संवादकीय – मे २००७
लैंगिकता शिक्षण द्यावं की नाही हा प्रश्न मुळात गैरलागू आहे. लैंगिकता माणूस शिकतोच. ज्याप्रकारे परिसरातून मूल मातृभाषा शिकतं, तसंच लैंगिकताही शिकतं. मुद्दा इतकाच असतो की मुखपृष्ठावर उल्लेखल्याप्रमाणे मानवीपणानं त्यानं/तिनं शिकावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
तसे प्रयत्न आजही शाळांमध्ये अपवादानंच केले जातात. मानवी समानतेचा हक्क, बळजबरी नसणं, फसवणूकीला लैंगिकतेच्या अवकाशात थारा न देणं, समाजपातळीवर लैंगिकतेतल्या वैविध्यांचा स्वीकार असणं, ह्या बाबी आजच्या काळातही ‘स्वप्नील’ कवीकल्पनांच्याही पलिकडे आहेत.
डॉ. रघुनाथ कर्वे ह्यांचा समाजस्वास्थामधला एक लेख पालकनीतीत पुन्हा छापला होता. लहान मुलांसह पालकांनी एकत्र अंघोळ करावी, ह्यामुळे शरीरांबद्दलचं अनाठायी कुतूहल सहजी शमतं आणि स्वतःबद्दलची, शरीराबद्दलची घृणा वाटत नाही. असं म्हणणारा हा साधासुधा लेख होता. आश्चर्य असं होतं की डॉ. कर्व्यांनी हे शंभर वर्षांपूर्वी म्हटलं होतं. कर्वे काळाच्या पुढे होते, असं मान्य केलं तरी काळ कर्व्यांच्या म्हणण्यापर्यंत कधी पोचणार असा प्रश्न आजही उरतोच आहे. स्त्रियांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या, संतती-नियमनाच्या साधनांची बाजारात रेलचेल झाली, तरी खर्या अर्थानं बाईला ‘माणूसपणाचा’ अधिकार मिळाला का? पालकनीतीची मित्रसंस्था ‘नारी समता मंच’ ही रौप्यमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे. अगदी सुरवातीच्या काळात त्यांनी ‘मंजूश्री सारडा’ ह्या हुंडाबळीच्या निमित्तानी जनजागरणाचा प्रयत्न सुरू केला होता. आजही आर्थिक सधन, सर्व संधींची रेलचेल वाट्याला येणार्या समाजात तरी ही जाग आल्याची दिसते का?
शिक्षणक्षेत्रात, घरांत किंवा कामाच्या ठिकाणी स्त्रियांना स्पष्ट-अस्पष्ट स्वरूपातल्या लैंगिक त्रासाला थांबवता येतं का? समलिंगी ओढ/आवड नैसर्गिक असू शकते, हे विज्ञानानं सिद्ध केलं तरी आजही भारतीय दंडविधानाला ते मान्य आहे का?
सात मे हा दिवस म्हणे एड्सची लागण झालेल्या बाळांसाठीचा मानला जातो. ह्यात आईकडून लागण झालेली बाळं आहेत, तसाच एक मोठा गट पतीकडून लागण झालेल्या १४ ते १८ वर्षांमधल्या बालिकांचाही मानायला हवा. कायदा काय हवं ते म्हणो, आजही ग्रामीण गटातली बहुसंख्य लग्नं अल्पवयातच होत आहेत. आणि १४ ते १८ वयांतल्या संमतीपूर्वक लैंगिकसंबंधाना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय पाश्चिमात्य पावलावर पाऊल टाकून येऊ बघतो आहे.
