वाचिक अभिनय

वाचिक अभिनयाचा आणि आपला काय संबंध असा विचार कदाचित आपल्या मनात येईल. पण मुलांशी संवाद करणार्या कोणालाही असं म्हणून चालणार नाही. ‘बिगरी ते मॅट्रिक’ मधले पु. ल. आठवून बघा. खबरदार… जर टाच मारूनी… जाल पुढे… ही कविता कण्हत, कुंथत, कशीतरी ओढत म्हणणार्यात मास्तरांची त्यांनी केलेली नक्कल आठवते?
शिक्षकानं आपल्या मनातला उत्साह आणि आनंद शिकणार्यांषच्या मनात पेरला नाही, तर त्या शिकण्यात काही रामच नसतो. हा आपलाही अनुभव असेल. बहुधा मुलांचे आवडते शिक्षक हे छान गोष्टी सांगणारे, प्रभावी संवाद साधणारे, सबंध वर्गाला आपल्या विषयात गुंतवून, खिळवून ठेवणारे असेच असतात. त्यामुळे वाचिक अभिनय हा शिक्षकाला आवश्यक आणि उपयोगी आहे हे निश्चित.

वाचिक अभिनय हे डॉ. श्रीराम लागू यांच्या पुस्तकाचं नाव. वाचल्यावर प्रथमदर्शनी मला वाटले की रंगमंचावर काम करणार्या अभिनेत्यांसाठी हे पुस्तक लिहिलेलं असावं. सहज उत्सुकता म्हणून पुस्तक चाळलं. ‘काही प्रश्नोत्तरे’ व ‘आवाजाचे व्यायाम’ यामुळे माझं कुतुहल चाळवलं गेलं. पुस्तक १९९८ मधेच बाजारात आलं आहे, तरी मी नव्यानं वाचल्यावर त्याबद्दल सर्वांना सांगावं असं वाटलं.

जी जी माणसं आपल्या आवाजाचा आपल्या व्यवसायासाठी वापर करतात किंवा ज्यांना सातत्यानं रोज सहा-आठ तास बोलावं लागतं अशा सगळ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. उदा. – गायक, धर्मोपदेशक, राजकीय पुढारी, कथाकथन करणारे, व्याख्याते, प्रवचन करणारे इ. आपल्या आवाजाचा भरपूर वापर करणारा आणखी एक व्यवसाय शिक्षकाचा. मी स्वतःही शिकवते. सरासरी शिक्षकाला बोलणं + ओरडणं (मनात नसलं तरी, केवळ नाईलाजास्तव) अशी दोन्ही कामं करावी लागतात. अशावेळी आवाजावर अवाजवी ताण येतो. तेव्हा शिक्षकांनीही आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यायची नि त्याला आकार कसा द्यायचा हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं मला वाटलं.

हे पुस्तक तयार होण्यामधे अतुल पेठे या प्रसिद्ध दिग्दर्शक-नट आणि संस्था चालकाचा मोठा वाटा आहे.

दीर्घ अनुभव, वाचन-व्यासंग आणि वैद्यकीय ज्ञान त्यांच्या साहाय्याने निर्माण झालेल्या ह्या मार्गदर्शिकेचं महत्त्व सांगताना डॉ. लागूंनी एक वैयक्तिक अनुभव सांगितला आहे.

डॉ. लागू पुण्यात प्रॅक्टीस करत होते. तेव्हा के. नारायण काळे (नाट्य-चित्रपट-साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व) त्यांना भेटले. त्यांनी डॉ. लागूंना बेंगलोर इथं होणार्याज एका नाट्यशिबिरात ‘voice and speech’ या विषयावर सहा व्याख्याने देण्यास फर्माविले. डॉ. लागू म्हणाले, ‘‘माझा त्या विषयाचा काहीच अभ्यास नाही.’’ हे ऐकताच काळे रागावले आणि म्हणाले, ‘‘तुला माहीत नसेल तर तू माहीत करून घे कारण तू नट आहेस. शिवाय नाक-कान घसा यांचा तज्ज्ञ देखील आहेस. हा विषय तुला माहीत असायलाच हवा.’’ पाठोपाठ दुसर्याक दिवशी ताबडतोब चार इंग्लीश पुस्तकेही डॉ. लागूंकडे पोचती झाली. पाच आठवड्यांत डॉ. लागूंनी व्याख्यानांची तयारी केली. बेंगलोरला व्याख्यान देताना शिबीरार्थींकडून काही व्यायाम करून घेतले. व्याख्यानाचा प्रयत्न यशस्वी झाला. पण हे सर्व करीत असताना डॉ. लागूंना एक विचार सारखा डाचत होता, त्रास देत होता. आपण शिबिरात नुसते व्यायाम करा असं सांगितलं पण सांगितलेल्यापैकी एकही व्यायाम आपण स्वतः करीत नाही. ते व्यायाम जाणीवपूर्वक सुरू केले पाहिजेत. मनाचा ठाम निर्धार करून डॉ. लांगूनी सर्व व्यायाम करायला नेमाने व काटेकोरपणे सुरुवात केली. त्या विषयावरची पुस्तकं सातत्यानं वाचली. या सगळ्या साधनेचा त्यांना खूप फायदा झाला.

