आमिषांचा मुका शिक्षेचा दम

मुलांशी बोलताना सहजपणे बोलली-ऐकली जाणारी ही काही वाक्ये – ‘‘ह्या वर्षभर छान अभ्यास कर. मार्क मिळवून दाखव, तर क्रिकेटचा सेट घेऊन देईन आणि नाही केलास, तर बघच! मग, चाबकानं फोडून काढीन.’’
‘‘पाहुणे येणारेत, तेव्हा नीट वाग हं! नाही तर ते गेले की पाठीचं धिरडं करीन मी, सांगून ठेवते.’’
‘‘आमचं बोलणं होईपर्यंत कोपर्यात देवासारखं शांत बसायचं, तर परत जाताना भेळ मिळणारे.’’
‘‘शरू, जर्दाळू हवाय? मग कोपर्यावरून कोथिंबीर आणून द्यायची मला.’’
‘‘रोहन, आज घर तू झाडायचंयस. झाडलंस तरच उद्या सिनेमाला पाठवीन. आपल्याजवळ भलते लाड नाहीत.’’
‘‘मी घरात नसताना कोण कोण आलं होतं XXXकडे, मला सांग, कॅसिओ कुणाला हवाय?’’
‘‘शशांक, आज तू जे पाहिलंस ते कुणाला सांगायचं नाही, जर सांगितलंस तर बघ. पाय मोडून ठेवीन मी कायमचा.’’
‘‘लग्न करायचं तर श्रीमंत बापाच्या लेकीशीच. लग्नाबरोबर घरही भरलं पाहिजे. आयुष्यभर काही कमी पडणार नाही तुला.’’
‘‘ह्या मुलाशी लग्नं करायचं नाही. तू तसा प्रयत्न केलास तर मी काय करीन, त्याचा अंदाज असू दे तुला.’’
कुणाही माणसानं, विशेषतः आपल्या मुला-विद्यार्थ्यानं आपली सूचना पाळावी, आपल्या मनाप्रमाणे वागावं अशी बहुतेक सर्वांचीच कमी-अधिक प्रमाणात इच्छा असते. ह्या इच्छेत तसं पाहताना अनेकदा काही गैरही नसतं. कधी इच्छा साधीसोपी असते किंवा गंभीर मुद्दाही असतो पण भलेपणातून आलेला असतो, तर काही ठिकाणी या भलेपणात थोडा विकृतपणा मिसळायला लागताना दिसतो. परिस्थिती, माणसांच्या वृत्तीमधली विविधता, ह्यांच्या परिणामांचाही त्यांत भाग असेल, ‘दुसर्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला लावणं’ मात्र त्यात निश्चितपणे असतंच. हा दुसर्याच्या कृतीवर आपलं नियंत्रण आणणारा नियंत्रणवादी विचार, आणि आचार, आपल्या हेतूंची भद्रता कमी करतो असा मुद्दा मला आपल्या सर्वांसमोर विचारार्थ मांडायचा आहे.
ही नियंत्रणवादी विचार आणि आचार यांनी बनलेली वृत्ती फक्त मुलं आणि आपण अशाच नात्यात दिसते असं नाही तर कामगार, नोकर, हाताखालचे, जनता अशा सर्वांवरच या नियंत्रणवादी वृत्तीचा प्रयोग केला जातो. इथं एक गोष्ट स्पष्टच आहे की नियंत्रण कोण कोणावर आणू शकणार? तर अधिक क्षमता, अधिकार असणारे त्याहून खालच्यांवर! कधी कधी या भूमिका वरवर दिसतात त्याच्या उलटही असतात, आणि ही नियंत्रकाची भूमिका मिळवण्याचा प्रयत्नही केला जातो. परंतु आज या लेखात हे मोठ्यांच्या जगातले मुद्दे मी विचारात घेणार नाही. तो वेगळ्या क्षमतेचा, आणि वेगळ्या लेखाचा विषय ठरेल.