अल्पवयात लग्न वाट्याला आलेल्या ह्या छोट्या मुलींची त्या लैंगिक संबंधाना संमती आहे, असं मानून आपण त्याला कायद्याचा थोडासा विरोध, निदान कायदा मानणारे धरतात तोही काढून घेणार आहोत. ही सगळी परिस्थिती आपल्या मुलामुलींना जेव्हा सहजपणे ‘लैंगिकता’ शिकवते, तेव्हा नेमकी कोणती मूल्यं, योग्यायोग्यतेचा विचार त्यांच्यात रूजवते? हे पाहिलं तर जाणीवपूर्वक प्रयत्नांची, चांगल्या लैंगिकता शिक्षणाची गरज उमजून येईल. नुसती ती गरज मान्य करून आणि काही लोकांनी ते काम करूनही पुरणार नाही, तर त्या कामाला सर्व प्रकारे स्वीकारायला हवं, प्रोत्साहित करायला हवं. डॉ. साठे पतीपत्नींची विस्तृत मुलाखत ह्या अंकात आहे, पूर्वीपासून आणि आजही मुलग्यांच्या लैंगिकता शिक्षणाचा मुद्दा प्रश्नांकितच राहिल्याचं त्यामधून दिसतं.
परिस्थिती थोडी बदलल्यासारखी वाटते, एरवी संपर्कमाध्यमं, बाजारपरिस्थिती, स्पर्धात्मकता ह्या दिशांनी बघावं, तर गेल्या शंभरवर्षात कापलं गेलं नव्हतं एवढं अंतर १०-२० वर्षात उलटलं आहे. काळ विलक्षण गतीनं धावतो आहे, असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. पण दुसरीकडे गरिबी, स्त्री-पुरुष असमानता, ह्यात मात्र म्हणावा तेवढा बदल दिसत नाही.
एका अर्थी, मानवी हक्क, लैंगिकता, स्त्री-पुरुष समता, एच्.आय्.व्ही./एड्स ह्या विषयांमधलं एकंदर काम मला दंगलींनंतरच्या समाजाच्या दर्याद्र हातभारासारखं वाटतं. त्यामागची भावना, संवेदना तर अगदी चांगलीच आहे, पण मूळ प्रश्नाला त्यातून हात लागत नाही. जे उरलंय ते वाचवायचा, जखमींना उपचार देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि आपली ताकद त्यातच संपणार अशी भीतीही वाटते आहे.
कट्टणभावीच्या शिवाजीदादा कागणीकरांचं नाव पालकनीतीच्या वाचकांच्या स्मरणात असावं. पालकनीतीतर्फे दिला जाणारा ‘सामाजिक पालकत्व पुरस्कार’ त्यांना २००१ साली दिला होता. कामातून येणार्या नैराश्याबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं. निराशेची धग शिवाजीदादांसारख्या अतिशय तळागाळात काम करणारानं अनुभवली नसणंच अशक्य. पण शेवटी त्यांनी एक प्रसंग सांगितला, तेवढाच इथं सांगते –
‘एस्.टी.ची वाट पहात थांबलो होतो. ऊन होतं, गर्दी होती. एस्.टी. आली, भरलेलीच होती. मला लोकांना सारून पुढे कधी जाता येत नाही, मी शेवटचाच होतो. खालच्या पायरीवरच उभा होतो. बसच्या पुढच्या भागातून जोरजोरात ‘बाबा तू वर चढ, तू आधी वर चढ’ अशा एका लहान मुलीच्या हाकार्या येत होत्या. ती मला म्हणतेय हे मला आधी कळलंच नाही. पण नंतर ती शिवाजीबाबाऽऽ, म्हणाली तेव्हा कळलं.
ती माझ्या तशी ओळखीचीही नव्हती. कलिका केंद्राच्या वर्गांना ती शिकायला येत असे. मी वर चढू पहातोय, शेवटचा आहे हे तिला दिसलं होतं. तिच्या ताकदीत त्या अंतरावरून फक्त साद घालणं शक्य होतं, ते ती करत होती. मी तिचं ऐकलंच पाहिजे, निराश हताश न होता, पुढे चाललं पाहीजे. असं मला वाटलं.’
ह्यावर तुम्ही आम्ही वेगळं काय म्हणणार, सांगा!