वेदी – लेखांक – १

Magazine Cover
लेखकाविषयी थोडेसे…..

‘वेदी’ हे लहानपणातल्या आठवणींचं संकलन आहे. सुप्रसिद्ध लेखक वेद मेहता यांचं लहानपणचं लाडाचं नाव वेदी. वेदी पाच वर्षांचा सुद्धा नव्हता तेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी लाहोरहून मुंबईला शिकायला पाठवलं. घरापासून तेराशे मैल लांब. वेगळं हवापाणी, वेगळी माणसं, वेगळी भाषा, वेगळे आवाज, वेगळे स्पर्श या सगळ्यांशी त्याला जुळवून घ्यावं लागलं. हे आवाज, स्पर्श महत्त्वाचे कारण वेदी अंध मुलगा होता. चवथ्या वर्षी त्याला मेनिनजायटिस झाला आणि त्यात त्याची दृष्टी गेली. त्याचे वडील डॉक्टर होते. इंग्लंडला राहून शिकून आलेले. वेदीनं इतर अंध माणसांसारखं दीनवाणं आयुष्य जगावं असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांच्या इतर चार मुलांसारखाच वेदी आत्मनिर्भर असावा असं त्यांना वाटायचं. त्यांचा पत्र संपर्क झाला श्री. रासमोहन यांच्याशी. ते कुटुंबवत्सल बंगाली ख्रिश्चन होते. शिवाय अमेरिकेतील अंधशिक्षणसंस्थेतून शिकून आले होते. ते होते म्हणून वेदीच्या वडिलांनी – डॅडीजींनी दादर स्कूल फॉर ब्लाईंड ही शाळा त्याच्यासाठी निवडली. त्याच्या आईचा म्हणजे ममाजींचा विरोध होता तरी. ती शाळा कसली ! ते खरं म्हणजे अनाथ अंध मुलामुलींचं वसतिगृह होतं, जेमतेम सोयीसुविधा असलेलं. पण वेदीच्या वडिलांना त्याची खरीखुरी कल्पना आली नाही. आणि अंधांसाठी एवढ्या शाळा तरी भारतात होत्या कुठे! मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी मन घट्ट करून त्याला तिथे पाठवलं.
शाळेत सुरवातीला वेदी एकटा पडला. तो फक्त पंजाबी बोलायचा. बाकी सगळे मराठी बोलायचे आणि हेडमास्तरांनी तर त्याला इंग्रजी शिकवण्याचा चंगच बांधला होता. शिवाय त्याच्या आणि इतर मुलांच्या परिस्थितीत आणि वयातही खूप फरक होता. वेदी एक सुखवस्तू, सुसंस्कृत पंजाबी कुटुंबातला होता. त्यामुळे त्याचे कपडे चांगल्या प्रतीचे होते. तो पायात बूट घालायचा. त्याच्यासाठी झोपायला नरम गादी आणि पलंग होता. तो हेडमास्तरांबरोबर जेवणखाण करायचा. इतर मुलं तर रस्त्यावरून गोळा करून आणलेली गरीब अनाथ मुलं होती. वयानंही मोठी होती. वेदीला हे असं कुणाकडे तरी सांभाळायला पाठवून देणं म्हणजे विचित्रपणाचं वाटेल कदाचित. पण वेदी त्यातून खूप शिकला. आईवडिलांविना भावंडांविना राहणं, ओळखीच्या चवी, आवाज, वास यांच्याविना राहणं आणि इतरही खूप काही. सर्वसामान्य मुलं ज्या वयात स्वयंपूर्ण होऊ लागतात त्याच्या कितीतरी आधी, अंध वेदी स्वयंपूर्ण व्हायला शिकला. तो इंग्लिश ब्रेल वाचायला आणि लिहायला शिकला. बेरीज, वजाबाकी करायला शिकला. सगळी मुलं जे जे खेळ खेळतात ते शिकला. काही खेळांमध्ये