या ठिकाणी मुख्यतः पालक, शिक्षक व बालक यांच्यातील नियंत्रणवादी संबधाचा आणि त्यांच्या परिणामांचा पालकनीतीदृष्टीनं विचार करू या. हा विचार कठोर आत्मपरीक्षणासाठी जरूर आहे परंतु पालक शिक्षकांना दूषणे देण्यासाठी अजिबात नाही. हे, मी एवढ्यासाठी स्पष्ट करते आहे की, जेव्हा पालक-बालक संबंधाची तुलना काही कारणाने का होईना, कारखानदार-कामगार, मालक-नोकर वगैरे संबंधांशी होते, तेव्हा ती कुणालाही पटण्यासाठी राहात नाही. कारण स्पष्टच असतं. ज्या मुलाबाळांमध्ये वागणुकीत बदल घडवण्याची आपली इच्छा असते, त्या मुलाबाळांवर आपलं प्रेम असतं. त्यांच्या भल्याचीच इच्छा आपलं मन करत असतं. त्यामुळे आपला हेतू हा अत्यंत भद्र असाच असतो, त्यामध्ये दुष्टपणा नसतो, स्वार्थही एका अर्थानं नसतो. त्यामुळे मोठ्यांच्या जगातील-समाजातील मोठ्या प्रमाणात दिसणार्या नियंत्रणवादी संबंधांमुळे, आमिषं किंवा भीती दाखवून पटपट कामं करून घेण्याची एक सवय सर्वांनाच लागते. या सवयीचं प्रतिबिंब जिव्हाळ्याच्या नात्यातही दिसतं. शिवाय मुलंही आसपासच्या जगाकडे पाहात असतातच आणि त्यातून नकळत शिकतही असतात. त्यामुळे मोठ्यांच्या जगातील संबंधांचा विचार आपल्याला संपूर्णपणे बाजूला ठेवता येणार नाही, त्यातील संदर्भाचे धागे पाहात पाहातच जावं लागेल.
हेतू कितीही भद्र आणि स्तुत्य असला तरीही त्याचं प्रत्यक्षात होणारं रूपांतर अगदी वेगळं होऊ शकतं. हा हेतू मनात आणणार्या व्यक्तीची विचारांची चौकट जी काय असते, किंवा ती व्यक्ती जो वैयक्तिक चष्मा घालत असते त्यातून जे भद्र दिसतं तो आपला स्वतःचा भद्र हेतू – असं त्याचं स्वरूप ठरतं. एखाद्या व्यक्तीचा आपलं मूल यशस्वी व्हावं असा हेतू असेल, व त्याचा वैयक्तिक अर्थ डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, किंवा कॉम्प्युटर इंजिनियर व्हावा असाच असू शकेल मग मुलाला भले का चित्रांमध्ये, किंवा सुरांमध्ये रंगून जायला आवडत असू दे. ही व्यक्ती त्याच्या स्वतःच्या चौकटीत मुलाला बसवण्याचा प्रयत्न – येनकेन प्रकारेण करणार.
आमच्या परिचितांपैकी एका छोट्या मुलीला पालकांनी चांगलं शिक्षण मिळावं या हेतूनं इंग्रजी माध्यमाच्या अत्यंत नामवंत शाळेत घालायचं ठरवलं.
