‘बालसाहित्य’ असे काही असते का?

लहान मुलांसाठी असे स्वतंत्र साहित्य असते का आणि असावे का? मुलांसाठी विशेष अशी कादंबरी, मुलांच्यासाठी वेगळ्या कथा किंवा नाटके असू शकत नाहीत ही कल्पना साठीच्या दशकात पश्चिामी राष्ट्रांतून पुढे आली. त्यामागचे म्हणणे योग्य होते, ते असे की मुलेसुद्धा माणसेच आहेत, कोणी वेगळी नाहीत.

मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या कादंबर्याआ – गलिव्हरच्या सफरी आणि रॉबिन्सन क्रूसो हा त्याचा सबळ पुरावा होता. ह्या मुळात मुलांसाठी नाही तर प्रौढांसाठी लिहिल्या गेल्या. नंतर त्या दोन कादंबर्यां ना मुलांमधे मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्यांच्याकडे मुलांकरिता लिहिलेल्या कादंबर्याा म्हणून पाहिले जाऊ लागले. अनेक लोक ह्यात डॉन क्विक्झोट ह्या कादंबरीचाही समावेश करतात. परिणामत: असे मानले जाऊ शकले की मुलांसाठी विशेष वेगळ्या कांदबर्याग लिहिण्याची गरज नाही.

मात्र या कल्पनेला दोन-तीनच उदाहरणांचा आधार होता. आणि लहान मुलांसाठी म्हणून विशेष लिहिली गेलेली आणि त्यांच्यात प्रिय झालेली शेकडो पुस्तके आहेत ह्या वस्तुस्थितीकडे संपूर्ण दुर्लक्ष होते. पण दुसर्याम बाजूला असेसुद्धा दिसते की प्रौढांसाठी लिहिण्यात आलेली लक्षावधी पुस्तके आहेत ज्यांच्याबद्दल लहान मुलांना थोडाही रस वाटत नाही. म्हणूनच, विशेष बालसाहित्याच्या निर्मितीची गरज नसल्याच्या मताचे (मुद्याचे) खंडन करणे सोपे आहे.
लहान मुले ‘ही सुद्धा’ माणसंच आहेत असं म्हणणं हे बालकांना, त्यांच्या क्षमतेला कमी लेखणारं आहे. त्यामुळे पुढे जाऊन मुलांसाठी लिहिणं ही फारशी गांभीर्यानं घ्यायची गोष्ट नाही, त्यासाठी कौशल्याची फारशी आवश्यकता नाही असाच सर्वसाधारण समज प्रचलित झालेला दिसून येतो.

मानवी जीवनात बालवय आणि प्रौढत्व ह्या दोन अवस्थांत निर्विवाद फरक असतो आणि म्हणूनच त्यांच्यासाठीच्या वाङ्मयातसुद्धा फरक अपरिहार्य आहे. मुले आणि प्रौढ ह्यांना अवकाश आणि कालाचे आकलन कसे होते ह्यातही स्पष्ट आणि निश्चियत भिन्नता असते. हे एकदा मान्य केल्यानंतर त्यांचे साहित्याचे आकलन सारखे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पृथ्वीतलावरील एकाही सजीवास माणसाएवढे प्रदीर्घ बालपण लाभलेले नाही. मांजरांचे सरासरी आयुर्मान आठ वर्षांचे असते, त्यांचे बालवय केवळ चार महिन्यांचे असते किंवा संपूर्ण आयुर्मानाच्या एक चोविसांशच असते. कुत्र्यांचे बालपण त्यांच्या आयुष्याचा जवळपास विसावा हिस्सा व्यापते. इतर सर्व सजीवांत हत्तीपासून ते चिमणीपर्यंत त्यांचे बालपण हे त्यांच्या आयुष्यमानाचा नगण्य हिस्सा व्यापते. घोड्याचे शिंगरू जन्मानंतर काही तासातच स्वतःच्या पायावर उभे राहते. ह्याउलट माणसाचे बाळ जन्मानंतर तब्बल एक वर्षाने पराकाष्ठेने आणि डुगडुगत चालू लागते.

