वेदी – लेखांक ७

‘चल ऊठ वेदी, सहा वाजले.’’ त्याच्या छोट्याशा हातांनी माझे गाल पकडत देवजी म्हणायचा. मग मला आठवायचं आणि वाईट वाटायचं…. डॅडीजींचे मोठे गरम हात सकाळी उठवताना माझ्या कपाळावर टेकायचे. डॅडीजी बरेच वेळा मला उठवून जायचे. मग अगदी ऑफिसला जाताना त्यांचा हात कपाळावर टेकायचा तेव्हा स्वप्नात असल्यासारखं वाटायचं. मी उठायचो. ‘‘ऊठ आता. रासमोहनसरांनी उठायची घंटा वाजवलीसुद्धा,’’ माझे गाल पुन्हा ओढत देवजी म्हणायचा.

‘‘मला झोपू दे. माझं स्वप्न अर्धवट राहिलं आहे.’’ मी त्याला म्हणत असे. ‘‘मग डोळस मास्तर तुझी तक्रार करतील रासमोहनसरांकडे. ते कामच आहे त्यांचं.’’ तो म्हणायचा.
मग मी पटकन माझ्या पलंगावरून उतरत असे आणि भराभर सगळं उरकून कपडे बदलून प्रार्थनेच्या रांगेत उभा राहायला कसाबसा पोचत असे आणि प्रार्थनेची घंटा वाजत असे. डोळस मास्तरांच्या मदतीनं आम्ही मराठीतून ख्रिश्चनांची प्रार्थना म्हणत असू. रासमोहनसरांनी शिकवलेल्या प्रार्थना आम्ही इतक्या जोरात म्हणायचो की टॉवरमध्ये उभ्या असलेल्या रासमोहनसरांना आणि त्यांच्याही वर असलेल्या जीझस, मेरी आणि जोसेफ यांनाही त्या ऐकू जात असणार आणि ते ऐकून आम्हाला आशीर्वाद मिळत असणार. कधी कधी आम्हाला मुलींच्या बाजूने जोरात आवाज यायचा आणि आम्ही त्यांच्यापेक्षा जोरात प्रार्थना म्हणायचो. मला प्रार्थना म्हणायला आवडायचं. याच प्रार्थना देवजीनं इंग्रजीतून म्हटलेल्या ऐकल्या होत्या. तो म्हणायचा ‘‘माझ्या मिशनरी ममी – डॅडीच्या चर्चमध्ये ऐकलेल्या प्रार्थना वेगळ्याच वाटायच्या. तिथे ‘व्हेन द सेंटस् गो मार्चिंग इन’ या ओळी ऐकताना वाटायचं देवदूत आपल्याला उचलून नेत आहेत. पण इथे या मराठीतल्या प्रार्थना ऐकताना वाटतं बाथरुममधल्या भुतांसाठी बेडकं गात आहेत. फारच विचित्र वाटतं हे.’’

मुलं न्याहारीहून परत येत असत तेव्हा दाणे, खोबरं, पालक यांचा वास यायचा. हे पदार्थ मला कधीच मिळत नसत. ब्रेकफास्ट नंतर आम्ही आमच्या गाद्या नीट करायचो. झोपायची खोली साफ करायचो. सगळं नीट होतं आहे का ते बघायला डोळस मास्तर असायचे. शाळेच्या तासांची घंटा झाली की आम्ही सकाळच्या तासांसाठी खाली वर्गात जात असू. आम्ही मिस मेरी नावाच्या विद्यार्थिनी शिक्षिकेकडून प्राणी, पक्षी ओळखायला शिकायचो. तिला थोडं दिसत असे. ती चवदा वर्षांची होती. ती माझ्याएवढी असताना शाळेत आली. शाळेत सोय होती तेवढंच म्हणजे चवथीपर्यंत शिकली पण परत जायला घरच नव्हतं तिला आणि करण्यासारखंही काही नव्हतं. म्हणून बाराव्या वर्षी रासमोहनसरांनी तिला शिकाऊ शिक्षिका म्हणून ठेवून घेतलं होतं.

