खिडकी दृष्टिकोन

दि. १९ फेब्रुवारी २००६ रोजी ‘मुस्कान’ ने एक कार्यशाळा आयोजित केली होती. ‘मुस्कान’ हे बाल लैंगिक अत्याचारासंबधी जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणारं, पुण्यातील अभियान आहे. ही कार्यशाळा मुलांसोबत काम करणार्यांंसाठी तसेच समुपदेशक, शिक्षक यांच्याकरिता होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचारांची व्याप्ती आणि मुलांवर होणारे परिणाम लक्षात घेता मुलांशी संवाद कसा साधायचा, मुलांकडून अत्याचाराची माहिती कशी मिळवायची, त्याचे स्वरूप आणि परिणाम कसे जाणून घ्यायचे, या तणावातून मुलांना मुक्त करण्यासाठी कशी आणि काय मदत करता येईल इ. मुद्यांबाबत चर्चा झाली. बेंगलोरमधील ‘निम्हान्स’ (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍन्ड न्युरोसायन्सेस) या संस्थेतील बालमनोविकारतज्ञ डॉ. शेखर शेषाद्री यांना यासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यशाळेबद्दल –

डॉ शेषाद्री यांनी मुलांना लैंगिकता शिक्षण देणे खूप महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्यक्षात लैंगिकता या शब्दालाच खूप विरोध होत असतो. यासंदर्भातली माहिती देण्याबरोबर मुलांमध्ये आत्मविश्वास, धैर्य, आत्मभान निर्माण होईल यासाठीही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यांना ‘जीवन कौशल्यांचं’ शिक्षण देणं आवश्यक आहे असं ते मांडतात. यासाठी खिडकी दृष्टिकोन (window approach) या तंत्राची ओळख त्यांनी करून दिली. हा ‘खिडकी दृष्टिकोन’ नेमका काय आहे, कसा आहे – याची ओळख या लेखाद्वारे करून दिलेली आहे.

जीवन कौशल्य शिक्षण
जीवन कौशल्यांमधे दैनंदिन जीवनात उपयोगी असणार्या सर्वसाधारण पण महत्त्वाच्या कौशल्यांचा समावेश होतो. यात किमान दहा कौशल्यांचा अंतर्भाव हवा.
ही कौशल्ये पुढीलप्रमाणे –

१) निर्णय क्षमता
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही प्रत्येकाला निर्णय घ्यावाच लागतो. अगदी साधी मुलांच्याच बाबतीतली गोष्ट – दोन खेळणी समोर असतील आणि त्यातील एकच निवडायचे असेल तर दोनपैकी कोणते निवडायचे याचा निर्णय. अशा छोट्या गोष्टींपासून ते अगदी नोकरीच्या दोन आकर्षक संधींपैकी एकाची निवड करणे इथपर्यंत. पुढील आयुष्यातही अशी परिस्थिती सतत येतच असते. अशावेळी सारासार विचार करून निर्णय घेणे आणि त्याची जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे असते. म्हणूनच ही क्षमता विकसित करणे आवश्यक ठरते.

२) समस्या निवारण
दैनंदिन जीवनात अनेक छोट्या-मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्या सोडवण्यासाठी त्या त्या वेळी पर्याय सुचणे आणि त्याद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचं.

३) विश्लेषणात्मक विचारक्षमता
अनेक कौशल्यं ही एकमेकाधारित तसेच पूरक असतात. उदा. परिस्थितीचे नेमके विश्लेषण करता आले तर समस्या सोडवायला मदत होते.

