प्रकाशाची बेटं

तीन वर्षांपूर्वीचा कृष्णाष्टमीचा दिवस मला आजही चांगला आठवतोय. श्री. अनिल काळे यांच्या घरी आमच्या एका शिक्षिकेला अनिल काळे परिवाराचा ‘प्रभुराम स्मरण’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते देण्याचा कार्यक्रम होता. उत्साही आणि प्रसन्न वातावरण होतं. पुरस्कार प्रदानानंतर ‘मानव-धनसंपत्ती’ या विषयावर

डॉ. स्नेहलता देशमुख यांच खूप छान भाषण झालं. अशी छोटी छोटी प्रकाशाची बेटं मनाला खूप दिलासा देतात.

कार्यक्रम मनाला इतका भावला की त्याबद्दल मुद्दाम एक दिवस ठरवून अनिलदादांशी बोलले. १९८३ पासून सुरूवात केलेल्या या कार्यक्रमाचं सुरूवातीचं स्वरूप आणि कारण अगदीच वेगळं होतं. त्या वेळी अनिलदादांचा मुलगा नवीन पाचसहा वर्षांचा असेल. अनिलदादांच्या असं लक्षात आलं की दूरदर्शनवरचे मोठ्या-मान्यवर व्यक्तींबद्दलचे कार्यक्रम छोटा नवीन समजून, आवडीनं बघतो. त्यावरून त्यांना अशी कल्पना सुचली की अशा माणसांना आपल्याकडे बोलावून, मित्रमंडळींनाही बोलावून गप्पागोष्टी केल्या तर? मूल वाढताना त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्या जोपासणारे पालक असाही विचार करून तो कृतीत आणू शकतात हे ऐकताना मला विलक्षण आनंद झाला.
मित्रमंडळींना इतर कोठे जायची घाई नसावी, या निमित्ताने ती आपल्या घरी यावीत, हा हेतू मनात ठेवून ‘कृष्णजन्म’ साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला. त्या माणसाचा व्यासंगविषय किंवा श्रोत्यांना आवडेल असा विषय असावा असे ठरवले. १९८३ च्या कृष्णाष्टमीच्या दिवशी आमंत्रित केलेले पहिले पाहुणे होते श्रीकृष्ण वैद्य. (योगायोगानं त्यांचं नावही श्रीकृष्ण) बोटीवर खलाशी म्हणून काम केलेल्या वैद्यांनी पाचही खंडांची सफर केली होती. आणि सफर करताना आकाशातील ग्रह तार्यांडबद्दलही जाणून घेतलं होतं.

यानंतर दरवर्षी कृष्णाष्टमीला अनेक मान्यवरांनी अनिलदादांच्या घरी हजेरी लावली आहे. ‘पुढच्या वर्षी कोणाला बोलवायचे?’ यासाठी त्यांचं व्यासंगी, उत्साही मित्रमंडळ नाव सुचवायचं काम करतं. आतापर्यंत येऊन गेलेले मान्यवर-रवीन्द्र पिंगे, प्रभुराम जोशी, शांताराम नांदगावकर, विश्वास मेहेंदळे, श्री.भि.वेलणकर, राम जोशी, शंकर वैद्य, मृदुला जोशी, विद्याधर गोखले, अभिराम भडकमकर, दिनकर गांगल, वामन देशपांडे, दा.कृ. सोमण, नियती चितलिया, राजू परुळेकर इत्यादी. या नावांवरून लक्षात येतं की साहित्य, नाट्य, ज्योतिष इत्यादी अनेक विषयातील मान्यवर मंडळींनी अनिलदादांच्या घरी मैफल सजवली आहे. मोठ्या, मान्यवर माणसांना जवळून पाहणं, ऐकणं हा खूप छान अनुभव असतो.
एका ठिकाणी प्रा. प्रभुराम जोशी यांच्याशी अनिलदादांची ओळख झाली आणि १९८५ साली ते अनिलदादांच्या घरी आले. त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती झाले. १९८५ ते १९९२ या काळात म्हणजे अखेरपर्यंत ते त्यांच्या घरातील ‘रोल मॉडेल’ होते. ते देव मानत नव्हते पण त्यांच्या बोलण्यातून त्यांनी हे कधीही बोलून दाखवले नाही. शालांत परीक्षेत ते पहिले आले होते ही गोष्ट ते गेल्यानंतर कळली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांना जेव्हा
अनिलदादांनी बोलावलं त्यावेळी प्रभुराम जोशी यांनी आपल्या भावाला, ‘‘अरे, अशी संधी सोडू नको’ असं सांगून ‘मानवी संबंध’ या विषयावर अप्रतिम भाषण ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळवून दिली.