मला खुर्चीत बसायला आवडायचं नाही, माझ्या पायांचं काय करायचं तेच मला कळायचं नाही. मी पाय हलवले की आवाज व्हायचा. मग मिस मेरी मला शहाण्या मुलासारखं गप्प बसायला सांगायची. शिवाय आमच्या वर्गात मुलं एका बाजूला आणि मुली एका बाजूला बसायची. पटकन उडी मारून मुलींच्या भागात परणच्या जवळ जाऊन बसावं असं मला खूपदा वाटायचं. पण अब्दुल म्हणायचा, ‘‘अशा मुलींच्या खोड्या म्हणजे रासमोहनसरांच्या पट्ट्यांचे दोन रट्टे ढुंगणावर आणि दोन हातावर एवढं तरी नक्कीच. त्यांची पट्टी तुझ्या साध्या पट्टीसारखी चपटी आणि हडकुळी नाहीये. चांगली जाड आणि पोलिसांच्या दंडुक्यासारखी आहे.’’
-०-
मला आठवतंय, एकदा मिस मेरीनी माझ्या हातात कसली तरी कापडी, गुबगुबीत, फुगीर वस्तू दिली. ‘‘हे काय आहे वेदी?’’ तिनं विचारलं.
‘‘भुसा भरलेला पक्षी आहे.’’ मी उगीचच म्हणालो. माझं खरं म्हणजे लक्ष नव्हतं. मी ती वस्तू नीट हाताळलीच नव्हती. मी मिस मेरीच्या हाताच्या स्पर्शाबद्दल विचार करत होतो…. तिचे हात कसे मुलायम किंचितसे दमट आहेत पण अब्दुलचे मात्र कोरडे खरखरीत आहेत…. मराठी किती गोड बोलते ती.
माझ्या उत्तराला सगळे हसले.
‘‘बावळटच आहेस. पक्षी तर आहेच पण कुठला आहे ते सांग.’’ अब्दुल मध्येच बोलला.
मिस मेरीनं माझ्या हातातून तो पक्षी घेतला आणि रुबेनच्या हातात दिला. तो अकरा वर्षांचा होता आणि पूर्ण अंध होता. ‘‘हे काय आहे रुबेन?’’ तिनं विचारलं. ‘‘कबुतर आहे मिस मेरी.’’
मग मला मिस मेरीची पावलं परणच्या खुर्चीकडे जाताना ऐकू आली. ‘‘हे काय आहे परण?’’ ‘‘रुबेनचं उत्तर चुकलं. हे तित्तर आहे.’’
मग मला मिस मेरीची पावलं भास्करच्या खुर्चीकडे जाताना ऐकू आली. भास्कर नऊ वर्षांचा होता आणि त्याला थोडं दिसायचं. ‘‘मिस मेरी या सगळ्यांचं चुकलं. हा पारवा आहे.’’ ती माझ्या खुर्चीशी आली आणि तो पक्षी माझ्या पुढे ठेऊन म्हणाली ‘‘वेदी पुन्हा प्रयत्न कर. हा कुठला पक्षी आहे, सांगात येतंय?’’ त्या पक्ष्याला हात न लावता मी म्हणालो, ‘‘मला बाहेर खेळायला जायचंय.’’ ‘‘पण तू आत्ता वर्गात आहेस. कोणता पक्षी आहे ते सांग बरं वेदी !’’ मिस मेरी म्हणाली.
मी ती मऊ, गोलसर वस्तू हातात घेतली आणि नीट हात फिरवून घेतला. त्याला चोच, नखं आणि शेपूट होती. ‘‘ही मैना आहे.’’
सगळे हसले. ‘‘मैना म्हणजे काय? असा काही पक्षी नसतोच.’’ अब्दुल म्हणाला. ‘‘तो बोलणारा पक्षी असतो.’’ सगळे पुन्हा हसले. ‘‘पक्षी मुळी बोलतच नाहीत. मूर्ख कुठला ! घुबडाचा बच्चा आहेस.’’ अब्दुल म्हणाला. ‘‘अब्दुल, घाणेरडं बोलायचं नाही.’’ मिस मेरी त्याला म्हणाली. ‘‘वेदी अजून लहान आहे म्हणून, नाहीतर त्याला बरोबर सांगता आलं असतं.’’ देवजी म्हणाला. ‘‘आमचा नोकर शेरसिंग आहे ना त्यानं मला मैना पक्ष्याबद्दल सांगितलं होतं. मैना त्याच्या खांद्यावर बसून बोलायची.’’ मी सांगितलं.