मास्तरांनी अंधांना सोयीचे होतील असे बदल केले होते. तेही शिकला. या सगळ्यातून वेदी इतर मुलांशी जुळवून घ्यायला शिकला. पण सगळंच काही छान छान नव्हतं. आजारपणं होती. वसतीगृहात राहणारी सगळी मुलं करतात तशा पोरवयातल्या खोड्या, धाडसं आणि चुका होत्या. त्याचे परिणाम म्हणून हेडमास्तर किंवा ‘डोळस मास्तर’ म्हणजे वसतिगृहाचे प्रमुख, कडक शिक्षा करीत ती भोगावी लागे.
दुसरं महायुद्ध जोर धरणार असं वाटत असताना वेदी घरी परत गेला. शाळेत येताना जसा तो परिस्थितीचा बळी होता तसाच परत जातानाही होता. परंतु जे शिक्षण मिळालं त्यातूनच पुढे अर्थपूर्ण जीवनाची संधी चालून आली आणि वेदीनं ती हातची जाऊ दिली नाही.
‘वेदी’ हा वेद मेहतांच्या लहानपणातल्या सर्वसामान्य आठवणींचा संग्रह आहे. शोध घेण्याचा, परिस्थितीशी जुळवून घेण्याचा संघर्ष, लाड-प्रेम मिळवण्याचा प्रयत्न, खेळणं, स्वप्नं बघणं या सगळ्या सर्वसामान्यपणे बालपणात येणार्या अनुभवांची मालिका आहे. पण तसं पाहिलं तर वेदी पाचव्या वर्षीच मोठा झाला. सगळ्या मुलांबरोबर राहात असूनही वेगळं असणं म्हणजे काय ते त्याला शाळेत जाणवलं. आणि घरातल्यांबरोबर राहात असूनही वेगळं असणं म्हणजे काय ते तो घरात शिकला. या कथनात दोन आवाज सारखे जाणवतात. एक लहान मुलाचा आणि एक प्रौढ माणसाचा. जेव्हा मूल बोलतं तेव्हा गंभीर प्रसंग बालसुलभ आणि मजेशीर वाटतात. जेव्हा प्रौढ बोलतो तेव्हा साधे प्रसंगसुद्धा उदास, गंभीर वाटतात. मोठं झाल्यावर जुन्या आठवणींचा पुर्नविचार केलाय आणि वर्तमानकाळ, भूतकाळ यांचा सुरेख मिलाफ करत ही आत्मकथा प्रवाही भाषेत सांगितली आहे.
वेद मेहता यांचा जन्म १९३४ साली भारतात झाला. परंतु १९४९ सालापासून ते इंग्लंड, अमेरिकेत राहत आहेत. त्यांचं शिक्षण अमेरिकेत अरकानसॉ स्कूल फॉर ब्लाईड येथे झालं. त्यानंतर पोमोना कॉलेज, बलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड, हार्वर्ड येथे पुढील उच्च शिक्षण झालं. १९७५ साली त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं. १९५७ सालापासून ते अमेरिकन, ब्रिटिश आणि भारतीय प्रकाशनांसाठी लिहीत आहेत. १९५९ पासून ते ‘द न्यूयॉर्कर’ साठी लिहीत आहेत. त्यांना अनेक अभ्यासवृत्त्या आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. त्यांची आतापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातली काही आत्मचरित्रात्मक आहेत, काही परिचयातल्या व्यक्तींची शब्दचित्रं आहेत, काही भारतातल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीबद्दलची आहेत. अशी विपुल ग्रंथसंपदा असलेल्या वेद मेहता यांची बालपणात मराठीशी झालेली तोंडओळख आणि त्या वेळच्या आठवणींचं कथन मराठी वाचकांना नक्की भावेल.