३-३१/२ वर्षांची ही मुलगी स्वतःतच दंग असलेली. जगाची, इतरांची तिला भीती-क्षिती अजिबात नाही. लहान मुलाला सहज विचारलं जातं तसं, ‘‘नाव काय तुझं?’’ असं विचारलं तर, ‘‘आधी तुझं नाव सांग,’’ असं तिचं प्रत्युत्तर आणि शाळेची अपेक्षा तर बटण दाबल्यावर दिवा लागावा त्या तत्परतेनं नंबर्स, कलर्स आणखी तशाच हजार गोष्टी विचारताक्षणी सांगाव्यात अशा प्रकारची! आईवडिलांनी जीव तोडून कष्ट केले. मुलीचं पाठांतर करून घेतलं. तीन वर्षांची मुलगी या तयारीला कंटाळायची, मग तिला आमिषं दाखवणं भागच होतं. ‘ही कविता पाठ करून दाखवलीस की नवा खेळ.’ ‘सगळे रंग, नव्हे कलर्स, ओळखता आले की नवा फ्रॉक.’ तरीही कंटाळा केला की फटके, अबोला, नाहीतर कोंडून ठेवणं. मुलीची तयारी पूर्ण झाली. तरीही ऐनवेळी अवसानघात करून, ‘‘मला नाही आवडल्या त्या आंटी, मी नाही उत्तर दिलं त्यांना’’ असं म्हणून बाहेर निघून आली तर काय घ्या? मग आईवडिलांनी तिच्या प्राणप्रिय गोष्टी म्हणजे ‘अमुक केक, तमुक च्युईंगम’ वगैरे जमा केल्या. तिची आई सांगते, ‘‘सगळं पिशवीत भरून घेतलं, आणि थोड्या थोड्या वेळानं तिला पिशवी दाखवत होते. ‘नीट उत्तर द्यायचं, ‘देणार नाही’ असं म्हणायचं नाही’ तरच हे मिळणारे.’’ असं सांगत होते. जिंकलं बाई! मिळाली आम्हाला ऍडमिशन!’’
मी थक्क झाले. या आईवडिलांना मी ओळखते. ती एरवी समाजातील चांगली जबाबदार माणसं आहेत. मुलींवर त्यांचं जिवापाड प्रेम आहे, तरीही हे जे घडलं ते भद्रतेची पातळी ओलांडून जातंय असं मला वाटलं. परिस्थितीच्या चौकटीत स्वतःची चौकट बसवताना अगतिक झाल्यामुळे का होईना, पण हे पालक आपल्या लाडक्या मुलीला माणसाच्या माणूसभावनेनंही न वागवता प्राण्यांच्या पातळीवर नेऊन बसवत आहेत की काय असा मला प्रश्न पडला.
मानसशास्त्र काय सांगतं हे पाहताना असं दिसतं की ‘आपण जे ठरवू ते वागायला लावण्यासंदर्भातले प्रत्यक्ष प्रयोग प्राण्यांवरच केले गेलेले आहेत, आणि त्या पातळीवर ते सफलही झालेले आहेत. खाऊबद्दल आत्मीयता वाटावी म्हणून ८०% पर्यंत वजन उरेपर्यंत उपाशी ठेवून नंतर खाऊचं आमिष दाखवलं तर उंदीर काय वाट्टेल ते वागायला, उड्या मारायला, डोकं आपटायला तयार असतात. कबुतरं पिंगपॉंग खेळतात, ससे कदाचित पिंगा आणि फुगड्या घालून दाखवतील. हे सगळं जरी खरं असलं तरी ते करायला लावणं त्या प्राण्यांना ‘गोड’ वाटतं नाही आणि त्यांचं त्यातून भलं घडतं असंही नाही. प्रयोगात वापरल्या जाणार्या प्राण्यांच्या संदर्भातला नैतिकतेचा मुद्दा की, ‘प्राण्यांनाही अशा प्रकारे वापरावं आणि आपल्या इच्छेनुसार वागण्यास भाग पाडावं का?’ हा या ठिकाणी बाजूला ठेवला तरी ती पद्धत आपण आपल्या मुलांसाठी वापरत असू तर पालकनीतीचा (मासिकाचा नव्हे संकल्पनेचा) विचार आपण करणार की नाही?
याठिकाणी दिलं जाणारं चॉकलेट हे आरोग्यदृष्ट्या योग्य आहे की नाही, हा प्रश्न नाही आहे. मुलांसाठी वापरला जाणारा पैसा, प्रेम, लक्ष देणं ही अडचण नाही आहे. तर आपल्या चौकटीत आपल्याला योग्य वाटणारे हेतू आक्रमकतेनं दुसर्यावर लादणं उचित आहे का? असा प्रश्न आहे.