‘‘तुला गोष्टी छान सांगता येतात.’’ अब्दुलनं चिडवलं. मिस मेरीनं त्याला गप्प बसवलं आणि म्हणाली, ‘‘मला वाटतं रासमोहनसरांनी मला अशा पक्ष्याबद्दल काही तरी सांगितलं होतं. पंजाबमध्ये सापडणारा तो पक्षी काही शब्द बोलतो म्हणे. पण मला त्याचं नाव आठवत नाही. ते असू दे. तुम्ही सगळे हा पक्षी ओळखायला चुकलात. ही चिमणी आहे.’’

त्यानंतर तिनं अजून काही पक्षी हाताळायला दिले आणि त्याबद्दल सांगत राहिली. ‘‘हे कबुतर आहे. ते चिमणीपेक्षा थोडं मोठं असतं. हा पारवा. हा कबुतरापेक्षा गुबगुबीत असतो. ही खेळण्यातली म्हैस आहे. तिची शिंग कशी आहेत ते हात लावून बघा बरं. हे खेळण्यातलं माकड आहे. त्याचे हात लांब आहेत त्याचा उपयोग करून ते झाडांवरून ऊंच झोके घेतं. हा खेळण्यातला हत्ती आहे. पुढच्या बाजूला त्याची सोंड असते त्यामुळे तो लगेच ओळखता येतो.’’
‘‘मला खरा हत्ती बघायचा आहे.’’ मी म्हणालो. ‘‘अंधांना खरा हत्ती कधीच बघता येणार नाही. पण डोळस माणसं जर तुम्हाला म्हणाली की तो बघा हत्ती चाललाय तर तुम्हाला ते काय म्हणताहेत ते कळेल.’’ मिस मेरीनं सांगितलं.
मला ह्या गोष्टीबद्दल तिच्याशी वाद घालायचा होता पण तेवढ्यात आमची जेवणाची घंटा झाली.

जेवणानंतर रासमोहनसर ब्रेल शिकायची घंटा वाजवत. यानंतर आम्ही मेट्रनकडून ब्रेल शिकायचो. मला मेट्रनबाईबद्दल फारशी माहिती नव्हती. फक्त ती मुलींच्या विभागाची ‘डोळस मास्तर’ होती एवढं माहीत होतं. ती त्यांच्या वसतिगृहात झोपायची आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायची. मी मेट्रन हा शब्द कधीच ऐकला नव्हता. त्या शब्दाचा उच्चार ट्रेन सारखा वाटतो याची मला गंमत वाटायची. मला बरेच दिवस वाटायचं की ती लहान असताना माझ्यासारखी ट्रेनमध्ये बसून आली असणार आणि दुसरीकडे कुठे जाता येत नाही म्हणून मिस मेरीसारखी इथेच राहिली असणार.

एकदा मेट्रननी माझ्या हातात एक लाकडी पाटी दिली. ती नेहमीच्या कागदापेक्षा थोडी मोठी होती. त्याला वरच्या बाजूला काही खिळे आणि एक बिजागर्यांनी जोडलेली पट्टी होती. पाटीच्या सगळ्या बाजूनी लहान गोल भोकांच्या ओळी होत्या. भोकं साधारण दोन इंच अंतरावर होती. मेट्रनबाई माझ्या मागून पुढे वाकल्या. त्यांचं पोट गुबगुबीत होतं आणि त्यांच्या साडीतून पुढे आलेलं होतं. त्यांचे हात आखूड होते त्यामुळे पोट जास्तच मोठं वाटत होतं. त्यांना घाम आलेला होता आणि अंगाला कांदा आणि सुपारीचा वास येत होता.

