शिक्षा

महात्मा गांधींचे नातू आणि एम. के. गांधी इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. अरुण गांधी यांनी प्युरिटो रिको युनिव्हर्सिटी येथील व्याख्यानात खालील गोष्ट सांगितली.

दक्षिण आफ्रिकेतील दरबान या शहरापासून अठरा मैल लांब उसाची शेतं होती. तिथे माझ्या आजोबांनी एक संस्था स्थापन केली होती. सोळा वर्षाचा असताना मी माझ्या आईवडिलांबरोबर तिथे राहात होतो. तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे.

आम्ही गावापासून खूप लांब राहात होतो. त्यामुळे आम्हाला शेजार असा कुणाचा नव्हताच. त्यामुळे मी आणि माझ्या दोघी बहिणी, शहरात जाऊन मित्रमैत्रिणींना भेटायची, सिनेमा बघण्याची केव्हा संधी मिळत्येय यासाठी अगदी टपून बसलेले असायचो.

एक दिवस माझ्या वडिलांना दिवसभराच्या एका कॉन्फरन्ससाठी शहरात जायचं होतं. मी गाडीतून त्यांना तिकडे न्यावं असं त्यांनी सुचवलं तेव्हा मी मनातल्या मनात आनंदानं उडीच मारली. शहरात जाणार असल्यानं आईनं तिला हव्या असणार्या किराणा सामानाची यादी मला दिली आणि मी दिवसभर तिथे थांबणार असल्यामुळे वडिलांनी बरेच दिवसांपासून करायचं राहिलेलं गाडीचं सर्व्हिसिंग उरकून घ्यायला सांगितलं.
त्या दिवशी सकाळी मी वडिलांना त्यांच्या कामाच्या जागी सोडलं तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी संध्याकाळी पाच वाजता तुला इथेच भेटीन. मग आपण दोघं घरी जाऊ.’’

माझी सगळी कामं घाईघाईनं उरकून मी तडक चित्रपटगृह गाठलं. तिथे जॉन वेनचा डबलरोल असलेला चित्रपट पाहण्यात मी इतका रंगून गेलो की साडेपाच कधी वाजले ते मला कळलंच नाही. मी अगदी घाईघाईनं गॅरेजमधे जाऊन गाडी घेतली आणि आमचं जिथे भेटायचं ठरलं होतं तिथे गेलो तोपर्यंत जवळजवळ सहा वाजले होते. मी तिथे पोचताक्षणीच त्यांनी विचारलं, ‘‘काय रे, इतका उशीर का झाला?’’ मी जॉन वेनचा चित्रपट पाहण्यात गुंगल्यामुळे उशीर झाला असं सांगायची मला लाज वाटली. म्हणून मी सांगितलं की गाडी दुरुस्त झालेली नव्हती, त्यामुळे मला थांबावं लागलं. पण माझ्या हे लक्षात आलं नाही की त्यांनी आधीच गॅरेजमधे चौकशी केली असणार. त्यामुळे माझा खोटेपणा उघडा पडला.

ते म्हणाले, ‘‘तू मला सत्य निर्भयपणे सांगू शकतोस असा विश्वास तुझ्या मनात निर्माण करण्यात मी कमी पडलो. ह्याचा अर्थ तुला वाढवताना माझी कुठेतरी चूक झाल्येय. ती चूक शोधून काढण्यासाठी मी घरापर्यंतचे हे अठरा मैल अंतर चालत येणार आहे. म्हणजे चालताचालता मला शांतपणे विचार करता येईल.’’ आणि सूटबूट अशा साहेबी पोशाखातले माझे वडील त्या अंधार्या, खडबडीत रस्त्यावरून चालत घरी यायला निघाले.
त्यांना तसंच सोडून गाडीतून एकटाच पुढे निघून जाणं मला शक्यच नव्हतं. माझ्या खोटेपणामुळे वडिलांना किती मनःस्ताप सहन करावा लागतोय हे निमूटपणे बघत व त्यांच्यामागून हळूहळू गाडी चालवत घरी येण्यावाचून मला काही पर्यायच नव्हता. घरी पोचायला आम्हाला तब्बल साडेपाच तास लागले. तत्क्षणी मी मनोमन पुन्हा कधीही खोटं न बोलण्याचा निश्चय केला.

या प्रसंगाबद्दल माझ्या मनात नेहमी हा विचार येतो की अशावेळी मुलांना सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीनं शिक्षा केली जाते तशीच शिक्षा वडिलांनी त्यावेळी मला केली असती तर मी त्यातून काही बोध घेतला असता का? निश्चितच नाही. मी शिक्षा भोगली असती आणि पुन्हा ती चूक करायला मोकळा झालो असतो. पण त्यांच्या त्या एकाच साध्या वाटणार्या अहिंसक वर्तणुकीचा माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला की मला अजूनही ती घटना अगदी कालच घडल्यासारखी वाटते. मला वाटतं हेच अहिंसेचं सामर्थ्य आहे.

कुमारवयीन मुलांशी वागताना नेहमीच अनेक प्रश्न पडतात. त्यांच्याशी संवाद टिकवून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी करून द्यायची?