लैंगिकता शिक्षणाचा प्रवास

‘शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे की नाही’, अशी चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होताना दिसते.

या विषयाचे निर्विवाद महत्त्व ओळखले ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन-इंडियाच्या पुणे शाखेने, विशेषतः डॉ. सुमती कानिटकर, डॉ. अनंत साठे व डॉ. शांता साठे यांनी. गेली पंचवीसेक वर्षें म्हणजे एड्सच्या निमित्तानं हा विषय समाजासमोर येण्यापूर्वीच, विशेष करून साठे दांपत्य किशोरवयीन मुलामुलींशी लैंगिकता शिक्षणाच्या विषयावर संवाद साधून व्यापक मुद्यांवर काम करत आहे. त्यांच्या भूमिकेचा, उपक्रमांचा, बदलत्या काळातील प्रश्नांचा आढावा त्यांच्या मुलाखतीतून समजून घ्यायची संधी घेता आली. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांचंच हे शब्दांकन –

लैंगिक शिक्षण व लैंगिकता शिक्षण’ यातील फरक जरा समजावून घेऊ.

लैंगिक शिक्षणामधे केवळ शरीरधर्माशी निगडित माहिती दिली जाते. अल्पवयीन अवांच्छित मातृत्व आणि गुप्तरोगांचा वाढता फैलाव या गोष्टींना आळा घालण्याच्या दृष्टीने औपचारिक पातळीवर असे लैंगिक शिक्षण द्यायला पाश्चिमात्य देशात काही दशकांपूर्वी सुरुवात झाली. ह्या शिक्षणाचे स्वरूप Biomedical (मानवी पुनरुत्पादन आणि गुप्तरोग) होते. अशा मर्यादित स्वरूपामुळे या शिक्षणाचे हेतू व उद्दिष्टे साध्य होत नाहीत हे त्यानंतर आढळून आले. कामजीवनाची व्याप्ती व त्याचे मानवी जीवनातील स्थान (लैंगिक स्वास्थ्याचा एकंदर मानवी आरोग्याशी/स्वास्थ्याशी असलेला निकटचा संबंध) लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने लैंगिक स्वास्थ्याची नवीन व्याख्या तयार केली. कामजीवनाचा विचार करत असताना शारीर बाबींच्या पलीकडे जाण्याची गरज त्यातून अधोरेखित होते.

किशोरवयीन मुलामुलींशी संवाद साधताना आम्ही Sexuality= Sex + Gender अशा समीकरणाने सुरुवात करतो. मानवी कामजीवनाला भावनिक, मानसिक, सामाजिक तसेच सांस्कृतिक संदर्भही असतात. कामजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तनाविषयीची भूमिका, मूल्ये, लिंगभाव जाणीव व स्त्री पुरुष समानता (Gender & gender equality) अशा अनेक मुद्यांची आम्ही चर्चा करतो. अशा सर्वस्पर्शी संवादामुळे स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणे, स्त्री-पुरुषांमधील श्रेष्ठ-कनिष्ठता व योनिशुचितेचे अवास्तव महत्त्व कमी करण्याची जाणीव मुलांमधे निर्माण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. पाश्चात्य देशांमधे लैंगिक शिक्षण देऊनही फरक पडला नाही. उलट अनेक गंभीर समस्या वाढत गेल्या असा आक्षेप घेऊन लैंगिक शिक्षणाला विरोध केला गेला. त्याविषयी आम्हाला वाटतं की, पाश्चात्य देशातही लैंगिक शिक्षण सर्वत्र दिले जात नाही, शिवाय शरीराविषयी केवळ शास्त्रीय माहिती देणं, हे काही खरं sex education नव्हे. लैंगिकतेचा अर्थ व्यापक व सखोल आहे. तो समजावून सांगायला हवा. आणि पाश्चात्य किंवा आपल्या देशात निर्माण झालेल्या समस्या लैंगिक शिक्षणामुळे नसून लैंगिकतेचे व्यापारीकरण झाल्याने आहेत.

आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, किशोरावस्था ही एक संक्रमणावस्था आहे. या टप्प्यात शरीरामधे अनेक बदल होत असतात. या वयात लैंगिक बाबींविषयी अंधुकशी (अपुरी, चुकीची असली तरी) माहिती मुलांना असते व जोडीला लैंगिक भावना जाग्याही होत असतात. अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलायची गरज असते. शंका दूर करायची गरज असते. कामभावना नैसर्गिक आहे हे खरे. पण जीवन म्हणजे तेच नव्हे. आपल्या मनातील ऊर्मी संयमित ठेवण्याचे, प्रसंगी मन वळवण्यासाठीचे शिक्षण देणेही आवश्यक आहे.