४) सृजनात्मक विचारक्षमता
सृजनाबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. सृजनशीलता म्हणजे काहीतरी अद्वितीय घडवणं जे आजतागायत कोणी केलं नसेल, असं चुकीचं परिमाण आपण सृजनशीलतेला उगीचच देत असतो. सृजनशीलता म्हणजे नाविन्याची निर्मिती हे खरं आहे. पण इथली नाविन्याची कल्पना ही सापेक्ष आहे, खरं तर व्यक्तीसापेक्ष आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आजवर केलेल्या विचारापेक्षा नवीन वेगळा विचार, नवीन कलाकृती – या दृष्टिकोनातून तिचं नाविन्य ठरते. आणि म्हणूनच नवनिर्मिती करत राहणं ही सृजनशीलता ठरते. ती एक प्रक्रिया आहे जी सातत्याने घडत राहते. त्या प्रक्रियेतून निष्पन्न झालेली गोष्ट ही त्या प्रक्रियेचा तात्कालिक परिणाम. सृजनक्षमतेच्या दृष्टिकोनातून कमी महत्त्वाचा. नवनिर्मितीसाठी एकाच पद्धतीने विचार करून चालत नाही. तर एखाद्या परिस्थितीचा अनेक मार्गांनी विचार करणं आवश्यक असतं. ही बहुदिश विचारक्षमता – पर्यायाने सृजनात्मक विचारक्षमता. समस्या निवारणासाठी ही बहुदिश विचारक्षमता खूपच उपयोगी ठरते.

५) प्रभावी संवाद
संवादातून अभिप्रेत असलेली गोष्ट साध्य करण्यासाठी तो संवाद प्रभावी असण्याची आवश्यकता आहे. थोडक्यात बोलण्याचा – मुद्दे मांडण्याचा क्रम, कोणत्या मुद्यावर भर देणं अपेक्षित आहे, उच्चारणातील आघात, सौम्यपणा, ठामपणा, सुस्पष्टता, इ. अनेक गोष्टी संवाद प्रभावी होण्यास साहाय्यभूत ठरतात.

६) आंतरव्यक्तिक संबंध
समाजात वावरताना आपल्या सभोवतालच्या व्यक्तींबरोबर आपले नातेसंबंध कसे आहेत यावर आपलं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. आपल्याबद्दल इतरांचं जे मत असतं त्यावर आपलं समाजातलं स्थान अवलंबून असतं. नि त्या स्थानावर अथवा मान्यतेवर आपली स्व-प्रतिमाही ठरत जाते.

७) स्व-जागृती
थोडक्यात स्वतःबद्दलची नेमकी माहिती. स्वतःची बलस्थाने, उणिवा यांची जाण ठेवून त्यांना स्वीकारणे, त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे.

८) सहजाणीव
सहानुभूतिपेक्षा वेगळी. दुसर्याणची परिस्थिती, अवस्था समजावून घेणे, पण त्यात वाहवत जात नाही ना याचं भान ठेवून वागणे.

९) तणावाशी समायोजन
अनेक प्रकारच्या ताण-तणावांनी आजचं जीवन व्यापलेलं आहे. या तणावांशी सामना करत, जुळवून घेणे आणि त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणे.

१०) भावनांशी समायोजन
कोणत्याही परिस्थितीला कलाटणी देण्यास आणि आपल्याला क्लेश देण्यास कारणीभूत असतात त्या भावना. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे, त्यांना योग्य वळण लावणे, योग्य पद्धतीने त्या व्यक्त करणे, योग्यवेळी, योग्य त्या मार्गाने त्यांचा निचरा करणे आवश्यक असते. कारण या सगळ्याचा अंतिमतः संबंध आपल्या मानसिक स्वास्थ्याशी असतो.
ही सारी कौशल्यं आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहेत. अनेक संदर्भांबाबत त्यांचा वापर करावा लागतो.