अनाथाश्रम

मला आगगाडीची शिट्टी चांगलीच आठवते. भसाभस वाफ सोडत वाजलेली शिट्टी. डॅडीजींनी माझे इवले हात त्यांच्या हातात घेऊन जोडले आणि निरोपाचा नमस्कार केला. मला उचललं आणि गाडीच्या डब्याच्या खिडकीतून प्रकाशदादाच्या ताब्यात दिलं. ‘‘तू आता मोठा माणूस झालास बरं का’’, ते म्हणाले. हे त्यांचं वाक्य म्हणजे माझ्या आठवणीची सुरुवात करून देणारं, एक खूप ठसठशीत महत्त्वाचं वाक्य. माझ्या नशिबाची रेघ असल्यासारखं ते वाक्य मला नंतरही खूप वेळा, पुन्हा पुन्हा आठवायचं. गाडी अगदी सुटणारचं होती तेवढ्यात प्रकाशदादानी मला खिडकीतून बाहेर वाकवलं. माझ्या आईला पटकन माझी पापी घेता यावी म्हणून.
ममाजी म्हणजे माझी आई, डॅडीजी म्हणजे माझे वडील आणि प्रकाशदादा म्हणजे माझा आतेभाऊ. आगगाडीत बसून जाण्याचा हा प्रसंग डॅडीजींना नंतर आठवायचा तो फेब्रुवारीतल्या गारव्याबरोबरच. ममाजींना मात्र थंडीचं काही भानच नव्हतं कारण मला त्यांनी घट्ट जवळ धरलं होतं आणि माझ्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या मानेवर ओघळत होते. माझं काही तरी भयंकर होणार आहे असं मला वाटत असणार. ‘‘वेदी अजून पाच वर्षाचासुद्धा नाहिये. तो अंधशाळेत जायला अजून फार लहान आहे हो !’’ आई रडवेली होऊन म्हणाली. तर डॅडीजी म्हणाले ‘‘त्यानं कायम तुझ्या पदराला धरून राहावं असं वाटतंय का तुला? का त्यानं स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवलेलं आवडेल?’’

तिला आठवायचं… खरं तर तिला म्हणायचं होतं, ‘‘त्यानं काय व्हावं, काय करावं ते काही मला माहीत नाही.’’ पण ती पक्की पारंपरिक भारतीय पत्नी असल्यामुळे काही बोलली नाही… आणि आगगाडीनं शिट्टी मारली.
गाडीनं वेग घेईपर्यंत आणि उघड्या खिडकीतून त्या वेगात तालात आवाज येईपर्यंत मला खरं तर कळलंच नाही की मी कुठं तरी दूर चाललो आहे. मी डॅडीजी आणि ममाजींना हाका मारू लागलो. मी रडरड रडलो. मग झोपलो आणि मग विसरलो. परत आठवण झाली. मी सीटच्या गादीवर लाथा झाडल्या. गाडीच्या भिंतीवर बुक्क्या मारल्या. मी रडलो. मी झोपलो. मी उठलो. तेव्हा प्रकाशदादा म्हणत होता ‘‘वेदी, ही एक्सप्रेस ट्रेन आहे बरं का !’’ प्रकाशदादा माझ्या एकुलत्या एक आत्याचा मुलगा. तो चित्रपटांसाठी लेखन करायचं काम मिळवायला मुंबईला निघाला होता. तो लाडानं मला ऍक्टर म्हणायचा. तो माझ्या डॅडीजींवर अगदी स्वतःच्या वडिलांसारखं प्रेम करायचा. मी, माझ्या बहिणी आणि भाऊ त्याला सख्खा मोठा भाऊच मानायचो. मी त्याचा खूप लाडका होतो. पण मला सांभाळायचं काम मात्र त्याला आवडायचं नाही. त्याचं लग्न बिग्न झालेलं नसल्यानं लहान मुलांचं काय करायचं ते त्याला काही माहीतच नव्हतं. तो सारखा म्हणायचा ‘‘ऍक्टर तू का रे रडतोस?’’ आणि ‘‘तुला शू करायला जायचंय का?’’ पण मला सारखंच शू करायला जायचं असायचं आणि मला सारखंच ग्लुकोज बिस्किट हवं असायचं.
मला वाटतं आम्ही एक रात्र एक दिवस यापेक्षा थोडा जास्त वेळ आगगाडीत होतो. उघड्या खिडकीतून भरारा वारा येत होता आणि याबरोबर इंजिनाच्या धुरातली काजळी आणि धूळ याचे थर माझ्या केसांवर अंगावर, कपड्यांवर, सीटवर साठत होते. मला आठवतं एका स्टेशनात गाडी थांबली तेव्हा प्रकाशदादानं उघड्या खिडकीतून बाहेरच्या फेरीवाल्याकडून बडीशेपेच्या गोळ्या माझ्यासाठी घेतल्या होत्या. त्या गोळ्या खाताना मी खुशीतच आलो होतो आणि प्रकाशदादा मला किती आवडतो त्याचा विचार करत होतो, ते आठवतंय मला.