मी त्यांच्या हाताखालून पळायचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला धरून ठेवलं. मग ती पाटी कशी वापरायची ते दाखवू लागल्या. जाडसा ब्रेलपेपर त्या पाटीवर मधोमध कसा बसवायचा, वरच्या दोन खिळ्यांमध्ये अडकवून बिजागरीची पट्टी त्यावर दाबून घट्ट कशी बसवायची ते दाखवलं. मग त्यांनी मला ‘गाईड’ नावाचं काहीतरी दिलं. गाईड म्हणजे दोन धातूच्या पट्ट्या होत्या साधारण दोन इंच रुंद आणि पाटीच्या रुंदीपेक्षा थोड्या लांब. बिजागरीनी त्या एकमेकांना जोडलेल्या होत्या. माझी बोटं हातात घेऊन त्यांनी मला गाईडच्या पुढच्या पट्टीवरच्या तीस भोकांच्या दोन रांगा हाताळायला सांगितल्या. माझ्या बोटाचं टोक त्या भोकांमध्ये बरोबर बसत होतं. गाईडच्या मागच्या पट्टीला तशाच खोलगट गोलांच्या ओळी होत्या. त्यामध्ये सहा ठिपक्यांचे संच होते त्याला सेल म्हणायचं, असं त्यांनी सांगितलं. या दोन्ही पट्ट्या एकावर एक ठेवल्या म्हणजे वरच्या भोकांची फ्रेम बनायची खालच्या सेलसाठी. मग डाव्या बाजूने हे गाईड कागदाला फिट बसवायचे. मागची पट्टी कागदाखाली आणि पुढची पट्टी कागदाच्या वर असं ठेवून डाव्या बाजूच्या खिट्या घट्ट करून गाईड पक्कं करायचं. मग पेपर अगदी नीट घट्ट बसायचा त्या गाईडमध्ये. हा कागद मग पाटीच्या वरच्या भागात बसवायचा.

मग त्यांनी मला स्टाइलस नावाची वस्तू दिली. एका लाकडी गोटीला एक धातूची दांडी लावलेली होती. मी ती गोटी माझ्या बोटांनी धरल्यावर दांडीचं पिन असलेलं टोक खाली झालं. ते टोक गाईडच्या भोकातून आत घालून ब्रेल कागदाला भोकं कशी पाडायची, उजवीकडून सुरवात करून डाव्या हाताच्या बोटानं आधार देत पुढच्या सेलकडे कसं जायचं ते त्यांनी मला दाखवलं.

‘‘आता तू ब्रेल लिपीच्या पहिल्या ओळी लिहायला तयार झाला आहेस. लक्षात ठेव कागदाच्या ज्या बाजूनं ब्रेल वाचतात त्याच्या उलट्या बाजूला तू भोकं पाडतो आहेस. ब्रेल उलट्या बाजूनं लिहिलं जातं. सेलमधले वेगवेगळे ठिपक्यांचे संच म्हणजे एकेक इंग्रजी अक्षर. जेव्हा अक्षरं निवडून तुझ्या दोन ओळी लिहून होतील तेव्हा गाईड खाली सरकवून पाटीवरच्या पुढच्या भोकांमध्ये फिट करायचं. मग तुला पुढच्या ओळी लिहिता येतील.’’ सगळं दाखवत असताना त्या बोलत होत्या. त्यांचा आवाज भरदार होता आणि बोलताना त्या जोराने श्वास घ्यायच्या. पण त्यांचं मराठी कानाला गोड वाटायचं, मिस मेरी सारखं.