खिडकी पद्धत
‘खिडकी पद्धत / तंत्र’ म्हणजे एखाद्या विषयाला एकदम हात न घालता त्या विषयाचा संदर्भ आधी पाहणं. मग टप्प्या-टप्प्याने मुख्य विषयापर्यंत येणं. एक उदाहरण पाहू.
‘लैंगिक अत्याचाराला नाही म्हणा’ असं मुलांना सांगायचं आहे. म्हणजे यात लैंगिक अत्याचार म्हणजे काय, ते कोणाबाबत होऊ शकतात, कोणाकडून होऊ शकतात, त्यांची जबाबदारी अत्याचारी व्यक्तीची असते, त्यात तुमचा दोष नसतो, लैंगिक अत्याचार सहन करायला लागणं हा अन्याय आहे, त्याला नाही म्हणणं तुमचा अधिकार आहे, म्हणून कोणत्याही दडपणाला बळी न पडता तुम्ही नाही म्हणा – हे सगळं सांगायचं आहे.

आता हे जर या क्रमाने सांगायला गेलं तर मुलांमध्ये धैर्य निर्माण होईल की आहे ते धैर्य गळाठून बसेल? मुळात आपल्यापेक्षा मोठ्या असणार्या , आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत, ज्यांचा आपल्यावर अधिकार आहे अशा व्यक्तीला ‘नाही’ म्हणणं हे मुलांसाठी सोपं असतं का? तेही तुम्हांला काही आमिष किंवा धाक दाखवला जात असताना? म्हणजे ‘नाही’ म्हणण्याचं ‘धैर्य’ मुलांमध्ये आधी निर्माण करायला हवं आहे.

एखाद्या प्रश्नाबद्दल समज वाढवण्यासाठी त्याची माहिती मुलांपर्यंत पोचवणं हे महत्त्वाचं आहेच. पण लैंगिक अत्याचारासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्याबाबत फक्त जाणीवजागृती करून भागणार नाही. कारण मिळालेल्या माहितीने मुलं सजग होतील पण समजा अशी परिस्थिती उद्भवलीच तर काय करायचं याबद्दल गोंधळ निर्माण होईल. भले आपण ‘नाही म्हणा, प्रतिकार करा’ सांगितलं असेल. पण त्यासाठीचा आत्मविश्वास, धैर्य कुठून आणणार? आणि अत्याचारी व्यक्ती कोणत्याही मार्गाचा वापर करू शकतात. आपल्याला एखादी धमकी पोकळ वाटली तरी त्या मुलासाठी ती जगणं व्यापून टाकणारी असते. त्यामुळे अशा परिस्थितीशी सामना करणं सोपं नसतं. म्हणूनच जाणीव जागृतीबरोबरच हे धैर्य, हा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण करणं महत्त्वाचं ठरतं.

आणि या कामानेच सुरवात केली तर पुढचा विषय मांडणं, तो समजावणं जास्त प्रभावी आणि उपयोगी ठरतं. म्हणून खिडकी तंत्राने हा विषय मांडताना पहिला प्रयत्न किंवा सुरवात ही असावी. हे कशा पद्धतीने करता येईल हे थोडक्यात पाहूया.

सुरक्षेचा विचार घेऊन त्यापासून सुरवात करायची. घरात, शाळेत, रस्त्यावर, बसमध्ये, इ.इ. ठिकाणी आपल्याला कशाकशापासून धोका असतो याची चर्चा करून यादी तयार करायची. या धोक्यांच्या स्वरूपावरून त्यांचे वर्गीकरण करायचे. उदा. कापलं, भाजलं, शारीरिक दुखापती, दुसर्याचकडून असणारा धोका, यंत्रांपासून धोका इ. मग या धोक्यांपासून आपल्याला कसं सावध राहता येईल, त्यासाठी काय काळजी घेता येईल ही माहिती मुलांकडून काढून घ्यायची. त्यातून उपदेश टाळता येईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू शकेल. समजा एखादी दुर्घटना घडलीच तर काय करता येईल याचीही चर्चा घ्यावी. यातून सुरक्षेबाबतची पार्श्वभूमी तयार होईल.