मुंबईच्या व्हीटी स्टेशनवर उतरलो आणि छपरी टांग्यात बसलो. दादा त्याला व्हिक्टोरिया म्हणत होता. मी अशा छप्पर असलेल्या टांग्यात कधीच बसलो नव्हतो. पण मला चांगलाच प्रश्न पडला… स्टेशनचं आणि टांग्याचं नाव सारखंच का आहे बरं ! मी दादाला विचारलं तर त्यानं लक्षच दिलं नाही. तो पेपर वाचण्यात गढून गेला होता. मी त्याच्या हातातून पेपर हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला. ‘‘डॅडीजी सगळ्या गोष्टी समजावून सांगतात.’’ मी ओरडलो. ‘मला घरी घेऊन जा’, म्हणून खूप आरडा ओरडा केला पण त्यानं लक्षच दिलं नाही.

शेवटी कपड्यावरची काजळी झटकत तो म्हणाला ‘‘शाळा ! ऍक्टर – तिथे तुला लिहायला वाचायला शिकवतील छान छान शाळेत तुला खूप मजा येईल.’’ असं तो म्हणत असताना व्हिक्टोरिया हळू हळू थांबू लागली. व्हिक्टोरियावाला म्हणाला, ‘‘हाच तो भाग साहेब.’’

उघडी गटारं आणि गिरण्यांनी गजबजलेला तो मुंबईचा भाग बघून प्रकाशदादाला जरा आश्चर्यच वाटलं. तसं त्यानं नंतर मला सांगितलं. या भागात झोपडपट्टी होती. कशी तरी उभी केलेली, लाकडी, टपरीवजा दुकानं होती आणि दोन मोठ्ठ्या कापड गिरण्या होत्या. गिरण्यांच्या भोवती भक्कम, उंच दगडी भिंती होत्या. मधे येण्याजाण्यापुरते प्रचंड लोखंडी दरवाजे. त्यांच्यावरही काटेरी तारेची वेटोळी लावलेली. अगदी काहीही, कुणीही सहज आत जाऊ नये म्हणून पक्का बंदोबस्त होता. गिरण्यांचा डोक्यावर होती भकाभका धूर सोडणारी उंच नळकांड्यासारखी धुराडी. सगळीकडे धुरकट वास भरून राहिला होता. हे दादर म्हणजे जणू आगगाडीचा एक डबाच होता.

व्हिक्टोरियावाल्याला माझी शाळा म्हणजे एक कसलीशी वस्तीच वाटली आणि तो चुकून थोडा पुढेच गेला. हेही मला प्रकाशदादानं नंतर कधी तरी सांगितलं. शाळा म्हणजे एक चिंचोळी तीन मजली राखाडी रंगाची दगडी इमारत होती. त्यावर एक छोटासा टॉवर होता. ही शाळा दोन गिरण्यांमध्ये घुसवून ठेवल्यासारखी मधेच बांधलेली होती आणि शिवाय तिसर्या बाजूला होती मोडकळीला आलेली विटांनी बांधलेली चाळ, तिथल्या खिडक्यांमधून वाळत घातलेले कपडे लोंबत होते. तरी शेवटी व्हिक्टोरियावाल्यानं बरोबर शाळेच्या दारात आम्हाला आणलं. आम्ही खाली उतरलो आणि प्रकाशदादानं गाडीवानाला थांबायला सांगितलं. आपण बरोबर ठिकाणी आलोय याची प्रकाशदादाला तरीही खात्री वाटत नव्हती. तेवढ्यात त्याला वर लावलेली पाटी दिसली.

देवाच्या दयेने
१५ जानेवारी, १९२० रोजी शाळेचे उद्घाटन माननीय श्रीमती लॉईड यांच्या हस्ते झाले. सरकारने देऊ केलेल्या जागेवर ही संस्था उभी आहे. अनेक देणगीदार, मित्रमंडळी आणि मुंबई सरकार यांनी खर्चाचा अर्धा अर्धा वाटा उचलला आहे. त्यापुढे वास्तुरचनाकार, मुख्याध्यापक आणि इतर अधिकार्यांची नावं लिहिलेली होती.