मुंबईतील ‘मावा’ संस्थेतर्फे घेतलेल्या एका प्रशिक्षणात एकाचा प्रश्न होता, ‘दिवसातून किती वेळा हस्तमैथुन केलेलं चालतं? किती वेळा करणं चांगलं किंवा वाईटं?’ अशा प्रश्नांना संख्यात्मक उत्तर देणं चुकीच आहे. शरीराची मनावर आणि मनाचा शरीरावर कुरघोडी होऊ न देता करणं महत्त्वाचं. किती वेळा या प्रश्नाला उत्तरच नाही. ते व्यक्तीगणिक बदलेल.

एका नववीच्या विद्यार्थ्याला वर्गातील मुलीविषयी आकर्षण वाटत असे व त्याविषयी प्रचंड अपराधीपणा वाटून तो ताणावाखाली वावरत असे. त्याने शंका उपस्थित केल्यावर आम्ही त्याला सांगितले, ‘अशा पद्धतीचे विचार येणे हे पूर्णत: नैसर्गिक आहे. यात काहीही ‘पाप’ नाही. पण तुझे आत्ताचे वय शिकण्याचे आहे. ह्या मोहात पडलास, तर पुढील आर्थिक व संसाराची जबाबदारी दोघांनाही आत्ता पेलणार नाही. तेव्हा सध्या मनातल्या विचारांवर ताबा ठेव.’
स्त्री-पुरुष हे केवळ ‘नर-मादी’ नव्हेत. त्यांच्यातील निकोप मैत्रीचे संबंध हा मानवी नात्यातील सुंदर आविष्कार आहे. स्त्री-पुरुषांची मैत्री ‘लैंगिक मागणीशिवाय’ असू शकते. ते नातं निखळ, निकोप असू शकतं. अशा नात्याचं महत्त्व एका शिबिरात मी सांगत होते. तेव्हा एक मुलगा चटकन उठून म्हणाला, ‘खरंच. मुलीशी मैत्री केल्यानं मला ‘स्त्री’ची मानसिकता कळेल आणि आपल्या होणार्या पत्नीशी वागताना, एक स्त्री म्हणून समजून घेताना त्याचा फायदा होईल?’ स्त्री-पुरुष नात्याची मांडणी पापपुण्याच्या भाषेत न करता आम्ही – ‘बळजबरी नाही, फसवणूक नाही, परिणामांची जाणीव आणि ते पेलण्याची क्षमता’ – अशी करतो.

लैंगिकतेची संकल्पना आणि मानवी नात्यांचा, भावभावनांचा सखोल अभ्यास असणारे डॉ. अनंत व डॉ. शांता साठे यांचे गेल्या पंचवीस वर्षातले उपक्रम व अनुभवांचा साठा प्रचंड आहे. त्यांच्या ह्या कामातील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल ते सांगतात-

१९७९ मधे FPAI (Family Planning Association of India) तर्फे ‘किशोरावस्था : जाण, जाणीव, जबाबदारी’ हा प्रकल्प हाती घेतला गेला. पहिला टप्पा तयारीचा. पूर्व तयारीसाठी १९८१ साली आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक साहाय्य मिळून हा प्रकल्प सुरू झाला. ह्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी ‘सकाळ’ ह्या दैनिकात आवाहन दिलं होतं. शाळेतील मुलामुलींसाठी शैक्षणिक उपक्रमात भाग घेण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा हेतू त्यात मांडला होता. ह्या आवाहनाला प्रतिसाद देणारे १३० अर्ज आले. हे जवळजवळ सर्व स्त्रियांचेच होते. ह्या अर्जाची छाननी करून आम्ही ३० अर्ज निवडले. ज्यांना निवडलं होतं त्यांच्यासाठी पाच दिवसांचं शिबिर आयोजित तर केलंच, पण उरलेल्यांसाठीही एक दिवसाचं लैंगिकता शिक्षणाबद्दलचं शिबिर घेतलं. निरनिराळ्या विषयावर तज्ज्ञ, शिक्षण विशेषज्ञांनी ह्या तीस स्वयंसेविकांना शिकवलं.
या प्रशिक्षणानंतर स्वयंसेवी गटांसोबतीनं बरोबर आम्ही अनेक शाळांशी बोलल्यानंतरसुद्धा आम्हाला काहीच प्रतिसाद मिळेना. विशेषत: ‘मुलग्यांच्या’ शाळांनी स्पष्ट नकार दिला. मुलींच्या केवळ दोन शाळांकडून परवानगी मिळाली- ती सुद्धा फक्त ‘मासिक पाळी’ विषयी बोलण्याची!