आता पुढची पायरी असेल धैर्य निर्माण करण्याची. धैर्य संकल्पना समजावून देण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरता येतील. उदा. दुर्घटना घडल्यावर काय करायचं हे या चर्चेच्या आधाराने स्पष्ट करणे, किंवा जाहिरात करायला सांगणे. म्हणजे धैर्य म्हणजे काय हे मुलांनीच ठरवायचं. आता त्यांच्या या संकल्पनेची त्यांना विक्री करायची आहे. त्यासाठी म्हणजे त्याचं मार्केटिंग करण्यासाठी जाहिरात करायची. त्यासाठी त्यांचे गट करून सादरीकरण करायला सांगायचं. या सादरीकरणावर चर्चा घ्यायची. धैर्याची संकल्पना आपोआप स्पष्ट होऊन रुजत जाईल.

काळजी घ्यावी लागते, धैर्य दाखवावं लागतं असे प्रसंग कुठे घडतात यावर चर्चा करणं ही पुढची पायरी. खरं तर त्याची यादी आपण सुरवातीलाच केलेली असते. पण तेव्हा आपलं लक्ष प्रसंगांकडे होतं, पार्श्वभूमीकडे नव्हतं. म्हणजे हे प्रसंग कुठे घडू शकतात? तर घरात, रस्त्यावर, शाळेत, बसमध्ये, दुकानात, हॉटेलमध्ये, कुठेही. (अजूनही आपण नेमके लैंगिक अत्याचारांविषयी बोलत नसून मुलांकडून आलेल्या प्रसंगांबद्दल मोघमातच बोलतोय.) तर या पार्श्वभूमीचे वर्गीकरण सामाजिक, आंतरव्यक्तिक, वैयक्तिक अशा तीन भागात होतं. या तिन्ही भागात आपला कुणाशी संबंध येतो हे सांगून त्यावरून या संकल्पना स्पष्ट कराव्यात. हे रोल प्ले तंत्राने करता येईल. त्याची माहिती पुढे आली आहेच. या रोल प्ले वरील चर्चेने त्या त्या प्रसंगी येणारे दडपण आणि घ्यावी लागणारी सावधगिरी याविषयी बोलता येईल.

पुढची खिडकी अधिक नेमकी असेल. सामाजिक, आंतरव्यक्तिक आणि वैयक्तिक या तिन्ही पार्श्वभूमींवर वेगवेगळ्या संस्था कार्यरत असतात. जसे मैत्री, कुटुंब, लग्न इ. यात अनेक प्रकारची गुंतागुंत असते. अपेक्षा असतात, दडपणं असतात, कर्तव्यं असतात, जबाबदार्यात असतात, सुख असतं, दुःख असतं. या सगळ्याचा आपण एक भाग असतो. आणि म्हणून या सर्वांचे परिणाम आपल्यावरही होत असतात. आणि त्यातूनच आपल्या प्रतिक्रिया ठरत असतात. या सर्व परिस्थितीमुळे किंवा परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्यावर अत्याचार होऊ शकतात. उदा. वड्याचं तेल वांग्यावर या न्यायानं वडिलधार्यां्नी मुलांना मारणं. तर याच परिस्थितीचा फायदा घेऊन जवळचे असणारे मोठेच मुलांवर लैंगिक अत्याचार करतात. अजूनही अत्याचार / लैंगिक अत्याचार या शब्दांवर न येता विशिष्ट अनुभवांविषयी बोलता येतं. उदा. मामा / काका खुश होऊन पापी घ्यायला बघतो किंवा मिठी मारतो. पण आपल्याला ते आवडलेलं नसतं. अशा पद्धतीने.

