सहज शिक्षण
चिपळूण परिसरातल्या ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेच्या कामाबद्दलची ही लेखमाला. शिक्षणाबद्दलची एक वेगळीच दृष्टी देऊन जाणारी. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी जोडलेलं शिक्षण अधिक रसरशीत… आनंददायी असणार हे सरळ आहे. विशेषतः वंचित समाजगटातल्या मुलांसाठी तर हे फार महत्त्वाचं ठरतं. समाजातल्या तथाकथित पुढारलेल्या, शहरी शिक्षित वर्गानं तयार केलेला अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती ही त्यांना त्यांच्या समाजापासून, संस्कृतीपासून तोडून टाकणारी असते. अनेकदा ती ह्या शिक्षणात रमूच शकत नाहीत. इंदुलकर व त्यांच्या सहकार्यांनी सह्याद्रीच्या घाटमाथ्यांवर वस्त्या करून राहणार्या धनगर व कातकरी समाजातल्या मुलांचं शिक्षण कसं असावं ह्याचा मुळातून शोध घेतला, गेली दहा वर्षे प्रयोग केले. त्यातून विकसित झालेल्या ह्या शिक्षण पद्धतीबद्दल…
शाळा सुरू करताना जेव्हा शिक्षक वाडीत जाई तेव्हा मुले दूर पळून जात, लपून बसत. शिक्षकांशी काहीही बोलत नसत. पालकांनी दटावल्यावर शिक्षकाजवळ येऊन बसत. शिक्षकाने खेळ, गाणी, नकला असे प्रकार सुरू केल्यावर मुलांना ते आवडू लागे. त्यांची बोलीभाषा वेगळी असे. धनगर मुले धनगरी भाषेत बोलत तर कातकरी मुले काथोडी भाषेत बोलत. त्यांना स्वतःच्या भाषेत बोलण्याची मुभा देण्यात आली. शिक्षकाने त्यांची भाषा शिकण्यावर भर देण्यात आला. आपली भाषा शिक्षकाला शिकविण्यात, परिसराची माहिती देण्यात, आपली कला, करामती दाखविण्यात मुलांना रस वाटू लागला. ती शाळेत नित्यनेमाने येऊ लागली. शाळेतील वातावरण अनौपचारिक व खेळीमेळीचे ठेवण्यात आले. उठण्या-बसण्यातील अतिरेकी शिस्तीचा येथे अवलंब केला नाही. मुलांनी सतत ३ ते ४ तास चार भिंतींच्या शाळेत बसावे असा आग्रह धरला नाही. मुलांना जशी आवडेल, भावेल तशी शाळा असावी असा प्रयत्न आजही असतो. शाळेतील सर्व गोष्टी, कामे, कृती, मुलांनी ठरवाव्यात यावर भर असतो. इतरत्र सरकारी व खाजगी शाळांतून सैनिकी शिस्तीचा आग्रह असतो. उठणे, बसणे, बोलणे, वावरणे यावर प्रचंड निर्बंध असतात. अशी कडक शिस्त असेल ती शाळा चांगली असे व्यवस्थापक, शिक्षक आणि पालक या सर्वांनाच वाटते. सैनिकी स्वरूपाच्या कडक शिस्तीतूनच मुले शिकतात, घडतात हा त्यांचा एक प्रकारचा भ्रम असतो. हे सारे येथे आम्ही टाळले; नव्हे, दूरच ठेवले आहे. मुलांना मोकळेपणा मिळाला तर ती सार्या बाबी स्वतःच्या अंगानं व्यवस्थितपणे पार पाडतात. स्वतः ठरविलेले असे नियमन ती स्वतः करतात. कोणतीही कृती, घटना अयोग्य वाटली तर त्यावर शिक्षक चर्चा घडवून आणतो. मग मुलेच योग्य त्याचा स्वीकार करावयास शिकतात.