कार्यकर्त्यांसाठी मात्र आम्ही काम सुरूच ठेवलं होतं. दरवर्षी एक दिवसाचं चर्चासत्र असे. वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यावीत ह्याची प्रात्यक्षिकं असत. कारण ही उत्तरं ज्या त्या विद्यार्थ्याच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक क्षमतांनुरूप द्यावी लागतात.

ह्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनाचीही सुरवातीपासून रचना केलेली होती. स्वतः श्री. चिपळूणकरांनी (तेव्हाचे शिक्षणाधिकारी) शाळांमधले शिक्षक निरीक्षणासाठी पाठवले होते. सुरवातीच्या १-२ वर्षांनी श्री. चिपळूणकर आम्हाला म्हणाले, ‘आंतरशालेय खेळांच्या स्पर्धांसंबंधी मुख्याध्यापकांची एक मिटींग आहे. त्यांच्यासमोर तुम्ही हा विषय मांडा.’ सरांच्या सूचनेनुसार आम्ही मुख्याध्यापिकांच्या गटाला आवाहन केले आणि आम्हाला २० शाळांकडून बोलावणे आले (अर्थात फक्त मुलींच्या शाळा!) प्रश्नोत्तराच्या वेळी जाणवलं की मुली मोकळेपणाने शंका, प्रश्न विचारू लागल्या आहेत. स्त्रियांची छेडछाड, अंगचटीला येण्याविषयी राग व्यक्त करू लागल्या आहेत. एका आठवीतल्या मुलीने नेमक्या शब्दात सूचना केलेली आठवते – ‘मुलग्यांना जबाबदारी शिकवा. आम्ही निर्भय होऊ!’ त्यानंतर जवळजवळ तीन वर्षांनी मुलग्यांच्या शाळांकडून प्रतिसाद मिळाला. १९८७ नंतर ह्या अभ्यासक्रमात आम्ही लिंगसांसर्गिक आजार आणि एड्स ह्या विषयांचा समावेश केला.

एकट्या १९८९ सालात १०,००० मुलामुलींपर्यंत उपक्रम पोहोचला होता. त्याच्या १०% निवडून त्यांच्यातली ‘समजूत’ जाणून घेण्यासाठी संशोधन प्रकल्प केला. ह्या अभ्यासाबद्दल एन्सीइआरटीला माहीत होतं. त्यांनी १९९३ साली आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात मला आमंत्रण दिलं. त्यात मी ह्या संशोधनाबद्दलची मांडणी केली. ह्यानंतर तिथेच किशोरावस्था शिक्षणाचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात केला जाण्याचा निर्णयही झाला.
१९८२ ते ९२ पर्यंत आम्ही अंदाजे ७५,००० मुलामुलींशी शाळांतर्फे संवाद साधला होता. आर्थिक अडचणींमुळे पुढे हा प्रकल्प सोडून द्यावा लागला तरी अजूनही आमच्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात हा कार्यक्रम घेतला जातो.
या पद्धतीचे काम करणारा हा आशियातील पहिलाच प्रयोग-गट होता असं मानलं जातं. आशियातील लैंगिकता ह्या विषयावर हॉंगकॉंगला जागतिक परिषद भरली होती तिथे ह्या अभ्यासप्रकल्पाचं असं कौतुक केलं गेलं.

लैंगिकता शिक्षणाची व्याप्ती व खोली यांचा विचार शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना त्याविषयी कशी योजना असायची?