यापुढची खिडकी असू शकते ती विशिष्ट भावनांची नि त्यांच्या अभिव्यक्तीची. एखाद्या व्यक्तीच्या घरातील स्थानामुळे, त्याच्या / तिच्या वागण्या – बोलण्यामुळे, त्याने / तिने आपल्यात रस घेतल्यामुळे, आपल्यासाठी भेटवस्तू आणल्यामुळे किंवा तारुण्यसुलभ भावनांमुळे, थोडक्यात कोणत्याही कारणामुळे आपल्याला त्या व्यक्तीचं आकर्षण असू शकतं. आणि ते आपल्या वागण्यातूनही दिसू शकतं. कधी कधी तर एखाद्याच्या वागण्याची किंवा ती व्यक्ती देत असलेल्या भेटवस्तूची आपल्याला भुरळ पडू शकते. याउलट एखाद्या व्यक्तीची भीती, दहशत असू शकते. अशा व्यक्तीला आपण टाळायला बघतो. पण पुष्कळदा तेही शक्य नसतं.

या भावनांच्या जाळ्यात सापडूनही लैंगिक अत्याचार होऊ शकतात. पण लैंगिक अत्याचार म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी लैंगिकता म्हणजे काय हे समजायला हवं. त्यामुळे वयानुरूप लैंगिकतेविषयी माहिती देऊन त्याबद्दल चर्चा व्हायला हवी. त्यानंतर अत्याचार म्हणजे काय हे समजावून देऊन ते टाळण्यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा करता येईल. जोडीला एच्.आय्.व्ही.बद्दलही माहिती देता येईल.

तर अशा पद्धतीने या खिडकी तंत्राच्या माध्यमातून ‘लैंगिक अत्याचाराला नाही म्हणा’ हे सांगताना एक समग्र चित्र उभं राहील. त्याबरोबरच मुलांचं सक्षमीकरणही होईल.

या खिडकी तंत्राच्या माध्यमातून आपल्याला मुलांना त्यांच्या भवतालाबाबत आणि आयुष्यात सामना कराव्या लागणार्यान परिस्थितींबाबत अधिक सजग, जबाबदार बनवायचं आहे. आपण पाहिलेल्या सर्व कौशल्यांचे संदर्भ यापद्धतीने मुलांपर्यंत पोचवता येतील. अर्थात हे सर्व करताना खूप खेळकर पद्धतीने, मुलांना कुठेही कंटाळवाणं होणार नाही याचा विचार करूनच करावं लागेल. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करता येईल. नमुन्यादाखल या काही पद्धती :
१. रोल प्ले
एखादी घटना, परिस्थिती देऊन मुलांनाच अभिव्यक्त करायला सांगायचं आणि त्यानंतर मुलांच्या सादरीकरणावर चर्चा घ्यायची हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. एकतर असे प्रसंग अभिनित करायला आणि ते पाहायलाही मुलांना खूप मजा येते. दुसरं म्हणजे प्रेक्षक असणार्या मुलांमधील कुतूहल जागृत होतं. नेमकं काय घडणार आहे याची उत्सुकता निर्माण होते. पर्यायाने त्यांचा उत्साह टिकून राहतो. प्रत्यक्ष भूमिकेत शिरण्याचा अनुभव मुलांना खूप शिकवून जातो. कारण नंतर ‘तुम्ही असंच का वागला’ यावर विचार आणि चर्चा होते. आणि एखादी संघर्षमय परिस्थिती कशी हाताळायची याचं अनुभवातून शिक्षण होतं. एखाद्या समस्येकडे बघण्याचे अनेक मार्ग असू शकतात आणि म्हणूनच त्या समस्येलाही एकापेक्षा अनेक उत्तरं असू शकतात, हा सृजनात्मक विचार आपोआपच रुजतो. म्हणूनच हे माध्यम प्रभावी आणि रस निर्माण करणारं आहे.

