स्वप्न प्रकाशाचं

तुझ्या अस्तित्वाची नुसती चाहुल लागली तेव्हा ठेंगण्या झालेल्या आभाळाखाली –
कालिदासाचं मेघदूत, ज्ञानेश्वराचा अमृतानुभव बालगंधर्वाचे सूर अन् आईनस्टाईनची अणूअणूत भरलेली शक्ती…
अगदी सग्गळंच तुझ्या पेशीपेशीत पेरायची स्वप्न पाहात होतो आम्ही-!
त्या नऊ महिन्याच्या वाटेवर-आयुष्यांच्या रथातल्या जाणीवेच्या सारथ्यानं सांगितलेला चक्रव्यूहभेद…
त्यातून बाहेर पडण्याच्या विद्येसह जागं राहून ऐकवला माझ्यातल्या द्रौपदीला
आणि तरीही –
ते ठेंगणं झालेलं आभाळ – सार्या स्वप्नांचा चुराडा करीत कोसळलंच –
तुझ्या मतिमंदत्वाच्या निदानाच्या धक्क्यानं !
त्या स्वप्नांचे तुकडे वेचायचं भानही नव्हतं कित्येक दिवस
कणाकणानं नुसतीच वाढणार्या तुला पाहताना दरवेळी एक फुटका तुकडा खुपायचा काळजात –
आणि वाहणार्या वेदनांना एकमेकांपासून लपवित-हसत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत जगत होतो आम्ही
त्यातही कधीमधी तुझ्यात दिसणार्या वाढविकासाच्या खुणा-
तुझा एखादा हुंकार, पालथं होणं, पुढं सरकणं, कधी समजून हसणं…आईबाबा ओळखणं –
क्षणभरच कडाडून अख्खा अंधार उजळीत विजा चमकायच्या…
पण पुन्हा केवळ अंधार…अधिक गडद..अधिक गहिरा
हळूहळू त्या क्षणभराच्या चकाकीला सरावले डोळे आणि नंतरच्या अंधारालाही !
आणि मग सुरू झाली रस्त्यांच्या शोधांसाठी निरंतर प्रयत्नांची पायपीट !
तिथं भेटत राहिले-कधी निराशावादाचे खोल खड्डे,
कधी दैववादी तटस्थ डोंगर-धडपडून थकलेली हताश विकल माणसे,
तळमळून निरंतर वाहणारे प्रवाह तर कधी या अनाहत दु:खाचाच व्यापार करीत पांढरी झालेली उखळं-!
आणि क्वचितच वास्तववादाचा लगाम पकडून दाहीदिशांना चौखूर उधळणारा प्रयत्नवाद-!
दृष्टीच्या त्रिज्येला दिसलेलं-पगाराच्या परीघानं रेखलेलं वर्तुळ…त्याची एक परिक्रमा संपली तेव्हा….
आमच्या काळोखभरल्या आभाळात थोड्याशा चांदण्या लुकलुकत होत्या….मिट्ट काळोखाला सुंदर बनवीत होत्या.
तू उचललेलं प्रत्येक नवं पाऊल, उच्चारलेला प्रत्येक नवा शब्द, भाबड्या चेहेर्यावर उमटलेला प्रत्येक नवा भाव-
आमच्यासाठी प्रत्येक वेळी आनंदाचा नवा धडा शिकवित राहिला.
आनंद कसा भोगावा…हे तू शिकवलंस आम्हाला|
…कोसळलेलं आभाळ आता त्याच्या जागी स्थिर आहे. लुकलुकत्या चांदण्यांच्या आनंदासह….
स्वप्नांचे तुकडे जपून मनाच्या कपाटात ठेवलेले
न जाणो मध्येच एखादा जुळून यायचा म्हणून आता आहे त्या प्रकाशाच्या तुकड्यांना जुळवीत पेरायचंय त्यातलं एखादं तरी स्वप्न तुझ्यात
त्यासाठी-क्षणभरच लकाकून जाणार्या विजांचा प्रकाशही पकडायला शिकतो आहोत आता आम्ही
…निर्मितीच्या मस्तीत जगू पाहणार्या आमच्या गर्वोन्नत बुद्धीला…. बुद्धीच्याच काळोखातला हा प्रकाश…
शोधण्याचं-उजळण्याचं नि जपण्याचं भाग्य आम्हाला देणार्या हे नियंत्या –
अशा सार्याच मातापित्यांना हे भाग्य वाटून दे !