आम्हाला प्रत्येक शाळेत एका दिवशी ७० मिनिटे असे तीन दिवस मिळतात. यामधे आम्ही films, presentations/slides वापरतो. वॉल्ट डिस्नेची एक सुंदर डॉक्युमंेंटरी आहे मासिक पाळीबद्दल. शिवाय ‘मानवी वंशविस्ताराची (human reproduction) कहाणी’ ही फिल्म. त्यानंतर आम्ही मुलांशी बोलतो – मानवी जीवनचक्राची माहिती व त्यातील किशारावस्थेचे महत्त्व, शारीरिक स्वच्छता, सौंदर्य व सर्वांगीण आरोग्याचे महत्त्व, किशोरावस्थेतील बदलाची माहिती – आकर्षण, मोह, मैत्री, मुलामुलींमधलं नैसर्गिक आकर्षण, शारीरिक वाढ, देहप्रतिमा या शिवाय परस्पर आदरभाव आणि आत्मसन्मानाचा मुद्दाही चर्चेत घेतला जातो. मुलींशी मासिक पाळीविषयी तर मुलग्यांशी हस्तमैथुन, स्वप्नावस्था, देहप्रतिमा याविषयी विस्ताराने बोलतो.

मुलामुलींसाठी एकत्र सांगायची माहिती (Common) झाल्यावर मुलींचा गट वेगळा व मुलांचा वेगळा करतो. तसेच मुली स्त्री-स्वयंसेविकेशी मोकळेपणाने बोलतात व मुलगे पुरुषाला खुलेपणाने प्रश्न विचारतात असे अनुभवातून दिसते. शाळांमधे ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांशी आम्ही किशोरावस्थेविषयी बोलायला जातो. काही शाळांमधे हाच विषय सहावी-सातवीच्या गटाशीही चर्चिला जातो. (उदा. म्युनिसिपल शाळेत मुले-मुली वयाने मोठी असतात. या विषयातली त्यांची अनुभवव्याप्तीही अधिक असते.) आता आम्ही दोघे विशेषतः अकरावी-बारावीच्या टप्प्यावर लैंगिकता शिक्षणाचा कार्यक्रम आखतो.
शाळांशिवाय इतरही कार्यशाळा आम्ही घेत गेलो. विद्यापीठातील ‘लोकसंख्या प्रशिक्षण’ या विभागातर्फे ५ संलग्न विद्यापीठांतून २५-३० प्रतिनिधी निवडले गेले. ‘किशोरावस्था जाणीव’ या विषयावर १ दिवसाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जवळजवळ ९० प्राध्यापकांसाठी ‘संकल्पना, स्पष्टीकरण, प्रात्यक्षिक एक काळाची गरज’ या नावाने एक कार्यक्रम केला. त्या ठिकाणी ‘कसे शिकवावे’ याचे सविस्तर प्रशिक्षण प्रात्यक्षिक आम्ही दिले.
१९९५ पासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमातर्ंगत ‘लैंगिकता’ व ‘किशोरावस्था’ इ. विषयांवर दरवर्षी दोनदा शिबिरे घ्यायला मिळाली. या प्रशिक्षण कार्यक्रमानंतरही शिक्षकांनी आम्हाला कळवले की ‘मुलामुलींशी या विषयी बोलणे आम्हाला अवघड जाते. तुम्हीच पुन्हा येऊन बोला.’

B.Ed. कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी ‘Family life education’ वर कार्यशाळा झाली. त्यांच्याशी बोलायला आम्ही अधिक उत्सुक होतो. कारण B.Ed. करणारे विद्यार्थी हे उद्याचे शिक्षक. त्यांना या विषयाची संपूर्ण शास्त्रीय माहिती असणे व त्यांचा दृष्टिकोन निकोप असणे सर्वात महत्त्वाचे. पण अनुभव असा की या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचेही अज्ञान व दृष्टिकोन हे दोन्ही सामान्य अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच होते.
नागपूर येथे समाजसेवकांसाठी झालेल्या शिबिरात ‘लैंगिकता शिक्षण: का, काय व कसे शिकवावे?’ याविषयी प्रश्नोत्तरे पद्धतीने बोललो.

कोल्हापूरच्या आरोग्यविभागाने प्रत्येक गटात एक डॉक्टर, नर्स व MSW Worker असे आठ गट तयार केले होते. त्यांच्यासाठी दोन-तीन दिवसांचे शिबीर घेतले तेव्हा कामजीवनाविषयीचे (अगदी डॉक्टर्सचेसुद्धा!) असणारे कितीतरी गैरसमज व धारणा पुढे आल्या. एका MSW मुलींच्या गटाने मला प्रश्न विचारला होता, ‘TV वर सिनेमांमधे सुहाग रात म्हणतात; ते काय असतं?’
FPAI च्या विविध शाखांतर्फे नंतर आम्ही समाजसेवकांसाठी व अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोहाली, चंदीगड, कुन्नूर अशा अनेक ठिकाणी तीन-तीन दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या.