हे असं का घडतं? आपला हेतू तर भला असतो. अगदी आपल्या चौकटीतून पाहूनही त्याचं रूप काही सर्वथा पालटत नाही तरीही असं का घडतं? मुलानं शिकावं, अभ्यास करावा असं आपल्याला वाटतय. आपल्या मुलानं-मुलीनं अभ्यास करावा म्हणून आपण सिनेमा, गोष्टीचं पुस्तक, सायकल, हॉटेलमध्ये खाणं इ. आमिषं दाखवतो. ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यांचे प्रत्येकाचे काही सुपरिणाम-दुष्परिणाम आहेत. पण आपण मुलाला सांगतो, की ‘क्ष’ केलंस तर ‘य’ मिळेल. ज्यांचा अर्थाअर्थी एकमेकांशी काही संबंध आहे किंवा नाही ह्याचा विचार आपण केलेलाही नाही, त्या ‘क्ष’ आणि ‘य’ गोष्टी आपण एकमेकांशी जोडतो. त्यांची किंमतही सारखी असते असं नाही. कधी अगदी फालतू गोष्टीला, उपलब्ध आहे म्हणून वरच्या किंमतीचं आमिष दिलं जातं. तर कधी उलट! शिक्षा देण्यामध्ये तर मुलाच्या वर्तनाइतकाच, आपल्या त्यावेळच्या मनस्थितीचाही मोठा भाग असतो.
त्यामुळे या आमिष-शिक्षेच्या मार्गानं आपले हेतू-मग ते जे असतील ते-नेमकेपणी पुरे होतील, की त्यासोबत मूळ हेतू बाजूला पडून इतरच परिणाम घडू लागतील ह्याकडे बघावं लागेल.
प्रत्येक गोष्ट मग तो अभ्यास, जेवण, व्यायाम, जबाबदारीनं वागणं अशा गोष्टी आणि अर्थात इतरही काहीही करताना ती कशासाठी तरी, काहीतरी बक्षिस मिळावं म्हणून करायची, ह्याची एक सवय यातून मुलांना लागेल, आणि तशी लागताना दिसतेही. मग शिकणं हे आईवडील, शिक्षक यांच्यावर उपकार म्हणून करण्याचीच गोष्ट होते. रोजच्या प्रत्येक कृती करताना त्या बदल्यात आपल्या आवडीच्या वस्तू मिळवायच्या असं एक व्यापारी तत्त्व मुलं वापरू लागतात. अशा वेळी जाणवतं, की आज हे जरी उलट आमच्यावरच बेतलं असलं तरी मुळात ही सवय आम्ही पालकशिक्षकांनीच त्यांना लावली आहे का?
असं मानलं जातं की, प्रत्येक २/३ वर्षांपुढच्या लहान मुलाजवळही, स्वतःचा एक न्याय असतो. योग्यायोग्यतेचे स्वतःचे निकष असतात. परंतु आकर्षक वस्तूच्या मोहात पडून किंवा भीतीच्या वलयात सापडून ही न्यायनिष्ठ विचारक्षमताच बेशुद्ध होत असेल, आणि असं अनेकदा झाल्यावर ती नैसर्गिक उर्मीही कोळपून जात असेल का? आमिष आणि शिक्षाही अनेकदा वापरून झाल्या की त्यांचा कंटाळा येतो, प्रभाव संपतो, मग वरचं आमिष, आणखी वरचं, आणखी वरचं या पायर्या आपल्या ताकदीची, क्षमतेची मर्यादा ओलांडून वर वर जाऊ लागतात.
सर्वसाधारणपणे, आमिष-शिक्षाचे मार्ग शोधणार्या पालक-शिक्षकांच्या मनांतले हेतू काय असतात? (१) मुलांनी शिकावं आणि (२) जबाबदारीनं वागावं.
या दोन्हीही मुलांमध्ये उपजत असलेल्या मानवी वृत्तीच आहेत. त्या शिकण्यासाठी बाह्य आयुधं का वापरायची? आणि का वापरावी लागतात? सक्षम जीवनासाठी आवश्यक असलेल्या या गोष्टी जागेपणानं विकसित करण्यापेक्षा त्यांची जबरदस्ती करण्यातून उलटाच परिणाम साधेल, अशी शक्यता आपण लक्षात घ्यायची की नाही?