वाचन प्रेम


इंडियन एअरलाईन्समध्ये सेवेत असलेल्या अनिलदादांना वाचनाचा छंद आहे. गेली तीस वर्ष त्यांच्या कार्यालयात वाचनप्रेमी मंडळी मासिक वर्गणी काढून पुस्तके खरेदी करून वाचनालय चालवतात. अशा चांगल्या गोष्टीत इतकं सातत्य राखणं ही खूपच चांगली बाब आहे. अनिलदादांची किमान चाळीस पुस्तकं एका वर्षात वाचून होतात आणि आवडलेल्या पुस्तकाबद्दल मित्रांना सांगून ती वाचण्याबद्दल शिफारसही केली जाते याचा मलाही अनेकवेळा सुखद अनुभव आला आहे. या छंदाबद्दल अनिलदादांनी सांगितलं, ‘‘वाचनाची आवड १९६९ पासून लागली. अनेक परिचित माणसं चांगलं वागतात, चांगलं बोलतात, चांगला विचार करतात हे त्यांच्या वाचनाच्या संस्कारातून होत असावं असं वाटलं म्हणून जास्तीत जास्त चांगलं वाचन करणं ही गोष्ट मनावर अगदी ठसून गेली. त्याचा खूप फायदा झाला. कितीही मोठी व्यक्ती समोर आली तरी न्यूनगंड वाटला नाही. त्यांच्याशी कसे वागावे, बोलावे हे कळू लागले. इंडियन एअरलाइन्समध्ये असा गट तयार झाला. आजही ते वाचनालय छान चालू आहे.’’

प्रभुराम स्मरण पुरस्कार


अनिलदादांनी सांगितलं की चांगल्या गोष्टींना दाद देणे हे त्यांना प्रभुराम जोशी यांनी शिकवलं. त्यामुळे ते गेल्यानंतर त्यांच्या स्मृति प्रीत्यर्थ काही करावे असे सतत वाटत होते. ती संधी मनमाड एस.टी.डेपोचे ड्रायव्हर श्री. शेख यांनी दिली. आणि ‘प्रभुराम स्मरण’ पुरस्कार सुरू झाला. वेगळ्या वागण्याची, कामाची दाद आपण द्यावी असं त्यांनी ठरवले. इथे सर्वसामान्य माणूसही किती वेगळं, छान काम करीत असतो. पण आपण मराठी माणसं दाद द्यायला कंजुषी करतो.

सुधीर गाडगीळ यांच्या एका लेखातला हा किस्सा. पुण्यातल्या एका रिक्षा स्टँन्डच्या ठिकाणी एका झाडाखाली रिक्षा लावून ठेवण्याबद्दल भांडणं होत असत. एका रिक्षावाल्याने मनात काही ठरविलं आणि त्या वर्षी त्यानं त्या रस्त्यावर ओळीनं काही झाडं लावली. पावसाळ्यानंतर रिक्षातून पाण्याचे कॅन, बाटल्या आणून ती झाडं जगवली, वाढवली आणि भांडणाचा मुद्दाच निकाली काढला.
तसंच प्रवीण दवणे यांच्या लेखातला हा माणूस. शेवटची मुंबईला जाणारी लोकल गाडी, ती गाठण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत धावणारे, घामाधूूम होणारे प्रवासी आणि त्यांना पिण्याचं थंडगार पाणी पुरवणारा एक अनामिक माणूस. हा माणूस अंबरनाथला पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या एका मोठ्या पिशवीत घालून चढतो. लोकांना त्या देतो. माणसं आपली तहान भागवतात. ‘रिकाम्या बाटल्या परत करा’ इतकंच तो सांगतो. रात्री एवढ्या उशीरा लोकांसाठी पाणी पुरवणारा हा माणूस खरंच अफलातून, त्या रिक्षावाल्यासारखा!

