संशोधक घडवताना

माझा एक कलाकार मित्र आहे, कधीकधी असं होतं की त्याच्या काही म्हणण्यांशी/मतांशी मी सहमत नसतो. एखादं फूल हातात घेऊन तो म्हणेल, ‘बघ किती सुंदर आहे हे’, माझंही तेच मत असेल. पण त्यानंतरची त्याची टिप्पणी असेल, ‘‘एक ‘कलाकार’ असल्याने मला फुलाचं सौंदर्य दिसतं पण तू शास्त्रज्ञ, तू तर त्याची चिरफाड करणार आणि त्याची वाट लावणार.’’ मला वाटतं तो जरा आगाऊ आहे.

पहिली गोष्ट म्हणजे, जे सौंदर्य त्याला दिसतं ते सर्वांसाठी उपलब्ध आहे, अगदी माझ्यासाठीसुद्धा, असं मला वाटतं. जरी माझी सौंदर्यदृष्टी त्याच्याइतकी विकसित नसली तरी फुलाच्या सौंदर्याचा आस्वाद मी घेऊ शकतो. पण त्याचवेळी त्याला जे दिसतं त्याच्यापलीकडे अनेक गोष्टी मला त्या फुलात दिसतात. त्या फुलामधल्या पेशींची कल्पना मी करू शकतो, त्याही सुंदरच असतात. सौंदर्य काही एका चौरस सें.मी. पासून पुढेच असं मर्यादित नसतं, त्याहूनही छोट्या आकारांमध्येसुद्धा ते असतं.

प्रत्येक पेशीचे काही एक कार्य असते, आणि त्याच्याशी निगडित अनेक जटील प्रक्रियादेखील असतात. फुलांच्या रंगातले वैविध्य परागीभवनाकरिता कीटकांना आकर्षित करण्यासाठी असतं ही वस्तुस्थिती भलतीच वेधक आहे, कारण याचा अर्थ कीटकांना रंग कळतात, इतकंच नाही, तर आणखीही एक असा प्रश्न उपस्थित होतो की किडा-मुंगी यासारख्या क्षुद्र कीटकांमध्येही सौंदर्यदृष्टी असते की काय? शास्त्रीय दृष्टिकोन अशा अनेक प्रश्नांना जन्म देतो आणि त्यातूनच फुलाभोवतालचं वलय अधिकच गूढ आणि गडद होऊन जातं आणि जाणून घेण्याची उत्सुकताही वाढवतं. शास्त्रीय दृष्टिकोनामुळे फुलाच्या आस्वादाचा आनंद कमी कसा काय होईल ते मात्र मला कळत नाही.

विज्ञान या विषयाला माझ्या आयुष्यात मी नेहमीच प्राधान्य देत आलो. आणि लहानपणी तर मी माझे सर्व प्रयत्न त्यावरच केंद्रित केले होते. त्या काळात मानवतावाद वगैरे विषयांकडे बघायला मला ना वेळ होता ना धीर ! पदवी परीक्षेपर्यंत या विषयाचा थोडाफार अभ्यास करणं गरजेचं होतं पण तरीसुद्धा तो टाळण्याचा माझ्या ताकदीनं मी पुरेपूर प्रयत्न केला, आता जेव्हा वय झालंय आणि मी थोडा सैलावलोय तेव्हा ह्या कक्षा मी थोड्या रुंदावल्या आहेत. मी आता चित्र काढायला शिकलो आहे. थोडंफार वाचनही केलंय. पण मुळामध्ये मी तसा एकांगीच माणूस आहे आणि मला बर्याच गोष्टी येतही नाहीत. माझ्याकडे अगदी मर्यादित बुद्धी आहे आणि ती मी एका विशिष्ट दिशेनेच वापरलीय.
ह्याचं एक कारण असंय की माझ्या जन्माच्या आधीच माझ्या वडिलांनी आईला सांगून टाकलं होतं, जर आपल्याला मुलगा झाला तर त्यानं शास्त्रज्ञ व्हायचं. मी अगदी लहानगा असताना माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बाथरूममध्ये बसवायच्या वेगवेगळ्या रंगाच्या फरश्या आणल्या होत्या. आम्ही त्यांच्याशी खेळायचो. वडील त्या एकावर एक रचायचे आणि मी त्या ढकलून पाडायचो. काही दिवसांच्या खेळानंतर मी त्या परत रचायला पण मदत करायला लागलो. नंतर रचताना त्यांच्यात जराश्या गुंतागुंतीच्या रचनाही बनवायला लागलो, दोन पांढर्या मग एक निळी… दोन पांढर्या मग एक निळी, असं काही. तरी माझी आई म्हणाली, ‘त्या बिचार्या पोराला त्याचं-त्याचं खेळू दे बरं, त्याला जी फरशी लावायची ती लावू देत की.’’ पण वडील म्हणाले, ‘‘अंहं, मला त्याला तर्हेतर्हेच्या रचना करता येतात आणि त्या किती रंजक असतात हे दाखवायचंय. गणित शिक्षणाची पूर्वतयारीच आहे ही.’’ अशा प्रकारे वडिलांनी मला खूप लहानपणापासून विश्वज्ञान द्यायला आणि ते किती वेधक असतं हेही सांगायला सुरवात केली.