दरवाज्याच्या आत तिकिटासारखं चिमुकलं अंगण होतं आणि त्यापुढे एक व्हरांडा होता. तिथून आवाज येत होते, फरसबंद जमिनीवरून हलवलेल्या पितळी भांड्यांचे आणि माणसांच्या उठण्याबसण्याचे. मला न समजणार्या भाषेत पुरुषांच्या आवाजात आम्हाला भराभर अनेक प्रश्न विचारले गेले. (ती मुंबईची मराठी भाषा होती.) ती भाषा मजेशीरच होती. अगदी लहान मुलांच्या बोबडभाषेसारखी वाटली. पण बोलत तर होती चांगली आवाज फुटलेली मोठी माणसं. लाहोरला एका प्रदर्शनात मी भुतांसारखे भीतीदायक आवाज ऐकले होते त्याची आठवण झाली. (‘‘तू आता मोठ्टा माणूस झालास !’’ हे तर माझ्या चांगलं लखलखीतपणे लक्षात राहिलं होतं. इतरही अनेक शब्दाविना असलेल्या आठवणी होत्याच.)
‘‘हे लोक असे काय बोलताहेत?’’ मी प्रकाशदादाला विचारलं.
‘‘चांगला धीट मुलगा दिसतोय,’’ कुणीतरी मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणालं. माझी मातृभाषा पंजाबी होती पण मला हिंदी कळत असे. आमच्याकडचे नोकर आणि फेरीवाले हिंदीच बोलायचे.
‘‘हा इथला नवा विद्यार्थी आहे.’’ प्रकाशदादानं हिंदीत सांगितलं आणि काय सांगू! अनेक हात मला स्पर्श करू लागले. त्यांच्या त्या स्वागत करण्याच्या पद्धतीनं मला मात्र गुदगुल्या झाल्या. तुमची जेवायची वेळ आहे का, असं प्रकाशदादानं त्यांना विचारलं. मग काय उत्तरांचा नुसता गलकाच झाला. ‘‘आज शनीवार आहे.’’ ‘‘आज तुम्हाला मोठ्टी खाऊ खायची सुट्टी असते.’’
‘‘तुमचे अमेरिकेत शिकून आलेले हेडमास्तर श्री. रासमोहन कुठे आहेत?’’ प्रकाशदादानं विचारलं.

एका मुलानं आम्हाला जिन्यावरून वर नेलं. तिथे एक व्हरांडा होता. तिथल्या दारातून एका खोलीत नेलं. माझ्या ममाजींसारख्या उंच किनर्या आवाजात एक माणूस खाली वाकून मला काही तरी म्हणाला पण त्याची भाषा काही मला कळाली नाही. (तो माणूस म्हणजे श्री. रासमोहन होते. आणि ते इंग्रजी भाषेत बोलत होते.) श्री. रासमोहन यांना वाटलंच नव्हतं की त्यांच्याशी झालेल्या थोड्याशा पत्र व्यवहाराच्या आधारावर माझे आईवडील मला खरंच त्यांच्या शाळेत पाठवतील. हे त्यांना नंतर आठवत असे. चांगल्या सुखवस्तु आणि प्रतिष्ठित घरातली माणसं एका जेमतेम पाच वर्षाच्या अंध मुलाला तेराशे मैलांवरच्या इतक्या दूरवरच्या शहरातल्या शाळेत पाठवतील हे त्यांना खरंच वाटत नव्हतं. त्यातून इथली भाषा, हवामान, खाणंपिणं सगळंच वेगळं! मराठी भाषा बोलणार्या मुलांच्या अनाथाश्रमात सधन, पंजाबी घरातलं मूल कसं राहील याबद्दल पत्र व्यवहारात फारच थोडं लिहिलं गेलं होतं. (त्या शाळेत साधारण चाळीस गरीब, निराधार मुलं राहात होती. जवळजवळ सगळ्यांच्याच पालकांचा पत्ता नव्हता.) आणि अचानक त्यांनी मला प्रकाशदादाबरोबर त्यांच्या बैठकीच्या खोलीत येताना पाहिलं. मी अगदी सर्वसामान्य डोळस मुलांसारखा दिसतोय हे पाहून ते अवाक झाले. मी कदाचित शाळेत प्रवेश घेणारा मुलगा नसेन असंसुद्धा त्यांना क्षणभर वाटलं. मला थोडंसं तरी दिसत असणार असं त्यांना वाटत होतं. आंधळ्या मुलाचे इतके साधेसुधे दिसणारे डोळे, चेहर्यावरचा मोकळा आनंदी भाव त्यांनी पूर्वी कधी पाहिलाच नव्हता असं ते म्हणाले होते.

