प्रतिसाद

‘माझा प्रश्न’ हे माधव केळकरांचं टिपण पालकनीतीत वाचल्याचं आठवत असेल. प्राथमिक शाळेतला मुलगा, त्याचं चित्र शाळेच्या मासिकात छापलं असं म्हणत घरी येतो. सगळे त्याचं कौतुक करतात. पण नंतर वडिलांच्या लक्षात येतं की चित्र दुसर्यााच मुलाचं आहे. चिरंजीवांनी खालचं नाव बेमालूम बदलून स्वतःचं नाव घातलंय. वडिलांच्या मनात एका बाजूला मुलाच्या खोटं बोलण्या-वागण्याबद्दल काळजी तर आहेच पण यावर चर्चा करून मुलाचा व त्याच्या आईचा आनंद हिरावून घेऊ नये असंही वाटतंय. त्यावरील काही वाचक प्रतिक्रिया –

‘‘माधव, आपण ही छोटीशी दुर्घटना समजून दुर्लक्ष न करता त्याला शासन केलं पाहिजे. शिक्षेचे स्वरूप त्याच्या वयोमानानुसार ठरवावं. त्याचा आनंद न हिरावण्याच्या नादात त्याच्यातील अप्रामाणिकपणा वाढल्याचं दुःख आपल्या वाट्याला येण्याचा धोका आपण नजर अंदाज करू नये असं मला वाटतं.
मुलं खोटं बोलतात त्याला आम्हीही कारणीभूत असतो. पालक जेव्हा पेशंट म्हणून बालकाला घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा घरातून इंजेक्शन न देण्याचा बालकाशी करार करून गोड बोलून दवाखान्यात घेऊन येतात. त्याच्या इच्छेविरूद्ध इंजेक्शन देतात व फसवतात. बाजारातून भाजी घेऊन येतो अशी लोणकढी थाप मारून परगावी जातात. आई बाप खोटं बोलतात मग मी बोललं तर काय बिघडलं, असा न कळत संस्कार त्यांच्यावर आम्ही करीत असतो.’’

डॉ. वि. स. महाजन, कोठारा
‘‘पालकांसमोर असे प्रश्न अनेकदा येतात. विशेषतः संवेदनक्षमतेनं मुलांच्या मनाचा विचार करणार्यान पालकांना वळण, शिक्षा, मूल्य वगैरे गोष्टींसंदर्भात मुलाशी कणखर कसं बनायचं असं वाटणं साहजिक आहे.
या उदाहरणात मला सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो वयाचा. कुठल्या वयात मुलाला कुठली समज येणं अपेक्षित आहे याचं तारतम्य पालकानं जरूर ठेवायला हवं. अगदी लहान वयातल्या (५ वर्षांपर्यंत) बालिश लबाड्या, खोटं बोलणं मुलं पुढे विसरूनही जातात. तेव्हा त्यावर चर्चा, शिक्षा वगैरे करण्यात अर्थच नाही.

पण इथे मूल थोडं मोठं आहे, सात-आठ वर्षांच्या टप्प्यावर समजून – उमजून केलेली ही कृती आहे त्यामुळे सोडून देणे योग्य नव्हेच.

मुलाची चूक गुन्हा म्हणावी एवढी गंभीर नाही, तसंच त्यातून दुसर्याच कुणाचं नुकसान झालेलं नाही. पण छोटीशी का होईना ही लबाडी आहे, हेही खरंच. आज ही लबाडी खपवून घेतली तर मूल उद्या आणखी मोठी लबाडी करायला धजावेल ही भीतीही आहेच.

मुलाच्या वर्तनाबद्दल शिक्षा करणं हा एक मार्ग वाटू शकतो. पण त्यातून काय साधणार? एक बालिश, निर्व्याज आनंद मिळवायचा प्रयत्न फसला म्हणून मुलाला दुःख तर होणारच, तसंच ज्यानं हा आनंद हिरावून घेतला त्याच्याबद्दल राग येणार, अढी बसणार. पुन्हा लबाडी करताना कदाचित शिक्षेची दहशत हात थांबवेलही पण ‘मोह’ बलवान ठरला तर लबाडी सफाईनं पचवण्याचा विचारही होईल. मुख्य म्हणजे बाबांच्या आणि मुलाच्या नात्यात अंतराय येईल, संवाद थांबेल.
मुलाशी, मुलाच्या आईशी बोलणं, समजावून सांगणं त्याची चूक त्याच्या लक्षात आणून देणं, पुन्हा न करण्याबद्दल बजावणं, लक्ष ठेवणं हाही एक मार्ग आहेच. पालक बर्याूचदा हा मध्यम मार्ग अवलंबतात आणि कर्तव्य पार पाडल्याच्या समाधानात आपापल्या कामाला लागतात.

पण मला वाटतं, उपाय एवढा सोपा नाही आणि म्हणूनच केळकरांनाही प्रश्न पडलाय. त्यांचं आणि मुलाचं नातं छान आहे. त्यांना मुलाचा आनंद समजतोय. आपलं कौतुक व्हावं, आपल्या आई-बाबांना आपला अभिमान वाटावा ही मुलाची इच्छा बाप समजू शकतोय. मला वाटतं अगदी याक्षणी आनंदाचा हिरमोड करून चर्चा करण्याची गरज नाही. ही गोष्ट सोडून मात्र देऊ नये. काही दिवसांनी, भोवतालचं तसंच एखादं उदाहरण त्याच्या समोर आलं किंवा आणलं तर त्या निमित्तानं बोलता येईल. नव्या प्रसंगात असं करणं योग्य की अयोग्य हे त्यालाच विचारता येईल. नि त्यातून परत मागल्या घटनेकडे जाता येईल. (उदा. काकांनी भेट म्हणून तुला पाठवलेली वस्तू, मीच तुझ्यासाठी मुद्दाम आणलीये असं सांगितलं तर तुला काय वाटेल?)

दुसर्‍यात बाजूनं आपल्याला छान चित्र काढता यावं असं जर मुलाला वाटत असेल तर त्या संदर्भात काही संधी, मदत उपलब्ध करून देता येईल. काही चित्रांची प्रदर्शनं अथवा चित्र दाखवून चांगलं चित्र कशाला म्हणायचं? परीक्षकांनी ठरवलं तेवढंच चित्र चांगलं असतं असं नाही. मनापासून काढलेलं, काहीतरी म्हणणारं चित्रही चांगलंच असतं, हे बोलता येईल.
बर्यासचदा थेट उपदेश करून कंटाळ्याखेरीज काहीच साधत नाही. त्यापेक्षा उदाहरणातून, प्रत्यक्ष अनुभवातून समजलेलं जास्त परिणामकारक ठरतं.

पण त्यासाठी थांबण्याची, त्याच्या आयुष्यात तसा क्षण येण्याची वाट पाहायची पालकांची तयारी नसते. आपल्या कामात, भावविश्वात मोठी माणसं इतकी मश्गुल असतात की त्यांना चूक दिसली रे दिसली की उपदेश वगैरे करून कर्तव्य पार पाडायची घाई असते. पण अशानं संवाद कसा बहरणार?’’