बॉर्न इनटू ब्रॉथल्स

ही फिल्म बनवली आहे रॉस काऊफमान आणि झाना ब्रिस्की यांनी. खूप वेगळी फिल्म म्हणून भावणारी. तंत्र-हाताळणी या पातळीवर ती काही वेगळं, चमकदार सांगू बघते म्हणून नव्हे तर मुलांसोबतच्या, वेश्यावस्तीत राहणार्या् नि वेश्यांच्या मुलांच्या सोबत केलेल्या कामाचं, आगळ्यावेगळ्या कामाचं संवेदनशीलतेनं केलेलं चित्रण – दस्तऐवजीकरण म्हणून.
सर्वोत्तम डॉक्युमेंटरी फिचर म्हणून सत्त्याहत्तरावं वार्षिक ऍकॅडमी अवॉर्ड या फिल्मला मिळालं. मुलांमध्ये असणार्याम परिस्थितीशी झगडण्याच्या ताकदीला सलाम करणारी आणि कलेमध्ये असणारी ताकद-जोश दाखवणारी ही फिल्म आहे. यातील अनेक मुलं फिल्म पाहून झाल्यानंतर दीर्घकाळ स्मरणात राहतात.
झाना ब्रिस्की ही न्यूयॉर्कमधली फोटोग्राफर. तिनं सोनागाछीच्या या मुलांच्या हाती कॅमेरा दिला.
प्रत्येकाहाती कॅमेरा दिला आणि जगाकडं वेगळ्या नजरेनं कसं बघायचं हे शिकवलं. त्याची बनली एक फिल्म : बॉर्न इनटू ब्रॉथल्स.

बॉर्न इनटू ब्रॉथल्स ही दीड तासांची चित्रफीत पाहताना आणि पाहून झाल्यावरही बराच काळ लक्षात राहतात ते देहविक्रयाच्या बाजारात राहावं लागणार्याी मुलांचे निष्पाप डोळे आणि त्यांच्या सभोवताली चाललेला माणसांचा कोलाहल. तिथं येणारी माणसं रात्रंदिवस इतकी गैरकृत्यं करीत असतात की तरीही या मुलांचे डोळे इतके नितळ कसे असा प्रश्न पडावा. भय वाटून राहातं की हे सगळं बघता बघता मुलांच्या मनातल्या माणुसकीवरच्या विश्वासाच्या ठिकर्या् ठिकर्याच तर उडणार नाहीत? वानगी दाखल या चित्रफितीत दाखवलेल्या अविजित या दहा वर्षांच्या मुलाचे उद्गार वाचूया. अविजित म्हणतो, ‘‘इथं माणसं अगदी सकाळपासून दारू प्यायला सुरुवात करतात. दारू प्यायल्यावर ते इथल्या मुलींकडे जातात आणि वाईट गोष्टी करतात. पण त्याहून वाईट म्हणजे ते कधी कधी पैसेच देत नाहीत. मग मलाच त्यांच्यापाठी पैशांसाठी धावावं लागतं.’’

अविजितच्या या उद्गारांत ब्रॉथल (कुंटणखाना) च्या भयानक व्यवहाराचं सार आहे. तरीही अविजित काय, कोची काय किंवा पूजा काय या सर्वांच्या डोळ्यात डोकावून बघताना जाणवते ती भविष्याविषयीची आशा आणि उत्सुकता. या मुलांमध्ये आढळणारा हा अदम्य आशावादच जगाला तारून नेतोय की काय असं वाटावं इतकं हे चित्र विलक्षण आहे.

झाना ब्रिस्की ही तरुणी या मुलांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली सर्वांची झाना आंटी आहे. कोलकत्यातील सोनागाछी (सोना म्हणजे मुलगी किंवा स्त्री या अर्थी आणि गाछी म्हणजे गल्ली या अर्थी हा शब्द वापरला जातो.) या वेश्या व्यवसायाच्या परिसरातील मुलांसोबत राहाताना, त्यांना फोटोग्राफी शिकवताना, त्यांच्यासाठी चांगल्या शाळा शोधताना आणि हो, त्यासाठी लागणार्या रेशन कार्डासाठी उरस्फोड करताना झानाला जे काही दिसलं, भावलं ते तिनं आपल्या कॅमेर्या नं टिपलं आहे. मुलांच्या या आविष्काराचं चित्रण म्हणजे ‘बॉर्न इनटू ब्रॉथल्स’.