‘‘या मुलाचं हसणं फारच मनमोहक आहे.’’ श्री. रासमोहन मजेशीर हिंदीत म्हणाले.
ते माझ्याबद्दल बोलताहेत हे मला कळलंच नाही. तेवढ्यात एका बाईंनी मला उचलून कडेवर घेतलं आणि म्हणाल्या, ‘‘तुझं हसू किती गोड आहे रे !’’ ती श्री. रासमोहन यांची बायको होती.
त्यांनी असं म्हटल्यावर प्रकाशदादानं माझ्याकडे पाहिलं. माझ्या हसण्यात विशेष असं काय आहे ते काही त्याला कळलं नाही. पण रासमोहन पतिपत्नी चांगली माणसं आहेत एवढं मात्र त्याला वाटलं. ‘ते बंगाली ख्रिश्चन आहेत,’ हे डॅडीजींनी त्याला सांगितलं होतं तेव्हा त्याला फारसं आवडलं नव्हतं. कारण या दोन्ही प्रकारच्या माणसांबद्दल त्याचं मत काही फारसं चांगलं नव्हतं.

मग माझ्याकडे दुर्लक्ष करून श्री. रासमोहन प्रकाशदादाशी इंग्रजीत बोलायला लागले.
प्रकाशदादाही इंग्रजीत काहीतरी म्हणाला आणि मला काही कळायच्या आत निघूनही गेला. मी रडारड करून गोंधळ घालेन आणि सगळ्यांचीच पंचाईत होईल अशी त्याला भीती वाटली म्हणून तो पटकन निघून गेला असं त्यानं नंतर सांगितलं.
‘‘प्रकाशदादा कुठाय?’’ मी विचारलं. आगगाडीत असताना माझे पुढचे दोन दुधाचे दात पडले होते म्हणून मला नीट बोलता येत नव्हतं. माझ्या तोंडात काही तरी चिकटून बसल्यासारखं वाटलं आणि माझ्या तोंडातून नीट शब्दही येईनात. मी रडायला लागलो.
‘‘श्रीयुत आनंद परत गेले.’’ मोडक्यातोडक्या हिंदीत श्री. रासमोहन म्हणाले.
बोलताना त्यांनी प्रकाशदादाचं आडनाव वापरलं त्यामुळे ते काय म्हणतात ते मला थोडा वेळ कळलंच नाही. ‘‘मी तुझा काका आहे आणि ही काकू.’’ ते म्हणाले.
‘‘मुळीच नाही. माझे काका काकू लाहोरला आहेत. रेल्वे स्टेशनवर.’’ मी म्हणालो.
‘‘तू किती सुरेख, गोड मुलगा आहेस.’’ असं म्हणत त्यांनी माझ्या कपाळाचा पापा घेतला. ‘‘तुझ्या आईजवळ जातोस ना तसा ये बरं माझ्याजवळ.’’
श्री. रासमोहन म्हणाले, ‘‘हो हो. तू आता आमच्याजवळ राहायचं. आमच्याबरोबर जेवायचं. आम्ही तुझा छान सांभाळ करू.’’ श्रीमती रासमोहननी मला खाली ठेवलं आणि श्री. रासमोहन मला हाताला धरून खोली बाहेर घेऊन गेले. डावीकडे वळले, थोडी पावलं गेल्यावर त्यांनी कुलूप काढलं आणि दरवाजा ढकलला. तर कसला घर्रर्र आवाज झाला. मला तर वाटलं आता दरवाजा मोडणार. रडता रडता मी म्हणालो, ‘‘तो दरवाजा मोडणार आता’’ तर ते हसले.
‘‘अरे हा लोखंडी जाळीचा सरकता दरवाजा आहे. मनोर्याच्या वाटेवरचा. बघ हात लावून.’’ ते म्हणाले. मला खूपच उत्सुकता वाटली. बाजाच्या पेटीच्या भात्यासारखा सरकणारा दरवाजा मी कध्धीच पाहिला नव्हता.
प्रकाशदादा निघून गेलाय, ते मी थोडा वेळ विसरलो. मला तो दरवाजा उघडमीट करून बघायचा होता. पण श्री. रासमोहन म्हणाले, ‘‘असं नको करूस. तुझं बोट चिमटेल त्याच्यात.’’