आज ज्या पद्धतीने लैंगिकता शिक्षणाचे कार्यक्रम घेतले जातात, त्यातल्या मर्यादा सांगताना डॉ. शांता साठे म्हणाल्या.

प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे ‘One-shot therapy’ असते. त्यात दोन मर्यादा येतात. शिबिरार्थी त्यातली काही माहिती विसरतात, प्रत्यक्ष शिबिराच्या वेळी संकोचलेले असतात किंवा त्यांना मागाहून काही प्रश्न पडतात तेव्हा मार्गदर्शक उपलब्ध नसतो. दुसरी, प्रत्येक वयोगटांच्या गरजाच वेगवेगळ्या असतात. जरी शालेय वयात शिक्षण मिळालेलं असलं तरी पुन्हा अकरावी-बारावीच्या टप्प्यावर काही वेगळ्या मुद्यांना प्राधान्य देण्याचा विचार त्यामध्ये करावा लागतो. उदाहरणच द्यायचं तर, सोळा ते वीस ह्या वयोगटात लग्नपूर्व लैंगिक संबंध, एकतर्फी प्रेम, लिंगभाव अशा विषयांना जास्त प्राधान्य द्यायचं असतं. ह्या गटात गटचर्चा – मांडणी – प्रश्नोत्तरं अशा पद्धतींचा परिणाम जास्त चांगला दिसतो. मुलंमुली इथे फार समर्पकपणे त्यांचं म्हणणं मांडतात. प्रेमप्रकरणे-निराशा-व्यसन इ. विषयी चर्चा करताना एक मुलगी म्हणाली, ‘प्रेमभंगाने मुलगे इतके कसे काय निराश होतात. नोकरी, प्रमोशन, बक्षिसे इ. सारख्या इतक्या निराशा पचवतात. मग एक ‘प्रेमाची’ पचवू शकत नाहीत?’

मुलामुलींशी बोलताना भाषेचा सुयोग्य वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशिक्षण देताना प्रशिक्षणार्थींचा वयोगट, त्यांचा सामाजिक स्तर, मिळणारी अनुभवव्याप्ती यावर आधारित कार्यशाळेची आखणी करावी लागते. उदा. झोपडवस्तीतील मुलांशी बोलताना त्यांच्या बोलीभाषेतल्या शब्दांना मी ‘समांतर भाषा’ सांगतो. अमुक एका शब्दाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात असे सांगून माहिती द्यावी लागते. तसे न केल्यास मुलांना आपल्या बोलीभाषेची, अनुभवांची चेष्टा केल्याप्रमाणे वाटते.

एका शिक्षिकेचा अनुभव असा की मुलांशी सेक्सविषयी बोलताना परकी (इंग्रजी) भाषा जास्त सोपी जाते. ती Scientific Sterile Language जास्त बरी वाटते.

प्रत्येक कार्यशाळेनंतर साठे दांपत्य अनुभवांचे विश्लेषण करतात आणि त्यामुळेच प्रशिक्षणादरम्यान झालेल्या चुकाही प्रांजळपणे सांगू शकतात-