मेट्रनबाई पुढे निघून गेल्या आणि मी भोकं पाडून ब्रेल लिपीच्या माझ्या पहिल्या ओळी लिहायला लागलो. स्टाइलसची लाकडी गोटी माझ्या बोटांमध्ये मावत नव्हती. शिवाय भोकं पाडायला एवढा जोर लावावा लागत होता की मी दोन्ही हातात स्टाइलस धरून जवळ जवळ खुर्चीवर उभाच राहात होतो. असं कसं तरी बसून, उभं राहून मी लिहायचा प्रयत्न करत होतो. पाटी टेबलापेक्षा मोठी असल्यामुळे ती पुढे येऊन माझ्या पोटात रुतत होती. मी माझ्या डावा हातही स्टाइलस दाबायला वापरत असल्यामुळे मी स्टाइलसच्या पिनेला दिशा दाखवत नव्हतो. त्यामुळे मी प्रत्येक सेलमध्ये कुठले ठिपके दाबतोय ते मला कळतच नव्हतं.

मग मी गाइडातून कागद सोडवला आणि उलटा केला. ब्रेल बाजू वर करून. मी त्या ब्रेलच्या ठिपक्यांवरून हात फिरवला प्रत्येक ठिपका चांगला सुबक आणि ठसठशीत आला होता. साध्या कागदाला पिनेनी टोचल्यावर जसे वेडेवाकडे ठिपके पडतात तसे नव्हते हे ठिपके. पण या ठिपक्यांचा अर्थ काय ते मात्र मला कळलं नाही. तेवढ्यात मेट्रन म्हणाल्या, ‘‘शाबास वेदी आता तू ब्रेल वाचतो आहेस.’’

मला खूपच आनंद झाला आणि आठवलं….. मी माझ्या डोलणार्या घोड्यावर बसलोय…. मी माझा बाजा तोंडात धरून या टोकापासून त्या टोकापर्यंतचे सूर वाजवतोय…. माझ्या मेकॅनोच्या सेटमधून मी माझी पहिली खेळण्यातली मोटार गाडी तयार केली आहे….

‘‘मुलांनो ज्यांना ब्रेल लिहिता येत नाही त्यांनी कागद गाइडमधून बाहेर काढा.’’ मेट्रन मुलांना सांगत होत्या. ‘‘आता गाईडवरच्या सेलवर बोटं फिरवा. आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे. आता माझ्याबरोबर वरून खाली मोजत जा. पहिला ठिपका, दुसरा ठिपका, तिसरा ठिपका, चवथा ठिपका, पाचवा ठिपका, सहावा ठिपका. हे सहा ठिपके वेगवेगळ्या पद्धतीनं मांडले म्हणजे इंग्रजीची सव्वीस अक्षरं होतात. शिवाय पूर्णविराम, स्वल्पविराम या इतर खुणांसाठीही
ठिपक्यांची मांडणी असते. तशीच नेहमी वापरल्या जाणार्या अँड, फॉर, ऑफ अशा शब्दांच्या कॉन्ट्रॅक्शन खुणेसाठीही ठिपक्यांची मांडणी असते.’’

त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या ‘‘वेदी तुला सांगता येईल कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय ते?’’
‘‘मला काही कळत नाहीये’’ मी म्हणालो.
त्यांनी समजावून सांगितलं आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. ‘‘कॉन्ट्रॅक्शन म्हणजे अँड, फॉर, ऑफ यासारखे छोटे छोटे शब्द.’’ त्यांनी जे सांगितलंय असं मला वाटत होतं तेच बोललो.
‘‘छान. हुशार मुलगा आहेस.’’ त्या मला शाबासकी देत म्हणाल्या, ‘‘चला आता परत लिहा बरं.’’ मी माझा ब्रेल पेपर पुन्हा नीट बसवायचा प्रयत्न केला. खिळ्यात बसवताना कागदाला जी भोकं पडली होती ती जरा मोठी झाली आणि कागद गाईडमध्ये सरकला. त्यामुळे मी नंतर केलेले ठिपके तिरके तिरके जायला लागले आणि मी आधी केलेल्या ठिपक्यांमध्ये मिसळले आणि सगळा गोंधळच झाला.

