कळकळीची विनंती

आपल्याला मोठेपणी काय करायचं आहे ते मुलांना समजायला हवं आणि त्याचा पाठपुरावाही करता यायला हवा. पण हे समजण्यासाठी आवश्यक आहे थोडी पूर्वतयारी आणि बराचसा मोकळेपणा. गेल्या अंकात ‘बापाचं संशोधन’ या लेखामधून आपली लेखिकेशी थोडी ओळख झाली आहे. गेली सहा वर्ष मुलांना शिकवताना, त्यांच्याशी गप्पा मारताना या शिक्षिकेला बरंच काही दिसलं आहे आणि म्हणूनच तिनं पालकांना ही विनंती केली आहे.

गेली पाच-सहा वर्षे मी शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहे. एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘उपयोजित विज्ञान’ हा विषय सर्व शाखांच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना मी शिकवते. या पाचसहा वर्षांच्या अनुभवातून मी आज अशा एका निष्कर्षाला आले आहे, की आजच्या तरुण पिढीचं सर्वात जास्त नुकसान हे त्यांचे पालकच करत आहेत.

दरवर्षी मी बघते आहे की, अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या वर्गात किमान पंधरा-वीस टक्के विद्यार्थी असे असतात, की ज्यांना वेगळंच काहीतरी करायचं असतं. म्हणजे एकतर वैद्यकीय शिक्षणात रस असतो, पण तिकडे प्रवेश न मिळाल्यामुळे अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेला असतो. (या मागचं तर्कशास्त्र माझ्या आकलनापलीकडचं आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणार्यां ना साधारणत: जीवशास्त्र आणि संबंधित विषयांत रस असेल, असा माझा समज आहे. म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश नाही मिळाला, तर त्यांचं सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास किंवा जीवशास्त्राशी संबंधित विषयात पारंपरिक बी.एस्सी. वगैरे अशा पर्यायांकडे वळणं मी समजू शकते. पण अशी मुलं एकाएकी जीवशास्त्राशी दूरान्वयानंही संबंध येणार नाही, अशा क्षेत्राकडे कशी वळतात, हे मला आजतागायत उमगलेलं नाही. अर्थात हा काही मुलांचा स्वत:चा निर्णय नसतो, पण बरेचदा त्यांनी वैद्यकीय शिक्षणच घ्यायला हवं, हाही त्यांच्यावर लादलेलाच निर्णय असल्यामुळे एका दृष्टीनं त्यांच्यासाठी हा बदल नसतोच बहुधा!)

नाखूष विद्यार्थ्यांमध्ये काहींना पदार्थविज्ञान किंवा गणित विषयात मूलभूत संशोधन करावं असं वाटत असतं. पण पदार्थविज्ञान आणि गणितात चांगले गुण मिळाल्यावर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न घेणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा असं आईबाप, नातेवाईक व मित्रपरिवारातील लोकांना वाटत असल्यामुळे नाईलाजानं ही मुलं इकडे वळलेली असतात. या नाखूष मुलांमध्ये एक असाही वर्ग असतो, की ज्यांची प्रतिभा खरं तर वेगळ्याच क्षेत्रात असते. ही मुलं उत्तम कलाकार नाहीतर लेखक, कवी असतात, आणि खरं तर त्या त्या क्षेत्रातल्या चांगल्या आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची त्यांना गरज आणि आसही असते. पण केवळ आईबापांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेला असतो.

याशिवाय जवळ जवळ पन्नास टक्के मुलं अशी असतात, की त्यांच्या आईवडिलांना अभियांत्रिकी शिक्षणाचं शुल्क आणि देणग्या परवडताहेत, म्हणून ती इथं आलेली असतात. अभियांत्रिकीच नाही, तर कोणत्याही प्रकारच्या सखोल शिक्षणासाठी आवश्यक त्या क्षमताच त्यांच्यामध्ये विकसित झालेल्या नसतात. हा दोष त्यांचा नसतो, तर त्यांच्या शाळांचा, शिक्षकांचा, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचा असतो.

आपल्याला आयुष्यात काय करायचंय याविषयी त्यांची काही खास अशी मतंही नसतात, कारण आपलं मत आपण विचार करून बनवायचं असतं, हेच त्यांना माहीत नसतं. गाईडमध्ये छापलेली किंवा शिक्षकांनी उतरवून दिलेली उत्तरं जशीच्या तशी पाठ करून परीक्षांमध्ये ओकणं त्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की आयुष्यातल्या प्रश्नांनाही आईबाप आणि इतर ज्येष्ठांकडून तयार उत्तरांचीच त्यांना अपेक्षा असते आणि त्याविरुद्ध त्यांची काही तक्रारही नसते. गडकर्यां च्या मूकनायकाप्रमाणे एक संदर्भहीन आणि अर्थशून्य असं आयुष्य ती विनातक्रार जगणार असतात.