१९९९ ला ‘महाराष्ट्र टाइम्स’ मधल्या एका बातमीनं अनिलदादांचं लक्ष वेधलं. मनमाड डेपोच्या शेख नावाच्या ड्रायव्हरबद्दल ही बातमी होती. मनमाड ते पुणे, पुणे ते मनमाड अशा फेर्याा करणार्याह शेखनी आपली गाडी छान व्यवस्थित असावी, जाणं येणं वेळेवर असावं, यासाठी स्वत:च्या पगारातून बसला रंग देणे, बैठकांची दुरुस्ती, खिडक्यांची, दरवाजांची दुरुस्ती अशा गोष्टी केल्या आणि बसच्या वेळेबाबतही काटेकोरपणा ठेवला. त्यामुळे प्रवासी वाढले. आणि हे सर्व पाहणार्यान इतर कर्मचार्यांडवरही त्याचा चांगला परिणाम झाला. हळूहळू मनमाड डेपोचे वातावरण चांगले झाले. अनिलदादांनी शेखच्या जागी स्वत:ला ठेवून पाह्यलं. आणि या माणसाच्या कामाला दाद द्यायलाच हवी असं ठरवलं. त्या वर्षापासून (२०००) प्रभुराम स्मरण पुरस्कार द्यायला सुरूवात केली. मनमाडचे संत सहित्याचे अभ्यासक प्रा. यशवंत पाठक हे एका कार्यक्रमासाठी मुंबईला आले असता त्यांची भेट घेऊन त्यांच्याच हस्ते मनमाड डेपोला हा पुरस्कार देण्यात आला.

२००१ साली इंडियन एअरलाईन्समधल्या वेगळा विचार करून कृतीत आणणार्या युनियन लीडरला ‘प्रभुराम जोशी स्मरण’ पुरस्कार देण्यात आला. काही महिने सतत गैरहजर असणार्या पंचेचाळीस तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनसाठी अभिनव प्रयोग करून त्यांना सर्वांना कामावर हजर करण्याची किमया या लीडरने केली. श्याम पाठक यांनी या कर्मचार्यां चं समुपदेशन केलं आणि सगळेच्या सगळे कर्मचारी कामावर येऊ लागले. पंचेचाळीस जणांचे संसार मार्गी लावणं हे किती मोठं काम आहे!

२००२ साली चित्रलेखातील चौकटीतील बातमीवरून स्वत:च्या खर्चाने सतरा किमीचा रस्ता तयार करणार्याब नगर जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षक असलेल्या भापकर गुरुजींना ‘प्रभुराम स्मरण’ पुरस्कार देण्यात आला. १९५७ ते २००० या त्रेचाळीस वर्षात सतरा किमीचा रस्ता स्वत:च्या पगारातील निम्मी रक्कम खर्ची (सुरुवातीला पगार साठ रुपये होता) घालून गावकर्यांेच्या सहकार्याने पूर्ण केला. या रस्त्याला शासनाने अजूनही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे एस्.टी. बस जात नाही. भापकर गुरुजींना भेटण्यासाठी आणि त्यांनी तयार केलेला रस्ता पाहण्यासाठी अनिलदादा आणि त्यांचे मित्र देव बोन्द्रे गेले होते. ‘प्रचंड उत्साही माणूस’ असं भापकर गुरुजींबद्दल अनिलदादा म्हणाले. श्रावणाच्या रिमझिम पावसात या तिघांनी त्या रस्त्यावरून वाटचाल केली आणि श्रावणसरीसह अननुभूत आनंदात तिघेही भिजून चिंब झाले. हा अनुभव नक्कीच अनोखा असणार.

२००४ साली अहमदनगरच्या सव्वीस/सत्तावीस वर्षांच्या नीतेश बनसोडे या तरुणाला पुरस्कार देण्यात आला. पंधरा/वीस अनाथ मुलांचा सांभाळ नीतेश आपल्या मित्र मंडळींच्या सहकार्याने करतोय. त्याला आणि त्याच्या मुलांना भेटायलाही ही दुक्कल गेली होती. राजू परुळेकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि ‘संवाद’ कार्यक्रमातून नीतेशची दूरदर्शनच्या असंख्य दर्शकांना ओळख झाली त्यानंतर दोन/तीन महिन्यांनी अनिलदादांच्या नवीनने आणि त्याच्या मित्रांनी नीतेशच्या पंधरा/वीस मुलांना मुंबई सहल घडवली. मनात आलं आता धाकटी पातीही कामाला लागली आहे.