आम्ही पुन्हा डावीकडे वळलो आणि दरवाज्यातून गेलो. आमच्या पाठी त्यांनी तो दरवाजा बंद केला. आम्ही मग अरुंद जिन्यावरून वर गेलो. मला एका पाळण्याजवळ नेऊन ते म्हणाले, ‘‘ही आमची मुलगी हीया.’’ मी पाळण्यात हात घातला तर माझ्या हाताला दोन लाथा मारणारे इवले पाय लागले. ते हियाचे होते. ती फक्त एक वर्षाची होती. तिने माझं बोट पकडलं आणि तोंडात घातलं. परत मी थोडावेळ विसरलो की प्रकाशदादा मला सोडून गेलाय.

त्या रात्री मी हियाच्या पाळण्याशेजारच्या पलंगावर झोपलो. सकाळी उठल्यावर हियाला सांभाळणारी आया आली. ती मला म्हणाली ‘‘तुला मुलांच्या मोरीत नेते. इथे रासमोहन साहेबांची बाथरूम नाही तुला वापरता येणार.’’ तिथे जाण्यासाठी आधी आम्हाला खाली जावं लागलं. मग श्री. रासमोहन यांच्या बैठकीच्या/जेवणाच्या खोलीतून पुढे जाऊन इमारतीच्या दुसर्या भागात जावं लागलं. आयानं मला नळाखाली बसवलं. पाणी थंडगार होतं आणि फस्कन् अंगावर आलं. माझ्या अंगावर काटा आला. मी बदलीभर गरम पाणी आणि तपेली द्या म्हणालो. म्हणजे मग मला घरच्या सारखं थोडं थोडं पाणी अंगावर घेता आलं असतं. आयानं मला नळाखाली गच्च धरलं आणि म्हणाली ‘‘चल वेदी चांगला बहादूर मुलगा हो बरं’’
‘‘नाही. मला नाही व्हायचं’’ मी रडत म्हणालो.
‘‘अरे अगदी पावसात भिजल्यासारखंच आहे हे’’ ती म्हणाली.
मी क्षणभर विचार केला आणि हसलो. आयानं मला सोडलं.
‘‘पाऊस पाऊस !’’ मी ओरडलो आणि नळ अगदी मोठ्ठा सोडला. पाण्याची मोठ्ठी धार आली आणि सिमेंटच्या जमिनीवर तडातड आवाज करू लागली. मी आयाकडे पळत गेलो. तिनं मला टॉवेलात गुंडाळलं. ‘‘बहाद्दर बाळ माझा’’ मला जवळ घेऊन ती म्हणाली.

