संवादकीय – फेब्रुवारी २००८

कार्पोरेशनच्या शाळांमधे शिकवणार्या शंभर शिक्षकांपैकी सुमारे पन्नासांना डिस्लेक्सियाबद्दल थोडी, तरी पण योग्य माहिती होती, असं ऐकून मी थक्क झाले. कसं काय? असा प्रश्न विचारता-विचारता थांबले. समोरच्यानं आपणहून उत्तर द्यायला सुरवात केली, पण त्याआधीच मला ते कळलं. तुम्हा सर्वांनाही कळलं असणार. ‘तारे जमींपर’ने ही जादू केली होती. समजून घेण्याची, शिक्षणाची क्षमता कमी असण्याला डिस्लेक्सिया म्हणतात. डिस्लेक्सिया असणार्यांना अक्षरांवर लक्ष केंद्रित करता येत नाही, अक्षरं उलट्या प्रतिमेच्या रूपात लक्षात राहतात. अवघड शब्द जाणून घेताना जास्त वेळ लागतो, वगैरे वगैरे. तशी ही मानसशास्त्रातली संज्ञा आहे.एरवी सर्वांना माहीत असणारी ही बाब नाही. पण आता ती अनेकांना परिचित झाली आहे, ही माध्यमांची ताकद आहे. डिस्लेक्टिक बालकाकडे समजुतीनं, त्याच्या कमतरता जाणून लक्ष द्यावं, अनेकांना कमी अधिक प्रमाणात डिस्लेक्सिया असतो हे या चित्रपटाच्या निमित्तानं समोर आलं- हे तर महत्त्वाचं आहेच, एरवीही मुलांना आपल्या अपेक्षांच्या चाकोरीत घुसमटवून टाकण्यापेक्षा स्वत:च्या पद्धतीनं जगू, वाढू द्यावं हा विचारही त्यातून पुढे येतो.

त्या पलीकडे मानसशास्त्राला अपेक्षित संकल्पनांच्याही थोडं बाहेर येऊन पाहाल तर शिक्षणाची क्षमता कमी असण्याचं एक मोठ्ठं कारण ‘संधी नसणं’ असतं. फरक एवढाच की त्यातला डिस्लेक्सिया त्या संधी नसणारांचा नसून समाजाचा असतो. अडचण एवढीच असते की शिक्षणाची संधी मिळालेल्यांच्या दृष्टीने तो फार मोठा अपराध असतो, आणि तोही संधी नसणारांचाच. असो.

विकलांगत्व शरीराचं असतं, संधींचं असतं तसं संवेदनशीलतेचंही असतं. आणि सर्वात अधिक लक्ष त्याच्याकडे द्यायला हवं कारण आधीच्या विकलांगत्वात परिस्थिती बदलली जावी अशी इच्छा विकलांगांचीही असते, इथे तशी नसते उलट गर्व असतो, वरचढपणाचीच भावना असते. त्याला डिस्लेक्सिया म्हणावं की नाही- हा प्रश्न बाजूला ठेवू, पण असं का? असे प्रश्न मात्र सातत्यानं पडत राहतात, आपल्याला सर्वांना.

रस्त्यारस्त्यावरून धावणार्या शेकडो देखण्या महागड्या गाड्या चालवणार्या आणि त्यात बसणार्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा मिळूनही लाल दिवा म्हणजे थांबा,एवढा साधा नागरी नियम का समजत नाही? काळे पांढरे पट्टे म्हणजे पायी चालणार्यांना रस्ता ओलांडण्यासाठीची जागा हे का उमजत नाही?

भर रस्त्यावर स्त्रियांची छेड काढणं, विनयभंग करणं यासारखे प्रकार सरसहा होत असतात आणि बघे ते निमूटपणे बघत असतात, त्याबद्दल त्यांना खरंच काहीसुद्धा वाटत नाही? संवेदनशीलता, स्मरण, जाणीव आणि विचारांचं वरदान मिळालेल्या मनुष्यजातीत जन्माला आल्याची लाजसुद्धा नाही वाटत?

अरुंधती रॉय ह्या लेखिकेचा ‘लिसनिंग टू ग्रासहॉपर्स’ नावाचा एक विलक्षण धारदार लेख वाचण्यात आला. मनुष्यजातीच्या ह्या संवेदनहीनतेचा अक्षरश: थरारक पण वास्तविक ऐतिहासिक आढावा त्यात घेतलेला आहे. त्या म्हणतात की आपल्याला मिळालेली जागा नेहमीच कुणालाही कमी वाटत असते. त्यामुळे प्रत्येकजण प्रसरणमग्न असतो. साहजिकच जेथे पसरायचं तेथे आधीपासून असणार्यांचे शिरकाण करणे, वंशविच्छेद करणे ओघानेच आले. ह्या पायपसरूपणाला ‘लेबेन्सराऊम’ असा एक खास जर्मन शब्द आहे. ज्याच्याजवळ अधिक ताकद त्यानं अधिक पाय पसरायचेच. आखाती युद्धातील अफगाणिस्थानातली, इराकमधली अमेरिकी अरेरावी हे जागतिक पातळीवरचं उदाहरण. आणि आपल्या आसपासही असे छोटे छोटे वंशविच्छेद घडत आहेतच. नर्मदेची घाटी, समुद्र किनारे, मध्यभारतातील खनिजसंपन्न आदिवासीबहुल क्षेत्रं, नन्दीग्राम, सिंगूर, संसाधन संपन्न जागोजागी उभे राहणारे एस ई झेड ……… इथे वेगळं काय घडतं आहे? आर्थिक प्रगतीचा वेग दहा टक्क्यांच्या आसपास राखून जागतिक महासत्ता बनायचं स्वप्न साधायचं असेल तर हे आवश्यकच आहे ! (आणि एकदा का आपण महासत्ता बनलो की मग……मग बास !)
ही महासत्तेची स्वप्नं पाहणार्यांना विकलांग म्हणायचं की काय? ते विकलांग नाहीत आणि अशिक्षितही.

हे सगळं ठीक आहे, अरुंधती बाईंनी त्यावर लिहावंही, पण पालकनीतीच्या वाचकांना ते कशासाठी? माणूसपण हरवलेल्या ह्या कुतरओढीत आपली मुलं मागं पडू नाहीत,यासाठी त्यांनाही ह्या स्पर्धेत दौडवण्याच्या मागं आपल्यातले बहुसंख्य लागले आहेत म्हणून. स्पर्धेच्या ताणानं मूल कावरंबावरं होतं, त्याची शिकण्याची ताकद हरपते हे सांगून तारे जमींपर पुन्हा स्पर्धेवरच जातो आणि आपणही आपल्या मुलासाठी जास्त गुण खेचणारा क्लास शोधायला निघतो. भरडलं जायचं नसेल तर सुपात रहायचं नाही, तर स्वत:च जातं व्हायचं – हा नव्या युगाचा मंत्र आहे. पण असं होतंच नसतं, बळी तो कान पिळी एवढं एकच सुभाषित प्रत्यक्षात उरतं. संवेदना बधिरतेची ही विकलांगता आपल्या मुलांच्या जीवनाला ग्रासू नये म्हणून आपण सज्ज असायला हवं आहे याची आठवण करून देण्यासाठी.