संवादकीय – जून २००७

शालेय वयातल्या अनेक मुलामुलींसोबत शिबिर सहली, स्नेहसम्मेलन, गंमत जत्रा, दुकान जत्रा असे अनेक कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांनी आायोजले, पार पाडले असतील. कार्यक्रम उत्तम होतात, खूप धमाल येते, सगळं खरं, पण शेवटी फार शीण येतो हेही आठवत असेल. पालकनीतीच्या वाचक वर्गात अनेक शिक्षक-शिक्षिका आहेत, उत्साही पालक आहेत. ह्या सर्वांनी हा अनुभव घेतलेला असणार.

मुलं खूप उत्साही असतात, ती जवळजवळ दमतच नाहीत, दंगा, आरडाओरडी, चिडवणं, खिदळणं ह्या सगळ्याला अशा वेळी ऊत आलेला असतो. आणि आपल्याला काही अडचण न येता सगळं सुखरूप पार पडण्याच्या धास्तीनं ग्रासलेलं असतं. एकीकडे कार्यक्रम छान पार पडण्याचा, आनंद, मुलांच्या उत्साहाचं कौतुक वाटत असतं, त्याचवेळी ही धाकधुकीची जाणीवही असते.

पालकनीतीच्या खेळघरातही अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम नेहमीच होत असतात. ह्या निमित्तानं मुलांना वेगवेगळे अनुभव घ्यायला मिळतात. मोकळेपणा मिळतो, त्यामुळे अशा कार्यक्रमांना महत्त्वही असतं.
अगदी सुरवातीच्या आखणीपासून ते शेवटच्या आवराआवरीपर्यंत आमची मुलं उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. कुठल्याही कामाला त्यांची मनापासून तयारी असते. पण तरीही ती मुलं असतात. आपण मोठे असतो. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचं नीट नियोजन करणं आणि तसं पार पाडण्याची जबाबदारी आपलीच असते असं मनात पक्कं असतं आणि त्याचा ताणही असतो. शेवटीशेवटी चक्क थकायला होतं. कधीकधी तर इतकं आपण करतो पण मुलं आपल्या अपेक्षेएवढी जबाबदारी घेतच नाहीत नि मग आपलीच हौस आहे की काय सगळी असंदेखील प्रसंगी वाटून जातं. मग रागही येतो.

मे महिन्यात शाळेला सुट्ट्या, मग खेळघराच्या मुलांना सहलीचे वेध लागले. दोन दिवसांची निवासी सहल, पुण्यापासून चाळीस किलोमीटरवरच्या एका शेतघरात न्यायची ठरली. तिथून जवळच्या किल्ल्यावरही जाऊन येता येणार होतं.
मनात नियोजन सुरू झालं. दोन दिवस म्हणजे निदान चार जेवणं. खेळघराच्या दोनच ताई सोबत असणार होतो आणि चाळीस मुलं !

शेतावरच्या त्या घरात, स्वयंपाक करायला हरकत नव्हती, पण करून मिळायची सोय नव्हती. मुलांच्या मदतीने एवढा स्वैपाक करायचा तर अगदी पार थकायला होतं हा आधीचा अनुभवही होता.
मग अगदी वेगळाच विचार केला आणि ह्या सहलीत तो प्रत्यक्षात आणून बघायचंच ठरवलं. मुलांशीच सगळं बोललो आणि उपायही सुचवला. मुलांनी आणि आम्ही चार गट केले. प्रत्येक गटात आठवीपासून बारावीपर्यंत मुलंमुली होती.

प्रत्येक जेवणाची जबाबदारी एकेका गटावर दिली. मग त्यासाठी काय काय लागेल, त्याची यादी, खरेदी, तयारी, आणि प्रत्यक्ष स्वैपाकही त्यांचा त्यांनीच करायचा, आणि सर्वांना जेवायला घालून नंतरची आवराआवरी करून भांडी घासण्यापर्यत सगळं त्यांनीच निभवायचं ठरलं. मुलं म्हणाली, ‘‘चालेल, पण तुम्ही चवी सुधारायला वगैरे यायचं नाही मधेमधे.’’

आम्ही म्हणालो, ‘‘ठरलं, जे द्याल ते जेवू.’’ झालं! मुलांना इतका हुरूप चढला, त्यांनी याद्या केल्या, सर्वांच्या याद्या एकत्र करून खरेद्या झाल्या. स्वयंपाकात निष्णात असलेल्या काकूंकडे जाऊन पाककृती लिहून आणल्या.
तरी आम्हाला आशा होती, खास मोठ्यांची आशा, प्रत्यक्ष स्वैपाक करताना तरी बोलावतील, काहीतरी जमणार नाही, मग बोलवावंच लागेल ना !
पण काही नाही. आम्हीच होऊन स्वैपाकघरांत डोकावलो तर, ‘‘झालं सगळं की पानं वाढल्यावर मग या.’’ असं म्हणून तिथं थांबूही दिलं नाही.

चाळीस जणांचा स्वैपाक म्हणजे अंदाज घेणं आलं, काय आधीपासून करायचं, काय नंतर ह्याचं नियोजन आलं, काही मुलं त्यामानानं लहानही प्रत्येक गटात होती. त्यांना त्यांच्या योग्य कामं देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, सगळं त्यांचं त्यांनी केलं. क्वचित आवाज चढायचे, पण आपसात मिटवूनही घेतलं जायचं. अस्से स्वैपाक तर मग मस्तच झाले. हे काम त्यांनी ‘आपलं’ म्हणून केलं होतं, त्या आपलेपणाची चव जेवणात उतरली होती.
तर असं हे शिबिर मुलांनी उत्तम निभावलंच, आम्ही मात्र मुलं स्वैपाक करतानाही इकडे काळजी करत होतोच – काही कापणार तर नाही ना, भाजणार तर नाही ना, मुलं समजुतीनं वागतील ना, भांडणाच्या नादात काही ‘उद्योग’ करून ठेवणार नाहीत ना! अन्न वाया जाणार नाही ना, साधनांची नासधूस करून ठेवणार नाहीत ना, असे हजार प्रश्न आमच्या मनात आले.

पण, गप्प बसलो. यावेळी पक्कं ठरवलं होतं की मुलांवर ‘विश्वास’ टाकून तर बघूया. आपल्या हातूनही कधी काही चुकतं, बिघडतं की! झालंच तर निस्तरूया मागून.
पण गंमत म्हणजे असं फारसं झालं नाही. आमच्यावर करायला काहीच पडलं नाही. नाही म्हणायला एक प्रश्न पडला, ‘‘लहानांवर विश्वास ठेवणं मोठ्यांना इतकं जड का जातं? असा विश्वास टाकणं ह्या आधीच का बरं सुचलं नाही?’’