सुरुवातीला जेव्हा अशी विविध प्रकारची मुलं माझ्याकडे आपल्या मनाची घुसमट व्यक्त करायला यायची, तेव्हा माझा त्यांना एकच सल्ला असायचा – खरं म्हणजे तुम्ही अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यापूर्वीच आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, त्याच्यावर थोडा विचार करायला हवा होतात. आपल्या आईबापांना आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करायला हवा होतात. पण आता ती वेळ तर निघून गेली. पण तरीही अजूनही बी.इ. म्हणजे काही शेवट नव्हे. या चार वर्षात आपल्या मनाचा कल आजमावण्याचा प्रयत्न करा. बी.इ. झाल्यानंतरही तुम्ही पुन्हा आपल्या खर्‍या प्रेमाकडे वळू शकाल. आजकाल आपल्या शिक्षणव्यवस्थेत लवचीकता येऊ लागली आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल.

पण गेल्या काही वर्षांत मी स्वत: शिकवलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही दोन-तीन बॅचेस बाहेर पडल्या, त्यांच्याकडे पाहता, मला फक्त अंधारच दिसतो. अभियांत्रिकी शिक्षणाच्या चार वषार्ंनी विद्यार्थ्यांमधली सर्व प्रतिभा, वेगळं काहीतरी करण्याची आच पिळून काढलेली उघड्या डोळ्यांनी मी पाहात आले आहे. याला जितका अभ्यासक्रम, तो राबवण्याची पद्धत जबाबदार आहे तितकेच पालक आणि आजूबाजूचा समाज. यांच्या अतिरेकी दडपणामुळे कितीतरी प्रतिभावान मुलं, आज मुकी बिचारी कुणाही हाका अशी मेंढरं बनून आय्टी कंपन्यांच्या मायाजालात गडप झाली आहेत.

मी इंजिनिअर झालो तरी शास्त्रीय संगीताची साधना चालू ठेवता येईल, अशीच नोकरी धरीन, अशी प्रतिज्ञा केलेला, सर्व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये बक्षीसंच नाही तर तज्ज्ञांची वाहवा मिळवणारा मुलगा, आज अमेरिकेत एका सॉफ्टवेअर कंपनीच्या दावणीला बांधला गेला आहे. अतिशय चांगलं लिहिणारी, कविता करणारी एक विद्यार्थिनी दोन वर्ष गटांगळ्या खाऊनही आईवडिलांच्या अट्टाहासामुळे अजूनही बी.इ.च्याच चक्रव्यूहात अडकलेली आहे. तंत्रज्ञानात नवीन आविष्कार करण्याची प्रतिभा असलेल्या काही विद्यार्थिनी बी.इ. झाल्यावर पुढे शिकायचं सोडून आय्टी कंपन्यांमध्ये हमाली करत आहेत. दरवर्षी गटांगळ्या खात खात शेवटी जेमतेम काठावर पास होऊन पदवी मिळवलेले कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी आज नोकर्यां साठी जोडे झिजवत आहेत. त्यांच्याच आगेमागे असलेली त्यांच्यासारखीच सामान्य कुवतीची इतर काही मुलं (बहुतेकदा त्यांच्या सुदैवानं आईबापांची सांपत्तिक स्थिती बेताची असल्यामुळे) कमी शुल्काच्या आणि कमी प्रतिष्ठेच्या इतर पदव्या, पदविका मिळवून मार्गाला लागलेली पाहून या नामधारी इंजिनिअर्सना आता पश्चाचत्ताप होतो आहे. बी.इ. झाल्यावर आपल्या आवडीच्या अशा संशोधन क्षेत्रात जाऊ इच्छिणारी एक विद्यार्थिनी आज रूढ पद्धतीनं नोकरीच करावी यासाठी घरातून येणार्याव प्रचंड मानसिक दबावाला तोंड देते आहे.