पालक-शिक्षकही प्रथम सरळपणे सांगून बघतात, पण ते साधलं जात नाही, तेव्हा मग येनकेन प्रकारेण हे साधावं अशी अगतिकता त्यांना येते, आणि मग या युक्त्या वापरण्यास सुरुवात होते. त्या सुरुवातीला तर इतक्या फायदेशीर, आणि सहजसोप्या वाटतात की आपल्याला त्यांची सवयच होऊन जाते, आणि पुढचा मागचा विचार करण्याची इच्छाही होत नाही.
आमिष-शिक्षेच्या ह्या खेळाचं भयंकर रूप मला एका प्रसंगात जाणवलं. तो प्रसंग हा लेख लिहीपर्यंत मनात दबा धरून बसलेला आहे, तो तुम्हाला सांगते.
एका शाळेनं आयोजित केलेल्या ‘शिस्त’ या विषयावरच्या परिसंवादाला जाण्याची मला संधी मिळाली. शिक्षक, पालक, मानसशास्त्राचे तज्ज्ञ आणि स्वतः विद्यार्थी यांनी त्यात आपापल्या परीनं मतं मांडली होती. हे विद्यार्थी आता लहानग्या वयाचे नव्हते, शालेय शिक्षण पुरं होत आलेले ९ वी – १० वीचे होते.
शिक्षक आणि पालक यांनी तर ‘मुलांनी अभ्यास करण्यासाठी, शिस्त पाळण्यासाठी’ आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम असा मुकादम आवश्यकच आहे असं जोरदारपणे मांडलंच, ‘त्याशिवाय शाळा चालवता येणारच नाही’ असंही म्हटलं. मानसशास्त्राच्या तज्ज्ञांनीही त्यांचीच ‘री’ ओढली. यानंतरच्या एका विद्यार्थ्याच्या वक्तव्यानं मात्र मी थक्क झाले. तो म्हणाला, ‘‘आम्ही मुलांनी जर अभ्यास करायला, शिस्त पाळायला हवी असेल तर शिक्षेची टांगती तलवार आमच्या मानेवर असायला हवीच.’’
‘‘शिक्षेची टांगती तलवार हवीच.’’ कशासाठी तर शिकण्यासाठी आणि जबाबदारीनं वागण्यासाठी?
माझ्या मनात आलं, ‘काय करून ठेवलं आपण हे?’ आमच्या नकळत आमच्याच हातून होणार्या या मानसशास्त्रीय प्रयोगातला ‘बळीचा बकरा’ आता स्वतःच सांगतोय, ‘‘तलवार हवीच हं, त्याशिवाय आम्ही जबाबदारीनं कसे वागणार?’’
(…) शिकायचं कशासाठी?
शाळेत जायचंच कशासाठी? अभ्यास करायचा कशासाठी? शाळेत गणवेश घालून का जायचं? वाचनालयाची पुस्तकं वेळेवर का परत द्यायची? एवढंच नाही तर, समोरच्या काचेवर दगड का मारायचा नाही? बागेतील फुलंपानं का ओरबाडून काढायची नाहीत? अंगातून काढलेले कपडे तस्सेच ‘ळ’ ‘क्ष’ च्या आकारात पडून द्यायचे का नाहीत? यासारख्या प्रश्नांबद्दलचंही मुलांचं मत ‘केलं नाही तर शिक्षा मिळते, रागावतात’ यासारखं येताना दिसतं. मग आपला आपल्यालाच प्रश्न पडतो, की जबाबदारीची जाणीव आणि शिक्षणाची ओढ या मुलांपर्यंत पोचवण्यात आमचं काही चुकलं का? खरंच आहे. आपण सर्व पालक शिक्षकांनी हे पूर्वीच मान्य केलेलं आहे की, ज्यांना वर्तनसमस्या असलेली मुलं मानतात, त्यातली खरी समस्या त्यांना वाढवणार्या पालकांच्या वर्तनात असते.
