मातृत्व
(‘What motherhood really means’ ह्या रिडर्स डायजेस्ट नावाच्या नियतकालिकातील लेखाचं हे रूपांतर.)
जरा उशीरच झालाय् – पण विचार करतोय् आम्ही मूल व्हावं असा – तू काय म्हणशील?’’
माझ्या घशात काही अडकलं. तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘आयुष्य खूपच बदलतं – एवढंच म्हणेन मी’’
‘‘माहितीय् मला. रात्रीची जाग्रणं – सुट्ट्या – सहलींना राम राम’’
खरं तर हे मला म्हणायचं नव्हतं. अजिबात नाही. तिला सांगायचं होतं वेगळंच काही.
जे मूल झाल्यावरच कळतं आईला – शिकवता येत नाही.
शरीर फाडून मुलाला जगात आणतानाच्या वेदना – भरून येतात लगेचच.
पण आई होणं म्हणजेच घायाळ होणं कायमचं! हळव्या मनाचं ओझं बाळगत जीव सतत धास्तावून घेणं.
वर्तमानपत्रातल्या प्रत्येक बातमीचा संबंध आपल्याच मुलाशी जोडणं.
विमानाच्या स्फोटात – दुष्काळात – वायुगळतीत – सगळीकडेच मुलाचा चेहेरा पाहणं. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूइतकी दुसरी कोणतीच भीती तुला संपवणारी असत नाही. एका अर्थानं तुझं पशुत्व जागं करणारी मुलाच्या सुरक्षिततेसाठी नख्या काढून बसलेल्या सिंहिणीची भावना तुला आता कळेल काय?
‘‘आई’’ अशा हाकेतच जीवनाचं पाणी होऊन जाणं – त्या क्षणाचं मोल – हाकेतूनच जाणवणं – हे कसं कळेल?
महत्त्वाच्या मिटींग्ज, महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाची कामं – महत्त्वाची वेळ या सर्वांचं महत्त्व बाळाच्या गोड मधुर वासात विरघळून जाणं – बाळाच्या काळजीचा धोंडा मनावर ठेवूनच घराबाहेर पडणं – आयुष्याचा क्षण न क्षण बाळाच्या काळजीनं व्यापणं.
रोजच्या रोजचे आपले निर्णय आपल्या मुलाला कसे घडवतील? कुंकवाची टिकली तू नाही लावायची. असं सांगून काय शिकवतील? ऑफिसमध्ये घेशीलही झटपट निर्णय – पण प्रत्येक वाक्याचं आणि निर्णयाचं ओझं तुझ्या निर्णयशक्तीला आव्हान देईल मुलाला वाढवताना.
फुलाच्या पाकळ्या गळून पडल्या तरी बेढब बोंडाचं अप्रुप वाटणं – गळत्या पाकळ्यांचं भान न राहाणं – त्यासाठीच जगणं – त्यासाठीच सर्व सर्व काही करणं म्हणजेच आई होणं.
आणखी एक महत्त्वाचं – मूल होणं – म्हणजे मुलाच्या वडलांच्या नव्यानं प्रेमात पडणं. कारण तो आपल्या बाळाचा बाबा असतो. आपल्या बाळावर मायेचा वर्षाव करत असतो. बाळाला आंघोळ घालत असतो. मुलीशी सर्व कामं बाजूला ठेवून – सायकल खेळत असतो. म्हणून निव्वळ त्यासाठीच नवर्यावर प्रेम करणं हेसुद्धा प्रेम करण्याचं किती सुंदर कारण आहे! हे समजणं म्हणजे आई होणं.
किती किती अप्रुपाच्या असतात साध्यासाध्या गोष्टी! बाळानं पहिल्यांदाच चेंडू फेकणं, टेडीबेअरचा मऊपणा गालानं चाचपणं, भातानं चेहेरा माखणं – शीमध्ये लडबडणं! – सगळंच छान वाटणं म्हणजे आई होणं.
हे सगळं मी तिला कसं सांगू? तिचा गोंधळलेला चेहेरा पाहून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या गालावर थोपटत म्हटलं, ‘‘तुला कधीच पश्चाताप करावा लागणार नाही आई होण्याचा निर्णय घेतल्याचा’’ तिच्या मानवी धडपडीला हाक होती अमानवी पवित्र चैतन्याची!
(‘What motherhood really means’ ह्या रिडर्स डायजेस्ट नावाच्या नियतकालिकातील लेखाचं हे रूपांतर.)