पुस्तकाच्या पहिल्या भागात श्वा स नियंत्रण, स्वरयंत्राचं म्हणजेच आवाजाचं नियंत्रण याबद्दल मांडणी केली आहे. श्वरसनसंस्थेच्या सोप्या व सुटसुटीत आकृत्यांच्या आधारे सविस्तर मांडले आहे. जोडीला काही व्यायाम सांगितले आहेत.
आपण आपल्या आवाजाचा जो मूळ गुणधर्म (voice quality) असेल त्यात लक्षणीय बदल घडवू शकत नाही पण आपल्या आवाजावरची जी बाह्य-दडपणं आहेत त्यातून आवाजाला नक्की मुक्त करू शकतो. आवाजावरील बाह्य दडपणामुळे ऐकणार्या ला तो आवाज खरखरीत लागतो आणि शब्दोच्चारदेखील अस्पष्ट होतात. त्यामुळे मोकळा आवाज हुकमी काढणं जमलं पाहिजे. त्यासाठी छातीत पुरेशी हवा भरून घेण्याची क्षमता कशी वाढवावी? आवाज मोकळा येण्यासाठी संबंधित स्नायूंना कसं तणावमुक्त करावं? ह्यासाठी काही उपयुक्त व्यायामांचा उल्लेख आहे.

आपल्या मनात आवाजासंबंधी बरेच लहान मोठे प्रश्न असतात. उदा. आवाज फुटतो म्हणजे काय होतं? आपला ध्वनिमुद्रित आवाज आपल्याला वेगळा का वाटतो? तंबाखू व मद्यसेवनाचा आवाजावर नक्की काय परिणाम होतो? ह्या आणि इतर काही प्रश्नांची उत्तरं ‘शंकानिरसन’ ह्या भागात आलेली आहेत.

पुढील भागात अ पासून ज्ञ पर्यंत प्रत्येक स्वर व व्यंजन म्हणताना ओठ, जबडा, जीभ या सर्वांची होणारी हालचाल ह्याची माहिती दिलेली आहे. प्रत्येक अक्षर उच्चारताना कोणत्या संबंधित अवयवाची कोणती हालचाल होते हे लक्षात आलं की ते अक्षर स्पष्ट उच्चारण्यासाठी त्या त्या अवयवाची आवश्यक हालचाल करून उच्चार स्पष्ट होण्याच्या दिशेने प्रयत्न करता येतात.
उदा. – इ – जबडा थोडा वासलेला, ओठ विलग आणि दोन्ही बाजूंना खेचलेले, जीभ थोडी वर उचललेली, र्हकस्व उच्चार. आवाज तोंडातून.
ई – दीर्घ उच्चार. आवाज तोंडातून.
अनुनासिक – स्वरयंत्राच्या कंपनाने निर्माण होणारा आवाज तर घशाच्या पोकळीत चढतो तेव्हा त्याला दोन वाटा असतात. एक तोंडाच्या पोकळीतून आणि एक नाकाच्या पोकळीतून. हा दोन पोकळ्यांना विभागणारा जो पडदा असतो (टाळू) तो हाडांचा म्हणून अचल असतो. पण त्याच्या पाठीमागचा (म्हणजे घशाच्या बाजूचा) जो भाग असतो ते लवचीक स्नायूंचा असतो. त्याच्या शेवटच्या लोंबत्या टोकाला आपण पडजीभ म्हणतो. शब्दोच्चार करताना अनुनासिक उच्चार करायचा असेल तर त्या वेळी स्वरयंत्रातून निघणारा सर्व आवाज केवळ तोंडातून बाहेर न पडता काही भाग नाकातून बाहेर पडतो. म्हणजे पडजीभ नाकाची वाट बंद न करता मध्यंतरी लोंबत राहते.
उदा. – ‘प’ हा उच्चार करताना दोन्ही ओठ मिटलेले व सगळा आवाज तोंडातून बाहेर पडतो. त्या वेळी पडजीभ वर खेचली जाऊन नाकाची वाट बंद करते पण ‘म’ हा उच्चार करताना ओठ तसेच मिटलेले असतात पण निम्मा आवाज नाकातून व निम्मा आवाज तोंडातून बाहेर पडतो म्हणून ‘प’ चा ‘म’ होतो. सर्दी झाल्यावर ‘म’ चा बरेचदा ‘ब’ होतो.
माझी ३॥

शिक्षकाच्या एकूणच कामाकडं इतकं नीरसपणे आणि उपेक्षेनं बघितलं जातं की शिकवण्यामधे आवाज, शब्दफेक, वाचिक अभिनय ह्या गोष्टी खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात हे अनेकांच्या गावीही नसतं. भले हे पुस्तक रंगकर्मीसाठी लिहिले असेना, मला मात्र माझ्या रोजच्या कामात, माझ्या मुलांबरोबरच्या संवादाच्या, काही घडवण्या-बदलवण्याच्या प्रक्रियेत अतिशय उपयुक्त वाटलं. हा वसा आपणही घ्यावात असं वाटलं म्हणून….