आमच्या घरी विश्वकोश होता. मी लहान होतो तेव्हा ते मला मांडीवर बसवून तो वाचून दाखवायचे. समजा आम्ही डायनासोरबद्दल वाचत असू – पुस्तकात ‘टिरॅनोसोर रेक्स’बद्दलची माहिती असायची. ‘हा डायनोसोर २५ फूट उंच असतो आणि त्याचं डोकं ६ फूट लांब असतं.’ असं काहीतरी त्या पुस्तकात लिहिलेलं असायचं. वडील वाचायचं मधेच थांबवून म्हणायचे, ‘आपण आता याचा अर्थ समजावून घेऊ. समज, डायनोसोर आपल्यासमोरच्या पटांगणात उभा राहिला तर त्याला आपल्या खिडकीतून डोकावता येईल, इतका तो उंच असतो, (आम्ही दुसर्या मजल्यावर राहायचो.) पण त्याचं डोकं इतकं मोठं असेल की आपल्या खिडकीतून तो आत डोकावूच शकणार नाही.’ प्रत्येक वाचलेल्या गोष्टीचा अर्थ लावायचा त्यांचा सर्वतोपरी प्रयत्न असायचा. ‘इतके प्रचंड महाकाय प्राणी अस्तित्वात होते, ते सर्व काळाच्या ओघात नष्ट झाले, आणि त्याचं कारण कुणालाच माहीत नाही.’ हे सगळं विचारात घेणं हा प्रकार अतिशय रोमहर्षक होता. त्यांच्यातला एखादा माझ्या खिडकीतून डोकावेल अशी भीती मला कधीही वाटली नाही. पण गोष्टींचा अर्थ लावायला मात्र मी वडिलांकडून शिकलो. वाचलेली प्रत्येक गोष्ट नक्की काय म्हणते आहे, त्याचा अर्थ काय याचा अंदाज लावायचा प्रयत्न मी आजही करतो.

न्यूयॉर्क शहरातले लोक उन्हाळ्याच्या मौसमात कॅट्स्किल पर्वतावर हिंडायला जातात. आम्ही पण जायचो. वडील मंडळी सोमवार ते शुक्रवार न्यूयॉर्कमधे कामावर जायची आणि शनिवार-रविवार परत यायची. या दोन दिवसांमधे माझे वडील मला जंगलात फिरायला न्यायचे आणि जंगलातल्या अनेक चित्रकथा ऐकवायचे. हे बघणार्या आसपासच्या इतर आयांना हा प्रकार फारच आवडला. त्यांना वाटलं सगळ्याच वडीलमंडळींनी त्यांच्या मुलांना असंच फिरायला न्यायला हवं. तसं घडवून आणायचा त्यांनी प्रयत्नही केला पण त्यांना ते फारसं काही जमलं नसावं.

