा. मधे अंगण नि त्याच्या तीन बाजूंना वर्ग. अंगणात सुंदर सावली देणारं बोरीचं झाड. शाळेच्या भिंतींवर मुलांनी बनवलेलं साहित्य मिरवत आहे. सगळ्या शाळेतच मुलांच्या कलाकृती, चित्रं ठाईठाई मांडलेली. भरपूर पुस्तकांनी भरलेलं, मुलांसाठी सदैव खुलं असलेलं वाचनालय. शाळेत सगळी मिळून ३०-४० मुलं आणि ५ शिक्षक. हे सगळं ठीक आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे गोंगाट, गोंधळ, दंगा… अजिबात नाही. मुलं अतिशय आनंदानं नि स्वेच्छेनं शिकताहेत. ताई जे शिकवताहेत त्यात मुलांना रस वाटतोय. गरज भासेल तेव्हा शैक्षणिक साहित्य, पुस्तकं मुलं कपाटांतून घेताहेत. संदर्भ शोधताहेत, काम झाल्यावर परत व्यवस्थित ठेवताहेत. आपापल्या वाट्याची – शाळा झाडणं, पाणी भरणं अशी कामं उत्साहानं करताहेत.
तुम्हाला वाटेल, मी स्वप्न वगैरे सांगतेय. पण तसं नाही, हे खरं आहे. मी पाहून आले आहे, अनुभवून आले आहे.
ह्या जूनमधे पालकनीतीच्या खेळघराचे आम्ही कार्यकर्ते ही शाळा बघायला गेलो होतो. पाच-सहा दिवस तेथे राहून शिक्षकांशी बोलून परत आलोत, त्याच धुंदीत आहोत. बेंगलोरपासून तीस किलोमीटरवर सिल्वेपुरा इथली ही शाळा, ‘सीता स्कूल’. श्रीमती जेन साही ह्या जन्मानं ब्रिटीश पण आता पूर्णपणे भारतीय बनलेल्या महिलेनं तीस वर्षांपूर्वी ही कन्नड माध्यमाची शाळा सुरू केली. सातवीपर्यंतच्या ह्या शाळेत आजूबाजूच्या ग्रामीण भागातली अतिशय गरीब घरांतली मुलं येतात. परीक्षांना इथं संपूर्ण फाटा आहे. सातवीची परीक्षा मुलं बाहेरनं देतात. तोपर्यंत पाठ्यपुस्तकं फक्त संदर्भासाठी वापरली जातात. जेन आणि त्यांच्या सहकार्यांतनी संपूर्ण पर्यायी पाठ्यक्रम आणि त्याजोगती शैक्षणिक साधनं विकसित केली आहेत.
शाळेची सुरवात होते प्रार्थनेनं. मध्यभागी एका चटईवर मुलं पाना-फुलांची नक्षी तयार करतात. मधे एक समई लावलेली असते. त्या भोवती सगळी मुलं, शिक्षिका गोल करून बसतात. प्रार्थना, ध्यान, इ. नंतर मुलं आपापल्या तासांना जातात. प्रार्थनेचा हा माहौल आणि शब्द सर्वांनाच शांतवतात. शिकण्या-शिकवण्यासाठी लक्ष केंद्रित व्हायला त्यामुळे मदत होते. मुलांच्या पातळ्यांनुसार त्यांचे पाच गट केले आहेत. सगळ्यात लहान मुलांसाठी खेळ, चित्रं, मातीकाम, झोप यासाठी भरपूर वेळ असतो. तीही मोठ्या मुलांसमवेत आठ ते पाच एवढा वेळ शाळेत असतात. मोठ्या मुलांसाठी मात्र अतिशय आखीव कार्यक्रम असतो.
एक उदाहरण सांगते. गणितातल्या मापनाच्या तासाची अंगणात तयारी केली होती. टेबलावर लहान-मोठ्या पट्ट्या, टेप, दोरी इ. साहित्य ठेवले होते. मोजण्यासाठी साडी, दुपट्टा, यासारख्या वस्तू टेबलावर ठेवल्या होत्या. कार्डांवर मुलांनी काय करायचंय ह्याच्या सूचना होत्या. त्याप्रमाणे कुणी अंगणाची परिमिती, टेबलाचे क्षेत्रफळ, झाडाच्या पाराचा परिघ, साडीचं क्षेत्रफळ, वगैरे मोजायचं होतं. पूर्वतयारीनंतर आता शिक्षकांचं काम फारच थोडं उरलं होतं. जर काही अडलं, तर तेवढं मुलं शिक्षकांना येऊन विचारत.
सृजन लिखाणाच्या तासाला, मुलांसमोर एक छोटी काडेपेटी ठेवली होती. त्यात २० वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. मुलांनी त्या ओळखायच्या होत्या. मग त्यांची नावं लिहून त्यांचा वापर करून गोष्ट तयार करायची होती. ती सर्वांसमोर सादर करायची होती.
एक कोनाड्यात टाळ ठेवले होते. तास संपला की आळीपाळीनं मुलं सार्या् शाळाभर धावत टाळ वाजवत घंटा देत होती. मनात विचार आला-कुठल्याही शाळेत किंवा आमच्या खेळघरातही, मुलांच्या हाताला सहज लागतील असे टाळ जर ठेवले तर काय झालं असतं. सारं खेळघर दणाणून गेलं असतं. त्या टाळांसाठी भांडणं, त्यातनं मारामार्याळ नि शेवटी टाळ जप्त करायची वेळ आली असती. मुलं नियम पाळत नाहीत, मोठ्यांनी सांगितलेलं ऐकत नाहीत, मोठ्यांना त्रास होईल असा त्यांचा निषेध व्यक्त करतात, नि मग…. शिक्षकांना, पालकांना-शिक्षेला पर्याय नाही, असं वाटतं… मग त्यावर, मुलांची प्रतिक्रिया अर्थातच रागाची, संतापाची. पुढे एकंदरच भांडण तापत जाणार – हे चक्र सुरू होतं. त्यामुळे याच अंकात म्हटलंय तसं, शिक्षेविरोधी अभियान वगैरे करायची वेळ येते. शिक्षेनं मूल नाऊमेद होतं. राग-संताप-सूड अशा भावना त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा बनून राहतात. शिकण्यातला त्याचा रस कमी होतो. हे सारं आपल्याला माहीत का नाही?
पण तरीही पुन्हा पुन्हा मोठी माणसं त्याच मार्गानं जातानं दिसतात. त्याच्या उलट ह्या जेनताईंजवळ नेमकी काय खुबी आहे हे शोधण्याचा प्रयत्न मी सगळा वेळ तिथं करत होते. स्वतः जेनजवळ असणारा साधेपणा, मऊ सौम्य स्वभाव, मुलांच्यात, शिक्षकांच्यात आपसूक झिरपत असावा.
स्पर्धेची, सतत काहीही करून पुढे जायच्या अपेक्षांची टांगती तलवार मुलांच्या मनांवर नसल्यानंच की काय पण त्यांची स्वयंस्फूर्ती-स्वप्रयत्न आकार घेताना दिसताहेत.
ह्यातून तुम्हाला – आम्हाला काही शिकता आलं तर ‘सीता स्कूल’ चा हा आत्ता अशक्य, अप्राप्य वाटणारा चंद्र तुमच्याआमच्या अंगणातही उतरून येईल.