रोल प्ले ह्या माध्यमातून सामाजिक, आंतरव्यक्तिक आणि वैयक्तिक अभिसरण कसं होतं हे समजून घेण्यासाठी उदाहरण पाहू.
सामाजिक – दोन अपरिचित व्यक्तींना नाशिकला जायचं आहे. त्यातील एका व्यक्तीला तिकिट मिळालं आहे तर दुसरीला नाही. दुसर्यान व्यक्तीला तिकिटाची तातडीने आवश्यकता आहे, म्हणून ती पहिल्याकडे तिकिट देण्याची विनंती करते.
या प्रसंगाच्या सादरीकरणात दुसरी व्यक्ती सातत्याने विनवत राहिली. परंतु तासातासाने बस असतानाही ही व्यक्ती तिकिट का मागते आहे म्हणून पहिली तिच्याकडे संशयाने पाहत राहिली. शेवटी दुसरीने आई अत्यवस्थ असल्याचे सांगूनही पहिल्या व्यक्तीचा संशय फिटला नाही आणि तिने तिकिट देणे नाकारले.

चर्चेदरम्यान असं लक्षात आलं की या घटनेतील संवाद प्रभावी नव्हता. दुसर्याम व्यक्तीची अडचण खरी असूनही तिला ती ठसवता आली नाही. हा मुद्दा सर्वात आधी सांगून मन वळवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला असता. दुसरी गोष्ट म्हणजे आई अत्यवस्थ असल्याची चिंता त्या व्यक्तीच्या चेहर्याकवर दिसून येत नव्हती. थोडक्यात मुद्यांचा नेमका क्रम, देहबोली, उच्चारण तंत्र या गोष्टी प्रभावी संवादासाठी महत्त्वाची भूमिका वठवतात, हे लक्षात आलं.

आंतरव्यक्तिक – मुलीला पार्टीला जायचं आहे पण वडील तिला नकार देतात.
सादरीकरणात मुलीने अनेक प्रयत्न केले. पण वडिलांनी अभ्यास, नुकतीच झालेली सहल इ. कारणं दाखवत नकार दिला.

चर्चेदरम्यान लक्षात आलं की, मुलीचं एक म्हणणं आहे तर वडिलांचं दुसरंच. खरं तर पार्टीच्या निमित्ताने उद्भवणार्याण धोक्यांबद्दल त्यांच्या मनात भीति आहे. मुलीने मद्यपान केले तर? एखाद्या मुलाने तिची छेड काढली तर? किंवा आणखी पुढे जाऊन मुलीने कोणाशी लैंगिक संबंध ठेवले तर? या आणि अशा धोक्यांबद्दल भीती आहे. सादरीकरणातून वडिलांचं हे मत पुढं येत नाही. पण वडिलांना कोणती चिंता आहे, कशाची काळजी आहे हे लक्षात घेण्यासाठी विविध प्रश्न विचारून प्रवृत्त करता येतं. आणि त्या चर्चेदरम्यान सुरक्षेची/लैंगिकतेची/लैंगिक अत्याचारांची अशी एखाद्या कल्पनेची ओळख मुलांना करून देता येते. थोडक्यात, एकदम सुरवात न करता ‘खिडकी तंत्र’ वापरून एखाद्या विषयाकडे जाता येते. इथे संदर्भ असतो दोन व्यक्तींमधील संवादाचा, पार्टीचा. पण त्या माध्यमातून वेगळाच विषय सुरू करता येतो.

वैयक्तिक -मित्र / मैत्रिणीकडून त्याला / तिला पार्टीत मद्यपानाचा आग्रह केला जातो.
मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती मद्य चाखण्यास तयार होते. स्वतःच्या मनातील द्वंद्व, नैतिक मूल्यं, योग्य-अयोग्य इ. गोष्टींवर मैत्रीच्या दबावाचा खूप मोठा परिणाम होतो. पुष्कळदा त्या दबावाला बळी पडून अयोग्य सवयी किंवा अत्याचाराची शिकार होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय मित्रमैत्रिणींकडून चेष्टा केली जाते, बहिष्कार टाकला जातो, हेटाळणी केली जाते. हे टाळण्यासाठी दबावाला बळी पडणं स्वीकारलं जातं.
स्वतः प्रत्यक्ष भूमिकेत शिरणं, नंतर त्यावर चर्चा होणे यामुळे अनेक दृष्टिकोन समोर येतात. आणि या सर्व पार्श्वभूमींवरचं अभिसरण नेटकेपणानं समजतं.