नंतर माझ्या वडिलांनीच सर्व मुलांना न्यावं असं त्यांनी सुचवून बघितलं. वडील काही ह्या कल्पनेला राजी झाले नाहीत. त्यांच्या मते आमच्या दोघांच्यातल्या जवळिकीचा ह्या फिरण्यात मोठा भाग होता. तसं काही इतर मुलांसह व्हायचं नाही. त्यामुळे शेवटी इतर सर्व वडिलांनाच आपापल्या मुलांना फिरायला घेऊन जावं लागलं.

पुढच्या आठवड्यात आमचे सर्वांचे वडील कामावर परत गेले, आणि एकदा आम्ही पोरं शेतात खेळत होतो, तेव्हा एकजण मला म्हणाला, ‘तो पक्षी पाहिलास, कुठला पक्षी आहे तो?’
‘मला नाही माहीत’ मी उत्तरलो.
‘तो करड्या मानेचा थ्रश पक्षी आहे. तुझे वडील तुला काहीच शिकवत नाहीत की काय?’ त्यानं टोला मारला.

पण खरं तर वस्तुस्थिती त्याच्या अगदी उलट होती. वडिलांनी मला शिकवलेलं होतं पण फार वेगळ्या प्रकारे. ‘तो पक्षी पाहिलास?’ ते म्हणायचे ‘तो स्पेन्सर्स वार्ब्लर आहे.’ (त्यांना खरं नाव माहीत नाही हे मला माहीत होतं.) ‘इटालियन भाषेत त्याला चुप्पो लॅपिटिडा म्हणतात, पोर्तुगीजमध्ये बॉम डा पीडा, चीनी भाषेत चुंग-लॉंग-टा आणि जपानीमधे कटानो टेकेडा. जगातल्या सर्व भाषांमधले त्या पक्ष्याचे नाव तुला कळू शकेल. पण ते कळल्यामुळे त्या पक्ष्याबद्दलच्या तुझ्या ज्ञानात काहीच भर पडणार नाही. यातून तुला जगात विविध ठिकाणी राहणार्या लोकांबद्दल कळेल आणि त्यांच्या भाषेत ते या पक्ष्याला कुठल्या नावाने हाक मारतात तेवढंच फक्त कळेल. आपण तो पक्षी काय करतो, काय खातो, कुठे राहातो ते बघूया – ते जास्त महत्त्वाचं आहे.’ (एखाद्या गोष्टीचं नाव माहीत होणं आणि ती गोष्ट कळणं यातला फरक मला फार लवकर कळला.)

‘हे पक्षी आपल्या पिसांमधे सारखी चोच खुपसतात, इकडे तिकडे फिरताना पण तेच करतात.’
‘हो बरोबर आहे.’ ते म्हणाले, ‘तुला काय वाटतं, पक्षी असे चोच का खुपसत असतील?’
‘कदाचित त्यांची पिसं उडताना विस्कटली जातात म्हणून चोच खुपसून ती ते सरळ करत असतील.’ मी उत्तरलो.
‘बरं’, ते म्हणाले ‘असं जर असेल तर ते जमिनीवर उतरल्यावर लगेच काही वेळ खूपदा चोच खुपसतील आणि हळूहळू काही वेळाने ते असं करणं बंद करतील. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय?’
‘हो.’ ते म्हणाले, ‘चल, आपण बघू की आपल्या अंदाजाप्रमाणे जमिनीवर उतरल्या-उतरल्या लगेच चोची खुपसणं जास्त असतं का?’