यातली कोची आणि पूजा खूप धीटपणे प्रेक्षकाला सारं काही सांगू बघतात. कोचीला तर तत्त्वज्ञान सुचतं बोलता बोलता. आता हेच बघा ना, सकाळपासून रात्रीपर्यंत आलेल्या गिर्हााईकांची भांडी घासण्याचं, त्यांना मध्यरात्रीपर्यंत जेवण करून वाढण्याचं काम करणारी कोची आयुष्याबद्दल म्हणते, ‘‘आयुष्य नेहमीच दुःखी असतं आणि आपल्याला ते तसंच जगावं लागतं.’’ पण याच कोचीला वस्तीतल्या बायका ‘तू धंद्याला कधी लागणार? फार दिवस नाही लागायचे त्याला’ असा इशारा देतात तेव्हा मात्र त्या दहा अकरा वर्षांच्या मुलीचं हृदय भीतीनं भरून जातं आणि आपलं पुढे काय होणार हे कळत नसल्यानं ती मुलगी असहाय दिसते.

जी गोष्ट कोचीची तीच थोड्याफार फरकानं पूजाची आणि सुचित्राची. सुचित्राची आई कधीच मरण पावली आहे आणि मावशीला सुचित्राला धंद्याला लावून पैसे कमावण्याची घाई झाली आहे. शांती आणि माणिक ही बहीण भाऊसुद्धा त्याच भीतीच्या दडपणाखाली आहेत. शांती म्हणते, ‘‘माझ्या वडिलांनी मला विकायचा प्रयत्न केला होता. पण माझ्या बहिणीनं मला वाचवलं. पण मला या बायकांसारखंच करावं लागेल याची भीती वाटते.’’
पूजाविषयी बोलताना माणिक म्हणतो, ‘‘पूजाला लवकरात लवकर इथनं हलवायला हवं. मीच हे करावं असं मला सारखं वाटतं. कारण पूजा इथंच राहिली ना तर ती ड्रग्ज घेईल आणि लोकांचे पैसे चोरेल.’’

ही सगळी मुलं दहा ते चौदा या वयोगटातील आहेत आणि आपापल्या किंवा आपल्या सोबत्याच्या आयुष्याविषयी हे असं बोलताहेत, हा असा विचार करताहेत हे ध्यानात आल्यावर मन सुन्न होत जातं. पण मनाच्या या सुन्न अवस्थेत असताना हीच मुलं कॅमेरे घेऊन प्रेक्षकांसमोर येतात व सारं चित्रच पालटून जातं. अर्थात फोटोग्राफी या माध्यमाचा उपयोग करून मुलांना त्यांच्या भयानक आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार्याम झाना आंटीचं श्रेय केवढं मोठं आहे! मुलांना ही आंटी फार प्रिय आहे. ती खूप हुशार आहे असं तर त्यांचं मत आहेच पण ती फार छान शिकवते असंही त्यांना वाटतं. पूजा म्हणते, ‘‘झाना आंटीनं शिकवलं आणि कळलं नाही असं कधीच होत नाही.’’

कॅमेर्या नं समाजाची चित्रं टिपताना मुलांचे परस्परांहून भिन्न दृष्टिकोन प्रत्ययाला येतात आणि प्रत्येक मूल किती एकमेवाद्वितीय असतं याचा प्रत्यय येतो. त्यात अविजित या मुलाला फोटोग्राफीची कळच सापडली आहे. तोच त्याचा छंद आणि तेच त्याचं इप्सित असं काहीसं चित्रफीत बघताना वाटत राहिलं. अविजित याविषयी बोलताना म्हणतो, ‘‘मला माझ्या विचारांना रंगात बुडवावेसे वाटते.’’ पण त्याहीपुढे जाऊन तो म्हणतो, ‘‘शहरातले लोक कसे जगतात आणि गावातले लोक कसे जगतात हे दाखवायला मी फोटो काढतो. गावातले लोक मातीच्या घरात राहतात पण ते शहरातल्या लोकांपेक्षा खूप छान राहतात.’’ अविजितच्या मते शहरांतल्या लोकांचं जिणं अगदी बेक्कार असतं.