धनगर, कातकरी मुले सरकारी शाळेत गेली तर तेथे ती शरमतात. स्वतःबद्दल त्यांना कमीपणा वाटतो. इतर समाजातील मुले पोशाखात, नीटनेटकी, टापटीप असतात. तसे यांना राहाता येत नाही. त्यांच्याकडे विविध वस्तू असतात त्या यांच्यापाशी नसतात. इतर मुलांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारचा डौल असतो तो यांच्याकडे नसतो. यातून एक प्रकारची पराभूत मानसिकता तयार होते. जन्मतःच आपल्यापाशी काही कमी आहे, आपण त्यांच्यासारखे नाहीत, असे सारखे वाटत राहाते. यातून शिकणे कसे होणार? मुले मोकळ्या मनाने कशी शिकणार? या अडचणी तिथे असतात. इथे आम्ही वस्तीतच शाळा चालविल्याने ही संकटे उद्भवली नाहीत. मुले जशी आहेत तशीच शाळेत येऊ लागली. शाळा हे आपले दुसरे घर आहे, अशी भावना त्यांच्या मनात तयार झाली. मात्र असे होताना या मुलांत इतर समाजापासून तुटलेपण तयार होऊ नये म्हणून आम्ही जागरूकपणे प्रयत्न केले. नित्यनेमाने इतर वस्त्यांत जाणे, इतर समाजातील व्यक्तींशी देवाणघेवाण करणे घडेल अशी काळजी या शाळांतून घेतली जाते. इतरांबद्दलचे असलेले भय, स्वतःबद्दल वाटणारी शरम या सार्यांतून मोकळी झाल्यावर मुले मोकळेपणाने वावरू लागली, शिकू लागली. इतर वरच्या जातीतील लोकांशी बोलताना, वावरताना त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत गेला.
विषयवार शिक्षणाच्या पद्धती
सुरुवातीला मुलांमध्ये शैक्षणिक वातावरण तयार झाल्यावर पुढे लेखन, वाचन, मापन, निरीक्षण या मूलभूत शैक्षणिक क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला. सरकारने तयार केलेला पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचा विषयवार अभ्यासक्रम संदर्भासाठी घेण्यात आला. पण त्यामध्ये अडकून न बसता या मुलांसाठी स्वतंत्रपणाने एकेक विषयाचा अभ्यासक्रम आम्ही विकसित केला. असे करताना औपचारिक अभ्यासक्रमातील उणिवा टाळण्यात आल्या आणि त्यातील चांगल्या, उपयुक्त बाबी स्वीकारण्यात आल्या. दर दोन महिन्यांनी होणार्या चार ते पाच दिवसांच्या प्रशिक्षणात विषयवार अभ्यासक्रम व त्यावर आधारित अध्यापनपद्धती ठरविण्यात येतात. हे काम गेली बारा वर्षे नित्यनेमाने केले जाते.
भाषा शिक्षणात पाठ्यपुस्तकातील प्रमाण मराठी भाषा मुलांसाठी इतर इंग्रजी व हिंदी भाषांप्रमाणेच दूरची वाटणारी होती, असे जाणवले. म्हणून मुलांच्या घरात, वस्तीत बोलली जाणारी काथोडी व धनगरी या बोलीभाषांचा उपयोग भाषा शिक्षणात सुरुवातीला करण्यात आला. अ, आ, इ, ई अशाप्रकारे अक्षरांची घोकंपट्टी करून सुरुवात करण्याऐवजी मुलांच्या बोलीभाषेतील असे शब्द निवडण्यात आले जे केवळ त्यांना परिचितच नव्हे, तर त्यांच्या भावनिक जीवनाशी, संवेदनांशी खोलवर जुळलेले होते. असे भावनिकदृष्ट्या तीव्र अनुभव व्यक्त करणारे शब्द मुलांकडून घेऊन फळ्यावर लिहिण्यात आले.
सुरुवातीला मुलांच्या आत्यंतिक तीव्र अनुभवातील शब्द मुलांशी गप्पा मारीत फळ्यावर लिहिण्यात आले उदाहरणार्थ –
‘रानांमां जाऊला’ (रानात जात आहे) असे म्हटले की, मुलांच्या नजरेसमोर रानात भटकण्याचे रोमांचक अनुभव उभे राहतात.
‘शेट कूट हं (शेठ मारतो) या शब्दांमधून रानात तोडीवर असताना किंवा खोताच्या घरी काम करीत असताना वेळोवेळी त्यांच्याकडून सहन करावा लागणारा अत्याचार, त्यांचे विषयीची चीड मनात उभी राहते.
‘मंजुरी नहीं मेळरु’ (मजुरी मिळत नाही). रात्रंदिवस खोताकडे राबल्यावर मजुरीची रक्कम देताना केली जाणारी लबाडी आठवते.