हे कळायला फारसं अवघड नव्हतं. पण जमिनीवर उतरल्यानंतर लगेच किंवा काही वेळाने चोच खुपसण्याच्या प्रमाणात फारसा फरक आम्हाला जाणवला नाही. ‘नाही सांगता येत मला का ते चोची खुपसतात?’ मी हात सरळ वर केले.
‘कारण पिसांमधल्या उवा त्यांना त्रास देतात.’ ते म्हणाले, ‘पिसांवरचा प्रथिनयुक्त पदार्थ असतो तो खायला उवा येतात. प्रत्येक उवेच्या पायावर एक मेणासारखा पदार्थ चिकटलेला असतो. काही छोटे-छोटे किडे तो पदार्थ खाऊन गुजराण करतात. या किड्यांना तो सगळा नीट पचवता येत नाही. त्यामुळे त्यांच्या विष्ठेत एक साखरेसारखा पदार्थ टाकला जातो, त्याच्यावर आणखी जीवाणू वाढतात.’

शेवटी ते म्हणाले, ‘म्हणजे बघ, सर्वत्र अन्नाचा स्रोत असतोच आणि कोणीतरी जीवमात्र तो शोधून काढतो.’
आता मला माहीत आहे की कदाचित पिसांमधे नक्की ‘ऊ’ च असेल असं नाही. तीच गोष्ट तिच्या पायांवरील छोट्या किड्यांची. त्या गोष्टीतल्या तपशिलांमध्ये काही चुकाही असतील, पण महत्त्वाचं होतं ते त्या गोष्टीतलं तत्त्व. ते मात्र बरोबर होतं.

आणखी एकदा त्यांनी झाडाचं एक पान तोडलं. त्या पानामधे थोडा दोष होता. ज्याकडे आपण एरवी फार लक्ष देत नाही. ते पान जरासं खराब झालं होतं. इंग्रजी ‘C’ आकाराची एक करड्या रंगाची रेषा त्यावर उमटली होती. साधारण पानाच्या मध्यभागापासून सुरू होऊन वळण घेऊन कडेपर्यंत गेली होती.

‘ही करडी रेघ बघ !’ ते म्हणाले, ‘सुरुवातीला काहीशी अरुंद आहे पण कडेपर्यंत जाता-जाता चांगलीच रुंद झाली आहे. हे काय आहे? तर एक फुलपाखरू पिवळ्या डोळ्याचं आणि हिरव्या पंखांचं. त्यानं येऊन या पानावर अंडं घातलं. अंडं फोडून नाकतोड्यासारखा लहानसा किडा बाहेर पडला. त्याचं सगळं आयुष्य पान खाण्यात जातं – तेच त्याचं अन्न. जसजसा तो किडा पान खात जातो तसा तो त्याच्यामागे खाऊन टाकलेल्या पानाचा करड्या रंगाचा माग सोडतो. पानाच्या कडेपर्यंत येता-येता तो किडा आकाराने वाढत जातो आणि म्हणून तो करड्या रंगाचा मागही रुंदावत जातो. नंतर त्याचं रूपांतर होतं फुलपाखरात. पिवळ्या डोळ्यांचं आणि हिरव्या पंखांचं निळं फुलपाखरू. जे उडून जातं आणि दुसर्या कुठल्यातरी पानावर अंडं घालतं.

मला ही पुरेपूर जाणीव आहे की ह्या तपशिलांमधे चूकही असू शकते. ते कदाचित beetle असू शकतं. पण त्यामागची जी संकल्पना मांडायचा प्रयत्न ते करत होते, तो जीवनाचा एक मजेशीर पैलू आहे – सगळं मिळून शेवटी पुनरुत्पादन आहे. कितीही गुंतागुंतीचा उद्योग का असेना, मुख्य मुद्दा ते परत परत करण्याचा आहे.

तसा मला अनेक वडिलांचा अनुभव नसल्याने माझे वडील किती असामान्य होते हे मला कधी जाणवलं नाही. कुठल्याही शास्त्रामागची तत्त्वं जाणून घ्यायला, त्यांच्यावर प्रेम करायला, त्यांचं महत्त्व जोखायला ते कुठून शिकले हे मी त्यांना कधीच विचारलं नाही कारण सर्वच ‘वडील’ माणसांना जगातलं सगळं येतंच, असं गृहीत होतं. कुठलीही गोष्ट मनात टिपायला मला वडिलांनी शिकवलं.

