वंचितांमधे शिक्षणातून सामर्थ्य निर्मिती

राजन इंदुलकर यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी श्रमिक सहयोगबद्दल या आधी लिहिलं आहे. त्या लेखांचं संकलन पुढील काही अंकांमधून आपल्या समोर मांडत आहोत. या कामामागची भूमिका, या वंचित समाजांचा अभ्यास, त्यातून साकारलेली वैशिष्ट्यपूर्ण शिक्षणपद्धती खूप काही शिकवणारी नि मुळातून विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. आपल्याला आवडेल असा विश्वास आहे.

श्रमिक सहयोग संस्थेने वंचित घटकांतील मुलांच्या शिक्षणपद्धतीविषयक शोधाचे कार्य सन १९९२ पासून हाती घेतले. सुरुवातीला ग्रामीण भागातील शैक्षणिक स्थितीचे आकलन होण्यासाठी तपशीलवार अभ्यास केला.
या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात काम करण्याचे ठरविले. रत्नागिरी जिल्ह्यात गवळी-धनगर आणि कातकरी-आदिवासी या दोन समाजातील बहुतांश मुले शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत, हे ध्यानात आल्याने या दोन समाजांबरोबर भविष्यात काम करण्याचे संस्थेने ठरविले.

गवळी-धनगर आणि कातकरी समाजाची स्थिती आपण समजावून घेऊ.
गवळी-धनगर
हा समाज मुख्यत: कोकणातील पूर्वेकडे पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहातो. हा समाज मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर या (रत्नागिरी जिल्ह्यातील) सहा तालुक्यांत सह्याद्रीच्या रांगांवर वस्ती करून आहे. त्यांची वस्ती अतिशय लहान म्हणजे पाच ते पंचवीस घरांची असते. एका घरात दोन ते पाच कुटुंबे राहातात. म्हणजे एका वस्तीवर सरासरी साठ ते सत्तर लोकसंख्या असते.
हा गवळी-धनगर समाज सह्याद्रीच्या माथ्यावर पिढ्यानपिढ्या, साधारणपणे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीपासून राहात आहे. त्यांचा पूर्वीचा व्यवसाय सह्याद्री पर्वतातून मालाच्या ने-आणीसाठी बैल पुरविणे, वाहतूक करणे असा होता. कालांतराने पर्वतात रस्ते झाल्यावर त्याला दुग्धव्यवसायाकडे वळावे लागले. पर्वतात दाट जंगल असल्यामुळे उन्हाळ्यात गवताची टंचाई असते. त्यामुळे पाणी व गवतासाठी त्याला वर्षातून तीन ते चार महिने वस्ती सोडून इतरत्र जावे लागते. पाऊस पडू लागला की पुन्हा तो आपल्या वस्तीवर येऊन राहतो. दुधाचे सातत्य नसते. जनावरे फिरती असल्याने दूध फार मिळतही नाही. ते विकावयाचे तर डोंगर उतरून पाच-सहा मैल चालत येऊन गावात विकावयाचे. त्यातून मिळणार्या पैशावर मीठ-मिरची आणि जनावरांसाठी भुशीपेंड खरेदी करावयाची.

गावातील दुकानदाराकडे सारा हिशेब असतो. तो हिशेब शिलकीत कधीच नसतो. उलट देणे वाढल्यावर वर्षाकाठी एखाददुसरे जनावर विकावे लागतेच.
भाकरीसाठी तो डोंगरउतारांवर रान साफ करून नाचणी, वरी पिकवतो तर भातासाठी गावातील खोतांची खंडी अर्धाखंडीची शेती मक्त्याने करतो. ही सारी कमाई जेमतेम पोट भरण्याइतपत असते. रात्रंदिवस बारा महिने कष्ट करावे लागतात. घरातील प्रत्येकाकडे कामाच्या जबाबदार्या असतात. सकाळी उठून शेण गोळा करणे, दूध काढणे, गुरे सोडणे, दूध घेऊन खाली गावात जाणे, पाणी भरणे ही नित्यनेमाची कामे असतात. शिवाय शेतीची कामे असतात. पाळलेली

जनावरे सोडल्यास स्वत:च्या मालकीचे असे काहीही नाही. या भागातील सार्या जमिनी खोताच्या मालकीच्या आहेत. वनखात्याची जमीन येथे नाही.