‘तीस लागणी ही (तहान लागली). पाणी पिणे हा काथोड्यांसाठी अमृतानुभव असतो. उपाशीपोटी राहताना त्यांना पाणी हाच एकमेव आधार असतो.
‘या शिवाय काथोडी भाषेतील बास (बाबा), गय (आई), सूता (कुत्रा), कुकडा (कोंबडा), डोसा (मोठा माणूस) असे असंख्य शब्द गोळा होतात.
‘धनगरी भाषेतील वाघारु (वाघ), खडी (डोंगरकपारी), गय (गाय), बाजी (खोत), आवा (बाई), रयात (रात्र), फूटवा (रानाचा उपभोग घेताना खोताला द्यावा लागणारा मोबदला), कंद्या (कंदील), राखण्या (राखणदार) असे शब्द फळ्यावर लिहिताना रोजच्या जगण्यातील त्यांचे अनुभव जागे होतात. (चौकट पहा.)
शब्द निवडताना काना-मात्राविरहित असे गुळगुळीत शब्द निवडण्याचा आग्रह नसतो. उलट काना-मात्रांसहित शब्द निवडण्याने एकाच वेळी अक्षरे आणि काना, मात्रा, वेलांटी या संकल्पनादेखील समजून घेता येतात. ते ‘तुमचे’ शब्द आहेत, हे मुलांच्या मनावर बिंबविले जाई. अक्षरे, शब्द, भाषा आपल्या अनुभवाच्या मांडणीसाठी असतात. आपले अनुभव ते व्यक्त करीत असतात. म्हणजे ती आपली साधने आहेत. हे मुलांच्या लक्षात आणून दिले जाई. त्यांच्या या शब्दांवर चर्चा केली जाई. शब्दांभोवतीचे त्यांचे अनुभव, समाजाचे अनुभव मोकळेपणाने मुले व्यक्त करीत. त्यामुळे अक्षर ओळख, शब्दांचे वाचन ते अधिक मोकळेपणाने व आत्मविश्वासाने करू लागली.
या तर्हेने मुळाक्षरे, वर्णमाला पूर्ण केल्यानंतर, शिक्षक पाठ्यपुस्तकांकडे वळत. पाठ्य-पुस्तकांच्या धड्यातील अक्षरे ओळखणे, शब्दांच्या अर्थाची चर्चा करणे, आपल्या जीवनाशी ते जोडणे, त्यांच्याशी समांतर व विसंगत असे अनुभव मांडणे, स्वतःचे अनुभव धड्यासारखे लिहिणे या पद्धतीने वाचन, लेखन अधिक निर्भयपणे व अनुभवनिष्ठपणे आत्मसात केले जाते. सदर पद्धतीने ज्या मुलांना मराठी भाषा समजत नाही त्या मुलांना त्यांच्याच भाषेचा, त्यांच्याच अनुभवाचा आधार घेऊन भाषा आत्मसात झालीच. पण त्याचबरोबर स्वतः विषयीचा न्यूनगंड दूर झाला. आपल्या बोलीभाषेत अक्षर ओळख झाल्यावर पुस्तकातील मराठी शब्दांशी जुळवणूक करताना मराठीचा परिचयदेखील सहजपणाने झाला. अशाच सहजतेने इंग्रजी, हिंदी या भाषांकडे जाता आले.
काथोडी आणि धनगरी भाषा शाळेत बोलल्या जाऊ लागल्यावर सुरुवातीला वस्तीतील पालकांना ते आवडत नसे. त्यांना वाटे, अशाने मुले नवे काही शिकणार नाहीत. मराठी भाषेतील अभ्यासक्रम शिकतानाच मुले इंग्रजी बोलू लागली. इंग्रजीत छोटी वाक्ये बोलणे, गाणे म्हणणे असे केल्याने त्यांना या भाषेविषयी भय राहिले नाही. या पद्धतीमागे अशी धारणा आहे की, भाषा बोलावयास शिकताना सहजतेने आपले व समूहाचे अनुभव वापरून लिहावयास व वाचावयास शिकणे शक्य आहे. आपल्या अनुभवाच्या आधाराने लेखन, वाचनासारखी कौशल्ये अधिक सहजतेने आत्मसात केली जाऊ शकतात. ज्या अनुभवात भावनांची तीव्रता अधिक असते ते शब्द आत्मसात करण्यास सोपे जातात.