माझ्या आजूबाजूला लाकूड, धातू आणि कागद यांचे एकत्रित असे भोकं पाडण्याचे आवाज येत होते. स्टाइलसच्या खिळ्यानं गाइडच्या सेलवर केलेले टक टक आवाज, गाईड पट्ट्या पाटीवरून खाली सरकविण्याचे सर सर आवाज, गाईड पट्ट्या घट्ट करण्याचे खटखट आवाज. माझ्या पुढे देवजी होता तो वेगानं लिहीत होता. त्याची टिक टिक मला माझ्या लहान बहिणीच्या उषाच्या इवल्या पावलांच्या आवाजासारखी वाटत होती. डाव्या बाजूने भास्करची टिक टिक जरा थांबून थांबून आल्यासारखी, खुर्चीच्या फ्रेमवरच्या भोकातून वेत विणताना येतो तसा आवाज स्श् स्श्… सटक्. उजव्या बाजूने अब्दुलची टिक टिक, अचानक येणार्या रासमोहन सरांच्या क्लिक क्लिक वाजणार्या पावलांसारखी.

मला आठवलं माझी उमीताई पेन्सिलने वहीत लिहायची तेव्हा येणारा खुसखुस आवाज आणि पॉमीताईचं फाऊंटन पेन कागदावरून सरसर लिहित जायचं त्याचा आवाज, उमीताई वहीची पानं उलटायची त्याचा अगदी पुसटसा गोंजारल्यासारखा येणारा आवाज, पॉमीताई तिच्या पॅडवरचे कागद फाडून काढायची त्याच्या चुरगळ्याचा मंद आवाज.

‘‘मेट्रनबाई मला कागद पेन्सिल हवी आहे. मला उमीताईसारखं लिहायचं आहे.’’ मी ओरडलो. ‘‘अरे भास्करला थोडं दिसतं, तरी त्यालासुद्धा पेन्सिलने कागदावर लिहिता येत नाही. तुला लिहिता येईल असं का वाटलं तुला?’’ मेट्रनबाईंनी विचारलं. ‘‘मला कागद पेन्सिल हवीय.’’ मी ओरडलो आणि गाईड जमिनीवर फेकून दिलं. मी पाटी पण फेकणार होतो पण ती खूप मोठी आणि जड होती.

‘‘तुझी ही पाटी आणि गाईड म्हणजे तुझं नवं खेळणं आहे असं समज. तुला अब्दुलसाठी गुप्त संदेश लिहिता येईल.’’ जमिनीवर पडलेली गाईड पट्टी उचलत मेट्रनबाई म्हणाल्या.
ही कल्पना मला आवडली त्यामुळे मी थोडा वेळ त्या ब्रेल लिहिण्यात गुंतलो. पण थोड्याच वेळात मला कंटाळा आला. मी स्टाइलस टेबलावर टाकलं आणि पाय खाजवत बसून राहिलो.

योग्य वेळी मला ब्रेल लिहिता यायला लागलं. म्हणजे किती दिवस आठवडे, महिने लागले माहीत नाही पण माझं बोट मोठं झालं. माझे हात वाढले. माझी शक्ती वाढली. मग मला पाटीवर कागद नीटच लावता यायला लागला आणि ब्रेलमध्ये अचूक लिहिता यायला लागलं. ठिपक्यांची कोणती मांडणी कोणत्या अक्षरासाठी आहे ते लक्षात ठेवण्यासाठी मी युक्ती केली. मी टेलिफोनच्या नंबरसारखं किंवा घरातल्या लोकांसाठी एक अक्षर असं ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करू लागलो. मी जेव्हा एक, तीन, सहा असे ठिपके टोचायचो तेव्हा मला यू फॉर उमी मिळायचा. जेव्हा एक, दोन, तीन, चार असे ठिपके टोचायचो तेव्हा मिळायचा पॉमीताईचा पी. एक, तीन, चार म्हणजे ममाजींचा एम. मग ब्रेल अक्षरं माझ्या बोटांतून पळत स्टाइलसमध्ये जात तिथून गाईडच्यामधून खाली कागदावर जात आणि साधे साधे इंग्रजी शब्द तयार होत. कॅट, मॅट, सॅट असे.