एक दिवस मी खेळण्यातल्या गाडीशी खेळत होतो. गाडी ट्रकसारखी होती आणि तिच्या मागच्या हौद्यात एक चेंडू होता. मी गाडी ओढली की आतल्या चेंडूची हालचाल होई – तिच्याकडे माझं लक्ष वेधलं गेलं. मी वडिलांकडे जाऊन विचारलं, ‘बाबा माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. मी गाडी जेव्हा पुढे ओढतो तेव्हा चेंडू गाडीच्या मागच्या भागात जातो. ओढता ओढता जेव्हा मी अचानक गाडी थांबवतो तेव्हा चेंडू गाडीच्या पुढच्या भागात येतो. असं का होतं?’
‘ते कुणालाच माहीत नाही.’ वडील म्हणाले, ‘मूलभूत नियम असा आहे की गतिमान वस्तूंची गतिमान राहण्याची प्रवृत्ती असते. त्याउलट जोपर्यंत तुम्ही ढकलत नाही तोपर्यंत एका जागी स्थिर असलेली वस्तू स्थिरच राहील. या प्रवृत्तीला जडत्व म्हणतात. पण असं का असतं हे कुणालाच माहीत नाही. ही खूपच सखोल जाण होती. त्यांनी मला फक्त नाव सांगितलं, नाही तर पुढे जाऊन असंही सांगितलं, ‘जर तू कडेनं नीट बघितलंस तर तुला असं दिसेल की गाडीचा मागचा भाग तू चेंडूच्या विरूद्ध दिशेने ओढतो आहेस आणि चेंडू एका जागी स्थिर आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की घर्षणामुळे चेंडू जमिनीच्या सापेक्ष पुढे जातो. तो मागे जात नाही.

मी परत त्या छोट्या गाडीकडे धावलो. गाडीत चेंडू स्थिर करून ती परत मागे खेचली. कडेनी बघताना माझ्या लक्षात आलं की ते म्हणत होते ते खरं होतं. जमिनीच्या सापेक्ष चेंडू थोडासा पुढे सरकला होता.
माझ्या वडिलांनी मला अशा प्रकारे शिकवलं, उदाहरणांसहित चर्चा करून – कुठेही दबाव नाही, फक्त गप्पा, आपुलकीच्या रंजक गप्पा.

यामुळे मला आयुष्यभर प्रेरणा मिळाली, मला सर्वच विज्ञान विषयात रस वाटायला लागला. (त्यातलं पदार्थविज्ञान मला जास्त बरं आलं, हा एक योगायोगाचा भाग)
म्हणायचंच झालं तर मी एखाद्या पछाडलेल्या व्यक्तीप्रमाणे वागतो. लहानपणी काहीतरी विलक्षण अनुभवलेलं असतं आणि तशीच एखादी विलक्षण गोष्ट तो परत परत शोधत राहावा, तसं मी सातत्याने काहीतरी शोधत असतो. मला माहीत आहे, की अशा विलक्षण गोष्टी खात्रीनं सापडतील. अगदी प्रत्येकच वेळी नाही तरी बर्याच वेळी.

त्यावेळी माझा तेरा वर्षाचा चुलतभाऊ माध्यमिक शाळेत होता. बीजगणित हा विषय त्याला जरा अवघड जाई म्हणून त्याची शिकवणी घ्यायला एक शिक्षक घरी येत असत. त्यांच्या शिकवणीच्या वेळी मला कोपर्यात बसून ऐकायची परवानगी होती.
मी त्यांना ‘क्ष’ बद्दल बोलताना ऐकायचो.
मी माझ्या भावाला एकदा विचारलं, ‘तुम्ही काय करताय?’ २क्ष + ७ = १५ असं समीकरण दिलेलं आहे. मी त्यातल्या ‘क्ष’ ची किंमत काढतोय.
‘म्हणजे ४ का?’ मी विचारलं. ‘हो पण अंकगणित वापरून नाही. बीजगणित वापरून उत्तर काढायचं आहे.’

