सहज शिक्षण

धनगर मुलांना असंख्य म्हणी, उखाणे, कोडी अवगत होती. त्यापैकी काही कोडी पुढीलप्रमाणे आहेत.
– सुपभर लाह्या नी मधी रुपाया = चंद्र नी चांदण्या
– तीळभर दही, माझ्यान खपंना तुझ्यान् खपना = चुना
– वर कडा, खाल कडा, मदी दुधाच्या धारा = दळण्याचं जातं
– वाकूड तिकूड भेला, त्यावर बसला कोला = बंदूक
– तांबडी गाय चरत जाय, काळी गाय बसत जाय = वणवा
– रयात रयात जागलं पण हाती नाही लागलं = उंबराचं फूल
– कोकणात आली सखी, तिच्या मानंत मारली बुकी, सगळ्या घरभर लेकी = लसूण
– दिवसभर फिरते आणि पैशाएवढ्या जागत उभी र्हाते = काठी
– दिसभर बसतं, रातचं उभ र्हातं = गुरांचे दावे
अशी कोडी, उखाणी घालून गुरुजीला दमवण्यात मुलांना मजा वाटू लागली. कातकरी मुलं गाणी म्हणण्यात, नकला करण्यात पटाईत. या गाण्यात इतर लोकांकडून आपली होणारी फसवणूक, आपल्या समाजात पसरलेली व्यसनाधीनता, अशा समस्यांवर मार्मिकपणे टिकाटिप्पणी केलेली असते.
‘माझ्या बोटांत जादू हाय बगा बगा बगा…
कधी कधी बोट माझं सिगारेट बी ओढतं…
कधी कधी बोट माझं दारू बी पितं…’
अशी गाणी मुलं नकला करीत म्हणतात.
‘हिप्पीवाल्या पोरा तुझी हिप्पी वाढली, मलाच आवडली
चल पोरा जाऊ आपन आंबेवाडीला, बाराच्या गाडीला
चार आन्यानी बंदूक आनली इंदरा गांधीला, डुकर मारूला
चार पोरे झाली आता बसरे कायदा, सरकारी फायदा.’
अशा गाण्यातून जागोजाग मार्मिकपणा जाणवतो. हे गाणं डब्याच्या तालावर म्हणतांना पोरांचे पाय हरणासारखे थिरकतात. कातकरी माणसं रोजच्या रोज रात्री डब्याच्या तालावर नाचतात. रोजच्या रोज नवनवी गाणी रचतात. जुन्या गाण्यात नव्यानं भर टाकतात. ही सृजनशीलता त्यांच्यात ओसंडून वाहात असते. डुकराच्या शिकारीचा प्रसंग सादर करताना मुलं परिसरातील झाडांच्या फांद्या, चुलीतील राख, घरातील भांडी यांचा लीलया वापर करतात.
‘चल रं डुकरा पान्यावरी’
असे म्हणता म्हणता डुक्कर सर्वत्र गडबडा लोळते, शिकारी मुलं त्याला काठीनं झोडपल्याची नक्कल करतात. असे करताना मुलांना खर्याखुर्या शिकारीची अनुभूती येते.