हे सगळं पहिल्यानंतर मला सर्व तरुण मुलांच्या पालकांना एक कळकळीची विनंती करायची आहे – कृपा करून आपल्या मुलांना वार्यासवर सोडून द्या. तुमची सामाजिक प्रतिष्ठा तुमच्या स्वत:च्या कर्तृत्त्वावर ठरू द्या, मुलांना त्यासाठी वेठीला धरू नका. तुम्ही किंवा मी शिक्षण पूर्ण करून जगण्याच्या लढाईत उतरलो, तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक पडला आहे. आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे केवळ पैसा कमावणं नाही. सहा आकडी पगार मिळत असला, तरी त्याचा उपभोग घेण्यासाठी वेळ आणि मानसिक स्वास्थ्य नसेल, तर त्याचा काय उपयोग आहे? तसं पाहिलं तर आज प्रतिष्ठा आणि पैसा नाही असं कोणतंही क्षेत्र नाही. अंगी प्रतिभा आणि कौशल्य असेल, तर कोणतंही काम करून आवश्यक तेवढा पैसा आणि समाधान दोन्ही मिळवता येतं, असा हा नवा जमाना आहे. आपल्या मुलांना या वास्तवाची पूर्ण कल्पना आहे. चुकत-माकत धडपडत आपला मार्ग आपण शोधण्याची त्यांची तयारीही आहे. पण तुम्ही त्यांना त्यांच्या मानसिकतेविरुद्ध आणि कुवतीविरुद्ध भलत्या शर्यतीत उतरवून त्यांचं कधीही भरून न येणारं नुकसान करत आहात. आपल्या अतिप्रेमामुळे आंधळे होऊन मुलांना वाममार्गाला लावू नका.

एका शिक्षकाची ही कळकळीची विनंती कोणाच्या कानावर पडते आहे का? की हे केवळ अरण्यरुदनच आहे?

मला वाटतं-

परवा टी.व्ही.वर सौंदर्य स्पर्धांच्या स्टाइलमध्ये केलेला एक कार्यक्रम पाहण्यात आला. एखादं चिमुकलं आणि त्याची आई यांच्या टीममध्ये असलेली ही स्पर्धा. बाळ (मुलगा किंवा मुलगी) आणि त्याची आई, छानसं नटून-थटून जोडीनं त्या रॅम्पवर चालत येत, ओळख करून देत आणि परत ऐटीत आपल्या मूळ जागी जात. अशा दहा-पंधरा जोड्या एकामागून एक आल्या आणि आईनं शिकवलेलं, ठरवलेलं, बाळ बोललं! आईनं स्वत:देखील मी माझ्या बाळाला कसं वाढवते, कसा वेळ देते, मुलानं काय व्हावं वगैरेचं वर्णन केलं.

या सर्वात आईशिवाय बाळाला घडविण्यात आणखी कुणाचं तरी योगदान असतं याचा उल्लेख काहीसा अभावानंच जाणवला, आढळला. बाबा, ताई-दादा, आजी-आजोबा, काका-काकी, मामा, मावशी, शेजारी इतकंच नव्हे तर सांभाळणार्याल मावशी या सर्वांचासुद्धा त्या मुलांच्या वाढीत, विकासात वाटा असतो हे आई विसरली होती का?

बरं, बाळानं जी स्वत:ची ओळख करून दिली, ती त्याला त्याच्या आईनं शिकविली होती. त्याची स्वत:ची पण दुसर्या्नं करून दिलेली !

खरं तर लहान मूल थोडंसं मोकळं झालं तर स्वत:चा छान परिचय देतं. पण त्याला आपण तशी संधी दिली तर ! अशी संधी द्यायला हवी. आपण काय करतो- असं बोल, असा उभा रहा, असा वळ, असं कर असं सांगतो. त्याप्रमाणे तो प्रयत्न करतो. जिथं चुकतो, विसरतो- तिथं आईच्या तोंडाकडे पाहतो किंवा माघार घेतो.

पण एकदा लहानपणापासून आईनं तयारी करून द्यायची आणि आपण तसं करत राहायचं अशी सवय जडली तर ही मुलं स्वावलंबी कशी आणि कधी व्हायची? जीवनात येणार्याक अधिक-उण्या प्रसंगाला कशी सामोरी जायची?
मुलांना सर्वकाही विनासायास, आयतं, जागेवर उपलब्ध करून देणं म्हणजे प्रेम, जबाबदारीची पूर्तता असा चुकीचा ग्रह तर बनत चालला नाही ना?

लहानपणापासूनच छोट्या छोट्या सवयी लावत त्याला स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून देता येते. स्वत:ची वॉटरबॅग, डबा भरणे, दप्तर भरणे, जोडे-मोजे एकत्र ठेवणे, गणवेश काढून ठेवणे, खेळणी भरून ठेवणे, आपल्या हातांनी जेवणे अशा दैनंदिन बाबीतून स्वावलंबनाचे धडे देता येतात. चुकतील पण चुकत-चुकत शिकतीलही!

दहा-पंधरा वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र-स्वावलंबी जीवन जगायला मदत करण्यासाठी ही बीजपेरणी आहे. त्याची कामे त्याला करायला शिकवणे हासुद्धा प्रेमाचाच भाग आहे. मुलांच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पालकांनी याबाबत जागरूकपणे पावले उचलावीत.

सविता पटवर्धन,
रत्नागिरी.