संवादकीय – सप्टेंबर २००७
ह्या नंतरचा अंक दिवाळीचा. मराठी साहित्य जगात सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंक हा वर्षातला सर्वात वैशिष्ट्याचा. पालकनीतीही ह्याला अपवाद नाही.
एखाद्या विषयावर थोडंही आजूबाजूनं मांडावं तर एरवी पृष्ठसंख्या वाढण्याचं भय. ह्यातून थोडी फुरसत मिळते ती दिवाळीतच. ह्यावेळच्या दिवाळी अंकाचा वेध – विषय परिवर्तन असा योजलाय. खरोखर काही आमूलाग्र बदलाची वाट आपण प्रत्येकजण चालतो का? चालू शकतो का? त्यात अडखळतो का? ते कशामुळे? ही वाट सुकर झाली तर परिघाची फेरी संपवून आपण त्याच ठिकाणी पुन्हा येतो का? ह्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी आहे. मुखपृष्ठावरची कविता अशीच… लैंगिकता शिक्षणाचा आणि जगण्याचा, असण्याचा संदर्भ आपल्या मनात जागा करून सोडणारी.
कधी हा प्रश्नच पडायला लागतो की बदलासाठी बदल म्हणून कुणी आपल्याला बदलायला भाग पाडतं, की बदल हीच सर्वात सहजप्रक्रिया आहे म्हणून आपण बदलासमोर निमूट मान तुकवतो? लैंगिकता शिक्षणाला विरोध असला, तरीही ते होईल, होतंही पण अनेक छोटी गर्भाशयं जगात येण्याआधीच निपटली जात असतील तर मग साधलं तरी काय? आपण कुठून निघालोय, कुठे पोचायचंय ह्याचा काही
किमान संदर्भ त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत असतो की नाही, हे बघण्याचा हा प्रयत्न दिवाळी अंकात आपण करूया.
बेळगावसारख्या अगदी काही लहानखुर्या नव्हे, शिवाय काही एक परंपरा असणार्या गावात पुण्याहून गेलेली मैत्रीण म्हणते, ‘इथं शांत आहे सगळं. रस्त्यात कुणा एकदोघा वाहनांनी एकमेकांना आडवं लावलं, तरी बाकीचे दोन-पाच मिनिटं थांबून राहातात स्वस्थपणं. पुण्या-मुंबई-नाशकात मागून करतात तसा गिल्ला नाही करत इकडे. थोडं मागे पुढे करून ते वाट काढतील, की मग जायचं आपण, असा त्यांचा आपला साधा विचार दिसतो. पुण्यात आल्यावर वाटतं, सगळ्यांना सारखी घाईचीच लागलेली असते का काय?’
बदलाची – परिवर्तनाची घाई लागून खड्ड्यात पडत, इकडेतिकडे चिखल उडवत पण त्याकडे (कळूनही) वळूनही न पाहाता पुढे पुढे जाण्याची ही नवी बदलप्रक्रियाच बदलायला हवीय का?
बट्रांड रसेलचा एक सुंदर लेख वाचायला मिळाला. त्यांनी शिक्षणाचं ध्येय नेमकं काय, आणि विविध शिक्षणपद्धतीत त्या ध्येयाचा संदर्भ कसा आणि किती ठेवलाय यावर भाष्य केलं आहे.
‘शिक्षणाचं एक ध्येय ‘धैर्य’ असतं. शिक्षणानं पुढची वाट दिसावी, स्पष्ट व्हावी, आणि वाट निवडण्याचं, त्या वाटेनं जाण्याचं धैर्य यावं,’ असं नोंदवलं आहे आणि पुढे एक उदाहरण दिलंय, लहान मुलांचं. त्यांच्याजवळ धैर्य असतं, असं जरी म्हणता येणार नाही, तरी धैर्याच्या विरोधी ‘भीती’ही नसते. आधी अजिबात न घाबरणारं, किंबहुना भीतीची जाणीवच नसणारं मूल शाळेत जाऊ लागतं आणि मग आज्ञाधारक बनतं, म्हणजे त्याचे शासक सांगतील तेच आणि तेवढंच करणं त्याला झेपू लागतं. त्याबाहेर जाण्याचं धैर्य त्याच्या ठायी राहात नाही.
त्यांनी म्हटलंय की, ‘कोणाही लहान मुलाला अंधारात ‘कोणी पकडेल, इजा करेल’ असं अजिबात शिकवलं नाही, तर तो अंधाराला घाबरण्याचं कारणच असत नाही. आपण आधी घाबरायला शिकवतो, आणि मग घाबरू नये, धैर्य अंगी यावं, म्हणून प्रयत्न सुरू करतो.’
शिक्षणानं माणसात परिवर्तन घडतं, हे काही माझ्यासारखीनं तुम्हा सर्वांना नव्यानंच जणू काही असं सांगण्याजोगं वाक्य नाही. ते खरंच आहे, नाहीतर आपण शिकलोच का असतो? पण शिकण्यानं नेमकं काय परिवर्तन व्हायला हवं आणि नेमकं कोणतं प्रत्यक्षात घडतं?
धैर्याचं हे उदाहरण त्या लेखात वाचताना मला वाटलं, आपण सर्वांनी थोडं थांबून स्वतःकडे, परिवर्तनाच्या उर्मीकडे बघूयात. क्षणभर ह्या अंकाच्या टप्प्यावर थांबूया, आणि नेमक्या रस्त्याचा, ध्येयाचा, आणि ध्येयामागच्या कारणाचा अंदाज घेऊया. परिवर्तनाचा हा विषय आपापल्या मनात, संवादाला घेऊया, म्हणजे नंतरचा ‘परिवर्तन’ विशेषांक वाचताना आपल्याला कदाचित अधिक रंगत येईल. कुणी सांगावं?