या डोंगरातून विखुरलेपणानं राहाणारा धनगर समाज खोतांच्या मर्जीनुसार तेथे राहतो. सभोवतालच्या जंगलाचा गरजेपुरता उपयोग करून घेणे, गरजेपुरती शेती करणे, राहाण्यासाठी घर, गोठे इ. बांधणे हे सारे काही खोतांशी गोडीगुलाबीने राहून करावे लागते. वेळोवेळी खोतांच्या हातापाया पडावे लागते. खोतांना गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडे मजुरीला जावे लागते. एखादा धनगर आपले ऐकत नसेल तर खोत त्याला गावच्या देवळात बोलावतात आणि देवासमोर नाक घासावयास लावतात. भात, नाचणीच्या मिळणार्या उत्पन्नातील चौथा हिस्सा डोक्यावर घेऊन, डोंगर उतरून गावात आणून खोतांच्या दारात टाकावा लागतो. झाडझाडोर्याचा मोबदला द्यावा लागतो. दुधाच्या व्यवसायात त्याला अजिबात फायदा मिळत नाही. सारा हिशेब गावातील दुकानदाराकडे ठेवलेला असल्याने त्यात फसवणूक होते.

अशा रीतीने एकेकाळी संपन्नावस्थेत राहाणारा गवळी-धनगर आज हतबल झालेला आहे. जनावरांचे, प्राण्यांचे ज्ञान, जंगलाविषयीची माहिती, कष्टाळूपणा, दुधाचा पारंपरिक व्यवसाय हे सारे जवळ असूनही तो आपल्या जगण्याविषयी अतिशय निराश बनला.

गवळी-धनगरांची मुले आठव्या-नवव्या वर्षीच करतीसवरती होतात. गुरे चरविणे, गोठा साफ करणे, धाकट्या भावंडांना सांभाळणे, जेवण करण्यास मदत करणे, पाणी भरणे, शेतीच्या कामात भाग घेणे इ. कामे मुलांना करावी लागतात. या काळात शाळेत जाऊन शिकणे त्यांना शक्य होत नाही. बहुतेक शाळा गावातील मुख्य वस्तीत आहेत. धनगर वस्तीपासून

या शाळांचे अंतर सुमारे तीन ते सहा कि. मी. एवढे असते. ही पाऊलवाट डोंगरदर्यातून, जंगलातून जाणारी असते. या स्थितीत गावातील शाळेत येऊन बसणे आणि शिकणे अतिशय दुरापास्त असते.

अलीकडल्या काळात चिपळूण तालुक्यातील या समाजाच्या पन्नास वस्त्यांपैकी पाच-सहा वस्त्यांत शासनाने शिक्षणाची सोय केली आहे. पण चौथीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली तरी पुढचे शिक्षण घेणे अवघड असते. त्यामुळे

धनगरांच्या मुलांनी शिकून आपल्या जीवनाला वेगळे वळण द्यावे, अशी शक्यता दिसत नाही. या अपार कष्टांतून मुक्ती व्हावी म्हणून मुलांना अगदी लहान वयातच चिपळूण, पुणे अशा शहरात धाडतात. तेथे जाऊन ही मुले हॉटेलात वेटरची कामे करतात. तेथे मुलांना पोटभर खायला मिळते. यातून आमदनी वाढत नाही. एकूणच या गवळी-धनगरांचे संपूर्ण जीवन कष्टाचे, अगतिकतेचे आणि निराशेचे झाले आहे.

आदिवासी-कातकरी
हा समाज मूळचा रायगड जिल्ह्यातील आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षांत तो रत्नागिरी जिल्ह्यात भटकत येऊन काही प्रमाणात स्थिरावला आहे. या समाजाची वस्ती प्रामुख्याने मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण या चार तालुक्यात आहे. चिपळूण तालुक्यात कातकरी समाजाच्या तीस वस्त्या आहेत. एका मध्यम वस्तीत दहा ते पंधरा कुटुंबे असतात तर मोठ्या वस्त्यांमधील कुटुंबांची संख्या पन्नास ते साठ पर्यंत असते. या वस्त्यांना ‘राजवाडा’ असे म्हटले आहे.
कातकरी ही महाराष्ट्रातील आदिवासी जमातींपैकी सर्वात जुनी जमात आहे. तिला शासनाने सर्वात मूळची (most primitive tribe) जमात असे जाहीर केले व तिची जपणूक करण्याची भूमिका घेतली आहे. येथील वास्तव मात्र खूपच वेगळे आणि भयंकर असे आहे.

ही जमात अतिशय दुर्दशेमध्ये जगत आहे.
मूलत: कातकरी हा सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध असा समाज आहे. त्याच्याकडे भोवतालच्या परिसरातील घटना, वनस्पती, पशु-पक्षी, ऋतुचक्र, प्राणीजीवन, निसर्गचक्र याविषयी प्रचंड ज्ञान आहे. विविध कला, करामती यात ते पारंगत आहेत, चपळ आहेत. त्यांची सर्व इंद्रिये अतिशय संवेदनशील व तीक्ष्ण आहेत. बुद्धी आणि शरीर दोन्हीचा उपयोग ते लीलया करू शकतात.