श्री. रासमोहन यांची बैठकीची आणि जेवणाची खोली एकत्रच होती. तिथे सकाळच्या नाश्त्याला मी गेलो.जेवणाचं टेबल साधारण छोटंसं चौरसकृती होतं. रासमोहन बाईंनी मला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवलं. आणि लहान मुलांना बांधतात ना तसलं एक लाळेरं माझ्या गळ्याला बांधलं. हलकंसं उकडलेलं अंडं, थोडंसं भोक पाडून, चमच्यानं आपलं आपण कसं खायचं ते त्यांनी मला दाखवलं. घरी ममाजी मला टोस्टवर अंडं पसरून द्यायच्या तसं द्या, असं मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला.
‘‘जंगली मुलं तसं खातात, असं अंड्याच्या कवचातूनच, हलकेच, चमच्यानं सगळं काढून खायला आता तू शिकायला हवंस.’’ त्या म्हणाल्या.
‘‘खुर्च्यांना वेत लावायच्या तासाला वेदीनं जायची गरज नाही.’’ चमच्यानं टक टक करून अंड्याचं भोक थोडं मोठं करीत रास मोहन म्हणाले, ‘‘वेत विणायचं काम गरीब मुलांसाठी असतं आणि वेदी श्रीमंत घरातला मुलगा आहे.’’
ते काय म्हणताहेत ते काही मला कळलं नाही पण मला वाटलं खुर्च्यांना वेत लावणं म्हणजे काही तरी खेळ असणार. मी माझ्या अंड्यावर चमच्यानं टक टक करताना कल्पना केली. गरीब मुलांना खुर्च्यांवर सपासप मारायला एकेक वेताची काठी देत असावेत बहुधा. हा खेळ मला खेळू देणार नाहीत म्हणून मला त्यांचा खूप राग आला. प्रकाशदादाजवळ त्यांची तक्रार करावीशी वाटली.
‘‘मला प्रकाशदादाकडे जायचंय’’ मी रडायला लागलो. श्री. रासमोहन माझी समजूत घालायला लागले तर रासमोहनबाई म्हणाल्या ‘‘काही लक्ष देऊ नका त्याच्याकडे.’’
मी लगेच हातातला चमचा टाकून दिला. अंड्याचा मऊसर बलक माझ्या लाळेर्यावर आणि टेबलक्लॉथवर सांडला.
‘‘वेडी मुलंच असं अंडं सांडतात बरं का’’ रासमोहनबाई म्हणाल्या.
चमचा हातात नीट कसा धरायचा ते रासमोहनजींनी मला दाखवलं नंतर ते निघून गेले. रासमोहनबाईंनी नंतर जगमधून पाणी ओतून बेसिनमध्ये माझं तोंड आणि हात धुतले.
खालून कसला तरी हलका पण धारदार असा आवाज सतत येत होता.
‘‘हा कसला आवाज आहे?’’ मला उत्सुकता वाटली म्हणून मी विचारलं.
‘‘काय?… हां ते, ती काकांची घंटा आहे. सकाळच्या वर्गासाठी ते मुलांना गोळा व्हायला सांगताहेत.’’ त्या म्हणाल्या.
‘‘मुली कुठे आहेत?’’
‘‘मुली मुलींच्या वसतीगृहात राहतात आणि मुलं मुलांच्या.’’ त्या म्हणाल्या.
श्री. रासमोहन आले. त्यांनी मला खाली नेलं आणि शाळेच्या मेट्रन जवळ सोडलं.
‘‘तुम्ही कुठं राहाता?’’ मी विचारलं.
‘‘मुलींच्या वसतीगृहात.’’ असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक लाकडी चौकटीसारखं काहीतरी दिलं. त्यावर लाकडी मणी ओवलेले होते. त्यांच्या बोटांबरोबर बोटं हलवून त्यांनी मला मणी मोजायला शिकवलं. मी चांगले अठरापर्यंत आकडे मोजले. नुसतं बोट लावल्यावरसुद्धा ते मणी गर्रकन् फिरायचे ते मला फारच आवडलं. छानच खेळ होता तो.
नंतर थोड्या वेळानं श्री. रासमोहन येताहेत ते मला कळलं. फरशीवर क्लिक् क्लिक् असा पावलांचा आवाज करत छोटी छोटी पण भरभर पावलं टाकत ते चालायचे.
‘‘जेवायची वेळ झाली, चल माझ्याबरोबर’’ असं म्हणत त्यांनी माझा हात धरला.
त्यांचा हात ओढत मी म्हणालो, ‘‘मला तिकडे जायचंय.’’ व्हरांड्यातून मुलांच्या बोलण्या-हसण्याचे आणि भांड्यांचे आवाज येत होते.
ते हसले आणि म्हणाले, ‘‘ती सगळी गरीब बिचारी अनाथ मुलं आहेत. चल काकू वरती आपली वाट बघत असेल.’’