माणसाचे सरासरी जीवनमान साठ वर्षांचे असते; तर त्याचे बालपण किती काळाचे असते? माणसाची बाल्यावस्था साधारणत: वयाच्या अठराव्या वर्षांपर्यंत संपत नाही आणि तेसुद्धा चार अवस्थांतून गेल्याशिवाय नाहीच. ०-६ शैशव, ६-९ बालवय, ९-१२ कुमारवय, १२-१८ नवतारूण्य. साठ वर्षांच्या आयुर्मर्यादेपैकी ही १८ वर्षे म्हणजे जवळपास १/३ हिस्सा असतात. अशा प्रकारे मानवी जीवनात बालपण हे खरोखरच प्रदीर्घ असते. (आणि जर आपण पुढे एखाद्याच्या चरितार्थ कमावण्याच्या व स्वयंपूर्ण आयुष्य जगण्याच्या क्षमता अंगी येण्याची दखल घेणार असू तर हा विचाराधीन कालावधी २५-३० वर्षांपर्यंत विस्तारतो म्हणजे मानवी जीवनमानाच्या जवळपास अर्धा हिस्सा तो व्यापतो).

बालवयाच्या तुलनेत प्रौढत्व आणि वार्धक्य तुलनेने कमी कालावधीचे असते.

बालवय हे प्रदीर्घ मुदतीचे असल्याने लहान मुलांसाठी आणि प्रौढ व्यक्तीसाठी वर्षभराचा काळ सारखा नसतो. लहान मुलांसाठी एक वर्ष खूपच काळ रेंगाळते. आपल्याला हे आपल्या स्वत:च्या अनुभवावरूनच समजू शकते. जसं की बाल्यावस्थेत सुटीचे दिवस संपता संपत नाहीत. तर प्रौढत्वात सुटीचे दिवस निमिषार्धात संपतात. बालवयात एकेक तास वर्षभर रेंगाळतो. प्रौढांसाठी एक वर्ष एका दिवसासारखे संपते.

याचा अर्थ लहान मुले आणि प्रौढांच्या काळाच्या जाणिवेत तफावत असते.

मुलांच्या आणि प्रौढांच्या अवकाशाच्या जाणिवेतील फरक कळण्यासाठी मोठ्यांनी त्यांच्या बालपणातल्या शाळा, खेळांच्या जागा यांना एकदा भेट द्यावी. बालवयात आपल्याला त्या सर्व जागा, गोष्टी मोठ्या-मोठ्या दिसतात. खोल्या, पलंग, जिने, बागा, घराभोवतालचे आवार, शाळा, वर्ग, अवाढव्य आणि प्रशस्त दिसतात. आपल्याला बालपणातल्या त्या कल्पनांचे मोठेपणी आश्चर्यच वाटते-इतके आपले अंदाज चूक होते? पण हा भ्रमनिरास म्हणजे सगळी आपल्या ‘बाल’पणाचीच गफलत !

अवकाशाचा आवाका लहानपणी आणि मोठेपणी वेगळाच असतो. हा फरक केवळ स्थळ-काळाच्या जाणिवेपुरता मर्यादित म्हणता येणार नाही. स्थळकाळापलीकडचं त्यांचं आंतरिक विश्व वेगळंच असतं. त्याच एका जगात असूनही लहान मुले आणि प्रौढ हे प्रत्यक्षात वेगळ्या जगात जगतात. कारण त्यांचे त्या जगाचे आकलन भिन्न असते. ह्यामुळेच पालक आणि शिक्षकांना लहान मुलांशी संवाद साधणे खूपच कठीण होते. लहान मुलांचं एक विश्व असतं तर मोठ्यांचं वेगळंच. मुलं वेगळी स्वप्नं पाहतात, वेगळेच विचार करतात. घडणार्या गोष्टींमधे तिसरेच काही पाहतात. कारण त्यांच्या संवेदना, मान-अपमान, अंदाज, प्रेम वेगळंच असतं. ती वेगळ्याच मनोविश्वात वावरत असतात.

एका वेगळ्याच विश्वाचे रहिवासी असल्याने ती साहित्याकडेसुद्धा अगदी वेगळ्या रितीने पाहतात. हे ह्या संदर्भात फार महत्त्वाचे आहे. या संदर्भात काही वाङ्मयकृतींना मुले आणि प्रौढ दोघांकडून सारखी वाहवा मिळते हे आश्चर्यच आहे. ह्याची कारणप्रणाली अशी आहे की ‘गलिव्हरच्या सफरी’ किंवा ‘रॉबिन्सन क्रूसो’ ह्यांसारखी पुस्तके प्रौढांच्या आणि मुलांच्या, दोघांच्याही विश्वाला हात घालतात.