पण हाच अविजित एखाद्या क्षणाला अगदी खिन्न होतो. तो दोन वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याच्या आईशी लग्न केलं असं तो म्हणतो. या व्यवसायात असलेली त्याची आई गेली आणि वडील हशीशच्या पूर्ण कह्यात गेले. आईच्या आठवणींनी हे दहा वर्षांचं मूल बेचैन होतं. ना तो शाळेत जाऊ शकत की अभ्यास करू शकत. आईच्या आठवणी जागवताना रुद्ध कंठानं अविजित म्हणतो, ‘‘माझी आई म्हणायची, मी तुला पुढच्या शिक्षणासाठी लंडनला पाठवीन. पण आता तर आमच्यापाशी खायलाही पैसे नाहीत. तर मग शाळा कुठून करायची? मला तर वाटतं, आम्हाला काही भविष्यच नाही.’’

या मुलांनी इतके सुंदर फोटो काढले की त्या फोटोंची अनेक प्रदर्शनं भरली. त्यातून पुष्कळ पैसा उभा राहिला. झाना आंटीला मुलांच्या भविष्याची तरतूद करता आली. पण म्हणून मुलांचे प्रश्न सुटले का? याचं उत्तर मुलांनीच दिलंय. या व्यवसायात असलेल्या एका षोडषीला विचारलं गेलं की देहविक्रयाच्या या प्रश्नाला काही उत्तर आहे असं वाटतं का? या प्रश्नावर त्या मुलीची मुद्रा इतकी काही विचारमग्न झाली ना! अखेर मिनिटभर थांबून दीर्घ सुस्कारा सोडून ती मुलगी अतिशय खिन्नपणे पण ठामपणे म्हणाली, ‘‘नाही!’’

आता काही मुलांच्या सोनागाछीत आयुष्य घालविण्याविषयीच्या प्रतिक्रिया वाचा-
‘सोनागाछीत राहून संतासारखं वागायचं?’
‘आई खूप घाणेरडं बोलते पण ती माझी आईच आहे.’
‘इथं राहून हे सगळं बघायला लागतं हे वाईट आहे पण आपण हे बघायला पाहिजे कारण हे सगळं खरं आहे.’
मुलांचं हे कठोर वास्तव बदलण्याचा अत्यंत प्रामाणिक व प्रेमळ प्रयत्न झाना आंटीनं केला. (मुलांची ही आंटी खरं म्हणजे अगदी तरुण आणि सुंदर मुलगी आहे.) तिनं मुलांना एका चांगल्या शाळेत दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्याचं फलित काय झालं हे चित्रफितीच्या शेवटी दाखवलं आहे, ते या प्रमाणे –
– माणिकच्या वडिलांनी माणिकला शाळेत जाऊ दिलं नाही.
– पूजाच्या आईनं पूजाला लवकरच शाळेतून काढलं.
– शांतीनं स्वतःहून शाळा सोडली.
– गौर आता युनिर्व्हसिटीत जाण्याची स्वप्नं बघतो आहे.
– सुचित्राच्या मावशीनं तिला या व्यवसायाबाहेर जाऊच दिलं नाही.
– कोची मात्र सबेरात (शाळेचं नाव) राहिली. ती खूप खूष आहे.

‘बॉर्न इन टू ब्रॉथल्स’ ही समाजानं अक्षरशः वाळीत टाकलेल्या मुलांची कहाणी आहे. एक कोणी झाना आंटी येते आणि त्यांच्या हातात एकेक कॅमेरा देते. कॅमेरामधून हे जग बघताना मुलांना ते वेगळंच दिसतं. मुलं हरखून जातात. एका नवीन, सुंदर जगाची स्वप्नं बघू लागतात. त्यांची ती स्वप्न पुरी होतात, न होतात.
पण मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की या मुलांना जाणीव होते की आम्हांलाही

स्वप्नं बघण्याचा अधिकार आहे. पण हे एवढं होऊनच ही गोष्ट थांबत नाही. ही मुलं आपल्या फोटोंच्या माध्यमातून तीच जाणीव जगाला करून देतात.