(…) ज्यांना बक्षीस मिळालं, त्यांना त्यातून बक्षिसाशिवाय आनंद, आत्मविश्वासही मिळाला ही गोष्ट जशी बरोबर आहे, तशीच त्याची दुसरी बाजूही, ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचं काय? त्यांना न मिळालेल्या बक्षिसासोबत एक कटू प्रसंगाचा ओरखडाही उमटला असेल का? त्यांचा आत्मविश्वास आणि उमेद खच्ची झाली असेल काय? आणि त्याचा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर, जीवनधारणेवर काही परिणाम राहून गेला असेल का असाही विचार करूया. आणि बक्षीस मिळवणारांहून न मिळवणारांची संख्या बरीच जास्त असते. अशी काही उदाहरणं तुम्हाला आसपास दिसतात का? विशेषतः अशा व्यक्ती आपल्या स्वतःच्या मुलांबद्दल, त्यांना मिळणार्या बक्षिसांबद्दल अगदी परीक्षेतल्या गुणांबाबतीतही अतिशय हळवी आणि हट्टी असल्याचं जाणवतं का?
(…) परितोषिकांच्या-स्पर्धांच्या-या आजच्या सोसाट्यात आणखी एक मोठी कमतरता मानवी विचारांमध्ये राहून जातेय असं मला वाटतं. मानवी संबंधांची, एकमेकांशी असणार्या नात्याची किंमत आपल्याला पारितोषिकांहून कमी वाटू लागते. एकाच बक्षिसासाठी प्रयत्न करणार्यांना तर एकमेकांबद्दल मत्सर न वाटेल तरच नवल. समाजरीतीत याचं प्रदर्शन करण्याची कल्पना अयोग्य म्हणून तसं दाखवलं नाही तरी, अनेक आत्मचरित्रांतून, अनुभवकथनांमधून लोकांनी हे कबूल केलेलं आहे की सहाध्यायी मित्राबद्दल, भावाबहिणींबद्दल मनामध्ये फार मत्सर असायचा, तो वागणुकीत कमी यावा असा प्रयत्न केला तरी वर डोकावायचाच. प्रत्येक ठिकाणी असतात तसे अपवाद इथेही दिसतात पण त्या अपवादाचं दुसरं टोकही दिसतं. तिथे हा मत्सर, ही तुलना फक्त शिक्षण काळापर्यंत मर्यादित राहात नाही, तर तो जीवनाचा उद्देश बनतो. कुणा एका दुसर्याहून श्रेष्ठ ठरावं, सन्मान मिळावेत म्हणून आयुष्यभर तळमळणं नशिबाला येतं. ते नशीब योगायोगाचं नसतं, आपल्याच वागणुकीनं वाहून आणलेलं असतं.
नातेसंबंध बिघडण्याच्या सामाजिक रोगाचं फार मोठं कारण या बक्षीस – आमिषांच्या परिणामांत आढळतं. समवयी व्यक्तींमध्ये जसे हे संबंध बिघडतात तसे पालक-पाल्य, शिक्षक-विद्यार्थ्यांमध्येही बिघडलेले दिसतात. आपल्यावर टाकलं गेलेलं हे ‘अमुक बक्षीस मिळव’ ‘तमुक गुण मिळव’ यासारखं अपेक्षांचं ओझं पत्करलं तरी मनात स्वीकारलं जात नाही. पालकांच्या किंवा शिक्षकांच्या संपूर्ण कब्जात असणारं मूल मग या अपेक्षांना पुरं पडण्यासाठी खोटेपणा करतं. परीक्षेत कॉपी करणं, प्रगती पुस्तकावर गुण बदलणं, किंवा दुसर्याचं काम नकळत खराब करून ठेवणं असे प्रकार आपण पाहातो, त्यांच्या मुळाशी मुलाची अगतिकताच असते.