मात्र काळाच्या ओघात समाजात उभ्या राहात गेलेल्या शोषण व्यवस्थांनी कातकर्याला पुरते जखडून टाकले आहे. ठाणे-रायगड जिल्ह्यात त्यांचे मूळ आहे आणि तेथे उभ्या राहिलेल्या चळवळींमुळे तो काहीसा स्थिरावला आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती खूपच वेगळी आहे. येथे तो पूर्णत: उपरा ठरला आहे. गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून तो या परिसरात म्हणजे सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात जंगलतोडीवर काम करण्यासाठी येऊ लागला. १९५७ सालच्या कूळ कायद्यामुळे आणि आंबेडकरी चळवळीच्या प्रभावामुळे येथील बौद्ध आणि कुणबी समाज खोतांच्या चाकरीतून काहीसे मुक्त झाले. खोतांना हक्काचा मजूर हवा होता. जंगलतोडीवर अपार कष्ट करणारा कातकरी त्यांना आयता मिळाला. खोतांनी आपल्या मालकीच्या जमिनीवर त्यांना झोपड्या बांधू दिल्या. वर उदारपणाने सरकारी पैशातून काही गावात इंदिराआवास योजनेतील घरे बांधून दिली. जेणेकरून कातकर्याने आपल्या गावात राहावे व आपली चाकरी करावी. आपला हक्काचा बांधील मजूर म्हणून त्याने आपल्या गावात राहावे, असा खोत मंडळींचा हेतू होता.

सकाळी आठ ते सायंकाळी आठ असे बारा तास कातकरी नवरा-बायको खोतांच्या शेतीची कामे करतात. मोबदल्यात त्यांना प्रत्येकी वीस रुपये रोख आणि तीन वेळेचे अन्न मिळते. संध्याकाळचे अन्न म्हणून दोन शेर तांदूळ मिळतात. वयाच्या आठ-दहा वर्षापासून कातकरी मुले खोतांची गुरे राखण्याचे काम करतात. याचा मोबदला त्यांना हंगामाला (चार महिने) शंभर ते दोनशे रुपये इतका दिला जातो. यापैकी काही कातकरी कुटुंबे खोतांची बंधबिगार असतात.
पावसाळ्यात पाच महिने खोतांची शेती केल्यानंतर कातकर्यांना मजुरीसाठी इकडे तिकडे भटकावे लागते. परिसरातील ठेकेदार त्यांना या काळात जंगलतोडीसाठी (ही जंगलतोड बर्याच प्रमाणात अवैध असते) नेतात.

नद्या-नाल्यातील मासे पकडणे, रानात जाऊन शिकार करणे हे कातकर्यांचे पारंपरिक व आवडीचे छंद आहेत. याखेरीज मैलात (सह्याद्रीच्या माथ्यावरील जंगलात) जाऊन वनौषधी, मध गोळा करून ते ठेकेदारांकडे कवडीमोलात सुपूर्द करतात. ही सारी कामे अपार कष्टाची, जोखमीची आणि कसबी असतात. ती कातकर्यांनाच जमतात. कातकरी या सर्व कामांत तज्ज्ञ आहेत. मात्र वर्षाचे ३६५ दिवस कष्ट करून कातकरी पुन्हा रिकामाच राहातो. साठवणूक, बचत करण्याची त्याला सवय नाही. तेवढी कमाईदेखील होत नाही. शिक्षणाचा अभाव असल्याने हिशेब ठेवला जात नाही. जोडीला दारूचे व्यसन जडलेले आहे. आहार अपुरा आणि निकस असतो. त्यामुळे कुपोषण होते. टी.बी., कॅन्सर असे रोग जडतात. सामाजिक संघटनाचा अभाव असल्याने लैंगिक संबंधांचे नियमन होत नाही. त्यामुळे अनेक घातक रोग जडतात.

येथील कातकरी समाज अंधारात वावरत आहे. समाजात त्याला मानाचे सोडाच, पण माणूस म्हणूनही स्थान नाही. गोठ्यातील गाई-गुरे जशी असतात तसे खोत, ठेकेदार मंडळी यांना जनावराची वागणूक देतात. मारहाण, शिवीगाळ करतात. हे दुष्टचक्र भेदायचे तर शिक्षणाची गरज आहे. मात्र चिपळूण तालुक्यातील ७०% कातकरी मुलांनी सरकारी शाळेत प्रवेशच केलेला नाही. ज्यांनी प्रवेश केला ती मुले चौथी, पाचवीनंतर पुढे शाळेत टिकली नाहीत. सरकारी शिक्षकांना वर्गातील पट राखण्यासाठी ही मुले हवी असतात. ती नित्यनेमाने शाळेत यावीत, शिकती व्हावीत यासाठी मात्र काहीच प्रयत्न होत नाहीत. कातकर्यांचे जगणे समजून घेतल्याशिवाय, त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केल्याशिवाय या मुलांचे शिक्षण होणार नाही. याविषयीची जाण सरकारी यंत्रणेमध्ये आढळत नाही.