माझ्या नशिबाने मी बीजगणित शाळेत जाऊन शिकलो नाही. माळ्यावर पडलेल्या काकूच्या जुन्या शालेय पुस्तकातून मी तो विषय शिकलो. एक गोष्ट मला कळली की या विषयात मुळात सगळा भाग ‘क्ष’ची किंमत काढणे असा आहे, मग ती तुम्ही कशी का काढेनात. माझ्यासाठी ते ‘अंकगणितानी’ करायचं का बीजगणितानी करायचं अशी काही संकल्पनाच नव्हती. बीजगणितानी करायचं म्हणजे काय तर डोकं बाजूला ठेवून काही नियम पाळून आपण उत्तरापर्यंत पोचायचं. दोन्ही बाजूंतून सात वजा करा. किंवा जर समीकरणात गुणाकार असेल तर त्या संख्येने दोन्ही बाजूंना भागा वगैरे – वगैरे. तुम्ही नक्की काय करताय हे कळत नसेल तरीही उत्तरापर्यंत नेऊन पोचवणार्या या पायर्या – हे नियम मुलांनी बीजगणित या विषयात उत्तीर्ण व्हावं यासाठी बनविण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच माझ्या भावाला हा विषय कधीच आला नाही.

आमच्या गावच्या ग्रंथालयात ‘व्यावहारिक अंकगणित’ असं पुस्तक होतं. तसंच व्यावहारिक बीजगणित आणि व्यावहारिक भूमिती हीपण पुस्तकं होती. हे पुस्तक वाचून मी भूमिती शिकलो. पण लवकरच विसरलो कारण मला ते फारसं नीट कळलं नव्हतं. मी तेरा वर्षाचा होतो तेव्हा व्यावहारिक कॅल्क्युलस हे पुस्तक ग्रंथालयात येणार होतं. तोपर्यंत विश्वकोश वाचून माझ्या हे लक्षात आलं होतं की कॅल्क्युलस हा महत्त्वाचा आणि छान विषय आहे आणि मी तो शिकायलाच हवा.

जेव्हा ते पुस्तक मी ग्रंथालयात पाहिलं तेव्हा मला खूपच आनंद झाला. मी ग्रंथपालाकडे त्याबद्दल विचारणा करायला गेलो. तिनं चमकूनच माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘‘तू तर अजून लहान मुलगा आहेस, तुला कशाला ते पुस्तक हवं?’’

माझ्या आयुष्यात क्वचितच कधी मी इतका अस्वस्थ झालो असेन, पण मी त्यावेळी खोटं बोललो. ग्रंथपाल बाईंना सांगितलं की ते पुस्तक माझ्या वडिलांसाठी हवं आहे.

पुस्तक घरी आणल्यावर मी त्यातून कॅल्क्युलस शिकायला सुरुवात केली. मला तो विषय खूपच सोपा आणि सरळ वाटला. वडिलांनी पण पुस्तक वाचायला घेतलं पण त्यांना ते गोंधळात टाकणारं वाटलं. त्यांना काही ते समजेना म्हणून मग मी त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कक्षा इतक्या मर्यादित आहेत हे मला माहीत नव्हतं, त्याचा मला थोडाफार मनस्तापही झाला. पहिल्यांदाच मला जाणवलं की काही एका अर्थाने मी त्यांच्यापेक्षा जास्त शिकलो आहे.

पदार्थविज्ञानाव्यतिरिक्त वडिलांनी अजूनही अनेक गोष्टी मला शिकवल्या. त्यातली एक (जी बरोबर का चूक माहीत नाही) म्हणजे काही विशिष्ट गोष्टींबद्दलचा अनादर. उदाहरणार्थ मी लहान असताना मांडीत बसवून घेऊन ते मला वर्तमानपत्रातले फोटो दाखवत.