२. यादी तयार करणे
घरात, शाळेत, बसमध्ये, शहरात, रस्ता ओलांडताना थोडक्यात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कशाकशापासून धोका असू शकतो, असं विचारून त्याची यादी करायला सांगायची. त्यात अनेक गोष्टी येतील. त्यांचं वर्गीकरण करायचं. त्याद्वारे सुरक्षेची कल्पना समजावून द्यायची. त्यानंतर अत्याचाराबद्दल बोलायचं. सुरक्षेबाबत स्लोगन्स लिहायला सांगायची. ती सर्वांसमोर मांडायची.

३. जाहिरात
एखादा विषय घेऊन उदा. ‘धैर्य’ सर्वांना सांगायचं की, तुम्हाला धैर्याची म्हणजे धैर्य संकल्पनेची विक्री करायची आहे. तुम्ही कसं कराल? त्यासाठी त्यांचे छोटे गट बनवून सादरीकरण करायला सांगायचं.

४. हो, नाही आणि माहीत नाही
जागेचे तीन भाग करायचे. हो, नाही आणि माहीत नाही. त्यानंतर काही विधानं जी त्यांच्या समजेला पारखू शकतील अशी करायची. त्या विधानाबद्दल त्यांचं जे मत असेल त्या विभागात त्यांनी उभं राहावं. ‘हो’ आणि ‘नाही’ विभागातील मुलांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ दावे करून ‘माहीत नाही’ विभागातील मुलांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक भूमिकेसंदर्भात चर्चा होऊ द्यायची. उदाहरणांद्वारे समजून घेऊ. ‘लहान मुलांनी नेहमी मोठ्यांचे ऐकावे.’ हे विधान समूहापुढे ठेवले. काही लोक ‘हो’ गटात जातील, काही ‘नाही’ गटात, तर काही ‘माहीत नाही’ गटात. आता ‘हो’ गटातील आणि ‘नाही’ गटातील लोक आपापल्या भूमिकांचे समर्थन करत ‘माहीत नाही’ गटातील लोकांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न करतील. ‘हो’, ‘नाही’ गटाच्या भूमिका परस्परविरोधी असल्यामुळे साहजिकच चर्चा घडून येईल. अर्थात इथे नियंत्रकाची भूमिका महत्त्वाची राहील. चर्चेचे स्वरूप सकारात्मक राहील, त्याचं रूपांतर विसंवादात होत नाही हे पाहण्याबरोबरच मूळ मुद्दा निसटत नाही याकडे लक्ष ठेवणेही महत्त्वाचे.

या सगळ्या माध्यमांबाबत एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आपण कुठेही हे चुकीचं आहे / तुझं चुकतंय असं म्हणू नये. तटस्थपणे प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन व्यक्त करायला सांगावं. त्यावर चर्चा होऊ द्यावी. चुकीचा संदेश जाऊ नये हे जसं महत्त्वाचं आहे तसंच मुलांना अपमानित झाल्यासारखं वाटू नये आणि अभिव्यक्तीचा न्यूनगंड निर्माण होऊ नये हेदेखील तितकंच महत्त्वाचं. या माध्यमांचं वैशिष्ट्य असं की, ही प्रक्रिया एकतर्फी न होता सहभागाची होते. त्यामुळे मुलांना कंटाळवाणं न वाटता उत्साह टिकून राहतो. गटातून वावरण्याचा आत्मविश्वास वाढतो. आपण चुकीचं बोललो तरी आपली चेष्टा केली जात नाही उलट आपल्याला नेमका विचार करायला प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो.

अशा अनेक माध्यमांद्वारे या खिडकी तंत्राने ही कौशल्ये आणि त्यांचे अनेक संदर्भ मुलांपर्यंत पोचवता येतील.