श्रमिक सहयोगाचे शैक्षणिक पाऊल
चिपळूण तालुक्यातील गवळी-धनगर आणि कातकरी-आदिवासी या दोन्ही समाजांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. सरकारी सवलती, योजनांची तरतूद असली तरी आजतागायत या सवलती आणि योजनांचा लाभ या दोन्ही समाजांना घेता आलेला नाही. हे दोन्ही समाज शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांचे शिक्षण करणे हे एक मोठे आव्हानच आहे. हे शिक्षण पठडीबद्ध, पुस्तकी स्वरूपाचे असून भागणार नाही. या प्रतिकूल परिस्थितीत असे पठडीबद्ध शिक्षण झालेच तर एकेक सुटी सुटी व्यक्ती शिक्षित होईल. मात्र अशा तर्हेने या वंचित घटकांच्या स्थितीत बदल होणे ही अतिशय अवघड बाब आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आयुष्यातील पंधरा ते वीस वर्षे शिकून आपले स्थान निर्माण करावयाचे तर तेवढी ताकद या दोन्ही समाजांकडे नाही. या सार्या बाबी लक्षात घेऊन श्रमिक सहयोग संस्थेने या दोन्ही समाजांबरोबर शैक्षणिक प्रक्रिया चालविण्याचे काम सन १९९२ पासून हाती घेतले. आमच्या डोळ्यांसमोर तीन ढोबळ उद्दिष्टे होती.
१. आपल्या समाजातील वैविध्यपूर्णता, प्रत्येक समाजाची सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यावर आधारलेली शिक्षणपद्धती कशी असावी, त्याचा शोध घेणे.
२. धनगर, कातकरी या वंचित समाजांचे शिक्षण सकारात्मक पद्धतीने घडावे, जेणेकरून या समाजातील ताकदींचा आणि सामर्थ्यांचा उपयोग त्यात केला जाईल आणि मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होईल.
३. अशा वंचित समाजातील मुलांचे शिक्षण हे एक सुटी सुटी व्यक्ती म्हणून आपल्या समाजापासून वेगळे होऊन मोठे होण्यासाठी नव्हे, तर आपल्या समाजाला त्याच्यावर लादल्या गेलेल्या दुष्टचक्रातून, शोषणातून मुक्त करण्यासाठी झाले, तर खर्या अर्थाने ते उपयुक्त ठरेल, हे लक्षात घेऊन अशा शिक्षणाची प्रयोगशील स्वरूपात मांडणी करणे.

वरील उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने निवडक वस्त्यांत कामाला सुरुवात केली. प्रारंभी चिपळूण, संगमेश्वर व गुहागर या तीन तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळांचा नमुना सर्व्हे केला. त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर तपशीलवार अभ्यास करण्यासाठी तीन शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांतून व सततच्या विचारमंथनातून धनगर आणि कातकरी या दोन वंचित समाजातील निवडक वस्त्यांत अनौपचारिक शिक्षण वर्ग चालवून शिक्षणपद्धतीविषयक शोधाचे काम करण्याचे ठरले. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील पाच धनगर वस्त्यांत अनौपचारिक शिक्षण वर्ग चालू करण्यात आले. ही संख्या पुढे वाढत गेली. धनगर समाजात शिक्षणाविषयी सुप्त अशी आकांक्षा असल्याचे आम्हाला जाणवले. मात्र कातकरी समाजात शिक्षणाविषयीच नव्हे, तर एकूणच जीवनाविषयी आणि भविष्याविषयी कमालीची अनास्था होती. त्यामुळे आस्था निर्माण होऊन काही वस्त्यांत शिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. शेवटी ओवळी या गावातील कातकरीवाडीत वाट सापडली. एकदा ही वाट सापडल्यावर पुढे आणखी काही कातकरीवाड्यांत शाळा सुरू करणे फार अवघड राहिले नाही. अशा रीतीने धनगर समाजाच्या पाच वस्त्यांत तर कातकरी समाजाच्या दहा वस्त्यांत अनौपचारिक शाळा सुरू झाल्या.