एकदा असंच आम्ही फोटो बघत होतो त्यात धर्मगुरूसमोर झुकून उभी राहिलेली माणसं होती. वडील मला म्हणाले, ‘ही माणसं बघ. एक माणूस सरळ उभा आहे, आणि काही माणसं त्या माणसासमोर वाकून उभी आहेत. काय फरक आहे यांच्यामधे? हे ‘धर्मगुरू’ आहेत.’ त्यांना धर्मगुरूंचा तसा पण रागच यायचा. ते म्हणाले, ‘धर्मगुरूनी घातलेल्या टोपीचा हा करिश्मा – म्हणून हा फरक’ (जर त्या जागी एखादा जनरल असता तर खांद्यावरची ती पट्टी असती. शेवटी सगळीकडे गणवेश, पेहराव, पद यांनीच फरक पडतो.) ते पुढे म्हणाले, ‘‘पण या धर्मगुरूंनाही त्याच अडचणी असतात, ज्या इतरांना असतात. त्यांनाही जेवायला लागतं, त्यांनाही शरीरधर्म असतात. शेवटी तोही एक माणूसच आहे.’’ माझ्या वडिलांचा गणवेश बनवण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे गणवेश चढवलेल्या आणि उतरवलेल्या माणसामधला फरक बहुधा त्यांना सहज आकळे – त्यांच्यासाठी तो एकच माणूस असायचा. मला वाटतं ते माझ्यावर खूश होते. एकदा जेव्हा मी

कॉलेजमधून घरी परतलो होतो, तेव्हा मला म्हणाले, ‘‘तुझं आता बरंच शिक्षण झालेलं आहे. तर मला बरेच दिवस पडलेल्या एका प्रश्नाबद्दल सांग. त्याचं उत्तर मला फारसं समजलेलं नाही.’’
मी त्यांना प्रश्नाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, ‘जेव्हा एखादा अणू एका स्थितीतून दुसर्या स्थितीत जातो तेव्हा तो विद्युतभारित कण (फोटॉन नामक) उत्सर्जित करतो. ‘बरोबर आहे.’ मी म्हणालो ‘हे फोटॉन अणूमध्ये अगोदरपासून असतात का?’ ‘नाही अगोदरपासून नसतात.’
‘मग ते कुठून येतात, बाहेर कसे पडतात?’ वडील म्हणाले.

मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हे फोटॉन आधीपासून साठवलेले नसतात. इलेक्ट्रॉनच्या गतिमानतेतून ते तयार होतात. पण मला काही त्यांना नीट समजावता येईना. मी म्हणालो, ‘मी आत्ता बोलताना जो आवाज तयार होतोय. त्याच्यासारखं आहे ते. तो माझ्यामधे अगोदरपासून नव्हता. (हे काही माझ्या लहान मुलासारखं नाही. त्यानं अगदी लहानपणी एकदा गंमतच केली. अचानक येऊन असं घोषित केलं की एक विशिष्ट शब्द त्याला आता म्हणताच येत नाही. तो शब्द ‘मांजर’ असा होता. त्याचं कारण काय तर त्याच्या शब्दांच्या थैलीत तो शिल्लक राहिला नव्हता. अशी शब्दांची थैली नसते, ज्यातून शब्द बाहेर येत राहतात. तसा अणूमधे फोटॉनचा साठा नसतो.)
या स्पष्टीकरणाने त्यांचं समाधान झालं नाही. त्यांना न समजलेल्या कोणत्याच गोष्टीचं स्पष्टीकरण मला कधीच देता आलं नाही.

त्या अर्थानं ते माझ्याबद्दल निराशच झाले, यासारख्या अनेक गोष्टींची उत्तरं शोधून काढण्यासाठी त्यांनी मला वेगवेगळ्या विद्यापीठात पाठवलं पण त्यांना ती कधीच मिळाली नाहीत.
माझ्या आईची मात्र विज्ञान विषयाची जाण खूपच मर्यादित आहे. पण तरीही आईचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. तिच्याकडे विलक्षण विनोदबुद्धी आहे. हास्य आणि करूणा (compassion) या समजुतीच्या सर्वोच्च पातळ्या आहेत हे मी तिच्याकडूनच शिकलेलो आहे.

(साभार : ‘What do you care what other people think?’ मधून)