सुरुवातीला आम्ही थेट मनुष्याच्या प्रजनन संस्थेची माहिती देत असू. हा विषय अचानक आणि इतका थेट ऐकायची सवय नसल्याने किंवा तशी अपेक्षा नसल्याने मुली अवघडून बसत, संकोचत तर मुलगे कधी शांत, कधी खूप गोंधळ-गडबड करत. त्या ऐवजी ‘माणसाच्या वाढीचे टप्पे’ अशा पद्धतीने मांडणी केली तर असा प्रश्न येत नाही. दुसरी एक चूक आम्ही करत असू ती म्हणजे लिंगविषयक रेखाचित्रे/मॉडेल्स एकीकडे दाखवत त्याविषयी बोलण्याची. मुलग्यांच्या शाळांमधून शिट्ट्या वाजवणे, चित्रांकडेच बघत बसणे, खुणा करणे – होऊ लागले. यामुळे बोलण्याकडे कमी लक्ष दिले जाई व रेखाटनांचे आकर्षण वाढे. म्हणून आधी रेखाचित्र दाखवणे व ते नंतर बाजूला ठेवून त्याविषयी बोलणे अशी रचना केली. आणखी एक ठळक चूक म्हणजे ‘पालकांचा आणि शिक्षकांचा मुलांबरोबर सहभाग’. मोहाली येथे घेतलेल्या शिबिराच्या वेळी मागे बसलेल्या पालकांनी प्रश्नोत्तरांच्या वेळी बरेच आक्षेप घेतले. तेव्हापासून प्रश्नोत्तरांच्या वेळी पालकांना आणि शिक्षकांचा सहभाग न देण्याचं ठरवलं. वयात येतानाचे मुलींचे प्रश्न व मुलग्यांचे प्रश्न यात तफावत असते. मुलांसमोर प्रश्न विचारायची मुलींना लाजही वाटते. म्हणून शालेय कार्यक्रमात तर नेहमीच मुलगे व मुलींचे वर्ग वेगवेगळेच घेत असू. पण महाविद्यालयीन – अकरावी-बारावीच्या टप्प्यावरही लैंगिकता- ओळख, प्रेम, मोह, विवाहपूर्व तयारी यासारखे विषय एकत्रित बसून सांगून विशेष संकोच वाटणार्या विषयांबाबत मुलांचा व मुलींचा गट वेगळा करायची पद्धत सुरू केली.

किशोरावस्थेतील मुलं-मुली घर, शाळा यापेक्षा मित्र-मैत्रिणींशी अधिक मोकळेपणी बोलतात. याचा आधार घेऊन काही peer group educators तयार करायचा प्रयोगही करून पाहिला, पण तो यशस्वी झाला नाही. दोस्त कोंडाळ्यातली त्या वयाची मुले अर्धवेळ, बिनपगारी काम करण्यासाठी उपलब्ध होत नाही. तसेच त्या वयातील प्रगल्भता, अनुभव-समज, भाषा कौशल्ये, परिपक्वता, मूल्यांवरची निष्ठा, त्यांना मिळणारा वेळ अशा अनेक पातळ्यांवर आम्हाला त्यात अडचणी जाणवल्या.

बदलत्या काळात, माहितीच्या युगात लैंगिक शिक्षण अनेकांपर्यंत सहज पोहोचत आहे. पूर्वीपेक्षा जास्त पुस्तके, मासिके, चर्चा, कार्यक्रम होताना दिसतात. इंटरनेटसारख्या माध्यमानेही काहीशी माहिती अनेकांपर्यंत पोहोचताना दिसते. या पार्श्वभूमीवर पालकांच्या आणि शिक्षकांच्या प्रतिसादात काही बदल घडलाय असं वाटतं का?

पालकांची व शिक्षकांची लैंगिक शिक्षणाविषयीची मान्यता वाढलीय हे खरंच. समुपदेशनात मोकळेपणा आलाय. शिक्षक स्वतः मुलामुलींबरोबर ही चर्चा करायला आजही तयार नसतोच. त्याला तीन कारणं दिसतातं. एक तर त्यांना स्वतःलाही पुरेसं ज्ञान नसतं. दुसरं, ज्ञान असेल तरीही ते मांडण्याची पद्धत अवगत नसते. आणि तिसरं, आपल्याबद्दल विद्यार्थ्यांचं मत काय होईल ह्याची त्यांना चिंता असते. हे जाणूनच कदाचित मुलेही शिक्षकांपेक्षा इतर त्रयस्थ व्यक्तीकडून ऐकायला उत्सुक असतात.

आजही आम्हाला जाणवतं की मुलींच्या मासिक पाळीसंबंधी बोलण्याची गरज समाजाला दिसते, पण मुलग्यांबरोबरचं काम कमी पडतंय. किशोरवस्थेतील बदलाला मुलग्यांना ‘तयार करणं’ खूप गरजेचं आहे.
अद्यापही माहिती घेण्याचा उद्देश-‘रोग/धोके टाळावे’ यासाठीच असतो. लैंगिकतेची भावनिक-मानसिक बाजू व जबाबदार लैंगिक वर्तनाविषयी काहीच बोललं जात नाही, ह्याबद्दल खंत वाटत राहाते.
स्त्री-पुरुषातील निकोप व आनंदी नात्यासाठी लैंगिकता शिक्षणाची गरज निर्विवाद आहे-मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी, त्यांची मोठेपणाकडे जातानाची वाटचाल सुकर होण्यासाठी, लैंगिकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी !