वेदी – लेखांक – ४

दुसर्या दिवशी सकाळी देवजीनं मला माझी गादी नीट करायला शिकवलं. गादीखाली खोचलेली मच्छरदाणी काढून चादर नीट कशी करायची आणि परत मच्छरदाणी घट्ट खोचून टाकायची वगैरे सगळं शिकवलं. एकट्यानं गादीचे कोपरे उचलायला अवघडच होतं. ते उचलताना माझे हात थकून गेले. काहीही केलं तरी शर्टाच्या टोकासारखी मच्छरदाणीची टोकं बाहेरच निसटून यायची. त्यामुळे बरंचसं काम देवजीनंच केलं.

मग त्यानं मला मुलांच्या सार्वजनिक बाथरूममध्ये नेलं आणि म्हणाला, ‘‘आता तू नळाखाली आंघोळ करायचीस.’’
‘‘नाहीच मुळी. मी लहान मुलांच्या बाथरुममध्ये आयाबरोबर जाणार.’’ मी ओरडलो.
‘‘ती मुलींच्या भागात राहणार्या लहान मुलांसाठी आहे. तू आता मोठ्या मुलांच्यात राहायला आला आहेस.’’ तो म्हणाला.
त्यानं मला साबणाची वडी दिली. ती एवढी मोठी होती की माझ्या हातात मावेनाच. त्या वडीचं एक टोक खडबडीत होतं. मोठ्या साबणाचा लहान तुकडा काढल्यासारखं.

‘‘मला माझा पिअर्स साबण हवाय.’’ मी ओरडलो. मला आठवतं. पिअर्स साबण डॅडीजींच्या गाडीच्या आरशासारखा लांबट गोल असायचा आणि त्याला ममाजींसारखा वास यायचा. आणि आंब्याच्या कोयीसारखा तो माझ्या हातात बरोबर मावायचा.
‘‘पिअर्स साबण म्हणजे काय ते मला माहीत नाही पण हा लाईफबॉय साबण चांगला असतो. सगळी मुलं तोच वापरतात. आणि त्यामुळं कुणालाही गळवं होत नाहीत.’’

माझ्या हातातून साबण सुळ्कन् निसटला. माझ्या हाताला जेवढा साबण लागला होता तेवढा मी माझ्या पायाला लावला आणि गार पाण्यानी धुवून टाकला.
‘‘हे घे केसांना लावायचं तेल.’’ देवजीनं मला एक बाटली दिली. ती बाटली खूपच मोठी होती. तशी पकडायलाही अवघडच होती.
‘‘ही दुसरीच बाटली आहे.’’ मी म्हणालो. मला मी घरी वापरायचो त्या छोट्या चपट्या व्हॅसलिन हेअर टॉनिकच्या बाटलीची आठवण झाली.

त्यानं बाटली हातात घेतली आणि मला माझा हात पुढे करायला सांगितलं. थोडं तेल माझ्या हातावर घातलं. ते खूपच दाट आणि घाण वासाचं होतं.
‘‘मला हा वास नाही आवडत. मला माझं व्हॅसलिन हेअर टॉनिक हवंय.’’ मी ओरडलो.
‘‘हे चांगलं आहे. हे सगळ्यात चांगलं टाटा कोकोनट ऑइल आहे. टाटाचं नारळाचं तेल. सगळी मुलं वापरतात आणि त्यामुळे उवा होत नाहीत.

मी डोक्याला तेल लावलं आणि नळाखाली बसून चांगली आंघोळ केली.

दोन्ही हातात टॉवेल धरून हात पाठीमागे करून खालीवर हलवून आपली पाठ कोरडी कशी करायची ते देवजीनं मला शिकवलं. मग मी स्वतः भोवती टॉवेल गुंडाळून घेतला आणि देवजी मला खोलीत घेऊन गेला. तिथे भिंतीशी काही कप्पे होते. त्यात काही खोकी होती आणि माझ्या घरून आणलेली चामड्याची बॅग होती. त्यानं ती खाली काढली आणि त्यातून त्यानं माझा रेशमी शर्ट, सुती हाफ पँट आणि मोजे काढले. आपले आपले कपडे कसे घालायचे ते त्यानं मला दाखवलं. चड्डी घालताना एका हातानं भिंतीचा आधार घेऊन तोल कसा सावरायचा ते शिकवलं.

हळूहळू देवजीनं माझी इतर मुलांशी ओळख करून दिली. अब्दुल, भास्कर, रुबेन, धम वगैरे.

ती मुलं सारखी माझ्या जवळ येऊन माझे गालगुच्चे घ्यायची आणि म्हणायची, ‘‘गोबर्या गालाचा पिटुकला मुलगा.’’ ते म्हणायचे मी श्री. व सौ. रासमोहनसारखे पायात बूट घालतो. त्यांच्यासारखे माझे कपडे पण मऊ मऊ होते. फक्त माझे गाल मात्र पंजाब्यांसारखे फुगरे होते.

मी फक्त पाच वर्षांचा होतो आणि सगळ्यात लहान होतो. मी एवढा निरोगी आणि सशक्त कसा याचं सगळ्या मुलांना आश्चर्य वाटायचं. मी डोकं खाजवताना त्यांना कधीच ऐकू यायचं नाही. मी कधीच रात्रीचा खोकायचो नाही. मी सकाळी उठल्यावर कधीच पोट दुखायची तक्रार करायचो नाही. शिवाय मला कधीच ताप यायचा नाही. हे सगळं का ते त्यांना कळायचं नाही. मुलं माझ्या जवळ येऊन माझ्या कपाळाला हात लावून म्हणायची, ‘‘याला अजून ताप आलेला नाहीये.’’

मी खूपच पटकन मराठी बोलायला शिकलो. मुलं माझे गाल ओढतच राहिली, माझ्या कपाळाला हात लावतच राहिली पण मी पंजाबी आहे ते जवळ जवळ विसरून गेली.

एकदा माझ्या शर्टाचं बटण तुटलं. देवजीनं मला सुई ओवायला शिकवलं. त्यासाठी एक ओवशी दिली. ती पातळ नाण्यासारखी वस्तू होती. त्याला एक बारीक वायरचा गोल लावलेला होता. त्यात दोरा घालून ती वायर सुईच्या नेढ्यात घालायची आणि दोरा ओवायचा. मग दोर्याला गाठ कशी मारायची तेही दाखवलं. दातानी दोरा कसा तोडायचा, बटणाच्या जागेचा राहिलेला दोरा काढायचा आणि नवीन बटण तिथे ठेवून शिवायचं. बुटाला पॉलिश करायला सुद्धा शिकवलं. डब्यातून थोडंसं पॉलिश काढायचं आणि ब्रशनं ते सगळ्या बुटांना लावायचं आणि घासायचं. हातानं स्पर्श करून नीट झालंय की नाही ते पाहायचं. मला पॉलिश करण्यापेक्षा शिवायला चांगलं जमायचं.

माझी बाकी कितीही प्रगती झाली असली तरी मुलांच्या सार्वजनिक बाथरुममध्ये शू करायला काही मला नीट जमायचं नाही. तिथे इतका घाण वास यायचा की मला एका हातानं नाक धरावं लागायचं. फरशी इतकी गुळगुळीत असायची की कधी कधी मी घसरून पडायचो. तिथे कायमच गांधिलमाशा भिरभिरत असायच्या. मी एकदा कोपर्यात गेलो तर मला काहीतरी चावलं होतं.

देवजीनं मला मोरीतल्या भुताबद्दलही सांगितलं होतं. ‘‘कुणी जर उगीच फार वेळ मोरीत राहिलं तर ती भुतं त्याच्यावर झेप घेतात आणि नाक खाऊन टाकतात. त्यानं जर कधी तुझ्यावर झेप घेतली ना तर तू जीझस मेरी आणि जोसेफची प्रार्थना कर.’’

‘‘हे कोण आहेत?’’ ‘‘जीझस मेरी आणि जोसेफ स्वर्गात राहतात, ते अंधमाणसांवर फार माया करतात. त्यांचं नाव घेतलं तरी भुतं पळून जातात.’’

मी केव्हाही मोरीत गेलो की मला भिंतीतून भुतांचा पावलांचे आवाज यायचे. त्यामुळे भिंती थरथरायच्या. मी नेहमीच जीझस मेरी, जोसेफची प्रार्थना करायचो. त्यामुळे मला त्यानं कधीच त्रास दिला नाही.
मला आठवतं मी काकूंना त्यांच्या झोपायच्या खोलीजवळची बाथरूम वापराची परवानगी मागायचो. पण त्या म्हणाल्या ‘‘तू येणार कसा? आमच्या घराचं दार रात्री बंद असतं. तू इतर मुलांसारखा त्यांची मोरी वापर, तेच ठीक होईल.’’
मला जसं मुलांच्या बाथरुममध्ये जायला आवडायचं नाही तसंच माझे स्वतःचे कपडे पण मला आवडायचे नाहीत. पण त्याची कारणं वेगळी वेगळी होती. माझ्याकडे बरेच शर्ट आणि हाफ पँटस होत्या, मोजेही होते. रोज वेगवेगळे कपडे घालूनही मला ते दोन आठवडे तरी पुरले असते. हियाची आया माझे कपडे धुवायची. ती एकदा मला म्हणाली, ‘‘मी एवढे चांगले कपडे कधी पाहिलेच नव्हते.’’ मुलं सारखी माझ्या जवळ यायची आणि माझ्या कपड्यांना हात लावून बघायची. ते किती मऊ आणि चांगले आहेत त्याबद्दल कुजबुजायची. पण मला मात्र ते कपडे पार्टीला जायच्या कपड्यांसारखे वाटायचे. कारण मुलांचे कपडे म्हणजे भरड कापडाचे, अर्ध्या बाह्यांचे कुडते आणि तशाच खरबरीत कापडांच्या अर्ध्या चड्ड्या. प्रत्येकाला दोनच कपड्याचे जोड असायचे. दिवसभर आणि रात्री झोपताना तेच कपडे घालायचे. असे आठवडाभर घातल्यावर धोबी यायच्या दिवशी धुवायला द्यायचे. मुलं आपापले कपडे काढून देईपर्यंत तो थांबायचा. मग धोब्यानं आणलेले कपडे मुलं घालायची. धोब्यानं जर देवजीचा शर्ट हरवला तर दुसरा मिळेपर्यंत त्याला एकच शर्ट घालावा लागायचा. मग डोळस मास्तर शर्ट हरवल्याचा रिपोर्ट रासमोहनसरांकडे द्यायचे आणि ते त्याच्यासाठी नवा शर्ट आणायचे.

मला आठवतंय सुरवातीला मी देवजीला विचारायचो, ‘‘तुम्ही सगळे अर्ध्या बाह्यांचे कुडते आणि गंमतशीर अर्धे पायजमे का घालता? तुमचे कपडे इतके खरखरीत का असतात? ते तुझ्या गालासारखे का लागतात हाताला?’’
‘‘आपली शाळा टाटा मिलच्या शेजारी आहे म्हणून आम्ही नशीबवान आहोत. त्या मिलमधून हे कापड रासमोहनसरांना फुकट मिळतं. त्यांच्या दृष्टीनं हे वाया जाणारं कापड असेल पण ते मागणारी खूपच अनाथालयं आहेत. म्हणून म्हणतो या शाळेत आहोत हे आमचं नशीब. आम्हाला टाटा मिलच्या चांगल्या कापडाचे कपडे मिळतात घालायला.’’

त्यानंतर मलाही त्यांच्यासारखे कपडे घालावेसे वाटायचे आणि अनवाणी चालावंसं वाटायचं. एकदा देवजी मला बूट घालायला मदत करत होता तेव्हा मी हट्ट केला होता, ‘‘मला तुमच्यासारखं अनवाणी चालायचंय.’’
‘‘तू नशीबवान आहेस. तुझ्या घरची श्रीमंती आहे आणि तुला बूट घालायला मिळतात. मऊ मुलायम कपडे घालायला मिळतात.’’ माझ्या बुटाचं बक्कल घट्ट करीत तो म्हणाला होता.
‘‘मी मुळीच घालणार नाही.’’ मी म्हणालो.
‘‘रासमोहन सर म्हणतात तुला घालायलाच हवेत. नाहीतर… त्यांच्याजवळ पट्टी आहे बरं का.’’
‘‘मी घातलेल्या शर्टाचा रंग कुठला आहे?’’
‘‘मला माहीत नाही. माझी दृष्टी हळू हळू कमी होतेय.’’
‘‘माझा लाडका भाऊ ओमदादा इथे असता तर त्यानं सांगितलं असतं. तू मुळी माझा लाडका भाऊ नाहियेसच.’’

त्या दिवशी मला वर्गात परण भेटली. ‘‘तू छान निळ्या रंगाचा शर्ट घातला आहेस.’’ ती म्हणाली.
‘‘तुला कसं कळलं?’’
‘‘मला थोडं दिसतं. साधारण तीन चार हाताच्या अंतरावरून मला तुझा शर्ट दिसतो.’’
‘‘तू किती वर्षांची आहेस?’’ मी विचारलं.
‘‘मी दहा वर्षांची आहे.’’
‘‘माझ्या बरोबर काका काकूंच्या इथे टोस्ट खायला येशील का?’’
‘‘मला नाही टोस्ट खाता येणार. मी गरीब आहे. मी मक्याची भाकरी खाते.’’

त्या रात्री मला झोप आली नाही. मी परणचा विचार करत होतो. तिला टोस्ट खाता येणार नाही म्हणजे तिचे दात कसले असतील बरं ! एकदा देवजीनं मला मक्याच्या भाकरीचा तुकडा दिला होता. छान लागला. मला टोस्टपेक्षा जास्त आवडला. आणि तो खाल्ल्यावर मला इतर मुलांच्यात असल्यासारखं वाटायला लागलं. पण तो तुकडा इतका कडक होता की मला वाटलं आता माझा दात पडणार. तेवढ्यात एक डास माझ्या भोवती गुणगुणायला लागला. मी उशी झटकली, गादीवर उड्या मारल्या, मच्छरदाणी झटकली. पण डास काही जाईना. मी परत विचार करायला लागलो. मला रासमोहन कुटुंबासारखा टोस्ट का खावा लागतो, मला मऊ कपडे आणि बूट का घालावे लागतात, मला हॉस्पिटल बेडवर का झोपावं लागतं ! मला खात्री होती डॅडीजी असते तर त्यांनी मला हवं ते खाऊ दिलं असते. हवं तिथे झोपू दिलं असतं, आवडतील ते कपडे घालू दिले असते. आणि हवं तर अनवाणी फिरू दिलं असतं. ते आत्ता असायला हवेत असं मला वाटायला लागलं आणि मी रडायला लागलो.

‘‘काय झालं रे?’’ मच्छरदाणीत डोकं खुपसून देवजी म्हणाला.
‘‘मला डॅडीजी आणि ममाजी हवेत.’’ मी म्हणालो.
‘‘पण मी आहे ना.’’
‘‘मी टोस्ट खाल्ला नाही तरी चालेल असं काकांना सांगता येत नाही ना तुला.’’
‘‘पण टोस्ट तर चांगलं सायबांचं खाणं आहे.’’

मी अजून जोरात रडायला लागलो. ‘‘मला नको सायबांचं खाणं, डॅडीजी आणि ममाजी मला विसरले आहेत.’’
‘‘मुळीच नाही विसरले. अरे शेवटी ते तुझे आई…’’ मला जोरदार शिंका यायला लागल्या. डोळस मास्तर झोपेत काहीतरी पुटपुटले आणि घसा खाकरला. माझ्या शिंकांमुळे त्यांना जाग येईल असं वाटलं पण रासमोहनसरांच्या पावलांच्या आवाजासारख्या शिंका येतच राहिल्या. डोळसमास्तर पांघरुणाच्या आत थोडे हालले आणि पुन्हा त्यांचा श्वास संथ लयीत चालू लागला.

देवजी हळूच म्हणाला, ‘‘डोळसमास्तर अगदी बहिर्यांसारखे झोपतात. शिंक आली तरी हरकत नाही. शिंक आली म्हणजे काय ते तुला माहीत आहे? तुला शिंक येते आहे म्हणजे तुझी कुणीतरी आठवण काढतं आहे. कोण ते सांगता येणार नाही पण कुणी तरी नक्की आठवण काढतं आहे.’’

‘‘म्हणजे मी डॅडीजी आणि ममीजींची आठवण काढतो तेव्हा त्यांना पण शिंक येते?’’ शिंकता शिंकता मी त्याला विचारलं.
‘‘हो अरे खरंच.’’ हे ऐकून मला अजून शिंकत राहावंसं वाटलं. पण डोळसमास्तर जागे व्हायची भीतीपण होती.
‘‘तुझ्या आई वडलांचं तुझ्यावर खूप प्रेम असणार त्याशिवाय तुला इथे पाठवण्यासाठी त्यांनी एवढा खर्च नसता केला.’’ देवजी सांगत होता. ‘‘ते दर महिन्याला किती रुपये खर्च करतात माहिताय?’’
‘‘नाही. किती करतात?’’
‘‘त्या पैशातून शाळेतल्या सगळ्या वेताच्या खुर्च्या विकत घेता येतील आणि तरी थोडी शिल्लक राहील.’’

शाळेच्या वर्कशॉपमध्ये वेत तुटलेल्या खूप खुर्च्या दुरुस्तीला आलेल्या असायच्या. वेताचे तुकडे कापून घेऊन मुलं त्या खुर्च्यांच्या बैठका आणि पाठी विणत. त्या विणीची भोकं इतकी एकसारखी असत की मला आश्चर्य वाटायचं, यांना इतकं चांगलं कसं विणता येतं ! त्या खुर्चीच्या मालकांना खूप पैसे खर्च करावे लागत असणार वेत लावण्यासाठी.

देवजी मग त्याच्या पलंगाशी गेला. तेवढ्यात मला कसली तरी खुसखुस ऐकू आली. मी हळूच विचारलं. ‘‘देवजी काय आहे रे ते?’’
‘‘साधा उंदीर असेल. झोप आता शांत.’’

मी मच्छरदाणी नीट खोचून घेतली आणि झोपायचा प्रयत्न केला. मला स्वप्न पडलं. एक मोठी मांजर माझ्या मच्छरदाणीत शिरली
आहे आणि मला चावते आहे. ‘‘नवे कपडे ! नवे कपडे !’’ ती मियांव मियांव करत म्हणत होती. आणि तिला वाटत होतं माझा वाढदिवस आहे. म्हणून ती मला नव्या कपड्यांबद्दलचे चिमटे काढत होती. मी कुठल्याही बाजूला वळलो तरी मला तिचे दात दिसायचे. मी दचकून जागा झालो.

मी खाली उतरलो आणि देवजीजवळ जाऊन त्याला उठवलं आणि माझ्या स्वप्नाबद्दल सांगितलं. ‘‘काही घाबरू नकोस. तुझा आत्मा आणि मांजर काही तरी उद्योग करत आहेत. तुला झोप लागली म्हणजे तुझा आत्मा तुझ्या शरीरातून बाहेर पडतो आणि भटकायला जातो. आणि हवं ते करतो. जे तुला करता येत नाही. म्हणूनच मी सगळ्या मुलांना सांगतो की झोपेतून हळूहळू उठावं. म्हणजे आत्म्याला शरीरात यायला पुरेसा वेळ मिळतो.’’
आता तर मला खालच्या मजल्यावरून बांगड्यांची किणकिण आणि मुलांचे प्रार्थना म्हटल्याचे आवाज आणि मुलींचे जेवणाच्या वेळचे आवाज ऐकू यायला लागले.
‘‘देवजी देवजी ऐक. बांगड्या’’
‘‘अरे ते होय. ती भुतं आहेत. ती रात्री शाळेला जातात. खालचा मजला ताब्यात घेतात.’’
‘‘ती चावतात का रे? ती मोरीतल्या भुतांएवढी आहेत का?’’
‘‘त्यांना त्रास दिला तरच चावतात. ती अगदी पापणीच्या केसांइतकी हलकी असतात. आणि थर्मामीटरमधल्या पार्यासारखी घरंगळून जातात. डोळसमास्तरांकडचा थर्मामीटर फुटला होता ना त्यातल्या पार्यासारखी. ती शाळेच्या आत बाहेर तरंगत जातात, त्यांना हवं तसं हवं तेव्हा. पण त्यांना अंधार आवडतो. दिवसा साधारणपणे ती भुतांच्या वाड्यात राहतात. ती टाटा मिलच्या पलीकडे बिन खिडक्या दारांची इमारत आहेना तिथे.’’

मी हळूच परत माझ्या पलंगावर गेलो. मच्छरदाणी घट्ट खोचून घेतली. अगदी स्तब्ध पडून राहिलो. भुतांनी त्यांचं जेवण आणि शाळा संपवून पटकन् निघून जावं म्हणून जीझस मेरी आणि जोसेफची प्रार्थना म्हणायला लागलो. मी उशीवर माझा कान दाबला. मला स्वयंपाक करणार्या भुतिणीचा कणीक मळताना, पोळ्या भाजताना आवाज ऐकू यायला लागला…
ती मांडी घालून स्वयंपाकघराच्या जमिनीवर बसली होती. मी जवळ जाऊन तिच्या मांडीवर बसलो. तिच्या हातात कोळशाचा चिमटा होता. ती चुलीतले कोळसे त्यानं हलवत होती. दुसर्या हातानं तिनं माझ्या डोक्यावर थोपटलं.

‘‘तोंड उघड. तुझे दात पाहू दे मला. शी शी किती पिवळे पडले आहेत तुझे दात. चल हात पुढे कर’’ ती म्हणाली आणि त्या चिमट्यानं उचलून माझ्या हातात काही तरी ठेवलं. ते एकाच वेळेला गरम आणि गारही होतं. ‘‘ही राख आहे.
ती बोटावर घेऊन दात घास म्हणजे तुझे दात माझ्या दातांसारखे पांढरे शुभ्र होतील.’’
राखेची चव गरम आणि कुरकुरीत होती तरीही माझ्या दातांना टॉफीसारखी चिकटून बसली.
‘‘मी पकडलंय तुला ! मी तुला पकडलंय ! मी तुला भूतवाड्यात नेणार.’’ ती खदखदून हसत म्हणाली.
‘‘नको, नको,’’ मी ओरडत सुटका करून घ्यायला लागलो.

मला जाग आली. मी दातावरून जीभ फिरवली. चिकट राख काही जाणवली नाही. पण माझ्या गादीवर मात्र वाढत जाणारा ओला डाग जाणवत होता, भीती वाटण्यासारखा.