मुले आणि खेळ

काय खेळ चालवलाय लहान मुलासारखा,’ अशा प्रकारची उपहासगर्भ टीका आपण सर्रास ऐकतो. म्हणजे मुलांचे खेळबीळ एकदम निरुपयोगी किंवा खरं तर त्रासदायकच, अशी सर्वसाधारण रूढ कल्पना! पण मुलांच्या वाढीमधे खेळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मुलं वाढत असताना आजूबाजूचं जग मनात सामावून घेतात; समजून घ्यायचा सतत प्रयत्न करत असतात. यातून बाह्य जगाची जिवंत आणि सतत बदलती प्रतिकृती मनात घडवत जातात. तीच त्यांच्या खेळातून वेळोवेळी प्रतिबिंबित होत राहते. टी. व्ही., सिनेमातून क्षणोक्षणी दिसणार्याग मारामार्याव, गाणी अन् नाच हे किती चटकन मुलांच्या खेळांमध्ये सामावले जातात, हे आपण दररोज पाहतो. यातूनच मुलं जगामध्ये आपण कसं जगायचं, आपलं स्थान काय हे ठरवतात. म्हणजे प्रौढपणातल्या आपल्या भूमिकांची रंगीत तालीमच खेळातून चालते म्हणा ना! अर्थातच मोठ्या माणसासाठी जसं रोजचं ऑफिसचं किंवा घरचं काम महत्त्वाचं, अगदी तसंच अन् तेवढंच, किंबहुना जास्तच महत्त्व त्यांच्या खेळाला आहे.

वस्तुस्थितीचं प्रतिबिंब उमटवून जगाची ओळख करून घेण्याबरोबरच घरापासून सुटं होणं, समवयस्कांशी सहकार्य करायला शिकणं, संघभावना निर्माण होऊ देणं, या सर्व गोष्टींचे अक्षरश: ‘हसतखेळत’ धडे मुलांना खेळामधूनच मिळतात.

वैयक्तिक पातळीवरच्या अधिक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जिद्द, विजिगीषु वृत्ती आणि अंत:प्रेरणा या गोष्टी नसतील तर बुद्धी आणि शक्ती असलेली माणसंसुद्धा स्वत: किंवा जगाच्या उपयोगी पडत नाहीत, हे आपण हरघडी पाहतो. याउलट अपंग माणसंसुद्धा केवळ प्रेरणा अन् जिद्दीच्या जोरावर यशाची शिखरं पादाक्रांत करतात. अशी माणसं संशोधन, उद्योग, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या अडचणींवर मात करून यशस्वी होतात. या गुणांचं बाळकडू हे ‘बाळपणीच्या खेळातूनच मिळत असतं’.

याशिवाय सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खिलाडू वृत्ती. खेळामधे हारजीत ही व्हायचीच, हार-जीत महत्त्वाची नसून खेळणं महत्त्वाचं या गोष्टी आपण नेहमी ऐकतो आणि मानतोसुद्धा. पण ऑलिंपिकसारख्या जागतिक पातळीवरच्या स्पर्धांमध्येसुद्धा या तत्त्वांना हरताळ फासला जातो, हेसुद्धा जाहीरच आहे. म्हणूनच मग स्पर्धांपूर्वी उत्तेजक औषधं घेणं, पंचांनी दुजाभाव करणं अशा गोष्टी घडतात.

पराभव सहन करता येणं, अपयशानं खचून न जाणं, प्रयत्नांचं सातत्य टिकवणं आणि विजयामधे नम्र आणि सुसंस्कृत राहणं हे जगात जगण्यासाठी आणि चांगलं जगण्यासाठी अतिशय आवश्यक असलेले सद्गुण कमी असणं किंवा अजिबात नसणं हे मानसिक आणि सामाजिक रोगटपणाचंच लक्षण होय. मग आपण पाहतो की परीक्षेत नापास झालेली मुलं-मुली आत्महत्या करायला उद्युक्त होतात किंवा धंद्यात खोट खाल्लेला माणूस व्यसनाधीन होतो किंवा निवडणूक हारलेला पक्ष मारामार्याि आणि दंगली घडवून आणतो किंवा विजयी पक्ष किंवा व्यक्ती जुलूम करतात किंवा बदला घेण्याच्या मागे लागतात.