प्रौढांसाठी लिहिण्यापेक्षा मुलांसाठी लिहिणे फार कठीण असते असे नेहमी म्हणले जाते. असे का? तर लेखक प्रौढ असल्याने मुलांपेक्षा वेगळ्या विश्वात राहात असतो. आपल्या बालपणापासून दूर गेल्याने कदाचित बालपण विसरून सुद्धा गेलेला असतो. मुलांच्या खास विश्वात शिरून त्यांच्यासाठी लिहिणे परग्रहावरील रहिवासी वाटणार्या् कुण्या जिवासाठी लिहिण्यासारखे असते. अशा परिस्थितीत लेखकाने त्याच्या विश्वाच्या सीमा तोडून पलीकडे गेले पाहिजे. लहान मुलांच्या विश्वात स्थलांतर केले पाहिजे. हे कसे जमेल? काही लोक आग्रह धरतात की लेखकाने लहान मुलांच्या पातळीवर उतरले पाहिजे. माझ्या दृष्टीने ही चुकीची, अतर्क्य, अशक्य कल्पना आहे. मुलांचा खेळ प्रौढांनी खेळावा, त्यांची नक्कल करावी तसं होईल. हे अस्वाभाविक असल्याने अशा प्रकारे लिहिली गेलेली कृती, साहित्य, अनैसर्गिक आणि कृत्रिमपणे रचलेली होईल.

बालवाङ्मय लिहिण्यासाठी त्यांच्या भौतिक आणि आंतरिक विश्वाचा तपशिलात जाऊन काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. मुलांसाठी लिहिणे हे सर्वप्रथम एक तंत्रशुद्ध कार्य आहे. एखाद्या संशोधनासारखे हे तांत्रिक काम असल्याने ते करण्यास शिकता येते. जसे नाट्यलेखनाचे कौशल्य आत्मसात करता येते. कविता, कादंबर्याा, आणि कथांची गोष्ट वेगळी. कोणतेही प्रशिक्षण किंवा अध्ययन त्यासाठी उपयोगी पडू शकत नाही.

लहान मुलांसाठी लिहिताना मात्र तंत्र फार महत्त्वाचे असते. अर्थात एखाद्याने असे कौशल्य आत्मसात केले तरीही ती व्यक्ती चांगली नाटके किंवा चांगले बालवाङ्मय निर्माण करीलच असे म्हणता येणार नाही. पण दर्जेदार गुणवत्तेच्या वाङ्मयकृती निर्माण करण्यासाठी तंत्रावर प्रभुत्व मिळवणे अनिवार्य आहे.

लहान मुलांच्या विश्वात प्रवेश करणे कठीण आहे. कारण त्या विश्वाची कोणतीही सुस्पष्ट सीमारेषा अस्तित्वात नाही. जर असती तर लेखकांचे काम सोपे झाले असते. परंतु मानवी जीवन आणि मानवी विश्व हे गतिमान असतं. त्यांच्या सीमारेषा इतक्या घनिष्टपणे एकमेकांत गुंफलेल्या असतात की प्रत्यक्षात त्या ओळखूच येत नाहीत. एवढेच नव्हे तर बालकांचे विश्वसुद्धा अचल नसते. मुलांची वयोगटांत विभागणी ही काहीशी कृत्रिमच आहे. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे हे जग सातत्याने बदलत आहे आणि त्यात घडणारे कोणतेही बदल हे ताबडतोब ओळखू न येणारे असतात. ह्याचप्रमाणे माणसेसुद्धा नकळत बदलतात, लहान मुलांच्या जगातून प्रौढांच्या जगात प्रवेश करतात. ह्या एकाच अर्थाने प्रौढ हा लहान मुलांच्या विश्वाशी संपूर्णत: अपरिचित नसतो.

लहान मुलांची विविध वयोगटांत विभागणी ही जरी थोडीशी कृत्रिम वाटली तरी ती करावी लागते. तसंच लहान मुलांसाठी गोष्टी लिहिताना त्यांच्या विश्वात मान्य होईल अशा तंत्राचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांचे नाटक लिहिणे हे तर दुहेरी आव्हान आहे :- येथे तुमचं नाटक लिहिण्याच्या आणि लहान मुलांसाठी संवाद रचण्याच्या तंत्रावर प्रभुत्व असावे लागते. अन्यथा तुम्ही चांगले बालनाट्य लिहिणे केवळ योगायोगानेच घडेल. आपले ध्येय हे केवळ योगायोगावर विसंबून न राहता, जाणीपूर्वक लिहायला शिकण्याचे आणि ते काम फत्ते करण्याचेच आहे.