काही व्यायाम
जमिनीवर मांडी घालून अथवा खुर्चीवर ताठ बसा किंवा ताठ उभे राहा. सरळ पाठ, सरळ मान, नजर समोर राहील अशी डोक्याची स्थिती. हात बाजूला मोकळे सोडलेले. तोंड किंचित उघडे (हवा बाहेर जाण्याकरता.)
छाती भरून श्वास घ्या आणि ‘आ’ असा दीर्घ आवाज काढा. सगळा श्वास बाहेर जाईपर्यंत, चढउतार न करता, एका सुरात जितका वेळा ‘आऽऽऽ’ म्हणता येईल, तेवढा म्हणा.
असे दहा वेळा करा.

आवाज हळूहळू मोकळा होत जाईल. आवाज खरोखरच मोकळा झाला याची खात्री करण्यासाठी तोंड मिटून आवाज चालू ठेवा. आता ‘आ’ च्या ऐवजी ‘म्ऽऽ’ असा आवाज येत राहील. जर आवाज मोकळा झाला असेल, तर दोन्ही ओठांवर आणि काही वेळाने गालांवर ध्वनिलहरींचा कंप जाणवेल. ओठांना आणि गालांना मुंग्या आल्यासारखा. जसा आवाज लांबेल, तसा कंप वाढत जाईल. जर हा कंप ओठांवर जाणवला नाही, तर त्याचा अर्थ आवाजाच्या फेकीला वाटेत कुठेतरी अडथळा होतो आहे. म्हणजेच आवाज मोकळा येत नाही. जर हा ओठांवरचा कंप प्रत्येक वेळी सातत्याने जाणवला, तर त्याचा अर्थ असा की आवाज अगदी मोकळा झाला आहे.

हा अतिशय महत्त्वाचा व्यायाम आहे. कारण हा मोकळा आवाज अगदी हूकुमी काढणे जमले, म्हणजे स्वरसाधनेतली निम्मी लढाई आपण जिंकलेली असते!
तेव्हा आता शरीराच्या निरनिराळ्या अवस्थांत राहून हा मोकळा आवाज काढत राहा. उभ्याने, बसून, उताणे पडून, कुशीवर पडून, चालताना, अगदी शीर्षासन करूनसुद्धा!
श्वासाची लांबी कमी-जास्त करा. खोल श्वास घेऊन लांबी वाढवण्याच्या प्रयत्न करा. लांबी कमी करून, पण जास्त श्वास वापरून आवाजाची तीव्रता (Volume) वाढवा. (म्हणजे आवाजाची पट्टी न बदलता आवाज मोठ्ठा करा.) हे अनेक वेळा करा.

शरीराच्या कुठल्याही अवस्थेत मोकळा आवाज निघू शकतो, याचा अर्थ असा की, शरीराचे इतर स्नायू आकुंचन-प्रसरण पावत असले, तरी त्यांचा ताण स्वरतंतूंवर (त्यांच्या नाजूक स्नायूंवर) येऊ शकत नाही. त्यामुळे दीर्घकाल आवाज वापरूनही त्याला थकवा येत नाही.

अनेक प्रयत्न करूनही आवाज मोकळा होत नसेल, तर एक युक्ती आहे. पोहोण्याच्या तलावात जाऊन हनुवटीइतक्या खोल पाण्यात उभे राहावे. स्वरयंत्र पाण्याखाली असेल, पण पाणी तोंडात जाणार नाही हे पाहावे. या स्थितीत बोलले अथवा गायले तर पाण्याखाली असणारे सर्व स्नायू तणावरहित झालेले असतात आणि आवाज अगदी मोकळा येतो.

अर्थात एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आवाज वापरला, तर थकवा येणारच. त्या वेळी विश्रांती हा एकच उपाय असतो. दिवसातून तीन-तीन प्रयोग करणे कठीण नाही. मात्र दोन प्रयोगांच्या मध्ये बडबड करीत न राहता आवाजाला विश्रांती देणे आवश्यक आहे. नाटक चालू असताना मधूनमधून कोमटशा (फार गरम वा फार थंड नाही) पेयाचे घुटके घेतले, तर खूप वेळ बोलत राहिल्याने स्वरतंतूंना येणारा कोरडेपणा नाहीसा होऊन त्यांना ओलावा येतो. हा ओलावा कायम राखणे आवश्यक असते; कारण बोलताना (अथवा गाताना) स्वरतंतू कमी-अधिक प्रमाणात एकसारखे हलत असतात. बरेच वेळा एकमेकांशी घर्षणही करत असतात. कोरडे पडलेले स्वरतंतू एकमेकाला घासत राहिले, तर त्यांना इजा झाल्याशिवाय राहत नाही.