‘‘आपल्याजवळ जे जे आहे ते ते नाकारणे आणि शहरी लोकांजवळ जे आहे ते स्वीकारणे’’ असा त्यांचा ग्रह होता. भोवतालच्या सरकारी शाळांतून असेच घडत असते, तेच खरे शिकणे अशा समजेतून पालक गुरुजींकडे आपली नाराजी व्यक्त करीत. मात्र इथे आम्हाला ठाम राहावे लागले. कालांतराने जेव्हा मुलांची प्रगती होऊ लागली, मुले निर्भिडपणे बोलू, चालू लागली तेव्हा मात्र पालकांचा या पद्धतीवरील विश्वास वाढला.
त्यामुळे सुरुवातीला बाराखडीविरहित शब्द शिकविणे, नंतर बाराखडी शिकविणे अशी नेहमीची पद्धती आम्ही अनुसरली नाही. वर्णमालेतील बहुतांश अक्षरे पुरी झाल्यावर वर्णमाला व बाराखडीची रीत कशी असते, हे मुलांना दाखविण्यात आले. त्या आधीच अक्षरे, शब्द वाचनात व लेखनात मुलांनी आत्मसात केले होते.
मापनाच्या आणि गणिताच्या बाबतीतही अनुभवनिष्ठ पद्धतीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यावर भर दिला गेला. जीवनात कुठे कुठे मापनाची गरज आढळून येते, कुठे आपण मापनाचा वापर करतो, गणिताचा प्रत्यय जीवनात कसा येतो, याचा बोध घेऊन त्यावर प्रारंभीच्या काळात अधिक भर दिला गेला. अंक नुसते धडा धडा पाठ म्हणण्यापेक्षा अंक ओळखणे, अंकाचा वापर करणे, प्रत्यक्षात मोजणे अशा तर्हेने मापनाचा, गणिताचा अनुभव घेण्यावर भर दिला गेला. गणिताच्या वेगवेगळ्या संकल्पना जीवनात कशा येतात, कशा असतात, याचा वेध घेऊन गणित आत्मसात करण्यावर भर दिला गेला. त्यासाठी भोवतीच्या वास्तवावर भर दिला गेला. परिसरात असंख्य वस्तू असतात. त्यांची मोजदाद करण्यासाठी, मोजण्याच्या, गणिताच्या कौशल्यांचा आपण नित्य वापर करीत असतो. या गोष्टींचा अनुभव वर्गात, बाहेर मुलांना देण्यात आला. आपला परिसर, आपले अनुभव ही शिक्षणाची अखंड साधने आहेत. त्यांचा आपण नित्य वापर करू शकतो. त्यामुळे ज्ञानग्रहणाची कौशल्ये (लेखन, वाचन, मापन, निरीक्षण) आत्मसात करण्यास अधिक सुलभ जाते. खडे, बांगड्या, चिंचोके, फुले, पाने, झाडे, जनावरे ही सारी साधने मुलांच्या गणिताला आवाहन करणारी ठरली. ही पद्धत विकसित करण्याची जबाबदारी नुसती शिक्षकावर न राहाता मुलं त्यात नित्य भर घालू लागली. त्यासाठी विज्ञान, परिसर, अध्ययन, भूगोल या विषयांसाठी तर सभोवताली अमाप साधने होती. झाडे अन्नग्रहण कशी करतात, जमिनीचे, मातीचे थर कसे असतात, डोंगर-दर्या, नाला, नदी, हवा, दिशा या सार्या बाबी मुले प्रत्यक्ष निरीक्षणातून समजून घेतात. वर्गात बसून, त्या वाचून, फळ्यावर लिहून, चित्र पाहून समजून घेण्याऐवजी प्रत्यक्ष परिसरात हिंडणे, हाताळणे, अनुभवणे, तपासणे, निरीक्षण करणे असे केल्याने त्यामागील कार्यकारणभाव मुले स्वतःच पडताळून पाहू लागली. या बाबींविषयी शिक्षकाने मुलांना सांगण्याऐवजी किंवा समजावण्याऐवजी मुले स्वतः त्याचे स्वरूप, गुणधर्म, कार्यकारणभाव सांगू लागली. शब्दबद्ध करू लागली. मुलांसमोर तयार उत्तर ठेवण्याऐवजी प्रश्न निर्माण करण्यावर शिक्षकाने भर दिला. यातून प्रत्येक मुलात चिकित्सक वृत्ती निर्माण झाली.