आक्रमकता किंवा Aggressive instinct ही सर्वच जिवंत प्राण्यांची जन्मजात प्रवृत्ती आहे. ती जीव टिकवण्यासाठी अन् संरक्षणासाठी आवश्यकसुद्धा आहे. पण या प्रवृत्तीला साचा हवा, दिशा हवी अन् लगामसुद्धा हवा. तरच समाज सुरक्षित राहू शकतो. म्हणून या आक्रमकतेचं उपयुक्त अन् हितकारी उदात्तीकरण म्हणजे, खेळ! म्हणूनच समाजातली हिंसा अन् दहशतवाद कमी करण्यासाठी बाळपणापासून खेळावर लक्ष केंद्रित करणं हा जरा दूरचा पण टिकाऊ उपाय आहे.

अशा तर्‍हेने व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक, शारीरिक अन् बौद्धिक विकासाचं खेळ हे एक अविभाज्य अंग आहे, असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती ठरू नये. मानसोपचार शास्त्र आणि खेळ मुलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये खेळाचं महत्त्व अपार असल्यानं मानसोपचारशास्त्र त्याचा अतिशय विशिष्ट पद्धतीनं उपयोग करून घेतं. मुळात मानसोपचारशास्त्र हे इतर वैद्यकीय शास्त्रांप्रमाणं किंवा त्यांच्याइतकं बिनचूक असत नाही. कारण या शास्त्रात दृश्य आणि सहज मोजता येण्यासारखे घटक नाहीत. शिवाय मानसिक आरोग्याचा किंवा आजारांचा वागणुकीवर प्रत्यक्ष परिणाम असल्यानं शास्त्रीय अभ्यासासाठी आवश्यक असलेलं नियंत्रण आणता येणं कठीण असतं.
त्यातून लहान मुलांशी मोठ्यांप्रमाणं संवाद साधणं शक्य नसतं. त्यांचे स्वत:चे दृष्टिकोन अन् भावना या खूपशा अमूर्त स्वरूपात असतात. त्या त्यांच्या त्यांना शब्दात मांडता येत नाहीत, कारण तेवढी जाणीव अन् प्रगल्भता त्यांच्यात नसते. म्हणून त्यांच्या मनातल्या भावना, विचार अन् संघर्ष समजून घेण्यासाठी खेळाचा वापर करून घेतला जातो. त्यांना बाहेरचं जग कसं दिसतं आणि त्यांच्या मनात त्यामुळे उठणारे तरंग यांचं स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या खेळात दिसतं, हे आपण पूर्वी पाहिलेलंच आहे.

मग ज्या मुलाला भावनिक संघर्षापासून त्रास होतो, वागणं बदलतं अशा मुलाला जर मोकळेपणी खेळू दिलं आणि त्याच्या खेळावर लक्ष ठेवलं, ढवळाढवळ न करता फक्त निरीक्षण केलं तर त्यातून अनुभवी परीक्षकाला काही निष्कर्ष काढता येतात. मुलालासुद्धा त्याचे दृष्टिकोन आणि भावना समजून घेण्यासाठी मदत करता येते.
या मनोवैज्ञानिक पद्धतीला Play Therapy असं म्हणतात. यामध्ये खेळाच्या माध्यमातून परीक्षण, रोगनिदान अन् उपचार अशा तिन्ही गोष्टी करता येतात.

या पद्धतीविषयी अधिक तात्त्विक विवेचन करण्याचा या लेखाचा उद्देश नाही. पण एका छोट्याशा पुस्तकामध्ये Play Therapy ने नाट्यपूर्ण परिवर्तन घडवून आणल्याची सत्यघटना जशीच्या तशी दिलेली आहे. हे पुस्तक मुळातून वाचणे हेच सर्वांना अधिक आनंददायक ठरेल. पुस्तकाचे नाव : Dibs : In Search of self. लेखिका : Virginia Axline